चांगल्या पुस्तकांच्या वाचनाशिवाय, आपले जीवन अधुरे

Spread the love

कोणत्याही क्षेत्रातील वास्तविक ज्ञान अथवा माहिती मिळवायची असेल तर त्या करिता त्या क्षेत्रातील चांगल्या पुस्तकांचा अभ्यास करणे अतिशय आवश्यक असते. पुस्तके म्हणजे ज्ञाचाची भांडारं असतात. ज्या ज्या लोकांनी चांगल्या पुस्तकांशी मैत्री केली आहे, त्या त्या लोकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पडून, ते लोक त्या ज्ञानप्रकाशात प्रगती पथावर मार्गक्रमण करीत गेल्याचे आपणास दिसून येते. चांगल्या पुस्तकांच्या वाचनाशिवाय कुणीही आजपर्यंत ज्ञानी झालेला नाही, अथवा प्रगती पथावरही गेलेला नाही. पुस्तके वाचणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात काही वेगळेच गुण असल्याचे दिसून येतात. इतर लोकांपेक्षा त्यांच्या जीवनात आणि कार्यातही अधिक पद्धतशीरपणा, टापटीप, कोणतीही गोष्ट विचारपूर्वक तसेच काळजीपूर्वक करण्याची वृत्ती, कोणत्याही गोष्टीच्या परिपूर्णतेच्या हव्यास इत्यादी चांगले गुण दिसून येतात.

reading books can guide you to solve your problems

आपल्या जीवनात अनेकवेळा अनेक समस्या निर्माण होतात. जीवनात आपल्याला अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत आपण काय करावे? त्या परिस्थितीतून आपण कसा मार्ग काढावा? ह्यासंबंधीचे मार्गदर्शन आपल्याला ह्या पुस्तकांच्या वाचनातूनच मिळत असते. अनेकवेळा अडचणीच्या प्रसंगी अथवा संकटकाळी आपले मित्रसुद्धा आपल्याला योग्य तो सल्ला देऊ शकत नाही, किंवा योग्य ते मार्गदर्शन अथवा सहकार्य करू शकत नाहीत, परंतु पुस्तकांचे वाचन करणाऱ्या व्यक्तींना त्या पुस्तकांच्या वाचनातूनच योग्य ते मार्गदर्शन अथवा योग्य तो सल्ला जरूर मिळू शकतो.

reading books can help you through your career and ambition

जीवनात आपल्याला खरे आणि निस्वार्थी मित्र मिळणे अत्यंत कठीण झालेले आहे. ह्याबाबतीत अनेकांची निराशाच होत असते, परंतु चांगली पुस्तके हे आपल्या चांगल्या मित्रांसारखेच असतात. तेच आपल्याला निस्वार्थीपणे चांगले मार्गदर्शन करीत असतात. वेळप्रसंगी आपल्याला ते योग्य तो मार्गही दाखवीत असतात. पुस्तकांसोबतच दैनिक वृत्तपत्रांचे नियमित वाचन केल्यामुळे जगात, आपल्या देशात तसेच आपल्या शहरात रोज काय-काय घडत आहे? ह्याची आपणास माहिती मिळत असते. त्याशिवाय जगामध्ये कितीतरी वेगवेगळे असे अनेक विषय आहेत. आपल्या आवडीच्या काही विषयांचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपण स्वतः त्याबद्दल संशोधन करून अथवा माहिती घेऊन तो विषय परिपूर्ण रीतीने कधीच जाणून घेऊ शकत नाही. अशावेळी आपण त्या-त्या विषयाला संपर्पित झालेले जे विद्वान, अभ्यासक, तज्ज्ञ अथवा संशोधक असतात त्यांनी त्या विषयांवर जे काही ग्रंथ किंवा पुस्तके लिहिलेली असतात, त्या पुस्तकांचा अभ्यास करून त्यांच्या संशोधनाची परिपूर्ण माहिती करून घेऊन आपण आपले त्या विषयातील ज्ञान भांडार समृध्द करण्याचा प्रयत्न करू शकतो.

केवळ पुस्तकांचे वाचन करूनच त्या-त्या विषयातील तज्ज्ञ झालेत, अथवा त्यांनी आपले जीवन सुखी आणि समृध्द केल्याचे आपण पाहात असतो. वाचनामध्ये फार मोठी शक्ती आणि आनंद असतो. त्यामुळे आपल्याला कितीतरी विषयातील नवीन माहिती मिळते. ह्या नवीन माहिती मुळेच आपले जीवन सुखी होऊन आपले व्यक्तिमत्वही प्रभावी होते. विविध ग्रंथांचे वाचन केल्यामुळे आपल्या जीवनातील अनेक समस्या सुटण्यास मदत होते. ह्या गोष्टींची माहिती ग्रंथांचे वाचन करणाऱ्या वाचकांनाच असते.

look for the book shelf when you visit someone's house

ह्यापुढे जेव्हा तुम्ही एखाद्याच्या घरी जाल, तेव्हा त्याठिकाणी तुम्ही हे पहा कि ह्या घरात काही पुस्तके अथवा काही ग्रंथ संग्रह तुमच्या दृष्टीस पडतो काय? ज्या घरांमध्ये ग्रंथ संग्रह दिसून येत नाही, त्या घरातील लोक पैशाने कितीही समृध्द अथवा श्रीमंत असले तरीही त्यांच्याकडे ज्ञानाचे, चांगल्या संस्काराची अथवा बुद्धीमत्तेची समृद्धी अजिबात दिसून येत नाही. त्या परिवारातील जे-जे सदस्य त्या ग्रंथांचे वाचन करतील केवळ त्यांचेच ज्ञान आणि व्यक्तीमत्व इतरांपेक्षा अधिक संस्कारसंपन्न झालेले दिसते. इतर सदस्य केवळ दुरूनच त्या पुस्तकांच्या कपाटाला पाहात असतील तर इतर सदस्यांच्या तुलनेत त्यांचे ज्ञान अथवा त्यांना असलेली माहिती निश्चितपणे कमीच असते, असे समजण्यास हरकत नाही.

वास्तविक पाहता समाजामध्ये धन कमविणे ही काही लोकांकरिता फारच सोपी गोष्ट असते परंतु त्यासोबतच आपल्या आवडीच्या पुस्तकांचे वाचन करून ज्ञान मिळविणे, चांगले संस्कार आपल्या परिवारातील सदस्यांच्या मनावर रुजविणे, तसेच नीतिमत्तेने वागणे ही फारच कठीण गोष्ट आहे. कारण धन कमाविन्याकरिता अनेकांनी आपल्या चांगल्या संस्कारांचा आणि नितीमत्तेचाही बळी दिलेला असतो.

उदा – दाउद इब्राहिम, अरुण गवळी, विजय माल्ल्या, निरव मोदी अशी ही अनेकांची फार मोठी न संपणारी यादी आहे. ज्यांची आपण भ्रष्टचाराच्या संदर्भात नेहमीच वर्तमान पत्रात नावे वाचतो अशी अनेक राजकारणी मंडळी सुद्धा ह्या यादीमध्ये आहेतच. ह्या लोकांकडे एवढी प्रचंड संपत्ती आहे कि त्यांनी गैर मार्गाने गोळा केलेली संपत्ती कुणीही मोजूच शकत नाही. अशा लोकांकडे नितीमत्ता, चांगले संस्कार, चांगले ज्ञान अजिबात नसते. ह्या गोष्टी त्यांच्याकडे असत्या तर त्यांना एवढी प्रचंड संपत्ती कधीच गोळा करताच आली नसती अथवा कोणत्याही गैर मार्गाने त्यांना अशी संपत्ती गोळा करावीशी वाटलीच नसती.

ह्या मंडळींकडे आज कितीही प्रचंड संपत्ती असली तरीही ते आज समाजात निर्वासितांचेच जीवन जगत आहेत, अथवा ते कुठेतरी लपून बसले आहेत. त्यापैकी काही मंडळी तर समाजातून तोंड लपवून विदेशातही पळून गेलेली आहेत. ते जर त्यांच्या जीवनात चांगल्या पुस्तकांच्या संगतीत आले असते, तर कदाचित आज त्यांच्यावर ही वेळच आली नसती. चांगल्या पुस्तकांचे वाचन करून कदाचित त्यांच्यात नितीमत्ता आणि चांगले संस्कार निर्माण झाले असते आणि त्यामुळे पैसे कमविण्याकरिता त्यांनी अशाप्रकारच्या कोणत्याही गैर आणि अवैध मार्गाचा कधीच अवलंब केला नसता.

people who don't read books have lack of knowledge

आजकाल समाजातील जवळपास नव्वद टक्के लोकांना पुस्तके वाचण्याचा अतिशय कंटाळा आहे. वास्तविक पाहता ह्या “ पुस्तक शत्रू ” लोकांना विविध अवांतर गोष्टींच्या वाचनाची मुळात आवडच नसते, परंतु ते इतरांना तसे न सांगता मला पुस्तके वाचायला अजिबात वेळच नाही, असे सांगतात. त्यांना जेवायला, टीव्ही पाहायला, इतर अनेक गोष्टी करायला भरपूर वेळ असतो, परंतु पुस्तके वाचायला त्यांच्याकडे अजिबात वेळच नसतो. त्यांच्या शालेय जीवनातील अथवा महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमाची जी काही पुस्तके वाचून त्यांनी जे काही अल्पसे ज्ञान मिळविले आहे, तीच त्यांची ज्ञान साधना असते. इतर विषयांची त्यांना फारशी माहिती नसते, त्यामुळे समजात वावरतांना त्यांना अनेकवेळा अनेक अडचणी येत असतात. एखादी समस्या निर्माण झाली तर त्या समस्येची सोडवणूक कशी करावी? ह्याची त्यांना अजिबात माहिती नसते. अशावेळी ते हतबल होतात, त्यामुळे शाळेतील अथवा महाविद्यालयातील आपल्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांशिवाय आपण आपल्या आवडीच्या इतरही अनेक चांगल्या पुस्तकांचे वाचन केलेच पाहिजेत.

people who like reading books join the books community or library

आपल्या आवडीची चांगली पुस्तके विकत घ्यायला आपल्याला खरोखरच आर्थिक अडचण असेल तर अशावेळी आपण एखाद्या ग्रंथालयाचे अथवा वाचनालयाचे सदस्य होऊन तेथील अनेक पुस्तकांचा लाभ घेऊ शकतो. तसेच काही प्रकाशक मंडळी विशेष स्टॉल लावून काही विशेष पुस्तके अत्यंत स्वस्तात विकण्याचाही प्रकल्प राबवीत असतात. त्या ठिकाणाहूनही आपण आपल्या आवडीच्या ग्रंथांची खरेदी करू शकतो. काही-काही मंडळींना तर पुस्तकांविषयी चांगलीच आवड असते. ते वेळोवेळी खर्च करून अनेक ग्रंथ विकत घेतात, अशापद्धतीने त्यांचा ग्रंथ संग्रह हळूहळू वाढत जातो. अनेकवेळा तर आपल्या कामाच्या दैनंदिन व्यापात त्यातील अनेक पुस्तके वाचायला त्यांना वेळही मिळत नाही. अशा मंडळींनी पुस्तके वाचण्याकरिता रात्री नऊ ते एक पर्यंतची वेळ काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्यासारखी निवांत वेळ दिवसा कोणतीही नसते.

people who keep books at their home are rich by knowledge

ज्या-ज्या लोकांना पुस्तकांची विशेष आवड आहे त्या-त्या लोकांनी अनेक चांगल्या विषयांवरची पुस्तके विकत घेऊन आपले ज्ञान भांडार किंवा आपल्या घरातील पुस्तकांच्या रॅक्स अथवा पुस्तकांची कपाटे भरलेली आहेत. ही पुस्तकांची कपाटे म्हणजेच त्यांच्या घरातील “खरे वैभव” आहे. ह्या कपाटातील काही मोजकीच चांगली पुस्तके त्यांच्या परिवारातील मंडळींनी वाचली तरीही ते संस्कार संपन्न आणि प्रगल्भ व्यक्तिमत्वाचे होऊन जीवनात निश्चितच प्रगती करतील. ज्या घरामध्ये पुस्तके किंवा पुस्तकांची कपाटे नाहीत त्या घरातील मंडळीत चांगले संस्कार आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पुरेसा विकास झालेला सहसा आढळून येणारच नाही. त्या परिवारातील तरुण निश्चितपणे अप्रगल्भ व्यक्तिमत्वाचे आणि वाईट संस्काराचे निपजतील, म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात चांगली पुस्तके जमविण्याचा प्रयत्न करावा.

if you want to read books, purchase it from a book store

पुस्तकांच्या कपाटाला रद्दीने भरलेली अडचण न समजता हा आपल्या घरातील “ समृद्धीचा ठेवा ” आहे असे समजून हा समृद्धीचा ठेवा सदैव जतन करण्याचा प्रयत्न करावा. आपली पुस्तके चुकूनही कुणाला वाचायला देऊ नये कारण वाचायला दिलेली पुस्तके लोक कधीही परत करीत नसतात. ते जर खरे वाचक असतील तर ते इतरांकडील पुस्तके न घेता त्यांना हवी ती पुस्तके स्वतःच खरेदी करून आपल्या संग्रहात ठेवतील आणि त्यांचे वाचन करतील. इतरांकडून पुस्तके घेणारी मंडळी खरे वाचक नसतात, अशा मंडळींपासून दूर राहूनच आपल्या पुस्तकांचे संरक्षण केले पाहिजे, आणि अशा फुकट्या लोकांनीसुद्धा पुस्तके अशी इतरांकडून मागून न घेता स्वतः विकत घेऊनच वाचली पाहिजे.

विद्यापीठातील मराठीचे एक प्राध्यापक होते. त्यांना वाचनाची अतिशय आवड होती, म्हणून त्यांनी आपल्या तरुण वयापासूनच अनेक चांगल्या आणि दुर्मिळ अशा ग्रंथांचा संग्रह केला होता. ते नंतर सेवानिवृत्त झाले. पुढे त्यांचे वयोमानानुसार निधन झाले. तेव्हा त्यांच्या घरच्या मंडळींनी त्यांच्या त्या जीवापाड जपलेल्या ग्रंथ संग्रहाला अगदी बिनकामाचा रद्दीचा ढिगारा समजून, घरातील तो रद्दीचा ढिगारा, अथवा कचरा साफ करण्याच्या भावनेतून, त्यांची ती अमुल्य ग्रंथ संपदा अगदी पाच रुपये किलोच्या भावाने, दारावर आलेल्या एका रद्दीवाल्याला विकली. तो रद्दीवाला ती सर्व पुस्तके गाडीवर टाकून रस्त्याने नेत असताना आमच्या एका वाचनालय चालविणाऱ्या मित्राला दिसली. तेव्हा त्यांनी त्या राद्दीवाल्याची गाडी थांबवून त्या पुस्तक संदर्भात चौकशी केली. त्यानंतर त्याने त्या राद्दीवाल्याकडून त्याने सांगितलेल्या भावात म्हणजेच पंधरा रुपये किलोप्रमाणे ती सर्व पुस्तके आपल्या वाचनालयासाठी विकत घेतली. बारा वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. त्यावेळी मी त्यांच्या सिडको एम-२, मधील चैतन्य वाचनालयाचा सदस्य होतो. त्यावेळी त्या वाचनालयाचे संचालक असलेल्या दुसाने नावाच्या आमच्या त्या मित्रानेच मला ही गोष्ट सांगितली होती. दोन वर्षापूर्वी दुसाने ह्यांचेही निधन झाले आहे. आता कदाचीत त्यांची ती ग्रंथ संपदा पुन्हा एकदा बेवारस झाली असावी. अत्यंत आवडीने जपलेल्या दुर्मिळ ग्रंथ संग्रहावर अशी वेळ येऊ नये म्हणून पुढील पिढीने सुद्धा आपल्या घरातील दुर्मिळ ग्रंथ संग्रह जपला पाहिजे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दररोज न चुकता अठरा-अठरा तास वाचन करीत होते. त्यांनी आपले लाखो रुपयांची पुस्तके ठेवण्यासाठी मुंबईतील आपल्या “राजगृह” नावाच्या बंगल्यात पुस्तके ठेवण्यासाठी खास व्यवस्था केली होती. विविध आणि चांगल्या विषयांच्या हजारो पुस्तकांचे वाचन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एकमेव पहिल्या प्रतीचे विद्वान झाले होते.   डॉ. बाबासाहेबांनी असे सांगितले होते कि “ वाचाल तर वाचाल ” ह्याचाच अर्थ जो वाचन करेल तोच यशस्वी होईल. त्यांच्यापसून प्रेरणा घेऊन आपण जर केवळ दोन तासही पुस्तकांचे वाचन करू शकलो नाही, तर हे आपले आयुष्यातील फार मोठे दुर्दैव आणि अपयश आहे, असे समजण्यास काहीच हरकत नाही.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!