दहावी, बारावीत अनुत्तीर्ण झाले? हरकत नाही, पुन्हा प्रयत्न करून उत्तीर्ण व्हा

Spread the love

“नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थ्याची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्त्या, ही दि. ३१-०५-२०१८च्या दिव्य मराठी पान नं ३ वर आलेली बातमी वाचून आश्चर्य वाटले.” सांगली जिल्ह्यातील कर्नाळ येथे बुधवार दि. ३० रोजी ही घटना घडली. प्रणव दुष्यंत माने (१८) असे मृताचे नाव आहे. प्रणव हा कस्तुरबा वालचंद कनिष्ट महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी होता. बुधवारी दुपारी दुपारी एक वाजता बारावीचा ऑनलाईन निकाल लागणार होता. मात्र प्रणव याला त्या अगोदरच निकालाचे नैराश्य आले होते. निकाल जाहीर होण्यापूर्वीच प्रणव सकाळी साडे आठ च्या सुमारास घरातून बाहेर पडला. साडे नऊच्या सुमारास प्रणवने कर्नाळ – बिरसू दरम्यान रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.

after failing in 10th or 12th some student commit suicide

दहावी-बारावीच्या वर्गात नापास होण्याच्या भीतीनेच विद्यार्थी आता आत्महत्या करीत आहेत. अशा घटना घडत असल्याचे पाहून पालक वर्गातही आता चिंता व्यक्त होत आहे. नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल लागला. दहावी आणि त्यानंतर बारावीमध्ये उत्तीर्ण होणे ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक फारच महत्वाची घटना असते. ह्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ज्या प्रमाणे अपरिमित आनंद होतो, त्याचप्रमाणे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अपरिमित दुखःही होते. ह्यापूर्वी आयुष्यात त्यांनी एवढ्या अपरिमित दुःखाचा कधीच सामना केलेला नसतो, त्यामुळे ह्या घटनेचा त्यांच्या मनावर गंभीर परिणाम होतो. त्यातूनच मग काही विद्यार्थी-विद्यार्थिनी अत्यंत निराश होऊन आत्महत्याही करतात. अशा प्रकारच्या बातम्या नेहमीच आपल्या वाचनात येतात.

console your child when he fails in examination

अशावेळी पालकांनी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दोष देऊन त्यांची निंदा-नालस्ती करण्यापेक्षा त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त करून त्यांना धीर दिला पाहिजे. कुणाचा एखादा विषय राहतो, कुणाचे दोन किंवा तीन विषय राहतात तर कुणाचे चार किंवा पाचही विषय राहू शकतात. प्रत्येकाची बुद्धीमत्ता वेगवेगळी असते. सर्वच विद्यार्थी पास होतील, हे कसे काय शक्य आहे? अशावेळी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना धीर देऊन, त्यांना चांगले मार्गदर्शन करून, त्यांच्या राहिलेल्या विषयांची पुन्हा एकदा परीक्षा देण्याची आपण त्यांना प्रेरणा दिली पाहिजे. “एकदा नापास झाल्यामुळे विशेष असे काहीच बिघडत नाही. ह्याकरिता पुन्हा एकदा परीक्षा फीस भरावी लागेल आणि राहीलेल्या विषयांचा पुन्हा एकदा अभ्यास करून पुढील परीक्षा द्यावी लागेल. ह्यामुळे फारतर पुढील चार-पाच महिनेच वाया जातील.” असे सांगून त्या विद्यार्थ्यांना आपण धीर दिला पाहिजे.

अनुत्तीर्ण झाल्याबद्दल आपण त्याला दोष दिला अथवा त्याची निंदा-नालस्ती केली तर त्याचा धीर खचून, निराश होऊन कदाचित तो आत्महत्याही करेल त्यामुळे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी याबाबतीत अगोदरपासुनच विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. “नापास झालास तर पुन्हा परीक्षा देण्याची तयारी ठेव”, असे त्याला निकालाच्या आधीच पालकांनी सांगितले पाहिजे.

after failing instead of getting depressed start studying for the re examination

अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनीसुद्धा ह्याबाबतीत सकारात्मक विचार ठेऊन, शांतपणे आलेल्या परिस्थितीला धैर्यपूर्वक सामोरे गेले पाहिजे. अनुत्तीर्ण झाल्यामुळे निराश न होता पुन्हा एकदा परीक्षेचा फॉर्म भरून, अभ्यासाचे काटेकोरपणे नियोजन करून, पुढील परीक्षेत निश्चितपणे उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अनुत्तीर्ण झाल्यामुळे आपले फार मोठे नुकसान झाले आहे, असे त्यांनी अजिबात न समजता आपल्या आयुष्यातील पुढील फक्त चार-सहा महिनेच वाया गेलेत, असेच त्यांनी समजले पाहिजेत.

केवळ वाया जाणाऱ्या चार-सहा महिन्यांसाठी त्यांनी आत्महत्या करून आपले पूर्ण जीवन वाया घालवू नये. त्याऐवजी त्यांनी आपल्या राहिलेल्या विषयांच्या अभ्यासाची पुन्हा एकदा नव्या जोमाने तयारी करावी. पास होईपर्यंत एकदाच काय तर दोनवेळा-तीनवेळा अथवा कितीही वेळा, परीक्षा देण्याची त्यांनी मानसिक तयारी ठेवावी. पुढील परीक्षेत आपल्या राहिलेल्या विषयात आपण अधीक चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ, अशी त्यांनी उत्तीर्ण होईपर्यंत आशा बाळगावी. कुठल्याही परिस्थितीत धीर सोडून आत्महत्या करू नये. प्रयत्न आणि परिश्रम केले तर जीवनात आपल्याला सहजपणे यश मिळविता येते.

जीवनात आपल्याला अजून फार पुढे जायचे आहे. जीवनात पुढे जाताना अनेकवेळा यश मिळेल तर कधी कधी अपयशही मिळेल. अशावेळी ह्या अपयशाचा सामना करून आपण अधीक जोमाने पुढे जाण्याचा निश्चय केला पाहिजे. कोणत्याही अपयशाने पराभूत अथवा निराश होऊन आत्महत्या करणे हा त्यावर कधीच उपाय होऊ शकत नाही. म्हणून, “अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनो, मनाचा निश्चय करा आणि पुन्हा एकदाच नव्हे तर अनेकवेळा वारंवार प्रयत्न करा, त्यामुळे तुम्हाला नक्कीच यश मिळेल, ह्याची खात्री बाळगा.”

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

2 thoughts on “दहावी, बारावीत अनुत्तीर्ण झाले? हरकत नाही, पुन्हा प्रयत्न करून उत्तीर्ण व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!