खरी मैत्री, कशी असते?

Spread the love

 कुणालाही वाटते की, आपल्याला अनेक मित्र असावेत. मित्र असण्याचे खूप फायदे असतात. त्या सर्वांमध्ये काही ना काही तरी वेग-वेगळी विशेषत: असते. त्यांच्यातील त्या चांगल्या गुणांचा, त्यांच्या मार्गदर्शनाचा अथवा त्यांच्या विविध प्रकारच्या सहकार्याचा आपल्याला चांगलाच फायदा होऊ शकतो.

make new friends and be their friend

 एखादी महत्वाची गोष्ट आपल्याला माहिती नसते, परंतु त्या गोष्टीचा माहितगार असलेल्या आपल्या एखाद्या मित्राला आपण त्या बद्दल सल्ला विचारू शकतो. अशाप्रकारच्या अनेक क्षेत्रातील आपल्या मित्रांमुळे आपले बरेचसे काम सोपे होऊ शकते. ज्या प्रमाणे विविध क्षेत्रातील लोक आपले मित्र असावेत, असे आपल्याला वाटते त्याचप्रमाणे आपणही त्या सर्वांचे खऱ्या अर्थाने मित्र झालो पाहिजे. आपणही आपल्या त्या मित्रांना वेळप्रसंगी शक्य ती मदत व सहकार्य केलेच पाहिजे. आपण केवळ इतरांचेच सहकार्य घेण्याचे लक्ष ठेवले, आणि त्यांना कधी आपली गरज पडली तर आपण त्यांना सहकार्य केलेच नाही तर त्यांच्यासोबत खऱ्या अर्थाने आपली मैत्री कधीच राहू शकणार नाही. एवढेच नाही तर आपल्याला मदत किंवा सहकार्य करणारे आपले जे कुणी मित्र आहेत, त्यांच्या प्रती आपण कृतज्ञता पूर्वक आभार व्यक्त केले पाहिजेत.

try to avoid fake friends

 बऱ्याच वेळा तर असे होते की, जे आपल्याला कधीच साधी ओळखही दाखवत नाहीत ते लोक सुद्धा गरज पडली तर, मैत्रीचे नाते दाखवून आपल्याला चिकटण्याचा प्रयत्न करतात. असे न होता, सुरवातीपासूनच आपण आपल्या सर्वच मित्रांना आपल्या संपर्कात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजेत. त्यांनी विशेष अशा एखाद्या क्षेत्रात प्राविण्य मिळविले अथवा यश मिळविले तर आपण त्याबद्दल त्यांचे खास अभिनंदन करून कौतुक केले पाहिजे. त्यांचा वाढदिवस लक्षात ठेवून आपण त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत. यांच्या सुख-दु:खाच्या प्रसंगी आपल्याला त्यांच्यात सहभागी होण्याची संधी मिळाली तर आपण निश्चितच त्यांच्या सुख-दु:खातही सह्भागी झाले पाहिजे.

 आपले मित्र आजारी असतील तर त्यांना घरी किंवा रुग्णालयात जाऊन आपण त्यांना भेटलेच पाहिजे. त्यांना काही मदतीची गरज असेल तर तशी मदत करण्याचीही तयारी दाखवून आपण त्यांना वेळप्रसंगी शक्य ती मदतही केलीच पाहिजे. जे व्यक्ती वेळप्रसंगी मित्राकरिता स्वतः काहीतरी झळ सहन करतील, तर त्याबद्दल त्यांचे मित्रही त्यांची निश्चितपणे कृतज्ञतेने आठवण ठेवून, त्यांनाही वेळप्रसंगी मदत किंवा सहकार्य करण्याचा प्रयत्न करतील.

 मैत्रीची भावना ही दोन्ही मित्रांकडून सारख्याच प्रमाणात असावी. एक मित्र मैत्रीची भावना ठेवीत असेल आणि दुसरा त्याला टाळण्याच्याच प्रयत्न करीत असेल, तर अशा मित्रांमध्ये कधीच मैत्री होणार नाही. झाली तरीही ती मैत्री कधीच टिकणारही नाही.

 मैत्री ही समान दर्जाच्या व्यक्तींमध्येच असावी. कोणत्याही बाबतीत त्यांचा दर्जा जर सारखा नसेल, म्हणजेच एक मित्र श्रीमंत असेल आणि दुसरा मित्र अत्यंत गरीब असेल, तर त्यांच्यामध्ये कधीच मैत्री होणार नाही. एक फार ज्ञानी असेल आणि दुसरा मूर्ख असेल तर त्यांच्यातही कधीच मैत्री होणार नाही. मैत्री ही नेहमीच समान दर्जाच्या, समान आवड असणाऱ्या, समान वयोमान असणाऱ्या मित्रांमध्येच होत असते, आणि अशाच मित्रांमधीलच मैत्री नेहमी टिकतही असते.

 एखादा व्यक्ती आपल्या अत्यंत कामाचा आहे, म्हणून आपल्या कामासाठी मुद्दामच त्याच्यावर तुमच्या मैत्रीचे जाळे फेकण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. मैत्री ही अगदी सहजपणे कळत-नकळतच होत असते. दोन व्यक्ती कोणत्याही कारणास्तव त्यांच्या कामानिमित्त एकत्र आल्या, त्यांचे स्वभाव गुणधर्म एकमेकांशी जुळले तर, आणि त्यांनी एकमेकांना मनापासून सहकार्य व शक्य ती मदत केली तरच त्यांची मैत्री ही कायमस्वरूपी जुळते, तसेच अखंडपणे टिकतेही.

with the time the number of your friends keeps increasing

 वेळप्रसंगी तसेच वयपरत्वे अनेक ठिकाणी आपल्याला अनेक मित्र भेटत असतात. बालपणातील आपल्यासोबत खेळणारे आपले बालपणीचे घराशेजारील मित्र, शाळेतील अथवा वर्गातील आपले मित्र, हायस्कूल मधील मित्र, महाविद्यालयातील आपले मित्र, नोकरी अथवा व्यवसायातील भेटी-गाठीमुळे तयार झालेले नवीन मित्र, अशा अनेक ठिकाणाहून आपल्याला सतत वेळप्रसंगानुसार अनेक मित्र मिळतच असतात. जुन्या मित्रांचा आपल्याला वयोमानानुसार तसेच क्षेत्र बदल झाल्यामुळे हळू-हळू विसरही पडत जातो. नवीन-नवीन मित्रांमध्ये आपण सतत वेळप्रसंगानुसार हळू-हळू गुंततही जातो.

 अशावेळी, जास्तीत-जास्त लोक आपले मित्र झाले पाहिजेत, त्या दृष्टीने आपले इतरांशी संबंध असावेत. आजकाल अनेक लोक इतरांशी चांगले संबंध बनविण्यास असमर्थ ठरत आहेत. नवीन लोकांच्या भेटी घेणे किंवा स्वतः होऊन त्यांच्याशी संपर्क साधून संभाषण करणे ह्यामध्ये लोकांना फारच संकोच वाटतो. ज्यांना आपले मित्र मोठ्या संख्येने वाढवायचे आहेत, त्यांनी स्वतः होऊन अनेक लोकांशी संपर्क साधून संभाषण केले पाहीजे. ह्यामुळे त्यांचे अनेक लोकांशी संबंध वाढून, त्यांची अनेकांशी मैत्री होऊ शकते.

some people try to avoid friends and their relatives

 अनेकांचे आपल्या नातेवाईकांशीसुद्धा फारसे चांगले संबंध नसतात. तसेच त्यांचे परिचित असेलेले लोकही त्यांच्याशी फारसे चांगले संबंध ठेवीत नाहीत. असे लोक त्यांच्याबद्दल आपल्या नातेवाईकांना तसेच परिचित मंडळींनाही विविध कारणांवरून दुषणे देत असतात. आपल्या परिचित मित्र-मंडळींच्या संदर्भात बोलतांनासुद्धा ते म्हणतात की, “मला मित्र आणि अनेक नातेवाईकही आहेत, परंतु गरज पडली तर त्यापैकी कुणीही वेळेवर आपल्या कामात येत नाहीत… वगैरे वगैरे”.

 वास्तविक पाहाता आपण इतरांच्या अडी-अडचणीत त्यांना सहकार्य केले तरच ते मित्रही कधीतरी आपल्या उपयोगी पडतील, अन्यथा ते आपल्याला सहकार्य करण्याची अजिबात अपेक्षाच नसते. त्याचप्रमाणे कुणी नातेवाईक सुद्धा कधीतरी आपल्या कामात पडतील, अशी आपण आपल्या नातेवाईकांकडूनही कधीच अपेक्षा ठेवू नये.

avoid discussing your personal matters to the people

 मित्र असो अथवा आपले कुणी नातेवाईक असो, त्यांच्यासोबत आपण फक्त आपल्या सुख-दु:खाच्या चर्चा, त्यासुद्धा एका ठरविक मर्यादेपर्यंतच सावधपणे कराव्यात. अधिक सविस्तर अथवा खाजगी स्वरूपातील आपल्या परिवारातील गोष्टी त्यांच्यापर्यंत सहसा कधीही जाऊ देऊ नयेत. ह्यामुळे आपला फारसा काही फायदा तर होतच नाही, उलट आपल्या दु:खदायक अशा खाजगी गोष्टी मात्र इतरांना कळू लागतात, आणि त्यामुळे त्यांना मनातून आनंदही होतो. आजकाल दुसऱ्यांना अडचणीत पाहून आनंद होणाऱ्यांची संख्या जास्त असते. अशा लोकांची आपल्याला कधीच खरी सहानुभूती नसते.

 आजकाल आपला अनेकांशी परिचय होत असतो. हा परिचय बहुधा तात्पुरत्या स्वरूपातीलच असतो. कुणीतरी आपल्याला कधीतरी, कोणत्यातरी कामानिमित्त भेटतो, त्यानंतर त्याची पुन्हा कधीतरी भेट होईलच, अशी सहसा शक्यताही नसते. तर कुणीतरी व्यक्ती आपल्याला अधूनमधून कोणत्यातरी कार्यानिमित्त सतत भेटतच राहातो. त्याच्याशी आपण थोडे अधिकच बोलायला लागतो. थोडा अधिक परिचय झाल्यानंतर आपण इतरांना त्यांचा परिचय देतांना असे म्हणतो की, “हे माझे मित्र आहेत!”, परंतु वास्तवात ते आपले मित्र कधीच नसतात. खरे मित्र असे सहजपणे रस्त्यावर कधीच सापडत नसतात.

 मैत्री ही एक अत्यंत  दुर्मिळ अशी गोष्ट असते. ती सहसा कुणालाही सहजपणे लाभत नसते. जो आपला खरोखरच मित्र असतो, तो जेव्हा आपल्याला भेटतो तेव्हा त्याचे आणि आपले विचार जुळतात. त्याला आपले म्हणणे पटते, तसेच त्याचे म्हणणेही आपल्याला पटते. आपल्या मनात त्याच्याबद्दल एक वेगळ्याच प्रकारची जिव्हाळ्याची भावना आणि सहानुभूती निर्माण होते. तसेच त्याच्याही मनात आपल्याबद्दल तशीच भावना आणि सहानुभूती निर्माण होते. त्याला जर एखाद्या गोष्टीचे दु:ख झाले असेल, तर त्या गोष्टीचे तेवढेच दु:ख आपल्यालाही होत असेल, तर आपण खरोखरच त्या व्यक्तीचे मित्र आहोत, असे समजायला हरकत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला एखाद्या गोष्टीचे दु:ख झाले तर त्यालाही त्या गोष्टीचे तेवढेच दु:ख होत असेल तर तुम्हाला तुमचा खरा मित्र मिळाला आहे, असे समजायला काहीच हरकत नाही.

always help your friend when they need your help

 एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होणे, ह्यालाच तर आपण खरी मैत्री म्हणू शकतो. आपला मित्र आपल्या दु:खात मनापासून सहभागी होण्याकरिता आला असेल आणि आपण मात्र त्याच्या दु:खात मनापासून सह्भागी न होता, आपण आपल्या इतर कामामध्येच गुंतून राहाण्याकरिता परस्पर न सांगताच निघून गेलो असेल, अथवा त्यावेळी आपण आपल्या मित्राच्या दु:खात सहभागी होण्यास आपला काही वेळ देण्याकरिता टाळाटाळ केली असेल, तर तुमची मैत्री पाहिजे तेवढी घट्ट नाही, असाच त्याचा अर्थ होतो.

 आपल्या मित्राला काही अडी-अडचण आली असेल, तर त्याच्या अडी-अडचणीत आपण त्याला शक्य ती मदत किंवा सहकार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्राच्या अडी-अडचणीत आपण त्याला मदत करणे, हे आपली त्याच्याशी खरी मैत्री असल्याचाच पुरावा असतो. अशावेळी नंतर त्या मदतीची जाणीव ठेवून तो मित्र सुद्धा आपल्या अडी-अडचणीच्या वेळी आपल्याला निश्चितपणे अगदी आनंदाने मदत करील.

 आपल्या मित्राला जर एखादी अडी-अडचण आली आणि त्यावेळी आपण त्याला मदत करण्यास ठामपणे नकार दिला असेल, तर आपली त्याच्याशी अजिबात मैत्री नाही, हीच गोष्ट आपण त्याला त्यावेळी दर्शवित असतो. आपण त्याच्या अडी-अडचणीत त्याला मदत  करू शकलो, तर त्याचे आपण खास मित्र आहोत, हे आपण त्यावेळी सिध्द करीत असतो.

 आयुष्यात आपल्या खऱ्या मैत्रीचा पुरावा आपल्या मित्राला देण्याची वेळ क्वचित एखाद्याच प्रसंगी येवू शकते. त्या प्रसंगी आपण त्याची मदत करून ती वेळ सांभाळण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलाच पाहिजे.

 मैत्री संदर्भात आपण इतिहासातील काही गोष्टींचे अवलोकन करूया!

 सध्याच्या काळात अतिशय श्रीमंत आणि अतिशय गरीब व्यक्तीची कधीच मैत्री होऊ शकत नसल्याचे आपणास पाहायला मिळते. परंतु इतिहासातील कृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीची गोष्ट काहीतरी वेगळीच आहे.

 श्रीकृष्ण आणि सुदामा बालपणी त्यांच्या गुरूकडे आश्रमात एकत्र शिकायला होते. पुढे श्रीकृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि सुदामा भिक्षुकी करू लागला. सुदामाची अवस्था अत्यंत हलाखिची आणि दारिद्र्याची होती. त्या दारिद्र्याला कंटाळून सुदामाच्या पत्नीने एके दिवशी सुदामाला सांगितले की, “तुमचा बालमित्र द्वारकेचा राजा झालेला आहे. त्याच्याकडे जाऊन तुम्ही काहीतरी मदत मागा.”

 सुदामा मोठ्या अनीश्चेने आणि संकोचाने  द्वारकेला गेला. आपल्या बालमित्राला पाहून श्रीकृष्णाला अतिशय आनंद झाला. त्याने सुदामाला आपल्या आसनावर बसविले. त्याचे स्वतःच्या हाताने पाय धुवून सुदामाचा आदर सत्कार केला. सुदामाचे दारिद्र्य पाहून श्रीकृष्ण त्याच्या गळ्यात पडून रडला. श्रीकृष्णाने सुदामाला भरपूर मदत करून त्याचे दारिद्र्य संपविले.

 सांगायचे तात्पर्य असे की, आपल्या गरीब मित्राचे दु:ख आणि दारिद्र्य पाहून दुसऱ्या मित्राच्या डोळ्यातही पाणी येत असेल, तर ती निश्चितपणे खरी मैत्री असते. आत्ताच्या काळात कुणी श्रीमंत व्यक्ती आपल्या गरीब बालमित्राला साधी ओळखही दाखविणार नाही, मग मदतीची तर गोष्टच सोडा.

 अशीच इतिहासातील एक कर्ण आणि दुर्योधनाच्या मैत्रीचीही गोष्ट आहे. सुतपुत्र असलेल्या कर्णाला एका अटी-तटीच्या प्रंसगी पाच पांडवांच्या विरोधात युद्धकलेच्या स्पर्धेत सहभागी होण्यापासून वंचित होण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा दुर्योधनाने कर्णाला आपल्या अखत्यारीत असलेल्या अंगदेशाचा राजा बनविले होते. त्याची परत फेड अथवा भरपाई म्हणून कृतज्ञतेच्या आणि मैत्रीच्या भावनेतून कर्णाने आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत दुर्योधनाशी मैत्री ठेऊन त्याला पाडवांच्या विरोधात मदतच केली होती.

 पांडवांच्या विरोधातील दुर्योधनाची बाजू नेहमीच अन्यायाची होती. तरीही कर्ण मैत्री आणि कृतज्ञतेच्या भावनेतून दुर्योधनाला सतत मदतच करीत होता.

 वास्तविक पाहाता आपल्या मित्राचे कुठे जर काही चुकत असेल, तर त्याची चूक त्याला दाखवून देणे तसेच ती चूक दुरुस्त करावयास सांगणे, हेच खऱ्या मैत्रीचे लक्षण असते. परतू कर्णाने शेवटपर्यंत असे काहीही केलेले नाही. दुर्योधनाची चूक त्याला कधीच दाखवून दिली नाही. उलट तो शेवटपर्यंत कृतज्ञता आणि मैत्रीच्या भावनेतून दुर्योधनाच्या बाजूने उभा राहून दुर्योधनाला अन्यायकारक कामामध्ये मदतच करीत राहिला. हे काही खऱ्या मैत्रीचे लक्षण नाही.

 आपला मित्र काही चूक करीत असेल तर त्याला वाईट जरी वाटले तरीही आपण त्याची चूक त्याला दाखवून ती चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हेच खऱ्या मित्राचे लक्षण असते.

 आजकाल अनेक लोक म्हणतात की, “मला कुणीही खरा मित्र नाही, मला कुणीही मदत करीत नाही”, परंतु असे म्हणण्या अगोदर त्या व्यक्तींनी विचार केला पाहिजे की, आपण तरी कुणाचे खरे मित्र आहोत काय? कुणाला त्यांच्या मदतीची कधी गरज पडली असेल, तर त्यावेळी त्यांनी त्यांच्या त्या मित्राला अगदी निरपेक्ष भावनेने कधी मदत केली आहे काय? आपण दुसऱ्यांना त्यांच्या अडी-अडचणीत निरपेक्ष भावनेने मदत करीत गेलो तर कदाचित ते लोकसुद्धा आपल्याला अडी-अडचणीच्या वेळी निरपेक्ष भावनेने मदत करू लागतील.

 ह्यामध्ये कधी-कधी असेही होते की, आपण कुणालातरी अडी-अडचणीच्या वेळी निरपेक्ष भावनेने त्यांना मदत करतो, परंतु आपल्याला गरज पडली तर ते लोक आपल्याला अजिबात कधीच मदत करीत नाहीत. एवढेच काय तर आपण त्यांना केलेल्या मदतीचा सुद्धा त्यांना विसर पडतो.

 प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेग-वेगळा असतो. कुणी आपल्याला अडी-अडचणीच्या वेळी मदत करो, अथवा न करो, आपण मात्र जसे जमेल तसे इतरांना शक्यतो मदत करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलाच पाहिजे.

 जेव्हा तुम्ही दहा लोकांना निरपेक्षपणे मदत कराल, तेव्हा त्यातील नऊ लोक कदाचित तुम्ही केलेल्या मदतीची अजिबात जाणीवही ठेवणार नाहीत, परंतु त्यापैकी एक जण मात्र तुमच्या मदतीची निश्चितपणे जाणीव ठेवून, त्याबद्दल तो तुमच्याशी कृतज्ञ राहील. वेळप्रसंगी तोच तुमच्या अडी-अडचणीच्या वेळी अथवा तुमच्या सुख-दु:खाच्या वेळी तुमच्या मदतीकरिता धावून येईल. त्या तुमच्या एका खऱ्या मित्राचा शोध घेण्याकरिता मात्र तुम्हाला कमीत-कमी दहा लोकांना मदत करावीच लागेल. तरच त्यातुन तुम्हाला तुमचा एक खरा मित्र मिळून, नऊ लोक मात्र तुमच्याशी कृतघ्न असल्याची तुम्हाला जाणीव होईल.

 एक गोष्ट मात्र लक्षात घ्यावी लागेल की, अत्यंत स्वार्थी आणि इतरांना कधीही कोणतीही मदत न करणाऱ्या व्यक्तीला कधीच खरे मित्र मिळत नाहीत. तसेच इतरांनी आपल्याला मदत केली तरीही त्या मदतीची काहीच जाणीव न ठेवता, अथवा त्या मदत करणाऱ्या मित्राला वेळप्रसंगी गरज पडल्यास काहीही मदत न करता, वेळोवेळी केवळ मैत्रीच्या पोकळ गप्पा मारणाऱ्या खोट्या मित्रालासुद्धा खरे मित्र कधीच मिळणार नाहीत.

 कुणाला तरी आपले दु:ख सांगितल्यामुळे ते दु:ख हलके होते, असे म्हणतात. बऱ्याचवेळा आपल्याकडे सांगण्यासारखी काहीतरी विशेष गोष्ट असते. त्या बाबतीत आपल्याला कुणाचा तरी खरा सल्ला घ्यायचा असतो, आपल्याला दुसऱ्या कोणत्यातरी अत्यंत जवळच्या परंतु अत्यंत विश्वासू व्यक्तीसोबतच खास चर्चाही करायची असते. त्या व्यक्तीजवळ आपल्याला आपले मन मोकळे करता आले पाहिजे. त्याच्याजवळ आपल्याला आपल्या मनातली गोष्ट सांगता आली पाहिजे. त्याच्याजवळ आपल्याला हसता आले पाहिजे तसेच त्याला आपले दु:ख सांगून रडताही आले पाहिजे. आपल्या दु:खासंदर्भात त्याच्याशी चर्चा करून आपल्याला त्याचा सल्लाही घेता आला पाहिजे. असा आपला एखादा मित्र असणे फार आवश्यक आहे.

 खर तर आपण समाजात वावरतांना आपल्या चेहऱ्यावर खोटे मुखवटे लावूनच आपण वावरत असतो. आपण वरून इतरांना अगदी आनंदात असल्याचे दाखवितो, परंतु आपल्या मनात किती वेदना आहेत? किती दु:ख आहे? आपल्याला किती

अडचणी आहेत? हे आपण इतरांना कधीही मन मोकळेपणाने सांगूच शकत नाही.

 हे सर्व सांगण्यासाठी आपल्याला एखादा खरा मित्र असेल तर, आपण खरोखरच अत्यंत भाग्यशाली आहोत, असे समजायला काहीच हरकत नाही. ज्याच्यावर विश्वास ठेवून ह्या गोष्टी तुम्ही ज्याला सांगू शकाल तोच व्यक्ती कदाचित तुमचा खरा मित्रही असू शकेल.

 आयुष्यात प्रत्येकाला खरे आणि चांगले मित्र असावेत, परंतु खरे आणि चांगले मित्र मिळणे हीच एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. अनेकांना शक्य ते प्रेम देऊन, त्यांच्याशी मैत्री आणि सहानुभूती दर्शवून, त्यांना शक्य ती मदत व सर्वोतोपरी सहकार्य केल्यानंतर कदाचित, त्यातीलच एखाद्या मित्राच्या मैत्रीचा वृक्ष वाढीस लागून त्याच्या फुलांचा सुगंध दोघांच्याही जीवनात सगळीकडे दरवळू लागेल, त्यावेळेसच कदाचित आपल्याला आपला खरा मित्र मिळाला आहे, असे म्हणता येईल.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

One thought on “खरी मैत्री, कशी असते?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!