“खरे प्रेम असते तरी कसे ?”

Spread the love

संत कबीर म्हणतात, ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय !”

मुद्दा क्र. – १

आपल्या जवळच्या संपर्कातील लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे, चांगले वागवावे, त्यांनी आपल्यावर प्रेम करावे, असं प्रत्येकालाच वाटत असते, परंतु त्याकरिता आपणही त्या लोकांना चांगले म्हणावे, तसेच त्यांच्याशी आपुलकी ठेऊन प्रेमाने वागून, त्यांच्यासोबत चांगले बोलणेही अत्यंत आवश्यक असते.

तुम्ही इतरांना कधीच चांगले म्हणणार नाही, इतरांशी कधीच चांगले बोलणार नाही, इतरांबद्दल आदराची, जिव्हाळ्याची, आपुलकीची, प्रेमाची भावना बाळगणारच नाही, तर इतर लोकही तुमच्या बाबतीत तशी भावना कशी काय ठेवतील?

अशी एक म्हण आहे की, “प्रेमाने जग जिंकता येते !”

आता प्रेम म्हणजे काय? प्रेम करण्याची इच्छा ठेवणाऱ्या प्रत्येकाने हा लेख वाचलाच पाहिजे.

प्रेम, हा एक फारच मोठा आणि अत्यंत कठीण असा विषय आहे. ह्या विषयावर गेल्या हजारो वर्षात अनेकांनी संशोधन  करण्याचा किंवा ह्या विषयाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, प्रेम ह्या विषयावर, अनेक कविता, कथा, कादंबऱ्या, नाटक, चित्रपट इत्यादी तयार करण्यात आले आहेत. तरीही अजूनपर्यंत हा विषय कुणालाही पूर्णपणे कधीच कळलेला नाही. प्रेमासाठी अनेक लोक अगदी सहजपणे स्वत:चा जीव देतात, तसेच दुसऱ्याचा जीवही घेतात, तरीही त्यांना खरे प्रेम सहसा कधीच प्राप्त होत नाही. हे एक वास्तव सत्य आहे.

ह्या लेखामध्ये आज मी तुम्हाला प्रेमासाठी स्वत: जीव देणाऱ्यांचा तसेच दुसऱ्यांचा जीव घेणाऱ्यांचाही परिचय करून देणार आहे.

तसं पाहाता, इतरांप्रमाणेच मलाही हा विषय अजूनही कळलेला नाही, तरीही ह्या विषयावर आज आपल्यासमोर ह्या लेखाद्वारे काही तरी मनोगत व्यक्त करण्याचे मी ठरविले आहे.

मुद्दा क्र. – २

प्रेम म्हणजे काय? आणि त्याची व्यक्तीसापेक्ष अनेकांसोबत कशी काय विभागणी करता येईल?

आपल्या आजोबा-आजींवरील प्रेम, आपल्या नातवांवरील प्रेम, आपल्या आई-वडिलांवरील प्रेम, आपल्या भावा-बहिणींवरील प्रेम, आपल्या मुला-मुलींवरील प्रेम, आपल्या पती-पत्नीवरील प्रेम, आपल्या मित्र-मैत्रीणींवरील प्रेम, आपल्या प्रियकर-प्रेयसीवरील प्रेम, शक्य झाल्यास आपल्या पती किंवा पत्नीशिवाय इतर स्त्री किंवा पुरुषावरील अनैतिक प्रेम, आपल्या इतर नातेवाईकांवरील प्रेम, आपल्या जवळच्या संपर्कातील तसेच संपर्काबाहेरील इतर व्यक्तींवरील प्रेम, असे प्रेमाचे व्यक्तीसापेक्ष असे अनेक प्रकार आहेत.

त्यातीलच काही प्रकार आपण पाहू.

मुद्दा क्र. – ३

जेव्हा इतरांवर निरपेक्षपणे, निस्वार्थीपणे, कशाचीही अपेक्षा न ठेवता प्रेम केल्या जाते, तेव्हा तेच खरे प्रेम असते असे म्हणतात.

खऱ्या प्रेमामध्ये भावना असते. ह्यामध्ये स्वतः काहीतरी झळ सहन करूनही आपल्या प्रिय व्यक्तीकरिता काहीतरी चांगले कार्य करण्याची, त्या व्यक्तीला आनंद मिळवून देण्याची अथवा आपल्या प्रिय व्यक्तीला सुखी ठेवण्याचीच प्रबळ अशी भावना असते.

मुद्दा क्र. – ४

खरे प्रेम हे शब्दातून कधीच व्यक्त केल्या जात नाही, तर ते प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष कृतीतूनच दिसून येते.

या बाबतीत मी तुम्हाला या ठिकाणी इतिहासातील एक उदाहरण देऊ इच्छितो.

शहाजहान बादशहाने त्याच्या प्रिय पत्नीला, “मी तुझ्याकरिता ताजमहाल बांधून देईल!”, असे कदाचित तिच्या जिवंतपणी तिला कधीच म्हंटले नसावे.

आपली प्रिय पत्नी अर्जुमंद बानू बेगम ऊर्फ मुमताजमहल हिचे निधन झाल्या नंतर मात्र त्याने आपले तिच्यावरील प्रेम व्यक्त करण्याकरिता, अगदीच निरपेक्ष भावनेने तिच्या कबरीवर आग्रा येथे जग प्रसिध्द असा संगमरवरी शुभ्र दगडातील, भव्य ‘ताजमहाल’ बांधलेला आहे.

त्या ताजमहालाची भव्यता आणि अलौकिकता पाहूनच शहाजहान बादशहाच्या मुमताजमहल वरील अलौकिक अशा प्रेमाची आपल्याला कल्पना येते.

म्हणजे केवळ जिवंतपणीच नाही तर आपली प्रिय व्यक्ती मृत्यू पावल्यानंतरसुद्धा त्या व्यक्तीच्या प्रेमाची चिरंतन आठवण राहावी म्हणून त्या आपल्या प्रिय व्यक्तीचे स्मारक बांधण्याच्या ह्या कृतीलाही ‘प्रेमातील अलौकिकत्व’ प्राप्त झालेले आहे.

मुद्दा क्र. – ५

मोगल सम्राट औरंगजेबचा मुलगा, आजम शहा याने औरंगाबाद येथे इ.स.१६७९ मध्ये आग्रा येथील ताजमहालच्या धर्तीवरच, ‘बीबी का मकबरा’, हा  आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला आहे. औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानी, हिची कबर या मकबऱ्यात आहे. बीबी का मकबरा यास सन्मानाने दख्खनचा ताजमहाल असेही म्हणतात. औरंगजेबच्या मुलाने आपल्या आईवरील अलौकिक प्रेमाची प्रचीती व्यक्त करण्याकरिताच ‘बीबी का मकबरा’, ह्या नावाने प्रसिध्द असलेली ही भव्य वास्तू उभी केलेली आहे.

मुद्दा क्र. – ६

जगात अनेक व्यक्ती जन्म घेतात, आपले आयुष्य जगतात आणि मृत्यूद्वारे त्यांचे अस्तित्वही काही काळानंतर संपुष्टात येते, परंतु असेही काही नशीबवान लोक असतात की, त्यांच्यावर निरपेक्षपणे प्रेम करणारी मंडळी त्या व्यक्तीच्या स्मृती त्यांच्या मृत्यूनंतरही चिरंतन ठेवण्याकरिता जेव्हा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्या व्यक्तीचे स्मारक उभारतात, तेव्हा तो व्यक्ती मृत्यूनंतरही चिरंतनपणे आपल्या स्मारकाच्या रूपाने कायमस्वरूपी जीवंतच राहातो.

कदाचित जीवंत असतांना त्या व्यक्तीनेही आपल्या प्रिय व्यक्तींना आपल्या प्रेमाची जी काही प्रचीती दिली होती, त्याच प्रेमाची प्रचीती त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मारकांच्या रूपाने त्यांना कायमस्वरूपी जिवंत ठेवणार आहे.

त्यांनी ज्या ज्या व्यक्तींवर प्रेम केले होते, त्या त्या व्यक्तींनी त्या मृत व्यक्तीच्या स्मारकाच्या रूपाने आपल्या प्रेमाची परतफेडच करण्याचा अल्पसा प्रयत्न केलेला असतो.

मुद्दा क्र. – ७

जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीला म्हणतो की, “मी तुझ्यावर प्रेम करतो”, तेव्हा तो व्यक्ती निश्चितपणे अत्यंत खोटे बोलत असतो, कारण जिथे अजिबात प्रेमच नाही, तिथेच ते आहे, असे दर्शविण्याकरिताच अशाप्रकारचे खोटे बोलण्याची गरज भासत असते.

खरे प्रेम शब्दाने उच्चारून कधीच व्यक्त केल्या जात नाही, तर ते प्रेम आपल्या कृतीतून आपोआपच व्यक्त होत असते.

तुमच्या प्रिय व्यक्तीला तुमच्या कृतीमुळेच तुमच्या त्या प्रेमाची प्रचीती किंवा अनुभूती निश्चितपणे येत असते. त्याकरिता तुम्ही ते प्रेम केवळ शब्दाने कबुल करण्याची काही गरजच नसते.

मुद्दा क्र. – ८

   एखाद्या व्यक्तीविषयी एखाद्याला प्रेम वाटणे अथवा न वाटणे ह्याला त्या व्यक्तीची कोणती मनोवृत्ती कारणीभूत ठरते, हे कळणे कठीण आहे.

तरीही साधारणपणे एकमेकांसोबत झालेल्या संपर्कातून, घनिष्ट ओळखीतून, एकमेकांच्या सहकार्यातून, नवीन स्थापन झालेल्या नात्यातून, अथवा त्या नात्यातील सहवासातून तसेच एकमेकांकडून असलेल्या अपेक्षातून दोन व्यक्तींमध्ये मैत्रीची अथवा प्रेमाची भावना निर्माण होऊ शकते.

तसे पाहाता अगदी एक महिन्याचे बाळ असो, तरुण व्यक्ती असो किंवा नव्वद वर्षाचा वयोवृध्द व्यक्ती असो त्यांना त्यांच्या प्रिय व्यक्तीने, त्यांच्याकडे टाकलेल्या दृष्टीक्षेपातून, त्यांना केलेल्या स्पर्शातून, त्यांच्यासोबत झालेल्या बोलण्यातून तसेच त्यांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या कृतीतून त्यांना त्यांच्या आपल्यावरील प्रेमाची सहजपणे जाणीव होत असते.

कोणत्याही व्यक्तीला त्याच्या आयुष्यात प्रेमाची अत्यंत आवश्यकता असते. आयुष्यात ज्यांना प्रेम मिळू शकत नाही, अथवा त्यांच्या प्रिय व्यक्तींनी त्यांच्या प्रेमास नकार दिला किंवा जे प्रेमात अपयशी ठरले आणि ज्यांच्या प्रेमाला नातेवाईकांनीही मान्यता दिली नाही, अशा अनेक व्यक्तींना आपले जीवन व्यर्थ असल्याची जाणीव होते.

अशा अनेक व्यक्ती प्रेमात अपयश आल्यानंतर अगदी सहजपणे आत्महत्या करीत असल्याचेही आपणास दिसून येते. ह्यासंदर्भातील अनेक बातम्या आपण वेळोवेळी वर्तमान पत्रांमध्ये वाचतच असतो.

मुद्दा क्र. – ९

विशेष हे की खऱ्या प्रेमामध्ये प्रिय व्यक्तीकडून कशाचीही अपेक्षा केल्या जात नाही. प्रेमामध्ये जेव्हा कशाची तरी अपेक्षा केली जाते, तेव्हा तो निव्वळ एक देव घेवीचा व्यवहार असतो.

जिथे देव घेवीचा व्यवहार असतो, त्या व्यवहारालाच व्यापाराचे स्वरूप प्राप्त होत असते. जिथे व्यापार, देव-घेव अथवा व्यवहार असतो, तिथे खरे प्रेम कधीच अस्तित्वात नसते.

कारण अपेक्षेप्रमाणे देव-घेव अथवा व्यवहार न झाल्यास लगेच ते स्वार्थी प्रेमही संपुष्टात येते.

मुद्दा क्र. – १०

“माझे तुझ्यावर प्रेम आहे,” असे खोटे शब्द उच्चारून जिथे प्रेम असल्याचे दर्शविण्यात येते, तिथे समोरच्या व्यक्तीकडून काहीतरी मिळविण्याचाच निश्चितपणे प्रयत्न केल्या जातो. त्यामध्ये आपले नसलेले प्रेम शब्दाने व्यक्त करण्याचा समोरच्या व्यक्तीचा काहीतरी स्वार्थ असतो. अशावेळी दुसऱ्या व्यक्तीने सावध झालेच पाहिजे.

अशा पद्धतीने दुसऱ्याचा उपयोग जेव्हा स्वतःच्या स्वार्थासाठी करण्यात येतो, तेव्हा त्या ठिकाणी त्या व्यक्तीचे खरे प्रेम कधीच नसते, कारण खऱ्या प्रेमामध्ये इतरांपासून काहीतरी मिळविण्याची किंवा इतरांचा उपयोग करून घेण्याची भावना नसून इतरांना किंवा आपल्या प्रिय व्यक्तीला निस्वार्थीपणे काहीतरी देण्याचीच भावना असते. अशी भावना असेल तरच त्याला खरे प्रेम म्हणता येईल.

मुद्दा क्र. – १

कधी-कधी तर असेही होते की, एखादा व्यक्ती त्याला प्रिय असणाऱ्या व्यक्तीवर निरपेक्षपणे प्रेम करतो. त्याला प्रिय असलेल्या व्यक्तीसाठी स्वतः झळ सोसतो, परंतु त्याला प्रिय असलेली व्यक्ती मात्र त्याच्या प्रेमाला हवा तसा प्रतिसाद अजिबात देत नाही.

त्याच्याकडून मिळणाऱ्या फायद्याचा मात्र ती व्यक्ती स्वीकार करीत असते. त्याच्याकरिता कोणत्याही प्रकारे स्वतः झळ सोसण्याची मात्र त्या प्रिय व्यक्तीची अजिबात तय्यारी नसते, अशा प्रेमाला ‘एकतर्फी प्रेम’ असे म्हणतात.

आपल्या प्रेमाला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून शेवटी ती व्यक्ती ह्या एकतर्फी प्रेमातून कधी ना कधी तरी माघारही घेते, अथवा त्याला अशी माघार घ्यावीच लागते.

कारण आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, त्यांनीही आपल्यावर प्रेम करावे, अशी भावना त्याच्या मनामध्ये निश्चितपणे असतेच.

अशा प्रकरणात विवाहित मंडळी असली तर अशा एकतर्फी प्रेमाची परिणीती कधी-कधी घटस्फोटात किंवा इतरत्र अनैतिक प्रेम संबंध जुळण्यात अथवा दोघांपैकी कुणातरी एकाची हत्या होण्यातही होत असल्याचे दिसून येते.

मुद्दा क्र. – १

खरे प्रेम कशाला म्हणावे?

आपल्या प्रिय व्यक्ती करिता स्वतः झळ सोसूनही काहीतरी करणाऱ्याचे प्रेमच खरे प्रेम असते.

आपल्या प्रिय व्यक्तीला जर काही दुखः झाले किंवा काही इजा झाली अथवा त्याच्यासंदर्भात काही विपरीत दु:खद अशी घटना घडली, तर त्याचा परिणाम किंवा त्याची इजा तेवढ्याच तीव्रतेने त्या व्यक्तीवर प्रेम करणाऱ्यालाही पोहोचली, तर त्या दोन्ही व्यक्तीमध्ये निश्चितपणे खरे प्रेम अस्तित्वात आहे, असे समजायला हरकत नाही.

मुद्दा क्र. – १

ह्यासंदर्भात मी स्वतः प्रत्यक्षात पाहिलेली घटना सांगू इच्छितो.

१९९१च्या दरम्यानची ही गोष्ट आहे. त्यावेळेस माझा एन-७, सिडको, औरंगाबाद येथे फोटो स्टुडिओचा व्यवसाय होता. त्या निमित्ताने मला एका ठिकाणी अंतक्रियेचे फोटो काढण्याकरिता बोलाविण्यात आले होते.

ते ठिकाण औरंगाबादच्या पूर्वेस सरासरी दहा किलोमीटर अंतरावर असलेले एक लहानसे मांडकी नावाचे खेडेगाव होते.

ह्या मांडकी गावामध्ये गोविंदराव भिका गायके नावाचे एक पंच्याहत्तर वर्षाचे वृध्द गरीब शेतकरी होते. त्यांची त्या गावात सात एकर शेती होती. त्यांना पाच मुले आणि एक मुलगी होती.

ह्या गोविंदराव गायके यांचा वयाच्या सरासरी पंच्याहत्तराव्या वर्षी दमा आणि वृध्दपणामुळे दिनांक १० फेब्रुवारी १९९१ रोजी सायंकाळी पाच वाजता मृत्यू झाला.

दुसऱ्या दिवशी दिनांक ११ फेब्रुवारी १९९१ रोजी दुपारी त्यांची अंतक्रिया करण्याचे ठरले होते. त्या दृष्टीने त्यांच्या अंतक्रियेची तय्यारी चालू होती. ह्याच अंतक्रियेचे फोटो काढण्याकरिता मला बोलाविण्यासाठी त्या मृत व्यक्तीचा मोठा मुलगा नारायण गायके आणि त्यांचा मित्र सुरेश भेसर हे माझ्याकडे आले होते.

मृत व्यक्तीची पत्नी सौ.अंतीकाबाई गोविंदराव गायके यांचे वय त्यावेळी जवळपास पासष्ट वर्षे असावे. आपल्या जोडीदाराच्या अंतक्रियेची तयारी त्या अत्यंत दु:खी मनाने पाहात होत्या. आपल्या पतीच्या मृत्यूचा त्यांच्या मनावर चांगलाच दु:खद परिणाम झाल्याचे जाणवत होते.

सौ.अंतिकाबाई यांनी रात्री सरासरी तीन-साडे तीनच्या सुमारास आपल्या सर्व मुलांना आणि मुलीला जवळ बोलाविले आणि सांगितले की, “तुमचे वडील गेले, आता माझ्या जगण्यात काहीच अर्थ राहिला नाही. मी सुद्धा आता तुमच्या वडिलांसोबतच जाणार आहे. आमची दोघांचीही अंतक्रिया उद्याला अगदी शेजारी शेजारीच चिता रचून सोबतच पार पाडण्यात यावी.”

सर्वांना वाटले की, वडिलांच्या मृत्यूमुळे आई काही तरीच बोलत आहे. परंतु त्यानंतर अर्ध्या तासातच रात्री चारच्या सुमारास अगदी बसल्या जागीच सौ.अंतीकाबाई गोविंदराव गायके यांनी अगदी सहजपणे प्राण सोडून दिला.

ही एक अनपेक्षित अशी घटना होती. शेवटी दिनांक ११ फेब्रुवारी १९९१ रोजी दुपारी एकमेकांशेजारीच त्यांची चिता रचून, त्यांच्याच शेतात ह्या दोघांनाही अग्नी देऊन त्यांची अंतक्रिया पार पाडण्यात आली.

(स्व. सौ. अंतिकाबाई आणि तिचे पती स्व. गोविंदराव गायके, रा.मांडकी यांची एकमेकांना शेजारी चिता रचून दि.११ फेब्रुवारी १९९१ रोजी अंतक्रिया करण्यात आली.)

आपल्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या दु:खामध्ये स्वतः दु:खी होऊन, आत्महत्या करून आपलेही जीवन संपविणारे अनेक लोक आपण नेहमीच पाहात असतो.

इथे मात्र आपल्या जोडीदाराच्याबद्दल मनामध्ये असलेल्या अलौकिक प्रेमाच्या भावनेतून आपल्या जोडीदारासोबतच जाण्याच्या तीव्र इच्छेमुळे, अगदी सहजपणे बसल्या बसल्या आपले प्राण सोडून देण्याची ही घटना म्हणजे ह्या गायके दाम्पत्याच्या अलौकिक अशा प्रेमाचा पुरावाच आहे.

ह्यालाच तर खरे प्रेम असे म्हणता येईल. असेच असते आपसातील अलौकिक प्रेम.

मुद्दा क्र. – १

आता ह्या घटनेच्या अगदी उलट असलेली, आपल्या सर्वांना माहिती असलेली एक घटना मी ह्या ठिकाणी सांगत आहे.

औरंगाबादच्या सातारा परिसरात एका वर्षापूर्वी घडलेली आणि आपण सर्वांनीच वर्तमान पत्रांमध्ये वाचलेली ही खळबळजनक घटना आहे.

सातारा परिसरात राहाणारे उच्च शिक्षित आणि मोठ्या पगारावर कार्यरत असलेले ह्या घटनेतील पती-पत्नी स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहात होते.

पत्नी भाग्यश्री होळकर औरंगाबादच्या जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या पदावर आणि मोठ्या पगारावर कार्यरत होती, तर ४७ वर्षीय तिचे पती जितेंद्र होळकर जिल्हा मध्यवर्ती बँक शेकटा येथे शाखाधिकारी म्हणून कार्य करीत होते. त्यांचा एक मुलगा दहावीत शिकत होता तर मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत होती.

बहुदा अनेक घरात असतात, तसेच इथेही ह्या पती-पत्नीमध्ये किरकोळ गोष्टींवरून वाद-विवाद होतच होते. पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ करीत होता, असे पत्नीचे म्हणणे होते,

ह्या वाद-विवादाचा शेवट पतीच्या भिषण हत्त्याकांडात झाला, याबाबतीत पोलिसांचे असे म्हणणे होते की, ह्या घटनेमागे अनैतिक संबंधच कारणीभूत असावेत. त्याचीच ही हकीकत आहे.

पतीच्या संशयी स्वभावाला कंटाळून त्याच्याप्रती अत्यंत द्वेषाची भावना मनात बाळगून, पत्नी संसार करीत होती. पती पासून तसेच त्याच्या नेहमीच्या कटकटीतून मुक्त होण्याकरिता तिने आपल्या पतीची हत्त्या करण्याचा कट रचला.

तिला आपल्या पतीबद्दल प्रेम का वाटत नव्हते? ह्याचे खरे कारण तिलाच माहिती असावे. तिने आपल्या परिचित, शिवसेनेचा कार्यकर्ता असेलेल्या किरण गणोरे नावाच्या एका विश्वासू व्यक्तीला आपल्या पतीची हत्त्या करण्यासाठी दोन लाख रुपयांत सुपारी दिली. ह्या करिता तिने चाळीस हजार रुपये अॅडव्हान्सही दिले. गणोरे याने त्याच्या परिचित असलेल्या तसेच हत्तेची सुपारी घेणाऱ्या शेख तौसीफ आणि शेख हुसैन या दोन गुंडांना ह्या हत्तेची कामगिरी सोपविली.

ह्या तिघांनीही मग भाग्यश्रीच्या सहमतीने तिचे पती जितेंद्र यांच्या हत्तेची योजना आखून, घटनेच्या तीन-चार दिवस अगोदर घटना स्थळाची व त्या फ्लॅटची पाहाणी केली.

हत्तेच्या दिवशी, ठरल्यानुसार योजना आखल्याप्रमाणे पत्नीने आपल्या फ्लॅटचा मुख्य दरवाजा रात्री बारा वाजता, गुंडांना आत येण्यासाठी कडी काढून, मोकळा ठेऊन, फक्त लोटून घेतलेला होता.

ठरल्याप्रमाणे रात्री एक वाजता दोन गुंड कडी न लावलेल्या दरवाज्याला लोटून घरात आले. त्यांनी आपल्यासोबत आणलेल्या दोरीने, टीव्ही पाहून पलंगावर शांतपणे झोपलेल्या पतीच्या गळ्याला फास देऊन त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पतीसुद्धा जागा होऊन तो त्या गुंडांना जोरदार विरोध करू लागला. शेवटी त्या गुंडांनी चाकूने भोसकून त्या महिलेच्या पतीची हत्त्या केली. ही घटना घडत असतांना, योजनेत ठरल्याप्रमाणे जितेंद्र यांची पत्नी आपल्या मुलांच्या दुसऱ्या शेजारच्या खोलीत आतून कडी लावून शांतपणे झोपल्याचे नाटक करीत होती. तर त्या खोलीच्या शेजारच्याच खोलीत गुंड तिने सांगितल्यानूसार तिच्या पतीची हत्त्या करीत होते.

हत्त्या केल्या नंतर ठरल्याप्रमाणे गुंडांनी बाहेर पळून जातांना, बाहेरून घराची कडी लावून घेतली होती. सर्व काही व्यवस्थित पार पडल्यानंतर भाग्यश्री जोरजोरात रडण्याचा अभिनय करून शेजाऱ्यांना दार उघडण्याकरिता हाका मारीत होती.

शेजाऱ्यांनी दार उघडले, त्यांनतर पोलीस तक्रार होऊन पोलीस तपास सुरु झाला. गुन्हेशाखेसह, सातारा पोलीस ठाण्याच्या आठ तुकड्या ह्या प्रकरणाचा तपास करीत होत्या.

पोलिसांना पहिला प्रश्न पडला, तो असा की, बंद फ्लॅटचे मजबूत दार न तोडता, ते मुख्य दार सहजपणे उघडून हत्त्यारे फ्लॅटमध्ये कसे-काय घुसले? कारण फ्लॅटचे दार कुणीतरी मुद्दाम उघडे ठेवल्याशिवाय हत्त्याऱ्यांना फ्लॅटमध्ये कसेच शिरता येत नव्हते.

फ्लॅटमधील ह्या दाम्पत्याचा दहावीत शिकणारा मुलगा अथवा महाविद्यालयात शिकणारी मुलगी फ्लॅटचे दार उघडे ठेवण्याची शक्यताच नाही, तेव्हा मग पोलिसांनी त्या व्यक्तीच्या पत्नीवरच संशय घेऊन त्या दृष्टीने तपासाची दिशा ठरविली. पोलीस जितेंद्र यांचे मूळ गाव शेवगाव येथे ही जाऊन आले. त्यानंतर अनेक गोष्टी उघडकिस आल्या.

पोलिसांनी त्या परिसरातील घटनेच्या अगोदरच्या चार-पाच दिवसातील सी.सी.टी.व्ही.चे फुटेज तपासले. त्या फ्लॅटसमोर सुपारी घेणाऱ्या गणोरेची आलेली कार, तसेच त्यानंतर त्या परिसरातून स्पोर्ट बाईकवरून परिसराची पाहाणी करण्याकरिता हत्त्याऱ्यांनी अनेकवेळा मारलेल्या चकरा, ह्यावरून तपास पुढे सरकत गेला आणि सर्व गोष्टी हळूहळू उघडकीस आल्या. गुन्हे शाखेचे अधिकारी मधुकर सावंत यांच्या तपासात त्यांना असे आढळून आले की, भाग्यश्री, गणोरे, तौसीफ आणि हुसैन हे सर्व सतत एकमेकांशी मोबाइल द्वारे संपर्कात होते, त्यामुळे त्यांनी किरण गणोरे याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीत सर्वच गोष्टींचा सविस्तर खुलासा झाला.

त्यानंतर, मृत व्यक्तीची पत्नी भाग्यश्री हिला अटक करण्यात आली, त्या अगोदर तिने ज्या किरण गणोरे नावाच्या व्यक्तीला हत्तेची सुपारी दिली होती, त्या व्यक्तीलाही त्याच्या कारच्या नंबर वरून अटक करण्यात आली. ज्या गुंडांनी हत्त्या केली त्या गुंडांनाही त्यांच्या स्पोर्ट बाईक मोटार सायकलच्या नंबर वरून नंतर अटक करण्यात आली.

ह्या सर्वांच्या चौकशी वरून सर्व घटनांचा उलगडा झाला. ह्या सर्व आरोपींना नंतर हर्सूल जेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्या महिलेची मुलगी आणि मुलगा जेव्हा आपल्या आईला शेवटचे जेलमध्ये जाऊन भेटले तेव्हा ते म्हणाले की, “आई तू आमच्या पप्पांची हत्त्या करण्याकरिता गुंडांना सुपारी देशील, असे आम्हाला कधीच वाटले नाही!”

त्या मुलांच्या आईकडे ह्या प्रश्नाचे काहीच उत्तर नव्हते.

त्या स्त्रीची म्हणजेच भाग्यश्रीची नौकरी गेली, घरदार आणि सर्व नातेवाईकही तिला पारखे झाले आणि तिच्यावर जेलमध्ये जाण्याची पाळी आली.

‘प्रेम’ ह्या अडीच अक्षरी शब्दांचा अर्थ त्या दोघांनाही न कळल्यामुळेच त्या पती-पत्नीचे आपसात पटत नव्हते. वास्तविक पाहाता, पत्नीला तिच्या पतीसोबत अगदी सहजपणे केव्हाही घटस्फोट घेता आला असता, परंतु त्या ऐवजी आपल्या पतीच्या हत्तेचीच गुंडांना सुपारी देऊन त्याची हत्त्या करून पत्नी सुद्धा चौदा वर्षे जन्मठेपेची शिक्षा भोगण्याच्या मार्गावर गेलेली आहे.

ह्या बाबतीत तत्कालीन प्रभारी पोलीस आयुक्त राहुल श्रीरामे हे म्हणतात की, भाग्यश्री यांच्या चारित्र्यावर जितेंद्र संशय घेत होता, त्यामुळे त्यांच्यात नेहमीच वाद होत असे. त्याकरिता जितेंद्रला कायमचे आपल्या मार्गातून बाजूला करण्यासाठी भाग्यश्रीने जितेंद्रच्या हत्तेची सुपारी दिली होती.

ज्यांच्या मनात आपल्या पती आणि कुटुंबियांबद्दल एक टक्काही प्रेमाची भावना नाही, तर मनामध्ये जहाल असे द्वेषाचे विषच भरलेले असते, अशाच व्यक्ती असे कार्य करू शकतात.

ज्याची आपण कधीच कल्पनाही करू शकत नाही.

ह्या प्रकरणातील दांपत्याचा अथवा महिलेच्या प्रेमाचा हा कोणता प्रकार आहे? हे काही मला अजूनही समजलेले नाही, त्यामुळे मला त्याबद्दल इथे काहीच सांगता येत नाही.

एवढे मात्र खरे की, जगामध्ये सर्वात जास्त प्रेम पती-पत्नींमध्ये असते, असे म्हणतात. पती-पत्नीमध्ये जेव्हा असे अलौकिक प्रेम असते तेव्हा शहाजहान सारखा एखादा बादशाह आपले अलौकिक प्रेम व्यक्त करण्याकरिता तसेच आपल्या पत्नीच्या स्मृती चिरंतन ठेवण्याकरिता ‘ताजमहाल’ ची निर्मिती करतो, तर एखादा गरीब पती आपल्या ऐपती नुसार आपल्या पत्नीच्या कबरीवर एखादा साधा दगडही ठेवतो किंवा तिच्या अस्थी अत्यंत दु:खी तसेच प्रेममय भावनेने नदीमध्ये विसर्जितही करतो. अशावेळी त्यांच्या प्रेमाच्या आणि शहाजहान बादशहाच्या प्रेमाच्या तुलनेत काही कमतरता आहे, असे अजिबात म्हणता येत नाही. दोघांचेही प्रेम सारखेच आहे. आपले प्रेम व्यक्त करण्याची कुणाची आर्थिक ऐपत असते, तर कुणाची आर्थिक ऐपत अजिबात नसते.

जेव्हा पती-पत्नीमध्ये आपसात अजिबात प्रेम नसते, तेव्हा मी अगोदरच म्हंटल्याप्रमाणे त्यांच्यामध्ये निश्चितपणे घटस्फोट होतो, अथवा घटस्फोट न होता ही कुण्यातरी दुसऱ्या व्यक्तीसोबत त्यांचे अनैतिक संबंध प्रस्थापित होतात किंवा ह्या दोन पैकी काहीच झाले नाही तर त्या पती किंवा पत्नीपैकी एका जनाची निश्चितपणे हत्त्या तरी होते.

जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा ह्या लोकांना किंवा पती-पत्नींना आपल्या जीवनाचा तसेच प्रेमाचा अर्थच कळला नाही, असेच म्हणावे लागेल.

मुद्दा क्र. – १५

वाचकांनो,

ह्यासंदर्भात मी थोडे अधिक स्पष्टीकरण करू इच्छितो.

विशेषत: विवाहित दाम्पत्यांनी एकमेकांवर शंभर टक्के प्रेम करावे अशी त्यांच्या एकमेकांविषयी अपेक्षा असते.

अनेकवेळा असे होते की, ह्यातील एक व्यक्ती दुसऱ्यावर शंभर टक्के प्रेम करते परंतु दुसरी व्यक्ती मात्र त्याच्या प्रेमाला कोणत्यातरी अज्ञात कारणामुळे शंभर टक्के प्रतिसाद देत नाही. तेव्हा आपल्या शंभर टक्के प्रेमाच्या बदल्यात आपल्या प्रिय व्यक्तीकडून केवळ तीस टक्के प्रेमाची आपल्याला परतफेड होत असल्याची त्याला जाणीव होते, अथवा ते तीस टक्के प्रेमही आपल्या प्रिय व्यक्तीकडून आपल्याला सहजपणे मिळत नसून आपण ते त्यांच्याकडून जबरदस्तीने ओरबाडूनच घेत आहोत की काय? असेही त्याला वाटू लागते. अशावेळी त्या विवाहित व्यक्तींमध्ये अत्यंत गंभीर समस्या निर्माण होतात.

त्यांच्यामध्ये इतर कोणत्याही गोष्टीवरून सतत वाद-विवाद होतात. ते दोघेही मुद्दाम एकमेकांना दुर्लक्षित करू लागतात. त्यांच्यामध्ये कोणत्याही बाबतीत एकमेकांना सहकार्य न करण्याची प्रवृत्ती हळूहळू वाढत जाते. एकमेकांना कधी आणि कुठे विरोध करता येईल? ह्याची संधी ते शोधात असतात.

एकमेकांबद्दलचा राग आणि द्वेष त्यांच्या बोलण्यातून जाणवायला लागतो. ह्या सर्वांचा परिणाम शेवटी निश्चितपणे त्यांच्या घटस्फोट होण्यातच होतो. घटस्फोट घेतलेल्या अनेक प्रकरणांचा शोध घेतला असता सहसा ह्याच गोष्टी घडल्याचे दिसून येते.

अशा व्यक्तींपैकी काही कारणास्तव ज्यांचा घटस्फोट झाला नाही, तर त्या दाम्पत्यापैकी जी व्यक्ती सत्तर टक्के प्रेमापासून वंचित असते ती व्यक्ती आपल्याला शंभर टक्के प्रेम देणाऱ्या एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या शोधात राहाते. अशी व्यक्ती मिळाल्यास ती व्यक्ती निश्चितपणे त्या दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करते.

ह्यामध्ये त्यांच्या पहिल्या जोडीदाराने काही अडथला आणण्याचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती कोणत्याही प्रकारे आपल्या पहिल्या जोडीदाराची अगदी सहजपणे हत्त्या करण्यासही मागे-पुढे पाहात नाही.

आपल्या जोडीदाराची हत्त्या करून त्याला आपल्या मार्गातून बाजूला सारून प्रेमाच्या वाटेने पुढे जाऊन शंभर टक्के प्रेम मिळविण्याचा त्या व्यक्तीचा उद्देश कधीच पूर्ण होत नाही. कारण हत्त्या केल्यानंतर अशा व्यक्तीची तुरुंगात रवानगी होऊन शेवटी चौदा वर्षे जन्मठेप भोगण्याचीच त्या व्यक्तीवर वेळ येते.

शंभर टक्के प्रेमाची प्राप्ती करण्याच्या हव्यासापायी अशा व्यक्तींना चांगल्या वाईटाचे काहीही भान राहात नाही. एवढी प्रेमाची भूक अथवा भावना तीव्र असते.

ह्या सर्व दुर्दैवी घटनांपासून दूर राहू इच्छिणाऱ्या दाम्पत्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींना, म्हणजेच आपल्या पती किंवा पत्नीला आपल्या शंभर टक्के प्रेमाची प्रचीती देऊन आपला संसार अथवा आपला परिवार सुखी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

हे शक्य नसल्यास अशी कोणतीही अप्रिय घटना घडण्या अगोदरच दोघांनी विचारपूर्वक एकमेकांच्या सहमतीने, एकमेकांची कोणतीही अडवणूक न करता, घटस्फोट घेऊन वेगळे झाले पाहिजे.

कारण, प्रेम हे कुणावरही जबरदस्ती लादण्याची गोष्ट नव्हे, तर ते विचारपूर्वक तसेच सहजस्फुर्तपणेच व्यक्त झाले पाहिजे.

पती-पत्नीला जेव्हा एकमेकांकडून शंभर टक्के प्रेम प्राप्त होत नाही, तेव्हाच त्या दोघांपैकी एकाची कशी हत्त्या केली जाते? त्या संदर्भात मी ह्या ठिकाणी उदाहरणा दाखल एक घटना सांगितलेलीच आहे.

मुद्दा क्र. १६ :

अशा लोकांकरिताच संत कबीर यांचा हा एक लोकप्रिय दोहा आहे.

“पोथी पढी-पढी जग मुआ पंडित भया ना कोय |

ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय ||”

ह्या दोह्यामध्ये संत कबिरांनी जीवनातील फार मोठे तत्त्वज्ञान सांगून, ‘प्रेम’ ह्या अडीच अक्षरी शब्दाबद्दल एक विशेष संदेश दिलेला आहे.

ते म्हणतात की, ज्यांनी आयुष्यभर अनेक पोथ्या आणि धर्मग्रंथ वाचले ते सर्व वाचूनही ते कोणीही, कधीही ज्ञानी झाले नाहीत.

परंतु ‘प्रेम’ हा केवळ अडीच अक्षरांचा शब्द ज्यांनी वाचला, त्यांनी जर त्या शब्दाचा अर्थ समजून घेऊन तो अर्थ आपले जीवन जगतांना अंमलांत आणला, तर त्याला सर्वकाही समजले, तो ज्ञानी झाला, असे म्हणता येईल.

कारण, त्यानंतर त्याची इतरांप्रती असलेली दृष्टीच प्रेममय होऊन जाते. सर्व जग त्याला प्रेममय दिसते.

त्यानंतर त्याला जगात कुणीही आपला शत्रू दिसून येत नाही. त्याच्या मनामध्ये कुणाबद्दलही द्वेष, इर्षा, संताप आणि घृणा ही नसते. सर्वांबद्दल त्याच्या मनामध्ये अत्यंत निरपेक्ष अशी प्रेमाचीच भावना असते. ह्या उलट ज्यांना ‘प्रेम’ ह्या शब्दाचा अर्थ नाही कळला, ते कुणाही सोबत प्रेमाने कधीच वागू शकत नाहीत. त्यांच्या मनामध्ये इतर सर्वच लोकांविषयी द्वेष, इर्षा, घृणा, अपेक्षा आणि संताप असतो.

असे लोक अत्यंत मूर्ख, अहंकारी आणि स्वार्थी असतात. जगातील प्रत्येक जण आपला शत्रू आहे, असे समजूनच ते सर्वांशी अत्यंत तूच्छ्तेने वागतात, त्यामुळेच ते कुणावरही कधीही प्रेम करू शकत नाहीत त्यामुळे कुणीही त्यांच्यावर कधीच प्रेम करू शकत नाहीत.

ह्या लोकांच्या अशा अत्यंत मूर्ख, अहंकारी आणि स्वार्थी प्रवृत्तीतूनच समाजात अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अशा घटना घडत असतात.

म्हणूनच, संत कबीर म्हणतात की, ‘प्रेम’ ह्या अडीच अक्षरांच्या शब्दांचा अर्थबोध होणे, म्हणजेच जीवन जगण्याचे तत्व तसेच जगाचे सत्य समजणे.

“प्रेम आहे तर सर्व काही आहे.” ज्या क्षणी हे सत्य आपल्याला समजून येईल त्यानंतरच आपल्या मनातील अहंकाराची व स्वार्थाची भावना नष्ट होऊन आपण सर्वांशी प्रेमाने वागू, त्यामुळे इतर लोकही आपल्याशी प्रेमाने वागतील, एवढेच नाही तर सर्व जगही आपल्याकरिता प्रेममय होवून जाईल.

मुद्दा क्र. १७ :

संत कबीरांनी सांगितले की, सर्वांवरच निरपेक्षपणे, म्हणजेच कुणाकडूनही कसलीही अपेक्षा न ठेवता प्रेम करा.

परंतु आपण नेहमीच ह्या उलट करतो, म्हणूनच आपण अडचणीत येतो. आपण ज्यांच्यावरती प्रेम करतो त्यांच्याकडून आपल्याला बऱ्याच मोठ्या अपेक्षा असतात, त्यामुळेच आपल्या सह ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीही अत्यंत अडचणीत येतात.

त्यामुळे कुणावर, कुठे, कसे, आणि कशाकरिता प्रेम करावे? ह्याचे आपण सतत भान किंवा तारतम्य ठेवले पाहिजे.

कबीरांच्या सांगण्याचा खरा अर्थ लक्षात न घेता आपण अपेक्षा ठेऊन ज्याला त्याला प्रेमाची विनंती करायला लागलो तर आपण निश्चितपणे संकटात पडू. आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल जरी प्रेम वाटत असले आणि त्या व्यक्तीच्या मनात जर आपल्याबद्दल प्रेमाची तशी कोणतीच एक टक्काही भावना नसेल, तर कबीरांचा, ‘ढाई आखर प्रेम का….!’ हा दोहा लक्षात घेऊन आपण जिथे-तिथे जबरदस्तीने प्रेम करण्याचा कधीच प्रयत्न करू नये.

एखाद्या व्यक्तीकडे आपण काहीतरी अपेक्षा ठेऊन जबरदस्तीने प्रेम करण्याचा प्रयत्न करणे, म्हणजेच त्या व्यक्तीला एक प्रकारे त्रास देऊन संकटात टाकणे, त्यासोबतच आपल्यावरही काहीतरी संकट ओढवून घेणेच होय.

आपण बऱ्याचवेळा वर्तमान पत्रातील बातम्यांमध्ये वाचतो की, ‘कुणीतरी तरुण एखाद्या तरुणीला अथवा स्त्रीला रस्त्यात अडवून किंवा तिच्या घरात शिरून, तिचा हात धरून, “मी तुझ्यावर प्रेम करतो, तू ही माझ्यावर प्रेम कर!” असे म्हणतो.

अशावेळी ती तरुणी आपल्या नातेवाईकांना सांगून आपल्यावर प्रेम करू इच्छिणाऱ्या त्या व्यक्तीची बेदम धुलाई करविते, शिवाय त्या तरुणाच्या अथवा व्यक्तीच्या विरोधात पोलीस तक्रारही नोंदविते.

सांगायचा मुद्दा असा की, संत कबीर म्हणतात त्याप्रमाणे, प्रेम ही काही कुठेही, कुणासोबतही, काहीही अपेक्षा ठेवून जबरदस्तीने करावयाची, सहज साधी आणि सोपी गोष्ट अजिबात नाही. ह्याचेही भान प्रत्येक व्यक्तीने ठेवलेच पाहिजे.

अन्यथा त्या व्यक्तीला चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या व्यक्तीवर, चुकीच्या पद्धतीने प्रेम केल्याचे दुष्परिणाम निश्चितपणे भोगावेच लागतील.

हा शेवटचा मुद्दा संत कबीरांनी नव्हे तर मी स्वतःच सांगितलेला आहे.

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!