प्रा. विष्णू गाडेकर भाग ७ – समाजसेवा म्हणजे नक्की काय असते?

Spread the love

ज्यांना समाजसेवा करायची तीव्र इच्छा असते, त्यांनी स्वतःच्या घरापासून, स्वतःच्या खर्चाने, स्वतःच्या हिंमतीवरच, स्वतःच्या प्रेरणेने तसेच निस्वार्थी भावनेने आपली बौद्धिक, शारीरिक आणि आर्थिक ऐपत ओळखूनच समाजसेवा करायची असते. इतरांच्या जागेवर, इतरांच्या मदतीने, इतरांच्या आर्थिक सहकार्याने कधीही कुणाचीही समाजसेवा होऊ शकत नाही. महात्मा जोतीराव फुलेंनी सुद्धा त्यांच्या काळात मुलींसाठी जी काही शाळा काढली होती किंवा इतरही काही उपक्रम त्यांनी राबविले होते, ते त्यांनी स्वतःच्या जागेत आणि स्वतःच्या खर्चानेच राबविले होते. महात्मा फुले त्या काळात ठेकेदारीची कामे करीत असत. त्या कामातून मिळणारा पैसाच ते आपल्या समाजसेवेच्या कार्यासाठी वापरीत असत. खरोखरच अत्यंत निस्वार्थीपणे समाजसेवा करण्याची इच्छा क्वचितच कुणाचा मनात निर्माण होते. इतर मंडळी मात्र समाजसेवेच्या नावाखाली अनेक उपक्रम राबवून त्यामधून विविध प्रकारे प्रचंड कमाई तर करतातच त्याशिवाय शासनाच्या विविध योजना राबवून त्याद्वारे मिळणाऱ्या अनुदानावरही स्वतःची तुंबडी भरतांना दिसून येतात.

काही वर्षापूर्वी प्रा. विष्णू गाडेकर एका अपघातातून वाचल्यानंतर त्यांना असे वाटायला लागले की, इतरांची सेवा करण्याकरिताच ईश्वराने त्यांना मृत्युच्या जबड्यातून परत पाठविले आहे. त्यामुळे आपण आता समाजसेवा केली पाहिजे. निश्चितच हा विचार चांगला आहे, परंतु समाजसेवा म्हणजे आपल्याला नेमके आय करायचे आहे?  तर ते म्हणतात की, “मला अगदी पहिल्या वर्गापासून अत्यंत बुद्धिमान मुले निवडून त्यानं चांगले उच्च दर्जाचे शिक्षण मोफत द्यायचे आहे.” (कारण हे शिक्षण मोफत दिले तरच ती समाजसेवा होईल, ह्याकरिता फीस जर घेतली तर ती समाजसेवा नसून व्यवसाय होईल. मग आपण समाजसेवक आहोत असे आपल्याला म्हणताच येणार नाही.) ह्या बाबतीत त्यांची कल्पना समजून घेण्याकरिता मी त्यांना म्हणालो की, “ही सर्व मुळे गोर-गरिबांचीच असतील काय?” तर ते म्हणाले की, “गोर गरिबांची मुले हा माझा कन्सेप्टच नाही. कोणत्याही समाजातील, कोणत्याही परिवारातील, कोणत्याही आर्थिक स्तरातील जी अत्यंत हुशार मुले असतील, त्यांच्याकरिताच मला ही पहिली ते दहावी पर्यंतची मोफत शाळा काढणे आहे.” ह्याकरिता त्यांनी सात-आठ वर्षांपूर्वी दोन मजली शाळेची दगडी इमारत म्हैसमाळच्या ओसाड निर्मनुष्य माळरानावरील जमिनीवर बांधण्याचा संकल्प केला होता. परंतु अत्यंत नियोजन शून्य पद्धतीने हे कार्य केल्यामुळे त्यांची कशी फजिती होऊन कसे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते, या संदर्भात आपण ह्या अगोदरच्या लेखांमध्ये सविस्तर वाचलेले आहेच.

विशेष हे की ज्या ज्या परिवारात टॅलेंटेड किंवा बुद्धिमान मुले आहेत, त्या त्या परिवारातील त्यांचे पालक आप आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी किंवा त्याकरिता हवा तो खर्च करण्यासाठी सक्षम आहेतच. आपल्या मुलांसाठी कोणत्यातरी एखाद्या समाज सेवकाने पुढे येऊन एखादी विशेष शाळा काढावी आणि त्यामध्ये आपल्या मुलांकरिता त्यांनी मोफत राहाण्याचा तसेच शिक्षणाचा सर्व खर्च करावा, अशी त्या मुलांच्या पालकांनी कधीच अपेक्षा व्यक्त केलेली नाही. अशा अवस्थेत त्यांच्या ह्या शाळेची समाजाला खरोखरच विशेष प्रखरतेने अत्यंत तातडीची आवश्यकता असल्याचे अजिबात दिसून येत नाही. शिवाय समाजातील अत्यंत बुद्धिमान किंवा टॅलेंटेड विद्यार्थी अनेक इंग्रजी शाळांमधून सध्याही भरपूर डोनेशन आणि महागडी शैक्षणिक फीस देऊन सध्या त्यांच्या स्वतःच्या खर्चानेच शिक्षण घेत आहेत.

अनेक कोचिंग क्लासेसचे संचालक सुद्धा अशाच बुद्धिमान आणि टॅलेंटेड विद्यार्थ्यांना अत्यंत महागडी फीस घेऊन शिक्षण देतच आहेत. अनेक लोक आपली टॅलेंटेड मुळे त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी पाठवीत आहेत, त्यामुळे आपण ह्या विषयावर आपली समाजसेवा सुरु केली नाही तरी कुणाचे त्यामुळे फारसे नुकसान होण्याची काहीच शक्यता नाही. त्यामुळे समाजसेवा करण्यासाठी आपण निवडलेला विषयच निरर्थक ठरतो. त्याऐवजी प्रा. गाडेकर गुरुजींनी दुसरा एखादा विषय निवडावा.

औरंगाबाद शहराच्या उत्तरेकडे असलेल्या हर्सूल सावंगी गावाच्या परिसरात अत्यंत टॅलेंटेड मुला-मुलींकरिता “स्टेपिंग स्टोन” नावाची एक पूर्णपणे इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणारी एक अत्यंत महागडी व सर्व सोयी सुविधांनी युक्त अशी पहिली ते दहावी आणि पुढे बारावी पर्यंतची शाळा आहे. दोन दिवसांपूर्वीच तेथे शिक्षण घेणाऱ्या एका दहावीच्या टॅलेंटेड विद्यार्थ्याची व माझी भेट झाली. त्यानुसार मला त्यांच्या शाळेबद्दल सविस्तर माहिती कळाली. त्या शाळेतील प्रत्येक वर्गात केवळ पंधरा ते वीस एवढीच मुले असतात. पहिली पासून बारावी पर्यंतच्या प्रत्येक वर्गाची वर्षाची शैक्षणिक फीस दिड लाख रुपये एवढी आहे. आता काही दिवसांपूर्वीच त्यांची शैक्षणिक सहल पंधरा दिवसांकरिता अमेरिकेला जाऊन आली. प्रत्येक मुलाकरिता त्या शाळेने सहलीचे शुल्क दोन लाख ऐंशी हजार रुपये एवढे आकारले होते. हे सर्व सांगायचे तात्पर्य असे की, टॅलेंटेड मुलांचे पालक त्यांना शिकविण्याकरिता हवी तेवढी फीस देण्याच्या तयारीत आहेत. ह्या टॅलेंटेड विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याकरिता त्यांचे शिक्षकही अत्यंत टॅलेंटेड हवे असतात. टॅलेंटेड शिक्षकांना पगारही तसाच चांगला द्यावा लागतो, एवढेच नाही तर त्या टॅलेंटेड विद्यार्थ्यांच्या अत्याधुनिक सोयी सुविधा असलेल्या शाळेची ही सर्व यंत्रणा सांभाळणारे त्या शाळेचे संचालक सुद्धा अत्यंत टॅलेंटेड असतात. त्यामुळेच ते ही टॅलेंटेड मुलांची शाळा इतक्या उत्कृष्ट पद्धतीने व्यावस्थित चालवू शकतात. ह्या शाळेचा परिसरही तसाच निसर्गरम्य आहे. ह्या शाळेची इमारतही तेवढीच भव्य आणि प्रशस्त आहे. ह्या शाळेचे संचालक जर तेवढे टॅलेंटेड नसते तर त्यांना त्यांची ती भव्य इमारतही कधीच बांधता आली नसती. कोणत्याही लुंग्या-सुन्ग्याने येऊन त्यांना सहजपणे फसविले असते. टॅलेंटेड विद्यार्थ्यांच्या शाळेची ही सर्व यंत्रणा इतक्या व्यावस्थितपणे त्यांना कधीच चालविता आली नसती.

औरंगाबाद शहरातून त्या शाळेच्या बसेस आपल्या विद्यार्थ्यांना सकाळी ६ वाजता घेऊन जातात आणि शाळा सुटल्यावर त्यांना परत आणूनही सोडतात. तेथील शिक्षक आणि त्या शाळेचे संचालकही अत्यंत टॅलेंटेड आहेत, ते जर तसे नसते तर ते आपल्या टॅलेंटेड मुलांना चांगले शिक्षण कसे काय देऊ शकतील? त्या टॅलेंटेड मुलांनी व्यवहारात कसे जगायचे? कसे वागायचे? कसे राहायचे? आपल कार्य व्यावस्थित कसे करायचे? जीवनात यशस्वी कसे व्हायचे? आपल्याकडे येणाऱ्या अपयशाला दूर कसे ठेवायचे? हे सर्व त्या टॅलेंटेड विद्यार्थांना शिकविणे जरुरीचे असते. हे सर्व त्या विद्यार्थ्यांना शिकविण्याची पात्रता त्या संचालकांमध्ये तसेच त्या शिक्षकांमध्येही असणे आवश्यक असते. ह्या टॅलेंटेड विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये जे टॅलेंटेड विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ते आर्थिक दृष्ट्या अतिशय उच्च दर्जाच्या पालकांचीच मुले आहेत. दर महिन्यात आपल्या पाल्याचे शिक्षणावर जे पालक कमीत कमी वीस हजार रुपये फीस आणि इतर खर्चाच्या स्वरूपात अत्यंत सहजपणे खर्च करू शकतील, केवळ त्याच पालकांची पाल्य ह्या शाळेमध्ये शिक्षण घेऊ शकतात.

टॅलेंटेड विद्यार्थ्यांकरिता प्रा. विष्णू गाडेकर गुरुजींनी मोफत शाळा काढण्याचा संकल्प केलेला आहे. अशा परिस्थितीत ह्या शाळेच्या संचालनासाठी लागणारा प्रचंड पैसा आणि योग्य सहकाऱ्यांचे सहकार्य ते कसे आणि कोणत्या पद्धतीने मिळवीतील? हाच सध्या त्यांच्या समोर सध्या फार मोठा प्रश्न आहे. असले काही दिव्यस्वप्न पाहाणे म्हणजे चंद्रावर जाण्याकरिता चंद्रयानाची स्वतः निर्मिती करून चंद्रावर फेरी मारून येण्याची योजना आखण्याइतकेच हे अत्यंत अवघड असे कार्य आहे. ह्या चांद्रयानाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणे, त्याकरिता आपला वेळ, परिश्रम आणि पैसा खर्च करणे म्हणजे आपले जीवन व्यर्थपणे वाया घालविणे असाच याचा अर्थ आहे. ज्यांना हे कळत नाही, त्यांना आपण काय म्हणावे?

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!