प्रा. विष्णू गाडेकर भाग ८ – असे असते समाजसेवेचे स्वरूप

Spread the love

समाजात असेही काही लोक आहेत, जे कुणाकडूनही कशाचीही अपेक्षा न करता खरोखरच स्वत:च्या सामर्थ्यानुसार, स्वतःच्या जागेवरच समाजसेवा करीत आहेत. समाजसेवा करणे म्हणजे केवळ एखादी शिक्षण संस्था स्थापन करून, शाळा कॉलेजेस सुरु करणे, असे अजिबात नव्हे. आजकाल शाळा कॉलेजेस सुरु करणारे, “आम्ही समाजसेवा करीत आहोत,” असे जरी म्हणत असले तरी ती त्यांची समाजसेवा आहे, असे त्यांच्या शिवाय इतर कुणीही म्हणत नाहीत. कारण आजकाल शाळा कॉलेजेस सुरु करण्यासारखा फायदेशीर असा दुसरा कोणताही व्यवसाय नाही. ह्या व्यवसायात जो फायदा आहे तो इतर कोणत्याच व्यवसायात नाही.

शाळा कॉलेजेस सुरु करणाऱ्यांना शैक्षणिक फीसच्या रूपाने विद्यार्थ्यांकडून बरीच रक्कम गोळा करता येते. त्याशिवाय ज्या शाळा कॉलेजेसना शासनाचे अनुदान मिळते त्यांच्या शिक्षकांच्या तसेच कर्मचाऱ्यांचा पगार ही शासनामार्फतच केल्या जातो. त्यांच्या शाळेच्या अथवा कॉलेजच्या इमारतींचे भाडे आणि इतर खर्चही शासनाकडूनच अनुदानाच्या स्वरुपात मिळतो. त्याशिवाय आता शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीद्वारे अथवा नेमणूकीद्वारेही ह्या संस्थाचालकांना अगदी लाखो करोडो रुपये मिळत असतात.

एखाद्या अनुदानित शाळेत शिक्षक म्हणून एखाद्या व्यक्तीची नेमणूक करायची असेल तर त्या शाळेचे संस्थाचालक त्या शिक्षकाकडून आज कमीत कमी तीस लाख रुपये घेतात. प्राध्यापकांच्या नेमणुकीचा दर सध्या पन्नास लाख रुपये चालू आहे, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अथवा शिपायांच्या नेमणुकीचा दर आज कमीत कमी वीस लाख रुपये आहे. काहीही विशेष न करता एवढी मोठी कमाई केवळ शैक्षणिक संस्थांची स्थापना करणाऱ्या मंडळींनाच होत असते. हे त्यांच्या कमाईचे प्रचंड आकडे पाहिल्यानंतर अनेक लोकांना असे वाटते की आपणही एखादी शाळा वगैरे सुरु करून “समाजसेवा” करावी.

समाजात शाळा-कॉलेजेस काढणारे अनेक मोठे मोठे “समाजसेवक” आहेत. शाळा कॉलेज काढण्यापूर्वी त्यांची आर्थिक परिस्थिती कशी होती? आणि शाळा कॉलेजेस काढल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती कशी झालेली आहे? ह्याचे आपण निरीक्षण केले तर ही “समाजसेवा” करणाऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये झालेला प्रचंड बदल आपणास सहजपणे लक्षात येतो. समाजात अजूनही काही समाजसेवी प्रवृत्तीचे लोक आहेत, जे कुणाकडूनही कशाचीही अपेक्षा न करता खरोखरच स्वतःच्या सामर्थ्यानुसार स्वतःच्या जागेवरच समाजसेवा करीत आहेत.

समाजसेवा करणे म्हणजे केवळ शाळा काढून सर्वसामान्य किंवा बुद्धिमान मुले निवडून त्यांनाच शिक्षण देणे, असे नव्हे. महाराष्ट्रामध्ये अजूनही काही लोक आहेत ते कशाप्रकारे समाजसेवा करीत आहेत ह्याचे आपण निरीक्षण केले पाहिजे.

समाजसेवा दोन प्रकारची असते. शैक्षणिक संस्था स्थापन करून आपल्याला त्यातून भरपूर आर्थिक प्राप्ती होऊ शकते, तर दुसऱ्या प्रकारच्या समाजसेवेमध्ये आपल्याला काहीही आर्थिक प्राप्ती न होता, वेळप्रसंगी आपल्यालाच भरपूर खर्च करावा लागतो आणि त्याशिवाय त्याकरिता स्वतः अविरत परिश्रमही करावे लागतात. जे लोक समाजसेवा करीत असतांना त्या समाजसेवेउन ते जर शासकीय अनुदान मिळविण्याचा प्रयत्न करीत असतील किंवा शासकीय अनुदान घेत असतील तर ती त्यांची समाजसेवा नसून तो त्यांचा आर्थिक प्राप्ती करून घेण्याचा व्यवसायच आहे, असेच समजले पाहिजे.

काही ठिकाणी समाजसेवा म्हणून खरोखरच काही लोक अनेक अनाथ, बेसहारा मुला-मुलींचे पालकत्व स्विकारून त्या मुला-मुलींचे संगोपन व शिक्षण करीत असतात. आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या स्वतःच्या जागेतच ते आपला हा उपक्रम राबवित असतात. काही ठिकाणी काही लोक एड्स ग्रस्त पालकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या एड्स ग्रस्त मुला-मुलींचे संगोपन व शिक्षणही करतात तर काही ठिकाणी काही लोक आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे शिक्षण व संगोपन करतात.

कोल्हापूरसारख्या ठिकाणी नसिमा हुर्जुक ह्यांची संस्था आहे जी गेल्या तीस वर्षापेक्षाही अधिक काळापासून अपंगांच्या शिक्षणाचे, संगोपनाचे व त्यांना स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभे करण्याचे, म्हणजेच स्वतःच्या उपजीविकेसाठी त्यांना विविध काम शिकविण्याचे कार्य करीत आहेत. नसिमा हुर्जुक ह्यांनी आपल्या ह्या संस्थेमार्फत फार मोठी समाजसेवा केलेली आहे. आपली पूर्ण मालमत्ता आणि आपले संपूर्ण जीवन त्यांनी ह्या संस्थेसाठी म्हणजेच अपंगाच्या पुनर्वसनासाठी समर्पित केलेले आहे.

डॉ. प्रकाश आमटेंचे “प्रकाशवाटा” हे आत्मचरित्र वाचल्यानंतर किंवा त्यांचा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की त्यांनी सुद्धा गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम अशा आदिवासी क्षेत्रात जाऊन साध्या गवताच्या झोपडीत राहून कोणत्याही सोयी सुविधा तिथे उपलब्ध नसतांना तेथील आदिवासिंकरिता केवळ आपल्या पाच-सहा सहकाऱ्यांसह तीस वर्षापूर्वी कार्य सुरु केले होते. आज त्यांनी त्या ठिकाणी मोफत शाळा, मोफत रुग्णालय तसेच अनेक प्रकारच्या सोयी सुविधा त्या दुर्गम भागातील आदिवासींना पुरवून त्यांच्या जीवनातील अंधार हटवून त्या ठिकाणी प्रकाश निर्माण केलेला आहे. त्या ठिकाणच्या आदिवासींना त्यांनी अनेक प्रकारच्या सेवा सुविधा पुरविलेल्या आहेत.

जी सेवा दिन,दुःखी, गरजू तसेच गोरगरीब लोकांना उपलब्ध नाही, अथवा ज्या सेवेची ह्या लोकांना आवश्यकता आहे, त्यांची ती गरज ओळखून आपल्या ऐपतीप्रमाणे आपण आपल्या जागेवर, आपल्या स्वतःच्या खर्चाने त्यांच्याकरिता आपण ते कार्य अत्यंत निस्वार्थीपणे केले पाहिजे. आपली स्वतःची जागा न वापरता, आपला स्वतःचा पैसा न वापरता, आपल्या समाजसेवे करिता दोन माजली दगडी इमारतीचा हव्यास कधीच धरू नका. ज्या सेवेची लोकांना गरजच नाही, ती सेवा इतरांच्या आर्थिक सहकार्याने लोकांना बळजबरीने देण्याचा तुम्ही प्रयत्नही करू नका.

खरोखरच कोणत्या सेवेची, विशेषतः गोर-गरीब जनतेला अथवा गरजू बेसहारा मुला-मुलींना गरज आहे? त्या प्रमाणेच त्यांना मदत व सहकार्य करा. तीच तुमची समाजसेवा राहील. अनेक समाजसेवी लोक वृधाश्रमाची स्थापना करून निराधार व आजारी वृद्धांना सांभाळतात. हे सर्व करतांना कुणी मला इमारतीसाठी किंवा इतर खर्चासाठी आर्थिक मदत करतील काय? याचीही ते कधीच अपेक्षा करीत नाहीत. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे सुद्धा सध्या समाजसेवा म्हणून चांगले कार्य करीत आहेत. आपल्या समाजसेवेसाठी दोन माजली इमारत बांधण्याचा त्यांनी कधीच अट्टहास केलेला नाही. नाना पाटेकर मुंबईत अगदी साध्या टू बी एच के च्या फ्लॅटमध्येच राहातात.

ज्या जय शेतकऱ्यांनी दुष्काळ पिडीत होऊन आत्महत्या केलेल्या आहेत, त्यांच्या विधवांना तसेच त्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना त्यांनी अनेकप्रकारे मदत केलेली आहे, त्यांनाच खरोखर मदतीची गरज होती. प्रा. गाडेकर गुरुजी, ज्या टॅलेंटेड मुलांना तुमच्या मदतीची किंवा तुमच्या शाळेची गरजही नाही त्या टॅलेंटेड मुलांना शाळा काढून शिकविण्याचा तुम्ही का अट्टहास करता?

औरंगाबाद येथील जिन्सी बायजीपुरा येथे “युसुफ मुकाती ट्रस्ट” आहे. ह्या ट्रस्टचे गेल्या काही वर्षापासून अत्यंत चांगले समाजकार्य चालू आहे. ह्या ट्रस्ट तर्फे मंगल कार्यालय, हॉटेल्स इत्यादी ठिकाणचे उरलेले अन्न गोळा करण्यात येते. ते व्यवस्थित सुरक्षितपणे साठविण्यात येते. या ट्रस्ट तर्फे “रोटी बँक” हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत शेकडो गोरगरीब व गरजू लोकांना ह्या अन्नाचे दररोज मोफत वाटप करण्यात येते. त्याचप्रमाणे या संस्थेने “कपडा बँक” सुद्धा स्थापन केलेली आहे. अनेकांकडील वापरात नसलेले चांगले जुने कपडे किंवा मोठ्या व्यापाऱ्यांकडील डेड स्टॉक (विकल्या न गेलेला कपड्यांचा जुना स्टॉक) गोळा करण्यात येतो. त्या कपड्यांचे नंतर हजारो गोर गरीब लोकांना मोफत वाटप करण्यात येते. कुणीही त्या कपडा बँकेमध्ये यावे, आणि आपल्या मापाचे हवे ते कपडे मोफत घेऊन जावे, ही त्यांची योजना आहे. ह्या वर्षी रमजानच्या महिन्यामध्ये आपल्या ह्या कपडा बँकेमार्फत त्यांनी सुमारे तेवीस हजार पेक्षाही अधिक लोकांना कपड्यांचे मोफत वाटप केलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी पाणी बँकसुद्धा स्थापन केलेली आहे. ह्या पाणी बँकेद्वारे वीस लिटरच्या कॅनद्वारे ते दररोज गरजूंना मोफत शुध्द आणि थंड पाण्याचे वाटप करीत असतात. याकरिता त्यांनी एका विशेष वॉटर प्लांटची सुद्धा स्थापना केलेली आहे. त्याशिवाय “चाय पे शादी” ह्या उपक्रमागत त्यांनी अनेक गोर गरीब लोकांचे विवाह लावून दिलेले आहे. विवाह समारंभातील सर्व खर्चाला टाळून केवळ चहा पाणी देऊन त्यांनी अनेक वधू वरांचा विवाह लावून दिलेला आहे. तसेच अनेक समाजसेवी मंडळी किंवा राजकीय मंडळी सार्वजनिक विवाहाचे आयोजन करून अनेक गोर गरीब परिवारातील तरुण तरुणींचे मोफत स्वखर्चाने विवाह लावून देतात. ही सुद्धा एकप्रकारे समाजसेवाच आहे. समाजसेवेचे असे अनेक प्रकार आहेत. खरोखरच समाजसेवा करण्याची इच्छा ठेवणाऱ्या व्यक्तींना अनेकप्रकारे समाजसेवा करता येईल.

डॉ. अनिल अवचट हे पुण्यामध्ये अत्यंत निस्वार्थीपणे व्यसनमुक्तीसाठी कार्य करतात. आत्तापर्यंत त्यांनी हजारो लोकांना दारू पिण्यापासून मुक्त केलेले आहे, दारूच्या व्यसनातून सोडविले आहे. ही सुद्धा त्यांची फार मोठी समाजसेवाच आहे.

प्रा.गाडेकर गुरुजी, २०१९च्या लोकसभा निवडणुकीकरिता आपण स्वतःचे एक कोटी रुपये खर्च करण्याचा संकल्प केला होता. त्याचप्रकारे गोर गरिबांची तसेच ज्यांना खरोखरच गरज आहे, अशा लोकांकरिता तुम्ही ज्या दिवशी स्वतःचे पाच-दहा लाख रुपये खर्च करण्याचा संकल्प करून तसा खर्च कराल, त्याच दिवशी तुम्ही खरे समाजसेवक म्हणून ओळखले जाल. समाजसेवेचे अनेक प्रकार आहेत, अशाप्रकारची कोणतीतरी समाजसेवा करण्याचे सोडून आपण शाळा काढण्याचाच संकल्प केलेला आहे. शाळा काढणे आजकाल समाजसेवा समजण्यात येत नसून तो एक प्रतिष्ठीत व्यवसाय झालेला आहे. त्यामुळे त्याकरिता ह्या उपक्रमाला कुणीही मदत करीत नाहीत, ही अगदी साधी गोष्ट आहे. आपल्याला ह्या बाबतीत फार अनुभव आहे. मी तर अगदीच लहान आणि अनुभव शून्य माणूस आहे. समाजसेवेचे अनेक प्रकार आहेत, ज्यांना समाजसेवा करायची आहे त्यांनी ह्यासारख्या अनेक गोष्टींचा शोध घेतला पाहिजे. अशा अनेक गोष्टींपैकी काही गोष्टी निवडून जेव्हा त्या गोष्टींची अमलबजावणी होईल आणि त्याकरिता जेव्हा आपला स्वतःचा पैसा खर्च होईल, त्याच दिवशी आपल्यातील खरा समाजसेवक जागृत झालेला आहे, असे म्हणता येईल.

प्रा. विष्णू गाडेकर गुरुजी, यांनी यापैकी काहीही केले नाही तरीही काहीच हरकत नाही. समाजातील इतर लोक जी काही समाजसेवा करीत असतील त्यांच्यासोबत त्यांच्या कार्यात ते सहभागी झाले तर ती सुद्धा त्यांची फार मोठी समाजसेवाच होईल. त्यांनी आत्तापर्यंत केलेली समाजसेवा कधी कधी य्तांच्या घरच्या मंडळींना व इतरांनाही अनेकवेळा त्रासदायकच ठरत गेलेली आहे. आता वयाच्या पासष्टाव्या वर्षी ते जर काहीही न करता शांतपणे बसून राहिले, तर ती सुद्धा त्यांची एक फार मोठी समाजसेवाच होईल, असे मला वाटते. परंतु त्यांच्या ह्या “समाजसेवेच्या कार्यावर” एवढे प्रेम आहे की, त्यांना असे शांत बसणे कधीच जमणार नाही. समाज कार्य करण्यासाठी त्यांच्या मनात तसेच त्यांच्या शरीरात असलेला प्रचंड उत्साह तसेच समाज कार्याची असलेली त्यांची अति आवड हीच तर त्यांच्या समाजकार्यातील त्यांची उर्जा आहे.

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!