अशी सावधगिरी बाळगून, इंटरनेटवरूनही लग्न जुळवा

Spread the love

आजकाल तरुणांना तसेच तरुणींना विवाह करण्याअगोदर एकमेकांना अनुरूप वधू किंवा वर संशोधन करणे फारच कठीण झालेले आहे. आपल्या समाजातील परिचितांमध्ये, नातेवाईकांमध्ये तसेच त्यांच्या संपर्कातील इतर मंडळींमध्ये वर किंवा वधूचे संशोधन करण्याचा प्रयत्न केला जातो. बहुतेक वेळा तर तरुण किंवा तरुणी कुठे महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेत असतील, अथवा कुठे नोकरी वगैरे करीत असतील तर तिथेही त्यांच्या संपर्कात त्यांना अनुरूप असलेल्या वधूचे किंवा वराचे अस्तित्व जाणवले अथवा त्यांचा एकमेकांशी चांगला परिचय झालेला असला तर त्यातूनही ते आपल्याकरिता वधू किंवा वराचे संशोधन करून नंतर त्यांची भेट आपल्या पालकांसोबत करून आपला जीवन साथी निवडतात. एकमेकांचा परिचय असल्यामुळे त्यांना कदाचित आपल्याला अनुरूप जोडीदार मिळाल्याचे समाधान होत असावे.

आजकाल वधू-वर संशोधन करण्याकरिता ह्यापेक्षाही चांगला एक पर्याय उपलब्ध झालेला आहे. इंटरनेटमुळे आता केवळ देशातीलच नवजे तर संपूर्ण जगातील लोकसुद्धा एकमेकांच्या संपर्कात सहजपणे येऊ शकतात. वधू-वर संशोधन करणाऱ्यांकरिता आता इंटरनेट सेवेचासुद्धा मोठ्या प्रमाणावर वापर केल्या जात आहे.

now a days people search online for bride and groom

जीवनसाथी डॉट कॉम, शादी डॉट कॉम वगैरे सारख्या अनेक संस्थांच्या सेवा तरुण-तरुणींना सहजपणे वधू-वर संशोधन करण्याकरिता मदत करीत आहेत. वधू वर संशोधन करणाऱ्यांनी इंटरनेटवर ही वेबसाईट उघडून त्यामध्ये आपल्या छायाचित्रासह आपली संपूर्ण माहिती नोंदवायची असते, आपले नाव, वय, जन्म तारीख, शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय, वार्षिक उत्पन्न, परिवारातील सदस्यांसंदर्भात थोडक्यात माहिती म्हणजे भाऊ बहिणी किती आहेत? त्यापैकी कुणाची लग्ने झालीत आणि कुणाची लग्ने होणे बाकी आहेत? ते काय करतात? आई-वडिलांसंदर्भातील माहिती, त्यांचा व्यवसाय किंवा नोकरी, स्वतःचे घर आहे की नाही? स्वतःची कार वगैरे असेल तर त्याची माहिती, त्यांना कशा प्रकारच्या वधूची किंवा वराची अपेक्षा आहे? त्यासंदर्भातही वधू वर संशोधन करणाऱ्या व्यक्ती आपली अपेक्षा नोंदवितात, त्यासोबतच आपला ई-मेल आणि मोबाईल क्रमांकही तसेच आपण राहात असलेल्या शहराचे नावही त्यामध्ये त्यांनी नोंदविलेले असते.

brides and grooms are divided into different categories

ह्या वेबसाईटवर त्यांच्या जाती निहाय, तसेच त्यांच्या अपेक्षेनुसार त्यांना अनुरूप असलेल्या अनेक वधू-वरांची यादी किंवा काही प्रोफाईल म्हणजेच त्यांची छायाचित्रासह संपूर्ण माहिती त्यांनी दिलेल्या ई-मेलवर टाकण्यात येते. ह्या वेबसाईटवर ही सर्वच माहिती त्या तरुण-तरुणींना पाहाता येते. आपल्याला अनुरूप असलेल्या त्या प्रोफाईलमध्ये त्या त्या तरुणीच्या किंवा तरुणाच्या पालकांचा मोबाईल नंबर दिलेला असतो.

सुरुवातीला आपल्याला योग्य वाटणाऱ्या तरुणीच्या किंवा तरुणाच्या प्रोफाईलवर आपल्याला आपला इंटरेस्ट सेंड करण्याची सोय असते. आपण सेंड केलेला इंटरेस्ट त्यांनी मान्य केला किंवा अमान्य केला तर त्याचे उत्तर आपल्याला त्या आपल्या प्रोफाईलवर पाहायला मिळते. त्यांनी आपला इंटरेस्ट मान्य केला तर आपण किंवा समोरची मंडळी या एकमेकांच्या प्रोफाईलवरील मोबाईल नंबर घेऊन एकमेकांशी संपर्क साधू शकतात. एकमेकांच्या नातेवाईकांना किंवा एकमेकांना प्रत्यक्ष भेटून आपल्या अपेक्षेप्रमाणे वधू किंवा वर आहेत काय? ह्या संदर्भात ते प्रत्यक्षात पाहून चौकशी करू शकतात.

इंटरनेटमुळे आपल्याला अगदी अनोळखी असणाऱ्या अगदी दूर दूरच्या शहरातील आपल्याला अपेक्षित असणाऱ्या वधू वरांची माहिती आपल्याला आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर इंटरनेटद्वारे सहजपणे पाहाता येते. आपल्याला अगदी अनोळखी असणाऱ्या व्यक्तीशी वधू किंवा वर म्हणून निवड करतांना किंवा त्यांच्यासोबत पती किंवा पत्नी म्हणून आपल्या आयुष्याचे नाते जोडतांना त्या त्या वधू किंवा वराची बारकाईने चौकशी करणे जरुरी असते. कारण बऱ्याच वेळा प्रोफाईलमध्ये आहे त्यापेक्षा अधिकची माहिती दिलेली असते. प्रोफाईलमध्ये दिलेल्या त्या माहितीची व्यवस्थितीत चौकशी करून, खात्री करणे आवश्यक असते.

check the all kind of official and non official papers

उदा – वधू किंवा वराचे आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, दहावी-बारावीची टीसी, गुणपत्रिका त्यानंतर पुढील महाविद्यालयीन शिक्षणाची गुणपत्रिका व टीसी, नोकरीच्या नियुक्तीच्या पत्राची झेरॉक्स, नोकरी असेल तर नोकरीच्या पगार पत्राची झेरॉक्स तसेच त्या वरासोबत नोकरीच्या कार्यालयात जाऊनही तिथे त्या वराची व त्याच्या नोकरीची चौकशी करावी, त्यातही काहीच गैर नाही. आपली सत्यता सिध्द करण्याकरिता तो तरुण तुम्हाला तिथे जरूर घेऊन जाईल. त्याशिवाय नोकरीचा पगार ज्या बँकेत जमा होतो त्या खात्याच्या पासबुकची झेरॉक्स, स्वतःचे घर असेल तर त्या घराच्या लाईटबील, पाणीबिल आणि मालमत्ता टक्स ……………………. भरल्याच्या पावतीची झेरॉक्स, शेती वगैरे असेल तर त्या शेतीच्या सातबाराच्या उताऱ्याची झेरॉक्स, ह्या सर्व कागदपत्राच्या झेरॉक्स, स्वतःची कार वगैरे असेल तर त्या गाडीच्या मालकीच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स, त्याशिवाय आपण आणखी विशेष कशाच्या झेरॉक्स देऊ शकतो? त्या सर्व झेरॉक्स कागदपत्रांची फाईल आपल्या बायोडाटा आणि छायाचित्रासह वराच्या नातेवाईकांनी वधूच्या नातेवाईकांना न मागता द्यावी किंवा दाखवावी. तसेच वधूने सुद्धा आपल्या अशाच काही आवश्यक त्या म्हणजेच शिक्षण वगैरे संदर्भातील कागदपत्रांच्या झेरॉक्सची फाईल वराने न मागता दाखवावी.

ह्या कागदपत्रांवरून वरा संदर्भात तसेच वधू संदर्भात बरीचशी सत्य आणि वास्तविक माहिती एकमेकांना सहजपणे मिळू शकते. आपली सत्यता सिध्द करण्यासाठी तरुण तरुणींनी ह्या माहिती संदर्भातील आपल्या सर्व झेरॉक्स प्रतींच्या कागदपत्रांची फाईल अगोदरपासूनच तयार करून ठेवावी. ही झेरॉक्स प्रतींची फाईल न मागता वधू किंवा वराला दाखवून त्यांनी आपली सत्यता सिध्द करावी.

अनेकवेळा प्रोफाईलमध्ये खोटी किंवा अतिरंजित अवास्तव अशी सुद्धा माहिती काही काही मंडळी देत असतात. त्यामुळे आपण त्या खोट्या मंडळींसारखे नाहीत हे आपण आपल्या कागदपत्रांद्वारे, अगोदर न सांगता सिध्द करावे. इंटरनेटद्वारे करण्यात येणारे विवाह नोंदणी पद्धतीने करावे, म्हणजे त्या विवाहाची खात्री असते, अन्यथा अनेकवेळा नोंदणी न करता झालेल्या विवाहातून वधूची किंवा वराची फसगतही झाल्याच्या अनेक बातम्या आम्ही वर्तमानपत्रात वाचलेल्या आहेत.

अनेकवेळा आपण बातम्या वाचतो की, वधू वरांचा विवाह होतो आणि नंतर चार सहा महिन्याने वधूला माहिती पडते की, आपल्या नवऱ्याचा तर ह्या अगोदरच एक विवाह झालेला आहे आणि त्याला एक बाळही आहे. तसेच बऱ्याच वेळा असेही होते की, विवाह झाल्यानंतर चार आठ दिवसात वधू त्या घरातील संपत्तीवर डल्ला मारून कुणालाही न सांगता घरातून फरार झालेली असते. वधू किंवा वर दाखविण्याचा किंवा त्यांना भेटण्याचा कार्यक्रम सुद्धा कोणत्यातरी एखाद्या भाड्याच्या घरातच झालेला असतो. ते घर सुद्धा आपले स्वतःचेच आहे असे त्यावेळी त्यांनी आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना सांगितलेले असते. त्यामुळे ते घर सुद्धा त्या वधू किंवा वराच्या नातेवाईकांनी सोडून देऊन त्यांनी लगेच पोबारा केलेला असतो.

beware of frauds in online marriages

अनेकवेळा तर परदेशात मोठी नोकरी करणारा श्रीमंत जावी गटवण्याच्या नादात त्याने मागितली तेवढी रक्कम देऊन लग्न करण्यात येते. जावई पंधरा-वीस दिवसांच्या सुटीवर येऊन हुंडा म्हणून मोठा खर्च घेऊन लग्न करतो. पंधरा वीस दिवस नववधू सोबत राहातो आणि नंतर, “सुटी संपली, आता एक महिन्याने येऊन पत्नीचा पासपोर्ट आणि व्हिसा तयार करून पत्नीला परदेशात घेऊन जातो”, असे म्हणून तो परत निघून जातो. त्यानंतर तो कधीच परत येत नाही. एखादा महा बिलंदर असलेला व्यक्ती परतही येतो, पत्नीच्या नातेवाईकांकडून पासपोर्ट आणी व्हिसाकरिता पुन्हा मोठी रक्कम उकळतो, आणि पत्नीला आपल्यासोबत परदेशातही घेऊन जातो. तिथे त्याच्या पत्नीला कळते की, आपल्या पतीची तिथे अगोदरपासूनच एक पत्नी आणि तिचे बाळही आहे.

पुढे अनेक भानगडी होतात, ती नववधू परत जरी आली तरीही मग पुढे फसवणुकीची तक्रार, कोर्ट कचेऱ्या, घटस्फोटाचे दावे, नुकसान भरपाई, वगैरे वगैरेच्या भानगडी करण्यातच त्या नववधूचा आणि तिच्या नातेवाईकांचा भरपूर वेळ आणि पैसा खर्च होऊन त्यांना विनाकारण मनस्थापही सहन करावा लागतो. भरपूर श्रीमंत अथवा पैसा खर्च करणाऱ्या वधू पित्याकडे पाहूनच, हे परदेशवारीचे जाळे टाकल्या जाते. मागे अशाच एका प्रकरणात अडकलेल्या मूळ भारतीय असलेल्या परदेशी राहणाऱ्या वराने जवळपास आठ वेळा लग्न करून आठ नववधूंची आणि त्यांच्या पालकांची फसवणूक केली होती. दिल्लीत ह्या वराला अटक केल्या गेली होती, काही वर्षापूर्वी ही बातमी आम्ही वाचली होती.

तर अशाही गोष्टी कधी कधी घडत असतात. त्यामुळे त्या संदर्भात कागदपत्रांची पाहाणी करून, त्या कागदपत्राचीही सत्यता तपासूनच मग पुढे पाउल टाकावे, अन्यथा आजकाल लोक नोटासुद्धा नकली छापतात, मग असे खोटी कागदपत्रे किंवा त्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती तयार करण्यात त्यांना कितीसा वेळ लागेल?

शेवटी अनेक चांगल्या गोष्टींचा उपयोग कधी कधी वाईट प्रवृत्तीचे लोक इतरांचे वाईट करण्यासाठीसुद्धा करीत असतात. अर्थात ही शक्यता अगदी शंभरात फक्त वीस टक्केच असते. नेमकी ती वीस टक्क्यातील गोष्ट आपल्याच बाबतीत होऊ नये, म्हणून वधू वरांच्या पालकांनी ह्या बाबतीत अत्यंत दक्ष असणे आवश्यक आहे.

in some cases people have found their right life partner from online websites

इंटरनेटमुळे काही काही वधू वरांना त्यांना अपेक्षित असा जोडीदार मिळून त्यांचा संसार सुखाचा झाल्याचेही काही प्रकरणे माझ्या पाहाण्यात आहेत. त्यामुळे वधू वरांचा शोध घेणाऱ्यांनी इंटरनेटद्वारे आपल्याला अपेक्षित असणाऱ्या वधू वरांचा शोध जरूर घ्यावा. त्यांची चांगली चौकशी करावी, आणि नोंदणी पद्धतीने अगोदर नोंदणी कार्यालयात विवाह करून, वाटल्यास नंतर त्यांना हवा तसा त्यांनी कार्यक्रम करावा. शेवटी ह्या सर्व गोष्टी एकमेकांच्या विश्वासावरच अवलंबून असतात. त्याशिवाय जगात सर्वच लोक वाईट आहेत, असेही नाही. अनेक लोक चांगलेही आहेतच, तरीही दक्षता बाळगून आपल्याला अपेक्षित असणाऱ्या वधू वरांचा शोध घेऊन, एकमेकांचे वैवाहिक आणि पारिवारिक जीवन एकमेकांनी सुखी करण्याचा प्रयत्न करावा हीच सर्वांची अपेक्षा असते.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!