दहावीची परीक्षा देतांना, खालील गोष्टी लक्षात ठेवा

Spread the love

नववी पर्यंतच्या शालेय जीवनात आपण पास होऊ की नापास होऊ? ह्या गोष्टीची विद्यार्थ्याला फारशी चिंता नसते, कारण ह्या अगोदरच्या सर्व परीक्षा आपण आपल्या शाळेमध्येच दिलेल्या असतात. शिवाय शाळेच्या निकालाची चांगली टक्केवारी येण्यासाठी नववी पर्यंतच्या वर्गामध्ये सहसा कुणालाही अनुत्तीर्ण केल्या जात नाही, त्याशिवाय हा निकाल शाळेच्या अंतर्गतच शाळेतील शिक्षकांच्या मार्फतच लावण्यात येतो. परंतु दहावीचे तसे नसते. दहावीचा निकाल दहावी बोर्डातून लावण्यात येतो. दहावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्याकरीता बोर्डामार्फत कुठे जाणार? ते पेपर कोण तपासणार? हे सर्व अत्यंत गोपनीय ठेवण्यात येते, तसेच हा दहावीचा निकालही अत्यंत काटेकोरपणे लावण्यात येतो. त्यामुळे दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणारांची फार मोठी संख्या असते. त्यामुळेच विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेची अत्यंत धास्ती वाटत असते. ही परिक्षा देण्याकरिता विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वासही नसतो, त्यामुळे तेथे आम्ही दहावीच्या विद्यार्थ्यांनी परिक्षा देण्यापूर्वी काय-काय करावे? ह्या बद्दल विशेष सूचना देत आहोत.

 

परीक्षेकरिता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करा.

Build confidence in students' minds for the exam

दहावीच्या वर्गात शिकत असतांना विद्यार्थ्यांनी वर्षभर चांगलाच अभ्यास केलेला असतो. अनेकांनी शिकवणीसुद्धा लावलेली असते. शाळेतील अभ्यास, शिकवणीच्या वर्गातील अभ्यास आणि विद्यार्थ्यांनी घरी केलेला अभ्यास अशा प्रकारे अभ्यासाच्या तिहेरी चरकात विद्यार्थी अगदी पिळून निघतो, तरीही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही काही भिती असते, त्या भीतीमुळे विद्यार्थ्यांच्या मनातील आत्मविश्वास नाहीसा होतो. शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भिती काढून टाकून, त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा.

ज्याप्रमाणे ह्या अगोदर शाळेमध्ये आपल्या परिक्षा होत असत, तशीच ही सुद्धा एक परिक्षा आहे. परंतु ती आपल्या शाळेत न घेता दुसऱ्या शाळेमध्ये घेण्यात येते. त्याशिवाय ह्या परीक्षेचा पेपरही अगदी बारकाईने तसेच काटेकोरपणे तपासण्यात येतात. शिवाय कॉपी करणे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या गैर प्रकारांना त्या ठीकांनी आळा घालण्यात येतो. विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास झाला असेल तर विद्यार्थी निश्चितपणे ह्या बोर्डाच्या परीक्षेतही उत्तीर्ण होतो, अशा प्रकारची माहिती विद्यार्थ्यांना देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा शिक्षकांनी प्रयत्न केला पाहिजे.

 

विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या कक्षात जाण्यापूर्वी अशी घ्या दक्षता.

recheck everything before going in exam hall

विद्यार्थ्याने परीक्षेचे टाईमटेबल, तसेच आपले हॉल तिकीट आपल्या सोबत घ्यावे. पहिल्या दिवशीच नाहीतर प्रत्येक दिवशी अर्धातास अगोदर विद्यार्थ्याने परीक्षा हॉलवर उपस्थित होऊन आपला रोल नंबर कोणत्या कक्षात आहे? ह्याची सूचना हॉलच्या बाहेर लावलेल्या फळ्यावर पाहावी. पेपर लिहिण्याचे आपले सर्व साहित्य म्हणजेच दोन तीन बॉलपेन, पेन्सिल, खोडरबर, पेपर लिहिण्याकरिता परीक्षा पॅड, पेपरचा वेळ पाहाण्याकरिता राईट टाईम चालणारी एक घड्याळ. आपली पाण्याची बॉटल, हे सर्व साहित्य विद्यार्थ्याने आपल्या जवळच्या पारदर्शकपिशवीत ठेवावे.

परीक्षेच्या वेळी मोबाईल जवळ ठेऊ नये. तसेच वह्या, पुस्तके, कॉपी करून लिहिण्याकरिता पुस्तकातून फाडून घेतलेली गाईडची पान वगैरे सारखे साहित्य आपल्या जवळ कधीच लपवून ठेऊ नये. गेल्या वर्षभरात आपण जो काही अभ्यास केला असेल अथवा जी काही त्या अभ्यासाची उजळणी केली असेल, त्याच भरवशावर अत्यंत आत्मविश्वासाने आपण परीक्षेचा पेपर लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

 

उत्तरपत्रिका हातात आल्यावर अगोदर हे करा.

उत्तर पत्रिका हातात आल्यावर तुमच्या हॉल तिकिटावर असलेला तुमचा रोल नंबर तसेच इतर आवश्यक असलेली माहितीसुद्धा व्यवस्थित तुमच्या उत्तरपत्रिकेवर लिहा.

 

प्रश्नपत्रिका हातात आल्यावर हे करा.

mark on the easy questions that you can solve easily

प्रश्नपत्रिका हातात आल्यावर कोणत्याही प्रकारे विचलित न होता अथवा न घाबरता, पूर्ण प्रश्नपत्रिकेवर दोन मिनिटात एक सरासरी नजर टाकून त्या प्रश्पात्रीकेचे वर वर निरीक्षण करा. आपल्या ओळखीचे किती प्रश्न त्यामध्ये आहेत? हे जाणून घ्या. नंतर प्रश्नपत्रिकेचे थोडे बारकाईने परंतु सावकाश चार-पाच मिनिटात वाचन करा. आपल्या हातात एक पेन्सिल घ्या आणि आपल्या ओळखीच्या प्रश्नांवर राईटची खूण करा.

जे जे प्रश्न आपल्याला सोडवायला सोपे वाटतात, त्यावर राईट ह्या अर्थाची खूण करून त्याखाली अंडरलाईन काढा. म्हणजे हा प्रश्न तुम्हाला चांगला सोडविता येतो. हा प्रश्न तुम्ही अगोदर सोडविणार अशा अर्थाची ती अंडरलाईन असते.

पूर्ण प्रश्नपत्रिकेचे वाचन झाल्यामुळे आता तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका समजलेली आहे. आता कोण-कोणते प्रश्न आपल्याला कोणकोणत्या क्रमाने सोडवायचे आहेत? त्यानुसार त्या त्या प्रश्नांच्या समोर अनुक्रम म्हणजेच १,२,३,४ असे आकडे टाका. जो प्रश्न प्रश्न तुम्हाला फार चांगला सोडविता येत असेल, त्याच्यावर एक नंबर टाका, त्याच प्रमाणे पुढील प्रश्नांवरही २,३,४ हे नंबर टाका.

हे नंबर टाकून झाल्यावर आता अजिबात वेळ वाया न घालविता आपल्या स्मरणशक्तीच्या जोरावर प्रश्नांची उत्तरे तुम्ही टाकलेल्या नंबरप्रमाणे लिहिण्यास सुरुवात करा. तुमच्याकडे एकूण किती वेळ आहे? त्यावेळेनुसार तुम्हाला एकूण किती प्रश्ब सोडवायची आहेत? त्यानुसार प्रत्येक प्रश्न सोडवायला तुम्हाला किती मिनिटे वेळ मिळणार आहे? त्याचा तुम्ही अंदाज घ्या आई तेवढ्या वेळात तुमचा प्रत्येक प्रश्न सोडविण्याची दक्षता घ्या.

 

प्रश्नांची उत्तरे लिहितांना एकाग्रतेने लिहा.

concentrate and write the answers

प्रश्नपत्रिकेचा अंदाज घेतल्यानंतर आता तुम्हाला जी काही उत्तरे लिहायची आहेत, ती उत्तरे लिहिण्याकरिता मनाची शांतता अबाधित ठेवून, मनात आत्मविश्वास जागवून, मन एकाग्र करून आपल्या स्मरणशक्तीच्या जोरावरच एकाग्रतेने प्रत्येक प्रशाचे उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. यावेळी प्रश्न पत्रिकेच्या विचारांशिवाय दुसरे कोणतेही विचार मनात आणू नका.

आपल्या मागे, पुढे अथवा शेजारी बसलेल्या इतर विद्यार्थ्यांकडे, त्यांच्या उत्तरपत्रीकांकडे पाहण्याचा किंवा कुणाला काही विचारण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. ह्यामुळे तुमची एकाग्रता भंग होऊन तुमचे लक्ष विचलित  होते. त्यामुळे त्या प्रश्नांचे तुम्ही जे काही उत्तर लिहिणार होते ते उत्तरही तुम्हाला वेळेवर आठवत नाही. तसेच तुम्ही चुकून कॉपी करण्याकरिता काही गाईडची पाने लपवून सोबत आणली असतील तर पर्यवेक्षकांचे जेव्हा आपल्याकडे लक्ष राहाणार नाही, तेव्हा म्हणजेच पहिल्या एक दीड तासानंतर आपण त्याची कॉपी करू, असा तुम्ही विचार करता. पर्यवेक्षक आपल्यावरून केव्हा लक्ष हटवितो, ह्याचीच वाट पाहात तुम्ही सुरुवातीचा एक दीड तास वाया घालविता. त्यामुळे परीक्षा हॉलमध्ये जातांना चुकूनही गाईडची पाने वगैरे सारख्या गोष्टी कधीही आपल्या सोबत ठेवू नका. जी काही उत्तरे लिहायची आहेत, ती केवळ आपल्या स्मरणशक्तीवर विसंबूनच लिहिण्याचा प्रयत्न करा. ह्या प्रयत्नात तुम्ही अनुतीर्ण झाले तरीही चालेल, ह्यामुळे फारसे काही नुकसान होत नाही, उलट तुम्हाला तोच पेपर पुन्हा एकदा देण्याची एक संधी मिळविता येते. तोच पेपर अगोदरही तुम्ही दिलेल्या असल्यामुळे पूर्वीच्या अनुभवामुळे तुम्हाला दुसऱ्यावेळी कदाचित त्या विषयात अतिशय चांगले गुणही मिळू शकतात. त्यामुळे अनुत्तीर्ण होण्याची भिती कधीही मनात बाळगू नका. पुन्हा-पुन्हा चांगला अभ्यास करून दुसऱ्यांदा परीक्षा देण्याची आपल्या मनाची नेहमीच तयारी ठेवा.

 

शेवटच्या पंचेचाळीस मिनिटांची जाणीव ठेवा.

keep last moment time in your mind

दोन, अडीच किंवा तीन तासांचा पेपर असतो.  त्यावेळेपैकी जेव्हा शेवटची पंचेचाळीस मिनिट बाकी असतात, तेव्हा आपण त्याअगोदर बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे सोडविलेली असतात. आता राहिलेली ही पंचेचाळीस मिनिटे आपल्यासाठी अत्यंत महत्वाची असतात. ह्या वेळेचा आपण पुरेपूर वापर करावा. अनेक विद्यार्थी आता आपले सर्व काही ह्या अगोदरच लिहून झालेले आहे, आता ह्याशिवाय आपल्याला अधिक काहीच लिहिता येत नाही, असे समजून आता इथे परिक्षा हॉलमध्ये थांबण्यात काहीच अर्थ नाही, असा विचार करून पेपर पर्यवेक्षकांकडे जमा करून परिक्षा हॉलच्या बाहेर निघून जातात. परंतु असे कधीही करू नये, परिक्षेसाठी उपलब्ध असलेल्या तुमच्या सर्व वेळेचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न करा.

जे प्रश्न आपल्याला अत्यंत कठीण वाटल्यामुळे सोडविणे बाकी राहिले आहेत, त्या-त्या प्रश्नांनाही ह्या पंचेचाळीस मिनिटात सोडविण्याचा प्रयत्न करा. कदाचित ह्या प्रश्नांमधील तुमचे अर्धे उत्तर जरी बरोबर असले तरीही त्याप्रमाणे त्याकरिता काही ना काहीतरी गुण तुम्हाला मिळतीलच.

 

उत्तरपत्रिका लिहिल्यानंतर त्यावर सरासरी नजर फिरवून फेर तपासणी करा.

तुम्ही लिहिलेल्या उत्तरपत्रिकेवर सरासरी नजर टाकून पुन्हा एकदा तुम्ही लिहिलेली उत्तरे वाचण्याचा अथवा त्याची फेर तपासणी करण्याचा प्रयत्न करा. कुठे काही थोडीफार दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती करण्याचाही प्रयत्न करा.

 

प्रत्येक उत्तराच्या खाली तीन-चार ओळींची जागा मुद्दाम रिकामी ठेवा, पुरवण्यांचा वापर करा.

तुम्ही लिहिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांच्या खाली सरासरी तीन-चार ओळींची जागा मुद्दाम रिकामी सोडा. मधूनच एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबद्दल अधिक माहिती आठवली तर ती माहिती त्या रिकाम्या ठेवलेल्या तीन-चार ओळींच्या जागेमध्ये तुम्हाला सहजपणे लिहिता येते. उत्तरपत्रिका पूर्णपणे भरली असेल तर वेगळी पुरवणी मागून घ्या, तो तुमचा हक्क आहे. आवश्यकतेप्रमाणे उत्तरपत्रिकेची पुरवणी तुम्हाला सहजपणे मिळू शकते.

 

परीक्षेच्या आदल्या दिवशी अजिबात जागरण करू नका.

do not study whole night before the exam

विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेकरिता पूर्ण वर्षभर भरपूर अभ्यास केलेलाच असतो. परीक्षेच्या काळात त्याच अभ्यासाची वरवर सरसरी फक्त उजळणी करायची असते. त्या विषयाचे आकलन होऊन तो विषय केवळ समजून घ्यायचा असतो. कोणत्याही विषयाचे पाठांतर न करता केवळ तो विषय समजून घेणेच अत्यंत महत्वाचे असते. पाठांतरात फार वेळ जातो आणि घोकंपट्टीचा अभ्यास कधीच काहीच कामाचा नसतो.

परीक्षा आल्यानंतर वेळेचा जास्तीत-जास्त फायदा घेता यावा, म्हणून अनेक विद्यार्थी परीक्षेच्या रात्री अभ्यास करण्याकरिता रात्रभर जागरण करतात आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ते परीक्षेकरिता जातात तेव्हा त्यांची पुरेशी झोपही झालेली नसते. मग पेपर लिहितांना त्यांना झोपेच्या डुलक्या लागायला सुरुवात होते. पेपर लिहिणे किंवा उत्तरे लिहितांना मन एकाग्र करणे त्यांना अत्यंत अवघड होते. अशावेळी त्यांची स्मरणशक्तीसुद्धा व्यावस्थित काम करीत नाही. म्हणून चुकूनही परीक्षेच्या आदल्या रात्री जागरण करू नका, अन्यथा तुमचा परीक्षेचा दिवस झोपेच्या डुलक्या घेण्यातच फुकट वाया जाईल.

 

अशाप्रकारे दहावीच्या परीक्षेकरिता आत्मविश्वासापूर्वक परीक्षेची तयारी करा. ह्या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात जर कधी अपयश आले तरीही पुन्हा पुन्हा परिक्षा देऊन यश मिळविण्याचा प्रयत्न करा.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!