आपल्या मुलांच्या टवाळखोरी कडेही थोडे लक्ष असू द्या

Spread the love

आजकाल आई-वडील आपल्या मुलांना सांभाळतांना किंवा त्यांचे संगोपन करतांना, त्याला काय-काय हवे आहे? ते सर्व पुरविण्याचा प्रयत्न करतात. त्याने कशाचीही मागणी करो, ती वस्तू त्याच्या करिता अगदी सहजपणे उपलब्ध करून देतात. केवळ आपल्या मुलाला हव्या त्या सुख-सोयी, अथवा हव्या त्या वस्तू पुरविल्या म्हणजे ते आपल्या मुलांच्या संगोपनाचे कार्य व्यवस्थित करीत आहेत, असे कधीच समजायचे नसते.

parenting guide how to treat your kids

आपल्या मुलाला हव्या त्या वस्तू किंवा आवश्यक त्या सुविधा पुरविण्या सोबतच, त्यांनी आपला मुलगा लहान असल्यापासूनच त्याच्यावर चांगले संस्कारही केले पाहिजेत. त्यासोबतच त्याला चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्नसुद्धा केला पाहिजे.

मुलाचे अति लाड करून त्याच्या सवयी बिघडवीण्यापेक्षा त्याला पालकांनी त्याचे लहान-मोठी कामे स्वतः करण्याकरिता प्रोत्साहन दिले पाहिजे. त्याच्या सर्वच कामांची त्याला सवय लावली पाहिजे. उदा – अगदी पाच-सहा वर्षांचा असतांनाच त्याला त्याचे कपडे स्वतः घालता आले पाहिजे. त्याचे मोजे त्याने स्वतः घातले पाहिजे. त्याच्या बुटाला पॉलिश करण्याचीसुद्धा त्याला सवय झाली पाहिजे.

parenting guide - let your kid do these things by their own

जेव्हा त्यांचा मुलगा दुसरी-तिसरीमध्ये जातो तेव्हापासूनच त्याला ह्या सर्व सवयी लावण्यात आल्या पाहिजे. आपले शाळेचे दप्तर त्याने स्वतःच भरले पाहिजे. शाळेतून आल्यावर आपले दप्तर त्याने व्यवस्थित जागेवर ठेवले पाहिजे. जेवण केल्यावर आपले ताट आपणच कसे स्वच्छ धुवून जागेवर ठेवायचे? हे सुद्धा त्याला आले पाहिजे. ही लहान-मोठी कामे त्याच्याकडून करवून घेवून त्याला ह्या प्रकारच्या कामामध्ये स्वावलंबी बनविले पाहिजे. अगदी लहानपणा पासूनच ह्या कामाच्या त्याला सवयी लावल्या नाहीत, तर मोठा झाल्यावर सुद्धा तो आपली अशाप्रकरची इतरही अनेक कामे तो इतरांकडूनच करवून घेईल. ( आपल्या मुलांना परावलंबीय होऊ न देण्यासाठी हे वाचा )

त्याच्यासोबतच त्याची मित्र मंडळी कोण-कोण आहेत? ह्याकडेही त्या मुलाच्या आई-वडिलांनी लक्ष दिले पाहिजे. शाळेत त्याने चांगल्या मुलांसोबतच राहिले पाहिजे. वाईट सवयीच्या मुलांसोबत राहिल्यास त्याला अनेक वाईट सवयी लागू शकतात.

parenting guide - make your kids do these things

लहानपणापासूनच त्याला अभ्यासाच्या तसेच चांगले खेळ खेळण्याच्या सवयी लावल्या पाहिजे. आजकाल टीव्हीमधील कार्टून फिल्म पाहाण्यात मुले बराच वेळ वाया घालवितात. ह्यावरही पालकांनी लक्ष दिले पाहिजे. एका ठराविक वेळी उठणे, ठराविक वेळी दैनिक दिनचर्या पार पाडणे, ठराविक वेळी जेवण, शाळा, अभ्यास, विश्रांती, मनोरंजन, खेळ इत्यादी मुलांच्या ह्या दिनक्रमांवर पालकांनी लक्ष ठेवले पाहिजे. त्यांचा मुलगा ह्या सर्वच गोष्टी व्यवस्थित पार पाडतो की नाही? ह्याकडे ही पालकांनी लक्ष दिले पाहिजे. त्याचप्रमाणे मुलींनासुद्धा त्यांच्याकरिता आवश्यक असणाऱ्या सर्वच कामांमध्ये त्यांना लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मुलांच्या अथवा मुलींच्या अति लाडापायी पालकांनी त्यांची ही कामे स्वतः करून देत गेल्यास, त्यांच्या मुलांना अथवा मुलींना स्वावलंबनाचे प्रशिक्षण योग्य प्रकारे न मिळाल्यास, त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आळस निर्माण होईल. आपल्या ह्या लहान-मोठ्या कामाकरिताही त्याला त्याच्या आईवर अथवा इतरांवर अवलंबून राहावे लागेल. ह्याचा त्याच्या पुढील जीवनावर सुद्धा वाईट परिणाम होऊ शकतो.

आजकाल मुलगा महाविद्यालयात जाऊ लागल्यावर अनेक पालक त्याला मोटार सायकल, स्कूटर वगैरे घेऊन देतात. वेळ वाचविण्याच्या दृष्टीने हे सर्व ठीकच आहे, परंतु तो महाविद्यालयात जाऊ लागल्यावर व्यवस्थित वर्गात बसतो काय? व्यवस्थित अभ्यास करतो काय? तिथे तो कशा प्रकारच्या मुलांच्या संपर्कात आहे? हे सुद्धा त्याच्या पालकांनी पाहिले पाहिजे. ( मुलांवर चांगले संस्कार करण्याकरिता पालकांनी ह्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे )

parenting guide - take where abouts of your kids

ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गरिबीच्या परिस्थितीची पूर्णपणे जाणीव आहे, तसेच आपले आई-वडील आपल्याला किती कष्टाने शिक्षणासाठी पैसा पुरवीत आहेत? हे ज्या मुलांना कळते, अथवा ज्यांना ह्याची जाणीव असते, तीच मुले अथवा मुली महाविद्यालयात व्यवस्थित अभ्यास करीत असतात. ज्या मुलांना ह्याची जाणीव नसते, असे चांगल्या आर्थिक परिस्थितीतील मुले मात्र महाविद्यालयात अभ्यास कमी आणि जास्त मौज-मजा करण्याकरिताच येत असतात. श्रीमंत असलेले त्यांचे पालकसुद्धा त्यांच्या मुलांकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाहीत. केवळ मुलगा दररोज महाविद्यालयात जातो आहे, हे पाहूनच ते समाधान मानतात. त्याशिवाय त्याला हवे तेवढे पैसे खर्चायला दिले आणि तो सांगेल त्या प्रमाणे त्याला इतर सर्व सुख-सोयी पुरविल्या की, आपली मुलांच्या बाबतीत असलेली सर्वच जबाबदारी संपली, असे त्यांना वाटते.

parenting guide - keep checking the routine of your kids

आपला मुलगा महाविद्यालयात जाऊन नेमके काय करतो? कोणाच्या सोबत राहातो? त्याचे मित्र कशा प्रवृत्तीचे आहेत? ह्या कडेही पालकांनी चांगलेच लक्ष पुरविले पाहिजे. अधून-मधून त्याच्या कॉलेजमध्ये जाऊन त्याच्या अभ्यासाची त्यांनी चौकशी केली पाहिजे. त्याचे शिक्षक त्याच्याबद्दल काय म्हणतात? हे सुद्धा पालकांनी ऐकले पाहिजे.

आपला मुलगा खरोखरच महाविद्यालयात शिक्षण घेण्याकरिताच येतो की, इतर काही अवांतर गोष्टी आणि टवाळखोरी करण्याकरिताच येतो? ह्याकडेही पालकांनी बारकाईने लक्ष ठेवले पाहिजेत. असे अनेक पालक आहेत, जे आपल्या मुलांच्या महाविद्यालयातील चांगल्या अथवा वाईट अशा कोणत्याही गतीविधी संदर्भात पूर्णपणे अनभिज्ञ असतात. आपला मुलगा महाविद्यालयात जातो, म्हणजे तो नक्कीच शिक्षण घेण्याकरिताच जातो, असे ह्या पालकांना वाटत असते. परंतु महाविद्यालयात येऊन, खरोखरच गंभीरपणे शिक्षण घेणारे जवळपास पन्नास टक्केच गरीब अथवा सर्वसाधारण आर्थिक परिस्थितीतील विद्यार्थी असतात. इतर पन्नास टक्क्यांमधील पंचवीस टक्के थोडे श्रीमंत परिस्थितीतील विद्यार्थी असतात, ते मात्र अभ्यास कमी आणि मौज-मस्ती करून वेळेचा अपव्यय करण्याकरिताच महाविद्यालयात येतात. तर राहिलेले अति श्रीमंत परिस्थिती असलेले पंचवीस टक्के विद्यार्थी मात्र महाविद्यालयात केवळ वेळ अपव्यव आणि उनाडक्या तसेच टवाळखोरी करण्याकरिताच येत असतात. असे विद्यार्थी दरवर्षी परीक्षेत अनुत्तिर्ण होत असतात.

parenting guide - see how your kids behave with the other kids

महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांची रॅगिंग घेण्यातही सहसा अशाच विद्यार्थ्यांचा पुढाकार असतो. कारण इतरांना छळण्यातच त्यांना अतिशय आनंद होत असतो. अशा विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनीसुद्धा अशा मुलांना अगदीच मोकाट सोडून दिलेले असते. कारण ते त्यांच्या काम-धंद्यांच्या अथवा व्यवसायाच्या व्यापातच पूर्णत: गुरफटलेले असतात. त्यांना वाटते की, “चला मुलगा महाविद्यालयात जात आहे ना, म्हणजे तो तिथे काही ना काही तरी नक्की शिकतच असेल.”

अशाप्रकारचा विचार करणारे पालकही अतिश्रीमंत असतात. आपल्या मुलांनी शिक्षण घेऊन चांगली नोकरी करून जीवनात उभे राहावे, अशी त्यांची इच्छाच नसते. कारण त्यांच्याकडे पैशांची काहीच कमी नसते. ते स्वतः पैसे कमविण्यात एवढे तल्लीन झालेले असतात की, आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला तसेच त्यांच्यावर चांगले संस्कार करायलाही त्यांना अजिबात फारसा वेळही नसतो. त्यांच्या घरी नोकर-चाकर असतात. तसेच पैसेही भरपूर असतात. त्यांची मुलेसुद्धा कारमध्येच महाविद्यालयात येतात. ह्या अशा मुलांच्या खर्चावर त्यांच्या पालकांचे कोणतेही नियंत्रण कधीच नसते. मग अशा मुलांच्या संगतीलाही त्यांच्या स्वभावासारखेच, त्यांच्या पुढे-पुढे करणारे, काही बिघडलेले तसेच अभ्यासात मन न लागणारे, टोळभैरव टुक्कार मुलेही असतात.

ही मुले आपल्या तीन-चार जणांच्या ग्रुपमध्ये राहून, इतर मुलांशी कोणत्याही अनावश्यक मुद्द्यांवर मुद्दामच भांडाभांडी किंवा मारामारी करीत असतात. अतिश्रीमंती आणि सर्व सुखसोयी अनासायास प्राप्त झाल्यामुळे अशी मुळे अतिशय तापट, हेकेखोर, गर्विष्ठ, अभिमानी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचेही असतात. ह्यांच्या पालकांनी त्यांच्यावर चांगले संस्कार न करता, ह्यांचा अगदी लहानपणापासूनच फारच लाड केलेला असल्यामुळे त्यांना नीतीमत्ता, सौजन्य, स्वावलंबन, इतरांशी मिळून-मिसळून वागण्याची पद्धत, ह्याची काहीही माहिती नसते. कोणतीही गोष्ट स्वतःच्या मनाविरुद्ध झाली की, त्यांना प्रचंड राग येतो. त्या रागाच्या भरात आपण काय करीत आहोत? हे त्यांना अजिबात समजत नाही. त्यांच्या पालकांनी त्यांचा अतिलाड केल्यामुळे त्यांना कधीच कोणत्याही चांगल्या सवयी लागलेल्या नसतात. लहानपणापासूनच त्यांनी बेमुर्वतखोरी आणि टवाळखोरीच्या सवयीचीच जोपासना केलेली असते.

मागे एका वर्षापूर्वी अशाच एका टवाळखोर मुलाने, आपल्या इतर दोन-तीन वर्गमित्रांना सोबत घेऊन त्याच्या वर्गातील एका मुलाचा आपल्या कारच्या धडकेने चेंगरून अत्यंत निर्घुणपणे खून केला होता. अगदी दिवसा ढवळ्या सिडको एन-२ भागातील कामगार चौकाजवळ त्याने आपल्या वर्गातील त्या मुलाला फोन करून बोलाविले, आणि तू माझ्या मैत्रिणीसोबत का बोलतोस? ह्या अत्यंत शुल्लक आणि अनावश्यक अशा मुद्द्यावरून त्याने त्या मुलासोबत भांडण उकरून काढले. ह्या भांडणातून आपला बचाव करण्याकरिता जेव्हा तो मुलगा तिथून पळून जायला लागला, तेव्हा त्या मुलाने आपल्या कारने त्या पळून जाणाऱ्या मुलाला जोराची धडक मारली. त्या धडकेने तो मुलगा भिंतीवर जोरात आदळून गंभीर जखमी झाला. तेव्हा त्या मुलाने ती कार तीनवेळा रिवर्स घेऊन त्या मुलाला जोरात आणखी तीन धडका मारून, त्याचा भिंत आणि कारच्यामध्ये चेंगरून निर्घुणपणे खून केला.

विशेष हे की, त्याच्या सोबत त्याचे जे दोन-तीन टवाळखोर मित्रही त्यावेळेस त्याच्या कारमध्येच बसलेले होते परंतु त्यांनीसुद्धा त्या मुलाला ह्या दुष्कृत्यापासून अडविण्याचा किंवा रोखण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. त्यामुळे त्या मुलासोबतच त्यांनाही सध्या जेलमध्ये जावे लागले आहे. एका शुल्लक गोष्टीकरिता एवढा अनावर संताप येऊन, दुसऱ्या मुलाच्या निर्घुण खुनास कारणीभूत ठरलेल्या त्या मुलाच्या पालकांनी त्या खुनी मुलावर त्याच्या बालपणापासून कशा प्रकारचे संस्कार केले असावेत? हा एक मोठा प्रश्नच आहे.

काहीही झाले तरी आपल्या मुलाने नीतीमत्तेने वागावे, सर्वांशी मैत्री ठेवावी, सर्वांशी सौजन्याने बोलावे, ज्या-ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्याच करण्याचा प्रयत्न करावा. शिक्षण घेण्यासाठीच आपण महाविद्यालयात येतो, तेव्हा त्या ठिकाणी आपण केवळ शिक्षणच घ्यावे, इतर भानगडी किंवा टवाळखोरी अजिबात करू नये. हे पालकांनी आपल्या मुलाला सांगितलेच पाहिजेत. कोणत्याही व्यक्तीला राग आल्यानंतर आपण त्या रागाच्या प्रभावाखाली ज्या गोष्टी करू नये, त्या गोष्टी सुद्धा करतो, त्यामुळे आपल्या रागावर कसे नियंत्रण ठेवावे? हे सुद्धा पालकांनी आपल्या मुलांना शिकविले पाहिजे.

ज्या मुलाने दुसऱ्या मुलाचा निर्घुणपणे खून केला आहे, त्याला आता निश्चितपणे जन्मठेप होईलच. त्याच्यासोबत जेलमध्ये त्याचे टवाळखोर मित्रही राहातीलच. आपल्या लाडक्या मुलावर योग्यवेळी, योग्य ते चांगले संस्कार न केल्यामुळे, त्याच्या प्रगतीकडे अथवा अधोगतीकडे पुरेसे गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे, त्याच्या संगोपनाच्या काळात, त्याच्या पालकांचे त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे, त्याची शिक्षा त्यांच्या मुलाला तर मिळालीच परंतु त्याचा तो टवाळखोर असलेला अत्यंत लाडका मुलगाही जन्मठेपेच्या शिक्षेच्या निमित्ताने त्यांच्यापासून कायमचाच दुरावला आहे.

तसेच कोणत्याही विशेष कारणाशिवाय ज्या मुलाचा निर्घुणपणे खून झाला आहे, त्याच्या आई-वडिलांनाही आपल्या एकुलत्या एका मुलाच्या पुत्र वियोगाचे फार मोठे दु:ख झाले आहे. ह्याकरिता पालकांनी आपल्या मुलांवर अगदी लहानपणापासूनच चांगले संस्कार केले पाहिजेत. एक वेळ तो शिक्षणात कमी पडला तरीही चालेले, परंतु चांगल्या संस्कारात तो कधीच कमी पडू नये. ह्यामुळे इतरांचे जीवन तर सुरक्षित राहिलच, त्यासोबतच त्यांच्या स्वतःच्या मुलाचेही जीवन आनंदात जाईल.

आपल्या मुलांवर जोपर्यंत त्यांचे आई-वडील चांगले संस्कार करीत नाहीत, अथवा आपल्या मुलाला टवाळखोरी करण्याकरिता अगदीच मोकाट सोडून देतील, तोपर्यंत अशाच स्वरूपातील अनेक घटना इतरत्रही घडतच राहातील. अशा घटनांमुळे इतर नीरपराध  व्यक्तींच्या सोबतच त्या टवाळखोर मुलांचेही आयुष्य जन्मठेपेच्या शिक्षेमुळे वाया जात राहील, म्हणून, “पालकांनो बालपणापासूनच आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा, तसेच त्यांच्या टवाळखोरीकडेही थोडे लक्ष असू द्या!”

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

2 thoughts on “आपल्या मुलांच्या टवाळखोरी कडेही थोडे लक्ष असू द्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!