डिप्रेशन दूर करण्याचे उपाय

Spread the love

आपल्याला अत्यंत आवश्यक असणारी किंवा ज्याकरिता आपण खूप प्रयत्न केलेला आहे, अशी एखादी गोष्ट प्राप्त करण्यात आपल्याला अपयश आले अथवा आपल्या जीवनात एखादी दु:खद घटना घडली, तर आपण अत्यंत निराश होऊन डिप्रेशनमध्ये जातो. स्वतः किंवा कुणाच्यातरी सहकार्याने डिप्रेशनमधून वेळीच बाहेर पडणे अत्यंत आवश्यक असते. डिप्रेशनच्या अवस्थेतून बाहेर येऊ न शकणाऱ्या व्यक्ती निराशेच्या खोल गर्तेत अधिकच रुतत जातात. यापैकी काही व्यक्तींच्या अविवेकी निर्णयामुळे त्यांच्या आयुष्याची रुपरेषा बदलते, तर काही काही व्यक्ती डिप्रेशनमधून मुक्त होऊ न शकल्यामुळे आत्महत्येचा मार्गही पत्करतात. ( आत्महत्या करण्याऐवजी, ह्या पर्यायांचा शोध घ्या )

खाली डिप्रेशन दूर करण्याचे काही उपाय सुचविले आहेत. आपण जर डिप्रेशनमध्ये असाल तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितपणे फायदा होऊ शकतो.

 

१) सकारात्मक विचार करा.

Think positively

सकारात्मक विचार करणे हा डिप्रेस करणारे विचार मनातून काढून टाकण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय आहे. डिप्रेशनमध्ये असल्यामुळे त्या काळात आपल्याला नेहमीच नकारात्मक विचार येत असतात. अशावेळी तुमच्या मनात जे जे नकारात्मक विचार येतात, त्या विचारांचे सकारात्मक दृष्टीकोनात परिवर्तन करा.

 

२) स्वतःला तसेच इतरांना दोष देणे थांबवा.

Stop blaming

डिप्रेशनमध्ये असतांना आपल्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली नाही किंवा एखादे काम झाले नाही, तर आपण तेव्हा स्वतःला किंवा इतरांना दोष देण्यास सुरुवात करतो. स्वतःला किंवा इतरांना दोष दिल्याने त्या परिस्थितीत तर काहीच बदल होणार नाही, परंतु तुम्ही अजून निराश व्हाल. त्यामुळे स्वतःला किंवा इतरांना दोष देण्याचे थांबवा.

 

३) वास्तविकतेत जगा आणि स्वतःला वाईट परिस्थितीत असल्याचे समजू नका.

stop imagining and live in reality

डिप्रेशनमध्ये असणाऱ्या लोकांनी त्यांच्या मनामध्ये एक वेगळेच जग तयार करून ठेवलेले असते, त्याप्रमाणे ते त्यांच्या मनामध्येच जगत असतात, त्यांना वास्तविकतेची जाणीव नसते. एखादे काम किंवा एखादी गोष्ट करण्याच्या अगोदरच ते, ते काम करतांना होणाऱ्या वाईट प्रसंगाची कल्पना करतात. यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो, म्हणून सध्याच्या चालू परिस्थितीचे भान ठेऊन होणाऱ्या न होणाऱ्या वाईट प्रसंगाचा विचार करू नका.

 

४) मार्गदर्शन करणारी पुस्तके वाचा.

read self help books

डिप्रेशनमधून बाहेर पडण्याकरिता मार्गदर्शन करणारी चांगली पुस्तके वाचा, अशी अनेक पुस्तके मार्केटमध्ये तसेच इंटरनेटवर उपलब्ध असतात. या पुस्तकांमध्ये दिलेल्या उपाय व कृतींचे स्वतःवर अवलंबन करून तुम्ही तुमचे डिप्रेशन दूर करू शकता.

 

५) स्वतःला नेहमी व्यस्त ठेवा.

Keep yourself busy

डिप्रेशनमध्ये असणाऱ्या व्यक्तीकडे जेव्हा कोणते काम नसते किंवा जेव्हा तो एकटा असतो, तेव्हा त्याच्या मनामध्ये अनेक विचार येत असतात. अशाप्रकारे एका मागे एक विचार येऊन तुम्ही न कळत डिप्रेशनमध्ये हरवून जाता, असे होऊ नये म्हणून स्वतःला नेहमी कोणत्या ना कोणत्या कामामध्ये व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. जर कोणतेच काम नसेल तर आपल्या घरातील छोटे-मोटे घरगुती काम करा अथवा एखादा ऍक्‍टिव्हिटी क्लास लावून घ्या.

 

६) गाणे ऐका.

Listen music

म्युझिकमुळे तुमची मनस्थिती बदलते. डिप्रेशनमध्ये असतांना उत्साहदायक गाणे ऐकल्याने तुमची निराशाजनक असलेली मनस्थिती बदलते. तुमच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊन, तुम्हाला चांगली प्रेरणा मिळते.

डिप्रेशनमध्ये असणाऱ्या व्यक्तीने भावनात्मक आणि दु:खी गाणे ऐकणे टाळावे, अशाप्रकारच्या गाण्याच्या शब्दांमुळे अथवा त्यातील म्युझिकमुळे तुमच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

 

७) चांगली झोप घ्या.

Take a good sleep

डिप्रेशनमध्ये असणाऱ्या लोकांच्या मनात सतत काही ना काही तरी विचार चालू असतो. ज्यामुळे त्यांना झोप लागत नाही किंवा त्यांची पुरेशी झोप होत नाही. आपल्याला स्वस्थ राहाण्यासाठी सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते. झोपण्याच्या अगोदर पाच ते दहा मिनिटे ध्यान करून आपल्या मनातील निराशाजनक विचार काढून टाकण्याचा प्रयत्न करा. तुमची झोपण्याची वेळ ठरवून घ्या आणि रोज त्याप्रमाणे झोपण्याचा प्रयत्न करा. ( रात्री पुरेशी झोप घेतल्याने हे फायदे होतात )

 

८) सकाळी योगासने किंवा व्यायाम करा.

Do yoga or exercise in the morning

रोज सकाळी नियमितपणे काही वेळ योगासने अथवा व्यायाम केल्याने आपला उत्साह वाढतो. व्यायाम, योगासन केल्यानंतर सकाळच्या उन्हामध्ये बसा, सकाळचे ऊन आपल्या आरोग्यासाठी चांगले असते, त्यामुळे तुमच्या मनाला तरतरी येऊन तुमचे मन प्रसन्न होईल.

 

९) बाहेर फिरायला जा.

go out for a vacation

आपले काम आणि दैनंदीन गोष्टींमध्ये आपण इतके व्यस्त होऊन जातो की आपल्याला सुट्टी घेऊन कुठे बाहेर फिरायला जाण्यासाठी वेळ भेटत नाही. रविवार किंवा सरकारी सुट्टी ज्या दिवशी असते त्या दिवसाचा वापर आपण आराम किंवा आपले राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी करतो. कुठेतरी नवीन जागी फिरायला गेल्याने आपला तणाव हा खूप प्रमाणात कमी होतो. तुमची सर्व कामे ठेऊन, रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून काही दिवसासाठी सुट्टी घ्या आणि एखाद्या नवीन जागी फिरून या.

 

१०) एखादा पाळीव प्राणी पाळा.

keep a pet

रिसर्चवरून असे दिसून आले आहे की, ज्या लोकांकडे पाळीव प्राणी पाळलेले असतात, त्या लोकांना सहसा डिप्रेशन झालेले दिसून येत नाही. पाळीव प्राण्यांच्या सहवासात राहिल्याने तुमच्या मनात निराशेची भावना निर्माण होणार नाही. पाळीव प्राण्यांच्या सहवासामुळे तुमच्या मनामध्ये आनंददायक भावना निर्माण होतात.

 

११) इतरांकडून अपेक्षा ठेऊ नका.

stop expecting from others

आपण नेहमी इतरांसाठी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि इतरांनीही त्याचप्रकारे आपल्यासाठी काही तरी केले पाहिजे, अशी आपण त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो. जेव्हा तुमच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा तुम्ही निराश होता. जर तुम्ही इतरांकडून अपेक्षा ठेवली नाही तर आपले मन दुखावणार नाही, त्यामुळे इतरांकडून कुठलीही अपेक्षा ठेऊ नका.

 

१२) नकारात्मक विचार असलेल्या लोकांपासून दूर राहा.

keep yourself away from negative people

नकारात्मक विचार असलेल्या लोकांच्या आसपास किंवा सहवासात राहिल्याने आपल्यात काही सुधारणा होण्याऐवजी आपण आणखी नकारात्मक गोष्टींकडे खेचल्या जातो, त्यामुळे तुम्ही अशा नकारात्मक विचार असलेल्या लोकांपासून दूर राहून सदैव सकारात्मक विचार असलेल्या लोकांच्या संपर्कातच राहाण्याचा प्रयत्न करा.

 

१३) आपले नुकसान होईल असा कोणताच निर्णय घेऊ नका.

Do not make any decisions that will make you regret

डिप्रेशनमुळे व्यक्तीला आपले बरे वाईट काहीही कळत नाही, अशावेळी निराशा तसेच रागाच्या भरात तो कधी कधी आपली नोकरी सोडतो, तसेच आपल्या जवळच्या लोकांशी वाईट बोलून त्यांनाही दूर करतो. अशा अविवेकी निर्णयामुळे तुमचेच नुकसान होते, परंतु त्यावेळी तुम्हाला हे कळत नाही, म्हणून डिप्रेशनमध्ये असतांना आपले नुकसान होईल असा कोणताच निर्णय घेऊ नका.

 

१४) आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत चर्चा करा.

Discuss with a person who is close to you.

डिप्रेशनमुळे आपल्याला काहीही सुचत नाही, अशावेळी आपल्या परिवारातील अथवा आपल्या मित्रांपैकी जी व्यक्ती आपल्या जवळची असते, आपल्याला समजून घेते त्या व्यक्तीसोबत तुमच्या समस्येसंदर्भात चर्चा करा. त्यातूनही कदाचित तुम्हाला काहीतरी उपाय सुचू शकतो.

 

१५) डायरीचा वापर करा.

Use the diary to write your feelings

आपल्याला जे काही वाटत आहे किंवा आपल्या मनात आलेले विचार व्यक्त करण्यासाठी नियमितपणे डायरी लिहिणे हा सर्वात चांगला पर्याय आहे. तुमच्या मनात आलेल्या भावना किंवा मनात आलेले विचार मोकळेपणाने डायरीत लिहिल्याने आपले मन हलके आणि शांत होते. तुमच्या डायरीत लिहिलेल्या गोष्टी वाचून, त्याचे निरीक्षण करून, तुम्ही आपल्या समस्या चांगल्या प्रकारे समजून, सोडविण्याचा प्रयत्न करू शकता.

 

१६) एखाद्या मनोचिकित्सकाशी चर्चा करा.

Discuss with a psychiatrist

तुमच्या समस्येवर तुम्हाला जेव्हा काहीही उपाय सुचत नाही, तेव्हा आपण एखाद्या चांगल्या मनोचिकित्सकाची भेट घेऊन त्याच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या पाहिजे. तुमच्या समस्या तो मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातून समजून घेऊन, त्याबद्दल योग्य ते मार्गदर्शन करून, त्या समस्यांवर उपाय सुचवेल.

 

Swapnil Ranveer– स्वप्निल रणवीर

linpaws8@gmail.com


Spread the love

One thought on “डिप्रेशन दूर करण्याचे उपाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!