“भाषण करण्यापूर्वी ह्या गोष्टी लक्षात ठेवा…!”

Spread the love

आपल्या जीवनात आपल्याला जर प्रगती करायची असेल, तर अनेक गोष्टींसोबतच आपल्याला काही लोकांसमोर उभे राहून प्रभावीपणे भाषणही करता आलेच पाहिजे.

अनेकांना आपल्यासमोर अनेक लोक किंवा श्रोते दिसले की, त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यांचे हातपाय लटपटायला लागतात. अशावेळी त्यांना ज्या श्रोत्यांसमोर जे काही बोलायचे होते, ते सर्व ते विसरून जातात. आपल्याला सुरुवातीला काय बोलायचे आहे? नंतर काय बोलायचे आहे? कोणत्या क्रमाने बोलायचे आहे? ह्या सर्व गोष्टी ते विसरून जातात.

मग अशावेळी क्रमवार सुसंगतपणे बोलण्याऐवजी ते विस्कळीत स्वरुपात, असंगतपणे मागचे मुद्दे पुढे आणि पुढचे मुद्दे मागे बोलायला लागतात. ह्या गडबडीमुळे त्यांना अनेक महत्वाच्या मुद्द्यांचा विसरही पडतो. मग त्यामुळे त्यांना घामही यायला लागतो. भीतीमुळे त्यांच्या तोंडातून व्यवस्थित शब्दही बाहेर पडत नाहीत. मग सगळाच गोंधळ होऊन, इतरही काही महत्वाचे मुद्दे न आठवल्यामुळे तो नवखा वक्ता पुरता गांगरून व घाबरून जातो. त्याला काहीच आठवेनासे होते.

मग अशावेळी, “आता मी माझे दोन शब्द संपवून आपली रजा घेतो”. असे म्हणून तो माईकचा ताबा सोडून पटकन आपल्या जागेवर जाऊन बसतो.

भाषणाच्या प्रसंगी आपली अशी फजिती होऊ नये, म्हणून आपण काय करणे आवश्यक आहे? त्या संदर्भातच आज आपण इथे विचार करणार आहोत.

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या भाषणाचा हेतू नक्की काय आहे? हे तुम्हाला अगोदर ठरवावे लागेल. आपल्या भाषणाचे अथवा इतरांसमोर बोलण्याचे आपले अनेक हेतू असू शकतात.

उदा – १) आपल्याला कुणाला तरी कशाबद्दल तरी माहिती द्यायची असते.

२) कुणाला तरी काहीतरी शिकवायचे असते अथवा दुसऱ्याला प्रशिक्षण द्यायचे असते.

३) एखाद्याला एखादे काम करण्यासाठी स्फूर्ती द्यायची असते, ते काम करण्यासाठी त्याला प्रवृत्त करायचे असते, किंवा ते काम करण्यासाठी त्याच्यामध्ये उत्साह निर्माण करायचा असतो.

४) एखाद्या मुद्द्याची त्यांना खातरी पटवून द्यायची असते, त्याबद्दल त्यांचे मन वळविणे आवश्यक असते.

५) एखाद्या विषयाचा आपल्याला वेगळ्या दृष्टीकोनातून शोध घ्यायचा असतो, त्यासंदर्भात इतरांशी चर्चा करायची असते.

६) इतरांसमोर बोलून आपल्याला त्यांची करमणूक करायची असते, अथवा त्यांच्या मनामध्ये आनंदाची निर्मिती करायची असते.

अशाप्रकारचे अनेक हेतू आपल्या समोर असतात. त्यापैकी एक असणारा आपला हेतू आपण अगोदर निश्चित करणे आवश्यक आहे.

जेव्हा आपल्याला एखाद्या गावाला अथवा प्रवासाला जायचे असते, तेव्हा आपल्याला अगोदर त्या गावाचे नाव माहित असणे अत्यंत आवश्यक असते. त्यानंतरच तुम्हाला त्या गावाला जाण्याकरिता कोणता निश्चित असा मार्ग आहे? हे तुम्ही ठरवू शकता. मग त्याकरिता कोणती गाडी कुठून धरायची? तिथे कसे पोहचायचे? गाडीत बसल्यावर पुढे गाडीतून कुठे उतरायचे? त्यानंतर आपल्याला हव्या त्या ठिकाणी कसे पोहचायचे? हे सर्व आपल्याला ठरविता येईल.

जर आपल्याला कुठे जायचे आहे? हेच जर माहिती नसेल तर मग आपण योग्य दिशेने, योग्य प्रकारे, योग्य त्या ठिकाणी प्रवास करूच शकणार नाही. यामध्ये आपली फारच तारांबळ होईल.

अगदी ह्याचप्रमाणे आपल्या भाषणाचे अथवा इतरांसोबत आपल्या बोलण्याचेही असते. त्यामुळेच भाषण करण्याअगोदर अथवा श्रोत्यांसमोर बोलण्याअगोदरही आपल्याला आपल्या भाषणाचा हेतू आणि भाषणाचा विषय अगोदरच निश्चित करावा लागेल, तर आपल्याला त्यासंदर्भातील इतर गोष्टीही आपोआपच समजायला लागतील. असे झाले तरच आपल्या मनातील विचारांचा गोंधळ होणार नाही.

भाषणापूर्वी जेव्हा आपण एखाद्याला विचारतो की, तुम्हाला का बोलायचे आहे? तर तो सांगतो की, “मी तर प्रमुख पाहुणा आहे त्यामुळे मला तर काही ना काही तरी बोलावेच लागेल.”

दुसरा म्हणतो, “मी तर कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे, मी नाही बोलून कसे काय चालेल?”

तर तिसरा म्हणतो की, “सगळेच बोलत आहेत मग मी नाही बोललो तर इतर लोक काय म्हणतील?”

अशाप्रकारे भाषण करणाऱ्या अनेक लोकांचे अनेक प्रकारचे विचार असतात. भाषण करण्याअगोदर अनेकांनी आपल्या भाषणाचा काय हेतू आहे? तोच प्रामुख्याने लक्षात घेतलेला नसतो.

जेव्हा तुम्ही भाषण करण्याकरिता लोकांसमोर उभे राहाणार असता, तेव्हा तुमचा भाषण करण्याचा काय हेतू आहे? हे तुम्ही निश्चितपणे अगोदरच ठरविणे आवश्यक असते. आपण लोकांसमोर कशाकरिता बोलणार आहोत? आपल्या भाषणानंतर श्रोत्यांना काय वाटणे अपेक्षित आहे? अथवा आपल्या बोलण्याचा श्रोत्यांवर काय परिणाम होणे अपेक्षित आहे? आपल्या भाषणाद्वारे आपल्याला श्रोत्यांकडून काय साध्य करायचे आहे? ह्या सर्वच गोष्टींचा विचार आपण भाषणापूर्वीच करणे आवश्यक आहे.

आपण श्रोत्यांसमोर ज्या-ज्या मुद्यांची आपल्या भाषणाद्वारे मांडणी करणार आहोत, त्या-त्या क्रमाने त्या-त्या मुद्द्यांची मुख्य ओळ (हेडलाईन) एका कागदावर लिहून काढावी. नंतर भाषणाची रूपरेषा म्हणून त्या मुख्य ओळीखाली त्या मुद्द्याचे थोडक्यात सविस्तर विश्लेषण लिहून काढावे.

त्या मुद्द्याचे काळजीपूर्वक वाचन केल्यानंतर, कुठे कोणता मुद्दा सुटला असेल तर त्याचीही आपल्या भाषणात व्यवस्थित नोंद करावी. भाषणापूर्वी सर्व मुद्द्यांचे काळजीपूर्वक पाच-सहावेळा तरी वाचन करावे. त्यामुळे सर्व मुद्दे आपल्या व्यवस्थित लक्षात राहातील.

त्यानंतर एक तीन बाय पाच इंची पांढऱ्या जाड कागदावर ह्या मुद्यांच्या (हेडलाईनची) मुख्य ओळींची नोंद करावी. सविस्तर मुद्दे न लिहिता एक-दोन ओळीतच त्यासंदर्भात आपल्या जवळच्या जाड पांढऱ्या कागदावर नोंद करावी. सविस्तर मुद्दा लिहिल्यास वाचतांना आपला गोंधळ होतो. त्यामुळे भाषणात आपण एकाग्रचित्त होऊ शकत नाही. तो कागद फक्त आपल्या हातात ठेवावा, त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

आपल्याला भूक जरी नसली तरीही जेवणाचा डबा आपल्या सोबतच आहे, ही भावनाच आपल्याकरिता आनंददायक असते. तशीच भूमिका त्या आपल्या हातातील छोट्या कागदाचीही असते.

त्यानंतर सभामंचावर प्रत्यक्ष बोलण्याआधी आपण माईकसमोर जाऊन, सर्व श्रोत्यांकडे हळुवार एकदा आत्मविश्वासपूर्वक नजर टाकावी. त्यामुळे आपल्या मनातील भीती थोडी कमी होते. नंतर आत्मविश्वासपूर्वक श्रोत्यांशी संवाद साधल्याप्रमाणे, त्यांच्याशी चर्चा केल्याप्रमाणेच एका-एका मुद्द्यावर क्रमवार बोलण्याचा सावकाश प्रयत्न केला पाहिजे. ह्यावेळी अजिबात घाई करू नये.

आपण योग्य त्या प्रकारे, योग्य त्या क्रमाने मुद्देसूद बोलत आहोत काय? ह्याकरिता आपण अधून-मधून आपल्या हातातील कागदावरही नजर टाकणे आवश्यक असते. आवश्यक तेवढेच महत्वाचे मुद्दे आपल्या भाषणात असावेत. अनावश्यक गोष्टींचा भाषणात ऐन वेळी अजिबात उल्लेख करू नये. जास्त वेळ अनावश्यक मुद्दे बोलत राहिल्यास श्रोतेही कंटाळतात, आणि आपसात बोलायला सुरुवात करतात.

आपल्या भाषणातील शब्दांप्रमाणेच आपल्या चेहऱ्यावरील हावभाव आणि आवाजातील चढ-उतारही असावा. ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यास आपण चांगल्याप्रकारे भाषण देऊ शकू.

सुरुवातीच्या दिवसात अशाप्रकारे तयारी करून भाषणे दिल्यास आपल्यात चांगलाच आत्मविश्वास निर्माण होतो. काही भाषणे दिल्यानंतर सभा मंचावर जाण्याची आपल्या मनातील भीती हळूहळू पूर्णपणे निघून जाते. ही सभामंचाची आणि समोर बसलेल्या श्रोत्यांची भीती आपल्या मनातून जेव्हा पूर्णपणे निघून जाते, त्यानंतरच आपल्याला भाषण देण्यापूर्वी पूर्वीसारखी कोणतीही तयारी करण्याची फारशी कधी गरजही राहात नाही.

सभामंचावर जाण्यापूर्वी आपण मनातल्या मनात विषयानुसार सर्व आवश्यक त्या मुद्यांची अर्ध्या तासातच जुळवा-जुळव करून, मुद्द्यांचा क्रम ठरवून अत्यंत आत्मविश्वासाने सहजपणे श्रोत्यांसमोर प्रभावशाली पद्धतीने भाषणे करू शकतो.

सभा गाजविणारे तसेच ऐनवेळी कोणत्याही विषयावर अत्यंत प्रभावशाली पद्धतीने भाषणे देणारे अनेक अनुभवी वक्ते त्यांच्या सुरुवातीच्या काळात, मी ह्या लेखात सांगितल्याप्रमाणेच आपल्या भाषणाची पूर्व तयारी करीत होते.

चांगले भाषण देणे अथवा चांगली वकृत्व कला येणे, या करिता आपल्याला बरीच तयारी आणि अभ्यास करावा लागेल. वकृत्व ही एक कला आहे. त्यालाच वकृत्वकला असेही म्हणतात. कोणतीही कला येण्यासाठी ज्याप्रमाणे त्या कलांची जोपासना आणि उपासना केल्यानंतरच त्या कलांमध्ये प्रगती साधता येते, तसेच सभेत कसे बोलावे? अथवा भाषणे कशी द्यावीत? ह्याकरीताही आपल्याला प्रयत्नपूर्वक वकृत्वकलेचीही जोपासना आणि उपासना करावी लागेल, तरच आपल्यातील एक चांगला वक्ता तयार होईल.

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!