विवाह विच्छेद होण्याची अथवा घटस्फोट घेण्याची कारणे

Spread the love

कोणतीही व्यक्ती आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणि शांती मिळण्याची अपेक्षा करीत असते. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या गोष्टी जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात, असे समजण्यात जरी येत असले तरीही केवळ ह्याच गोष्टींमुळे माणसाला सुख, शांती आणि समाधान मिळते, असे मात्र अजिबात नाही.

केवळ ह्याच गोष्टींमुळे व्यक्तीला सुख, शांती आणि समाधान मिळाले असते तर सर्वच लोक साधू संन्यासीच झाले असते अथवा लग्न न करता ब्रम्हचारीच राहिले असते. लग्न करून,  विवाहित होऊन सहजीवनाचा आनंद मिळविण्याचा लोकांनी कधीच प्रयत्न केला नसता. ह्याचाच अर्थ अन्न, वस्त्र आणि निवारा या सोबतच स्त्री-पुरुषांना विवाहित होऊन, विवाहित जीवनाचा आनंद मिळणेही अत्यंत आवश्यक असते, अन्यथा त्याला सुख-शांती आणि समाधान कधीच प्राप्त होऊ शकत नाही.

आज अनेक व्यक्ती मोठ्या पगारावर कार्यरत असतात. अनेक व्यक्ती उद्योग व्यवसाय करून श्रीमंतही झालेल्या असतात. त्यांच्याकडे अन्न, वस्त्र, निवारा ह्या संदर्भात सर्वच प्रकारच्या आवश्यक त्या सुख-सोयी उपलब्ध असतात, तरीही ते विवाह करण्याकरिता प्राधान्य देतात. विवाहाशिवाय त्यांच्या जीवनाला परिपूर्णता कधीच लाभत नाही. प्रत्येक व्यक्तीचे जीवनही आकाशात मुक्तपणे उडणाऱ्या एखाद्या पतंगासारखेच असते. दोऱ्याची रीळ ज्याप्रमाणे त्या उडणाऱ्या पतंगाचे नियंत्रण करीत असते, त्याचप्रमाणे त्या व्यक्तीची पत्नी त्या व्यक्तीचे अथवा आपल्या पतीचे किंवा त्याच्या सुखी संसाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन करीत असते.

स्थिती कटलेल्या पतंगाची आणि दोऱ्याची

  आजकाल कोणत्या ना कोणत्या तरी कारणामुळे अनेक विवाहित स्त्री पुरुषांच्या सहजीवनात अथवा कौटुंबिक जीवनात अडथळे आणि विसंगती निर्माण होत आहेत, आणि त्यामुळे एखाद्या कटलेल्या अनियंत्रित पतंगाप्रमाणे त्या पुरुषाची अवस्था होत आहे, तर पतंग कटल्यामुळे त्या पतंगाचा दोरा आणि त्याचे रीळही व्यर्थ ठरत आहे. दोरा कुठेतरी काटेरी बाभळीच्या झाडाला गुंतत आहे अथवा रस्त्यावरील मुले तो पतंग आणि दोरा किंवा मांजा लुटून नेट आहेत.

घटस्फोटाची प्रलंबित प्रकरणे

कोर्टामध्ये, कुटुंब न्यायालयांमध्ये अथवा स्त्री-पुरुष समुपदेशन केंद्रांमध्ये अनेक स्त्री-पुरुषांच्या केसेस विवाहबंधन तुटण्याच्या अथवा घटस्फोट घेण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत. अशा प्रकरणात एखाद्या प्रकरणाचा निपटारा करण्याकरिता त्या ठिकाणी मुद्दामच सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लावण्यात येतो. उद्देश हा की, ह्या सहा महिन्यांमध्ये ह्या प्रकारणात गुंतलेल्या स्त्री-पुरुषांनी शक्य झाल्यास आपआपसात बोलून एकमेकांशी समझोता करून घेऊन, पुन्हा एकदा आपला संसार पूर्वीपेक्षाही अधिक सामंजस्याने सुरळीतपणे सुरु करावा, परंतु ह्या प्रकरणांतील फक्त वीस ते तीस टक्के जोडपे आपसात बोलून समझोता करून पुन्हा एकदा एकत्रितपणे नांदावयास तयार होतात. तर जवळपास सत्तर टक्के जोडपे आपल्या घटस्फोटाच्या निर्णयावरच ठाम राहून घटस्फोटही घेतात. असे का होत असावे?

 

घटस्फोट होण्याची कारणे?

main five reasons of getting divorce

  ह्या प्रश्नाचा आपण जर विचार केला तर त्या करिता प्रामुख्याने खालील पाच गोष्टीच कारणीभूत असल्याचे आपणास दिसून येते.

 

१) कौटुंबिक, मानिसक व वैवाहिक संबंधांमध्ये एकमेकांना मनापासून सहकार्य करण्याऐवजी, दोघांचाही अथवा कुणा तरी एकाचा अत्यंत अहंकारी आणि दुसऱ्याला असहकार्य करणारा स्वभाव कारणीभूत असतो.

२) आपल्या प्रतिष्टेचा प्रश्न समजून त्या दोघांनी, त्या सोबतच त्या दोघांच्याही अथवा दोघांपैकी एकाच्या नातेवाईकांनी समेटाकरिता आणलेले अडथळे.

३) एकमेकांना चांगलीच अद्दल घडविण्याची किंवा बदला घेण्याची दुर्दम्य इच्छा.

४) आपल्या अपेक्षा पूर्ण न करणाऱ्या ह्या जोडीदारासोबत फारकत किंवा घटस्फोट घेऊन ह्यापेक्षा चांगला जोडीदार निवडण्याची तीव्र इच्छा.

५) जोडीदाराचा अत्यंत विकृत अथवा अत्यंत वाईट स्वभाव, पैशांची मागणी, मानसिक व शारीरिक छळ, मार-हाण, वाईट वागणूक, अनैतिक संबंध किंवा बाहेर ख्यालीपणा, दारू पिणे, काहीही कामधंदा न करणे, चारित्र्यावर संशय घेणे इत्यादी सारखी कारणे घटस्फोटाकरिता कारणीभूत ठरतात. कोणत्याही स्त्री-पुरुषांच्या संसारात ह्या पाच गोष्टींचा किंवा ह्यातील काही बाबींचा अंतर्भाव जर नसेल तर त्यांचा घटस्फोट होण्याची अथवा त्यांचे कौटुंबिक जीवन उध्वस्त किंवा दु:खमय होण्याची अजिबात वेळच येत नाही.

 

घटस्फोट होण्याचे प्रमुख कारण

घटस्फोटाकरिता वरील पाच कारणे जरी दिसत असली, तरीही ही सर्व कारणे नंतरची आणि दुय्यमच आहेत. वास्तविक पाहाता पती-पत्नीच्या सहजीवनातील किंवा वैवाहिक संबंधातील एकमेकांच्या, विशेषत: पतीच्या अपेक्षा पत्नीकडून जर पूर्ण होत नसतील तर त्यांच्यामध्ये निश्चितपणे दुरावा निर्माण होतो. त्या नंतर खरे कारण तर वेगळेच असते परंतु दुसऱ्याच कोणत्याही निमित्तावरून अथवा कारणामुळे त्यांच्यात धूसफूस, वाद-विवाद आणि भांडणे सुरु होतात. एकमेकांबद्ल असहकार्याची भावना आणि अबोलाही सुरु होतो. अशावेळी पत्नीही मग अबोला आणि असहकार्याची भावना मनात ठेऊन वागत असते. मग ह्यातूनच पुढे परिस्थिती हळूहळू अधिकच बिघडत राहाते. मग ह्यामध्ये त्यांचे इतर नातेवाईकही आपआपल्या परीने सहभाग घेऊन परिस्थिती अगदीच चिघळून टाकतात.

 

पत्नीच्या समंजस भुमिकेमुळे टळू शकतात घटस्फोट

वरील कारणांमुळे जेव्हा कौटुंबिक परिस्थिती बिघडते तेव्हा दोघांनाही एकमेकांचा सहवास नकोसा वाटतो. नेमके अशाचवेळी आपला अहंकार विसरून पत्नीने वेळीच आपल्या पतीच्या मनाप्रमाणे वागल्यास परिस्थिती सुधारू शकते, अन्यथा दोघांचा अथवा दोघांपैकी एकाचा अहंकार कारणीभूत ठरून हे प्रकरण वेगाने विवाह विच्छेद अथवा घटस्फोटाच्या मार्गाने वाटचाल करू लागते.

विवाह विच्छेद अथवा घटस्फोट टाळण्याकरीता अशा प्रकरणात पती पेक्षा प्रामुख्याने पत्नीचीच महत्वाची भूमिका असते, अशावेळी पत्नीने आपला अहंकार, आपला स्वाभिमान, आपल्या इच्छा, आकांक्षा, आपली आवड-नावड सोडून आपल्या सौजन्यपूर्ण आणि प्रेमळ वागणुकीने आपल्या पतीला पूर्णपणे सहकार्य करून आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पतीच्या अपेक्षेप्रमाणे अथवा इच्छेप्रमाणे तिने आपली वागणूक ठेऊन पतीच्या मानसिक, शारीरिक तसेच कौटुंबिक अथवा पारिवारिक गरजेनुसार तिने आपली वैवाहिक भूमिका पार पाडली पाहिजे, तसेच तिच्या पतीनेही ह्या बाबतीत तिला सुखी करण्यासाठी आपली निषेधात्मक अथवा वाईट वागणूक किंवा आपल्यातील दुर्गुण पूर्णपणे सोडून देऊन शक्य तो सर्व प्रयत्न केले पाहिजेत. ह्यामुळे निश्चितपणे दोघांच्याही वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होऊन त्यांच्यावर घटस्फोट घेण्याची कधीच वेळ येणार नाही. संसाररुपी गाडीचे दोन्ही चाके समगतीने व्यवस्थित चालत असतील, तरच त्यांच्या संसाराची गाडी सुखी जीवनाकडे वाटचाल करीत राहील.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!