प्रा. विष्णू गाडेकर भाग १ – गोर गरिबांच्या मुलांसाठी शाळा काढण्याच्या विचाराने झपाटलेले प्रा.विष्णू गाडेकर

Spread the love

२००८ च्या सुमारास मला एकदा एका अनोळखी नंबरवरून अनोळखी व्यक्तीचा फोन आला. “नमस्कार, मी प्राध्यापक विष्णू गाडेकर बोलत आहे. तुम्ही आता गेल्या महिन्यात ७ जुलै २००८ला ज्यांचे पुस्तक प्रकाशित केले आहे ते जे.के.जाधव माझे मेव्हणे आहेत. ‘प्रवास जे.के.दादांचा शिवूर पासून मुंबई प्रर्यंत’ ह्या नावाचे पुस्तक मला फार आडवले आहे, म्हणून मी तुम्हाला फोन केला आहे. मी एन १ सिडको विभागात गरवारे स्टेडियमच्या मागेच राहातो. फोन करून एकदा माझ्याकडे चहा घ्यायला या. त्या निमित्ताने आपली भेट, ओळख आणि चर्चाही होईल.” फोन वरील आवाज आणि भाषा ऐकली की बोलणारा गृहस्थ चांगला आहे की वाईट आहे? हे मला लगेच कळते.

ह्या फोनमधील भाषा आणि आवाजही मला चांगला मैत्रीपूर्ण वाटला म्हणून, “दोन दिवसानंतर रविवारी मी आपल्याकडील येईल,” असे त्या व्यक्तीला सांगतिले. आणि दोन दिवसानंतर प्रा.विष्णू गाडेकर यांना भेटायला गेलो. चांगला आणि वाईट माणसांना मी लगेच ओळखतो. त्यामुळे प्रा.विष्णू गाडेकर यांना मी माझ्या मित्रांच्या यादीमध्ये समाविष्ट केले. माझ्या यादीमध्ये फार जास्त मित्र कधीच नसतात, फक्त पाच सहा मित्रच माझ्या यादीत असतात.

माझ्या मित्रांच्या यादीमध्ये १) शांतीलाल देसरडा, २) आमदार एम.एम. शेख, ३) डॉ.राजेंद्र सूर्यवंशी, ४) डॉ.नंदकुमार गुरडे, ५) दिलीप अग्रहारकर, ६) प्रभाकर मापारी गुरुजी या पाच सहा लोकांचीच नावे होती. त्यामध्ये मग मी काही काळानंतर ७) प्रा. विष्णू गाडेकर यांचेही सातवे नाव समाविष्ट केले.

प्रा.विष्णू गाडेकर अत्यंत इमानदार आणि दुसऱ्याचे दुःख पाहून अत्यंत भावूक होणारा एक चांगला व्यक्ती आहे. कुणीही ओळखीचा अथवा बिना ओळखीचा व्यक्ती प्रा.विष्णू गाडेकर यांच्याकडे आला आणि आपले दुःख किंवा अडचण त्यांना सांगितली तर ते लगेच भावूक होतील आणि आपल्या खिशात शंभर, दोनशे, पाचशे जे काही रुपये असतील ते पैसे त्या व्यक्तीला ते काहीही विचार न करता लगेच देऊन टाकतील. त्यांच्या या भोळ्या, भावूक आणि दानशूर स्वभावाचा अनेक भामटे लोक खोटे बोलून गैरफायदाही घेतात. (त्यामुळे आमच्या वहिणी सौ.गाडेकर मॅडम यांनी आता प्रा.गाडेकर यांच्याकडील ए.टी.एम. कार्ड आपल्या ताब्यात घेतले आहे). मी त्यांना याबद्दल अनेक वेळा सावध करीत असे, परंतु माझ्या अपरोक्ष ही त्यांच्या सोबत असे बरेच प्रसंग घडत असायचे. काही काही भामटे लोक तर त्यांना योजना आखून मुद्दामच फसवायचे. एवढा उच्चशिक्षित प्राध्यापक असणाऱ्या व्यक्तीसही सहजपणे कुणी फसवू शकतो, याचेच मला आश्चर्य वाटायचे. हे सर्व पाहून मी त्यांना अनेकवेळा सांगायचो की, “तुम्ही कुणालाही अशाप्रकारे फुकटात पैसे देऊ नका”, परंतु ती त्यांची सवय कधीच गेली नाही. ते म्हणायचे, “अरे यार, तो फारच अडचणीत होता”

एकदा काय झाले की, एक दलित पुढारी त्यांच्याकडे आला आणि त्यांना त्याने सांगितले की, आम्हाला आमच्या नेत्यावर एक पुस्तक प्रकाशित करायचे आहे. ते पुस्तक मी लिहून ठेवले आहे, परंतु पुस्तक छापायला माझ्याकडे पैसेच नाहीत. ह्यांना त्यांना विचारले की, “किती खर्च येत आहे”, त्यांनी रक्कम सांगितली ती रक्कम यांनी चार-पाच दिवसांत त्या पुढाऱ्याच्या घरी नेऊन दिली. (ती रक्कम किती होती? ती मी इथे सांगणार नाही अन्यथा सौ. गाडेकर मॅडम प्रा.गाडेकर सरांना बोलतील.) एकदा तेच दलित पुढारी आजारी पडले. घाटीमध्ये चार-पाच दिवस ते भरती होते. ज्या ज्या खास लोकांची नावे त्यांच्या लक्षात होती, त्या यता लोकांना त्यांनी फोन करून आपल्या आजारपणाची माहिती दिली. त्यामध्ये प्रा.गाडेकरही होते, ते मला म्हणाले, “चला माझ्या एका मित्राला आपण घाटीत जाऊन भेटून येऊ,” मी त्यांना म्हणालो, “तुमचा तो मित्र कोण आहे? त्याचे मला नाव सांगा?”, त्यांनी मला नाव सांगितले. मी त्यांना म्हणालो, “अहो तुमच्या ह्या मित्राने १९८७मध्ये माझे एक छोटेसे काम महापालिकेतून करून देण्याकरिता माझ्याकडून एक हजार रुपये घेतले होते. नंतर अनेकवेळा त्यांच्याकडे विचारणा केल्यानंतरही त्यांनी ते काम करून दिले नाही किंवा त्या कामाकरिता घेतलेले हजार रुपयेही मला परत केले नाही,”

मग जेव्हा आम्ही घाटीत गेलो तेव्हा प्रा.विष्णू गाडेकर यांनी त्या दलित पुढाऱ्याला लगेच दोन हजार रुपयांची मदत केली. एवढेच नाही तर माझ्या समोरच त्यांनी त्या पुढाऱ्याला हे सुद्धा विचारले की, “यांचे असे म्हणणे आहे की, तुम्ही १९८७ला यांच्याकडून एका कामाकरिता एक हजार रुपये घेतले होते परंतु नंतर ते कामही तुम्ही केले नाही आणि यांचे हजार रुपयेही तुम्ही यांना परत दिले नाही”, यावर ते पुढारी म्हणाले, “मला तर याबाबतीत काहीच आठवत नाही”, मग मी वीस-एकवीस वर्षापूर्वी घडलेली ती घटना त्यांना सविस्तर सांगितली. त्यानंतरही त्यांनी मला तर काहीच आठवत नाही असे ते म्हणाले. अशा गोष्टी अशा लोकांना कधीच कुणाला आठवत नसतात किंवा ते न आठवल्याचे ढोंग करतात. शेवटी ते पुढारीच असतात. त्यानंतर मी प्रा.विष्णू गाडेकर यांना म्हणालो की, “तुम्ही अशाप्रकारे कुणालाही मदत का करता?”, तर ते म्हणाले, “ते सर्व लोक माझे मित्र असतात आणि ते अत्यंत अडचणीत असतात म्हणून मी त्यांना मदत करतो”, तेव्हा मी त्यांना म्हणालो की, “मित्र कुणाला म्हणायचे?हे तुम्हाला समजते काय? जो आपल्या अडचणीच्या वेळी आपल्याला मदत करतो तोच आपला खरा मित्र असतो. जो आपल्याशी खोटे बोलून किंवा इतर प्रकारे आपली आर्थिक लुबाडणूक करतो, तो आपला मित्र कधीच नसतो, हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. ह्या मंडळींनी तुम्हाला कधी तरी काहीतरी मदत केली आहे काय? हे तुम्ही मला सांगा?” ह्यावर ते काहीच बोलले नाही. मग मी त्यांना म्हणालो, “समाजातील अनेक लोक आपल्या ओळखीचे असतात, त्यांनाही आपण आपले मित्र म्हणतो, वास्तविक ते आपले मित्र नसून फक्त ओळखीचेच लोक असतात. आपल्या कदाचित एक हजार लोकांशी ओळखी असतील परंतु त्यातील कदाचित चार-पाच लोकच आपले खरे मित्र असतील. त्या एक हजार लोकांपैकी ज्या पाच-सात लोकांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी अगदी निस्वार्थी भावनेने तुम्हाला कधीतरी मदत केलेली असेल, केवळ त्याच लोकांची नावे तुम्ही एका वेगळ्या कागदावर लिहा. केवळ तेच लोक तुमचे खरे मित्र असतील. ज्या ज्या लोकांनी तुमची कोणत्याही खऱ्या किंवा खोट्या कारणावरून आर्थिक लुबाडणूक केलेली असते, ते तुमचे मित्र कधीच नसतात तर ते केवळ संधी साधू लबाड भामटेच असतात. अशा लबाड भामट्यांची तुम्ही एक वेगळीच यादी करा आणि त्यांना कधीही तुमचे मित्र म्हणण्याची चूक करू नका.” असे मी त्यांना नेहमीच सांगत असे, परंतु मी सांगितलेल्या ह्या गोष्टी त्यांच्या कधीच लक्षात राहात नसत. त्यामुळे त्यांच्या पूर्वीच्या वागण्यात कधीच बदल झाला नाही.

पूर्वी एकदा ते एम.जी.एम. समोरील रोडवरून चिश्तिती कॉलनीकडे येत असतांना रात्रीच्या वेळी त्यांची स्कुटी स्लिप झाली. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून ते बेहोश झाले. नंतर जवळपास एक महिना ते अपेक्स रुग्णालयात भरती होते, त्यावेळी ते आठ दिवस कोमात होते. त्यांच्यावर शस्त्रकीया करण्यात आली आणि एक महिन्याने ते शुद्धीवर आले. त्यानंतर ते कुणालाही वेळप्रसंगी म्हणत असत की, “माझ्या हातून अनेकांचे भले व्हावे, अशीच ईश्वराची इच्छा आहे. म्हणूनच ईश्वराने मला ह्या अपघातातून वाचवून अगदी मृत्युच्या जबड्यातून परत पाठविले आहे. म्हणूनच मला आता लोकांच्या भल्यासाठी चांगले काम करायचे आहे.” हा त्यांचा प्रामाणिक हेतू आणि हीच त्यांची प्रामाणिक भावना होती. परंतु अनेक लोक मात्र त्यांच्या ह्या भावनेचा दुरुपयोग करून त्यांची लबाडीने वेळोवेळी आर्थिक लुट करीत असत.

एकदा काय झाले, त्यांच्या मनात असा विचार आला की, “आपण गोर गरीब आणि सर्वसामान्य समाजातील अत्यंत हुशार असणाऱ्या मुलांसाठी एक चांगली निवासी शाळा काढायची. त्या शाळेमध्ये अत्यंत बुद्धीमान विद्यार्थी तयार करायचे. त्यांनी आपल्या देशाचे आधारस्तंभ झाले पाहिजे. आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांची निवासाची व शिक्षणाची मोफत सोय झाली पाहिजे वगैरे वगैरे….”. मला त्यांचा हा विचार त्यांच्याकरिता अत्यंत गैरसोयीचा, भयानक आणि त्यांची आर्थिक लुट करणारा वाटला. मी त्यांना या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना म्हणालो की, “अनेक श्रीमंत लोकांच्या अशा शाळा आहेत, ते हे कार्य अनेक वर्षापासून करीतच आहेत. अशावेळी तुमच्याकडे पैसे नसतांना हे कार्य तुम्ही करण्याची काहीच गरज नाही.” तरीही त्यांना माझे हे म्हणने अजिबात पटलेच नाही. त्यांनी त्या दृष्टीने अनेकांकडे विनंती केली. शाळेच्या संचालक मंडळाचे सभासद करून घेण्यापायी अनेकांकडून भांडवल तसेच देणग्या मिळविण्याचाही त्यांनी पर्यंत केला. तरीही त्यांना यामध्ये लोकांचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. लोक पैसे देत नाही, देणग्याही देत नाहीत, खोटी आश्वासने मात्र भरपूर देत आहेत, असा त्यांना या बाबतीत कटू अनुभव आला. मी त्यांना म्हणालो की, “अहो इथे प्रत्येकालाच आपआपल्या मुलांना शिकवायचे असते, त्यामुळे इतरांच्या मुलांच्या शिक्षणाकरिता कुणीच देणगी देणार नाहीत.”

एका दिवशी ते माझ्या घरी आले आणि मला म्हणाले की, पुढच्या दहा दिवसानंतर म्हैसमाळ येथे माझ्या नियोजित शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरु होत आहे. इमारत दोन मजली असेल, त्यात प्रयोगशाळा, लायब्ररी, कार्यालय, स्टाफ रूम, पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गाच्या खोल्या, वस्तीगृह इत्यादी इत्यादीचा समावेश असेल. त्यांचा हा विचार एकूण मला फारच आश्चर्य वाटले. त्यावर मी म्हणालो की, “इमारतीचे बांधकाम करण्याकरिता तुमच्याकडे जमीन आहे काय?” त्यावर ते म्हणाले “२५ वर्षापूर्वी मी एक सोसायटी स्थापन करून ६० सभासद जेके होते. त्या सर्वांच्या नावाचे सहा एकर जागेमध्ये ६० बाय ६० चे प्लॉट आहेत. त्याच जमिनीवर मी हे बांधकाम करणार आहे.” मी त्यांना म्हणालो, “त्यांनी त्यांचे प्लॉट मागितले तर काय करणार?”. ते म्हणाले, “तुमचे प्लॉट शाळेच्या इमारतीकरीता दान करा. असे मी त्यांना आवाहन करणार आहे.” त्यांचे हे विचार एकूण मी गप्प बसलो. त्यानंतर मी त्यांना म्हणालो, “अहो गाडेकर गुरुजी, आज तुमच्याकडे ह्या बांधकामाकरिता किंवा साहित्याकरिता काहीही पैसे शिल्लक नसतांना तुम्ही हे दोन माजली इमारतीचे बांधकाम कसे काय सुरु करणार आहात?” यावर ते म्हणाले, “मी आयुष्यात जेवढेही कामे केलेत, ते सर्व कामे माझ्या खिशात एक पैसाही शिल्लक नसतांनाच केलेली आहेत. तुम्ही आता बघत राहा, मी कसे काय काम सुरु करतो, नंतर एकदा काम सुरु झाले की, पैसे आपोआप येत राहातील.”

“पैसे आपोआप कसे येतात?” याचाच मी विचार करू लागलो. आपण कितीही धडपड केली तरीही आपल्याला पुरेसे पैसे कधीच मिळत नाहीत, अडचणींचा डोंगर कायम आपल्या समोर उभाच असतो. त्यांच्यासारखेच आपल्यालाही आपोआप पैसे येत राहिले तर किती बरे होईल, हाच विचार करीत मी रात्री झोपी गेलो.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!