आपला जीव एवढा स्वस्त आहे काय?

Spread the love

दि. ११ जून च्या वर्तमान पत्रातील बातमी, “मराठवाड्यात चार शेतकऱ्यांची आत्महत्या”, नापिकी व कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यात २४ तासात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पैठण तालुक्यातील मुरमा येथील तुकाराम अंबादास फटांगडे (३७) या शेतकऱ्याने भारतीय स्टेट बँक पाचोड यांचे ६५ हजार रुपयांचे कर्ज व हात उसने ७० हजार रुपये कर्ज होते. परतफेडीच्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे. नांदेड जिल्ह्यातील हिप्परगा येथील गोविंद काशीराम राठोड (५०) व अंबदोरी येथील बाबुराव पोताजी उरे (५९) आणि परभणी जिल्ह्यातील अकोली येथे गजानन बबनराव रोकड (२६) या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली.

गेल्यावर्षीच शासनाने सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम माफ करून त्यांना कर्जमुक्त करण्याच्या घोषणा मोठ्या प्रमाणात केल्या होत्या. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांकडून कर्जमुक्ती करिता फॉर्म भरून घेण्यात आले होते. हे काम कितीतरी दिवस चालू होते. वर्तमानपत्रात ह्यासंबंधीच्या शासनाच्या बातम्या आणि संबंधित मंत्र्यांच्या घोषणा बराच काळपर्यंत चालू होत्या. त्यानंतर आजही ह्या गोरगरीब शेतकऱ्यांवर नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करण्याची पाळी येत आहे, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. ह्या चार शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या हे तर एक उदाहरण आहे. अशाप्रकारच्या घटना दर महिना पंधरा दिवसात नेहमीच घडत असल्याच्या बातम्या आपल्याला वर्तमानपत्रामध्ये दिसून येतात.

दुष्काळामुळे नापिकी आहे, त्यासोबतच कर्जबाजारीपणाही आहे, तरीही ह्या गोष्टीला वैतागून शेतकऱ्यांनी आत्महत्या जरी केल्या, तरीही त्यांच्या आत्महत्यांमुळे त्यांचा हा प्रश्न अजिबात सुटत नाही. त्यांनी आत्महत्या केली म्हणून काही त्यांचे कर्ज माफ होत नाही किंवा त्या कर्जाची रक्कमही फिटत नाही. उलट त्या शेतकऱ्यांच्या परिवारातील एक कर्ता पुरुष जीवानिशी गेल्यामुळे त्या परिवाराचा आधारस्तंभ नष्ट होऊन, त्या परिवाराच्या अडचणी कमी होण्याऐवजी त्यांच्या अडचणीत अनेक पटींनी वाढच होत असते. त्या शेतकरी कुटुंबातील त्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न त्यांच्या समोर असतो. त्याचप्रमाणे त्यांच्या तरुण मुलींच्या लग्नाचाही प्रश्न त्यांच्यासमोर असतो. त्यांच्या परिवाराच्या उपजीविकेचा तसेच इतर खर्चाचेही अनेक प्रश्न त्यांच्यासमोर असतातच. त्या शेतकरी कुटुंबातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यामुळे हे प्रश्न किंवा त्या शेतकरी कुटुंबातील इतर समस्यांचे निराकरण कधीच होत नसते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कितीही नापिकी झाली अथवा ते कितीही कर्जबाजारी झाले, तरीही त्यांनी आत्महत्या करू नये.

ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येने त्यांचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत. जे शेतकरी अत्यंत इमानदार आणि अत्यंत नीतिमान असतात केवळ तेच शेतकरी आपल्यावर आलेले अशाप्रकारचे संकट पाहून स्वतःचा धीर सोडून आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. वास्तविक पाहाता त्यांच्याकडील कर्जच ही रक्कम अत्यंत शुल्लक आणि किरकोळ असते. त्या एवढ्याशा शुल्लक रकमेच्या कर्जाला घाबरून त्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करणे कधीच समर्थनिय ठरत नाही.

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या देशात काय घटना घडत आहेत, ते अगोदर पाहावे, त्यापासून काहीतरी बोध घ्यावा. मद्यसम्राट उद्योगपती विजय माल्या, हिरे व्यापारी निरव मोदी, उद्योगपती मेहुल चोक्सी, ललित मोदी ह्यांच्यासारख्या मोठ्या मोठ्या अनेक लोकांवर अगदी हजारो कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज काही त्यांनी आपल्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा जगण्याकरिता घेतलेले नव्हते, तर ते त्यांनी मुद्दामच बँकांना बुडविण्याकरिताच घेतले होते, आणि ते कर्ज घेऊन कायमचे विदेशात पळून जाण्याचीच त्यांची अगोदर पासूनच योजना होती. त्यांच्याशी संबंधीत असणाऱ्या इतर लोकांनाही त्यांच्या ह्या विदेशात पलायन करणाऱ्या कार्यक्रमाची कल्पना होतीच. विशेषतः राजकारणी मंडळी आणि संबंधित बँकांचे वरिष्ठ अधिकारी ह्यांच्या सहकार्याशिवाय त्यांना अशाप्रकारे हजारो कोटी रुपयांचे कर्ज काढून एवढ्या सहजपणे विदेशात पळून जाणे कधीच जमले नसते. विदेशात अगदी मस्तपणे जीवन जगणाऱ्या ह्या लोकांचे कधीकधी वर्तमानपत्रात फोटो छापून येतात, त्या फोटोमध्ये ते अत्यंत आनंदात जीवन जगत असल्याचे आपल्याला दिसून येते. परंतु आपले शेतकरी बंधू त्यांच्याकडे केवळ काही हजार रुपये कर्ज बाकी राहिल्यामुळे त्या कर्जबाकीच्या तगाद्याला कंटाळून आत्म्हत्येचाच निर्णय घेतात.

असल्या कर्जाला अथवा तगाद्याला घाबरून शेतकऱ्यांनी कधीच आत्महत्या करू नये. कुणावर कितीही कर्ज झाले, तरीही त्यांचा कुणीही कधीही जीव घेऊ शकत नाही. एवढेच काय तर कर्ज थकल्यामुळे त्यांना कुणीच सहजपणे तुरुंगातही पाठवू शकत नाही किंवा एवढ्या सहजपणे त्यांची मालमत्ताही कुणीच जप्त करू शकत नाही. मग एवढे सगळे असतांना त्यांनी स्वतःहोऊनच आत्महत्या तरी कशाला करायची? आपला जीव एवढा स्वस्त आहे काय? ज्यांच्याकडे अनेक कोटी रुपयांची थकबाकी आहे ते लोक सुद्धा त्या थकबाकीला घाबरून कधीही आत्महत्येचा विचार करीत नाहीत, मग आपणच आपल्या किरकोळ अशा पन्नास-साठ हजार रुपयांच्या थकबाकीकरिता आत्महत्या कशाला करायची?

ह्या बाबतीत एक विशेष बाब अशी लक्षात येते की, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे जेव्हा आपण वर्तमानपत्रात वाचतो तेव्हा ती नावे सहसा हिंदू धर्मिय लोकांचीच असतात. मुस्लीम धर्मिय शेतकऱ्यांची नावे आत्महत्या करणाऱ्या लोकांमध्ये कधीच दिसून येत नाहीत. याचाच अर्थ असा आहे की, त्यांनी जीवनातील प्रत्येक संकटाशी सामना करून धैर्याने तोंड देण्याचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण केलेला आहे. असाच आत्मविश्वास सर्वांनी आपल्या मनामध्ये का निर्माण करू नये.

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!