स्व.डॉ.शांतीलालजी देसरडा यांच्या प्रमाणेच आपला मृत्यूही आनंददायक व्हावा…!

Spread the love

जो व्यक्ती जन्म घेतो, त्याचा केव्हा ना केव्हा तरी मृत्यूही निश्चितपणे होणारच असतो. मृत्युपासून कुणाचीही सुटका नाही.

मृत्यू दोन प्रकारचे असतात. आनंददायी मृत्यू आणि दु:खदायक मृत्यू. ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात इतरांकरिता काहीतरी चांगली कामे केलेली असतात, आयुष्यभर त्यांनी नितीनियमाने वागून इतरांच्या सद् भावनाच मोठ्या प्रमाणात मिळविलेल्या असतात, केवळ अशाच व्यक्तीला आनंददायक मृत्यू प्राप्त होतो. तर ज्या व्यक्तींनी आपल्या आयुष्यात इतरांकरिता काहीही चांगली कामे केलेली नसतात, आयुष्यभर अनीतीने वागून इतरांची फसवणूक व लुबाडणूक करून त्यांनी त्या लोकांचा तळतळाट व शापही मोठ्या प्रमाणात मिळविलेला असतो, केवळ अशाच लोकांचा दु:खदायक मृत्यू होत असतो. मृत्यूपूर्वी असे लोक बराच काळ पर्यंत वेदनेने तळमळत, असाह्यपणे मृत्यूची प्रतीक्षा करीत मृत्यूशय्येवर खितपत पडलेले असतात. अशा दुरात्म्याला लवकर उचलून नेऊन, त्याला ह्या दु:खातून अथवा जगातून मुक्त करण्याची मृत्यूची सुद्धा अजिबात इच्छा नसते.

इतरांकरिता चांगली कामे केल्यामुळे ज्या व्यक्तीचा आनंददायक मृत्यू झालेला आहे, त्याच्याकरिता त्यांच्या परिवारातील व्यक्तीशिवाय, त्यांनी ज्यांच्याकरिता काहीतरी चांगली कामे केलेली आहेत, अशी बाहेरची सुद्धा अनेक मंडळी दु:खाने रडत असतात.

ज्या व्यक्तीकरिता त्यांच्या नातेवाईकांशिवाय इतर बाहेरच्या अनेक व्यक्तीही रडून रडून शोक व्यक्त करीत असतील तर, तो व्यक्ती निश्चितपणे नीतिमान, इतरांना मदत व सहकार्य करणारा तसेच अनेकांचा आधारवड आणि लोकप्रिय आहे, असे समजायला काहीच हरकत नाही.

आणि ज्या व्यक्तीकरिता केवळ त्याच्या परिवारातील व्यक्तीच रडत असतील तर त्या व्यक्तीने इतर लोकांकरिता काहीही चांगली कामे केलेली नाहीत, असे समजायला हरकत नाही. त्याने आपल्या दुष्ट प्रवृत्तीमुळे आपल्या आयुष्यात इतरांच्या शिव्या आणि शापच मिळविलेले असतात. अशी मंडळी अनीतिमान असतात, म्हणूनच त्यांचा मृत्यूसुद्धा अत्यंत दु:खदायक पद्धतीने होतो, असे समजायला काहीच हरकत नाही.

समाजाचे आपण जर बारकाईने अवलोकन केले तर मी सांगितलेल्या वरील गोष्टीची तुम्हाला निश्चितपणे प्रचिती येईल.

दि. १ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी अकरा वाजता होमिओपॅथीचे जेष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ.शांतीलालजी देसरडा यांचे पुण्याच्या रुग्णालयात अगदी आकस्मितपणे, आनंददायक अशा अवस्थेत निधन झाले.

असा आनंददायी मृत्यू क्वचितच एखाद्या पुण्यात्मा, परीससदृश्य व्यक्तिमत्वाच्या, अत्यंत लोकप्रिय आणि नीतिमत्तेने जगणाऱ्या व्यक्तीलाच प्राप्त होतो.

प्रत्येकालाच वाटते की, डॉ. शांतीलाल देसरडांप्रमाणेच आपलाही मृत्यू आनंददायीच व्हावा, परंतु आनंददायी मृत्यू होण्याकरिता आपण काय करणे आवश्यक आहे? नेमकी हीच गोष्ट मी आपल्याला ह्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.

आपण म्हणाल, ह्या गोष्टी तुम्हाला कशा काय माहित आहेत?

त्याचे उत्तर असे आहे की, मी गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील अनेक चांगल्या तसेच वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींचे, त्यांच्या लोकांसोबतच्या व्यवहाराचे, त्यांच्या जीवनाचे, बारकाईने अवलोकन करीत आहे. त्यामुळे कोण-कोणत्या प्रवृत्तीच्या लोकांचे मृत्यू आनंददायक होतात, आणि कोण-कोणत्या प्रवृत्तीच्या लोकांचे मृत्यू अत्यंत दु:खदायक होतात, ह्याचे मी अत्यंत सूक्ष्मपणे निरीक्षण केलेले आहे.

त्या संदर्भात मला समजलेले मृत्यू संदर्भातील सत्य, मी ह्या लेखाद्वारे आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.

ह्या संदर्भात थोडक्यात एकाच वाक्यात सांगायचे झाल्यास, कुणी गरीब असो, अथवा कुणी श्रीमंत असो, ज्या व्यक्ती नीतिमत्तेने वागतात, केवळ त्यांचाच मृत्यू आनंददायक होतो, आणि ज्या व्यक्ती जीवनात कधीतरी अनीतीने वागतात, त्यांचाच, मृत्यू अत्यंत दु:खदायक पद्धतीने, अनेक दिवस मृत्यूशय्येवर पडून राहिल्यानंतरच होतो.

आपलाही मृत्यू आनंददायक व्हावा, असे आपणास वाटत असेल तरच तुम्ही हा लेख वाचून, मृत्यूचे वास्तव सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करावा…..

 

जीवन जगत असतांना आपण पाहातो की, आपल्या सभोवताल असणाऱ्या कितीतरी लोकांचा मृत्यू होत असतो. प्रत्येकाच्या मृत्युकरिता विविध कारणे असतात. कुणाचे आजाराने निधन होते, तर कुणाचे अपघाताने निधन होते. कुणाचे वृद्धापकाळाने निधन होते, तर कुणाचे हृदय विकाराने म्हणजेचे हार्ट अटॅकने निधन होते. कुणी आत्महत्या केल्यामुळे त्याचे निधन होते, तर कुणी कुणाचा खून केल्यामुळे अथवा कुणी कुणाची हत्या केल्यामुळेही कुणाचे तरी निधन होते.

विविध व्यक्तींच्या मृत्यूकरिता विविध कारणे कारणीभूत असतात. आपल्या सभोवती असणाऱ्या आपल्या परिचयातील, आपल्या नातेवाईकातील किंवा आपल्या परिचयाचे नसणाऱ्या अपरिचित अशा अनेक लोकांचे आपण विविध कारणामुळे मृत्यू झाल्याचे पाहातो. एवढ्या लोकांचे मृत्यु पाहिल्यानंतरसुद्धा आपलाही एका दिवशी मृत्यू होईल, असे आपणास कधीच वाटत नाही.

त्यामुळे मृत्यूची आपल्याला कधीच भीती वाटत नाही. आपल्याला नेहमीच असे वाटते की, आपल्याशिवाय जगातल्या इतर सर्वच लोकांना मृत्यू येणार आहे, फक्त आपल्यालाच कधी मृत्यू येणार नाही. जर कधी आपल्याला मृत्यू जरी येणार असला तरीही त्याला अजून फार वेळ आहे, असेच आपल्याला नेहमी वाटत असते. आपला मृत्यू अजून फार दूर आहे अशाच भ्रमात आपण सदैव वावरत असतो, आणि त्यामुळे आपण अगदी निश्चिंतपणे तसेच बेधुंदपणे जीवन जगत असतो. ह्याच गोष्टीचे मला फार आश्चर्य वाटते.

प्रिय वाचकांनो, मृत्यू अगदी आपल्या जवळ आलेला असतो, काही क्षणातच तो आपल्यावर झडप घालणार असतो, तरीही त्याची आपल्याला काहीच जाणीव नसते. मृत्यू ची जाणीव न ठेवल्यामुळे आपले वागणे, आपले बोलणे, आपले जगणे, सर्वच काही बेधुंदपणे चालू असते. आपल्या बेधुंदपणे वागण्यामुळे आपण इतरांना कसा त्रास देत असतो, ह्याची आपल्याला काहीच जाणीव नसते.

आपण बेधुंदपणे जगत असतांना, स्वतःला एखाद्या राज्यापेक्षा कधीच कमी समजत नाही. एवढा आपल्याला गर्व अभिमान आणि माज आलेला असतो. अशाप्रकारे बेधुंदपणे जगत असतांना आपल्याला नितीमत्तेची अजिबात जाणीव राहात नाही. मग आपण अनेकांशी खोटे बोलतो, आपण अनेकांना शब्द देऊनही त्या शब्दाचे तसेच इतरांना दिलेल्या वेळेचे अजिबात पालन करीत नाही. वेळप्रसंगी आपण इतरांची फसवणूकही करतो. कितीतरी लोकांची लुबाडणूकही करतो. संधी मिळेल तेव्हा आपण भ्रष्टाचारही करतो. आपल्याला अकलेचा पत्ता नसतांनाही आपण स्वतःला फारच हुशार समजतो. कोणत्याही बऱ्या-वाईट मार्गाचा अवलंब करून आपण आपले पैसे वाचवितो किंवा इतर मार्गाने दुसऱ्याचे पैसे मिळवितो. अनेकवेळा तर आपण इतरांच्या कामाचे पैसेही मुद्दामच लबाडी करून बुडवितो.

आपल्याला असे वाटते की, विविध मार्गाने पैसे मिळवून आपण जीवनातील भरपूर आनंदाचा उपभोग घेऊ, परंतु  लक्षात ठेवा, असे कधीच काहीच होत नाही. मृत्यू आला की आपल्याला सर्व काही इथेच सोडून जावे लागते.

ग्रीक देशात इस.पूर्व. २० जुलै ३५६ मध्ये जन्मलेल्या, परंतु नंतर जग जिंकणाऱ्या, अलेक्झांडर द ग्रेट उर्फ सिकंदर ए आझम या नावाने प्रसिध्द असलेल्या बादशहाची एक गोष्ट आहे. हा ग्रीक देशातील मॅसेडोनियाचा राज्यकर्ता होता. जागतिक इतिहीहासात तो सर्वात यशस्वी व कुशल सेनापतींपैकी एक गणला जात होता. तत्कालीन ग्रीक संस्कृतीला त्या काळात ज्ञात असलेले संपूर्ण जग त्याने जिंकले आणि त्यामुळे तो जगज्जेता म्हणूनही ओळखला जातो.

हा, सिकंदर बादशहा आपल्या वयाच्या विसाव्या वर्षीच जग जिंकण्यासाठी तसेच प्रचंड संपत्ती मिळविण्यासाठी आपल्या देशातून आपले हजारो सैनिक घेऊन सर्व युध्द साहित्यासह बाहेर पडला. जे जे देश त्याच्या वाटेत आले, त्या त्या देशांच्या राज्यांशी युध्द करून, त्यांचा वध करून अथवा त्यांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांना आपले बंदिवान किंवा युध्दकैदी करून त्याने त्यांची संपत्ती लुटून त्यांचे राज्य हस्तगत केले. त्यांच्या स्त्रिया किंवा तरुण मुली आपल्या ताब्यात घेऊन तो त्या काळात ग्रीक संस्कृतीला ज्ञात असलेले संपूर्ण जग जिंकत तो पुढे-पुढेच जाऊ लागला. तेथील लोकांच्या हत्त्या करून, अनेक राज्ये त्याने लुटालुट, जाळपोळ व बेचिराख करून, देशोधडीला लावले.

अशाप्रकारे एक-एक राज्य, एक-एक देश लुटून समोरील देशावर ताबा मिळवीत तो पुढे-पुढेच जात होता.

प्रचंड संपत्ती मिळविण्याची तसेच जग जिंकण्याची त्याची अनावर इच्छा कधीच कमी झाली नाही किंवा संपली नाही.

आपला देश सोडून त्याला आता जवळपास तेरा वर्षे झाली होती. ह्या युद्धामध्ये त्याचे तसेच त्याने ज्या-ज्या राज्यांशी युद्ध केले होते, त्या त्या राज्यातील अगदी हजारोच नव्हे तर लाखो सैनिकांचाही मृत्यू झाला होता. एवढेच नाही तर या युद्धांमध्ये अनेक आयांनी आपल्या तरुण मुलांचा मृत्यू झाल्याचे पाहिले. अनेक स्त्रियांनी आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचे पाहिले. अनेक बहिणींनी आपल्या भावांचा मृत्यू झाल्याचे पाहिले.

ज्या सिकंदर बादशहामुळे आपले हे प्रिय नातेवाईक मृत्यू पावले आणि आपल्या घरा-दारांची होळी झाली, त्या सिकंदर बादशाहाला, ह्या सर्वच स्त्रियांना अत्यंत दु:खी अंतकरणाने शिव्या-शाप दिला.

वाचकांनो, अशाप्रकारे कुणाचाही तळतळाट आणि शिव्या-शाप मिळाल्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो , आणि तो मृत्यू सुद्धा अत्यंत दु:खदायी असतो.

विशेष हे की, सिकंदर बादशहा आणि त्यांच्या सैनिकांनी जग जिंकण्याच्या हव्यासापायी ज्या हजारो अथवा लाखो लोकांची हत्या करून जी प्रचंड संपत्ती मिळविली होती, त्या शापित संपत्तीसोबतच त्यांनी युद्धात मारल्या गेलेल्या लोकांच्या नातेवाईकांतर्फे दिल्या गेलेले शिव्या-शापही मोठ्या प्रमाणात मिळविले होते.

हा अशाप्रकारचा शिव्या-शाप मिळाल्यामुळे सिकंदर बादशहा अत्यंत अस्वस्थ झाला. त्यामुळे लवकरच वयाच्या अवघ्या तेह्तीसाव्या वर्षीच तो गंभीर आजारी पडला. त्याच्या जवळच्या विश्वासू सरदारांनीही त्याचा विश्वासघात केला. आता लवकरच आपला मृत्यू होईल, ह्याची सिकंदर बादशहाला जाणीव झाली. मृत्यूच्या जाणीवेने तो अस्वस्थ आणि दु:खी झाला. आपल्या गत जीवनाचे त्याने चिंतन केले. केवळ प्रचंड संपत्ती मिळविण्याच्या आणि जग जिंकण्याच्या हव्यासापायी आपण लाखो लोकांच्या हत्तेस कारणीभूत झाल्याची त्याला तीव्र जाणीव झाली. ह्यामुळे आपल्याला किती लोकांनी शिव्या-शाप दिले, ह्याचेही त्याने चिंतन केले.

आता आपला मृत्यू जवळ आल्याचे पाहून त्याने आपल्या मृत्यू पूर्वी आपल्या विश्वासू सरदारांना आपल्याजवळ बोलाविले. त्याने त्यांना सांगितले की, “जेव्हा माझा मृत्यू होईल, तेव्हा तुम्ही मला तिरडीवर बांधाल. त्यानंतर माझी अंतयात्रा निघेल. माझी ही अंतयांत्रा पाहाण्याकरिता रस्त्याच्या दोन्ही बाजूला अगदी हजारोच नव्हे तर लाखो लोकही गोळा होतील. अशा प्रसंगी माझी अंतिम इच्छा अशी आहे की, तुम्ही तिरडीवर बांधतांना माझे दोन्ही हात तिरडीच्या दोन्ही बाजूने बाहेर मोकळे लटकते ठेवावेत.”

सिकंदरच्या सैनिकांना सिकंदरच्या ह्या अंतिम इछेचे नवल वाटले. त्यांनी विचारले की, “आपले दोन्ही हात तिरडीच्या बाहेर मोकळे लटकते का ठेवायचे?”

तेव्हा सिकंदर म्हणाला की, “मी प्रचंड संपत्ती मिळविण्याच्या आणि जग जिंकण्याच्या हव्यासापायी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षीच आपला देश सोडून बाहेर पडलो होतो. त्यानंतर मी युद्धामध्ये गेल्या तेरा वर्षाच्या कालखंडात अनेकांची हत्त्या केली. अनेकांची संपत्ती लुटली, अनेक देश लुटपाट करून बेचिराखही केले, त्यासोबतच हत्त्या केलेल्या अनेक लोकांच्या नातेवाईकांचे शिव्या-शापही मिळविले.

आज माझ्याकडे प्रचंड संपत्ती जरी असली तरीही आज मी मृत्युच्या अगदी जवळ येऊन पोहोचलो आहे. गेल्या तेरा वर्षात इतक्या कष्टाने मिळविलेल्या ह्या संपत्तीचा मला आज काहीही उपयोग होत नाही. ही प्रचंड संपत्तीसुद्धा मला मृत्युपासून वाचवू शकत नाही. एवढेच नाही तर मृत्यू नंतर ह्या संपत्तीमधील एक रुपयासुद्धा मी आपल्यासोबत नेऊ शकत नाही. हे माझे किती मोठे दुर्दैव आहे. त्यामुळे मला तिरडीवर बांधतांना तुम्ही माझे दोन्ही हात दोन्ही बाजूने मोकळे लटकते ठेवा. माझी अंतयात्रा पाहायला रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जे लोक उभे राहातील त्यांना हे दिसले पाहिजे की, सिकंदर बादशहाने अनेकांची हत्त्या करून गेल्या तेरा वर्षात जी प्रचंड संपत्ती मिळविली आहे, त्यातील एक रुपयासुद्धा त्याला आता आपल्या मृत्यूनंतर आपल्या सोबत घेऊन जाता येत नाही.

सिकंदर बादशहा जसा रिकाम्या हाताने जन्माला आला होता, तसाच तो आता रिकाम्या हातानेच मृत्यूनंतरही परत जातो आहे. त्याचे तिरडीवरील दोन्ही हात आता पूर्णपणे रिकामेच आहेत.

इतरांना त्रास देऊन, इतरांची हत्त्या करून, अनीतीने इतरांची संपत्ती मिळवूनही त्या संपत्तीचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही. तिरडीच्या बाहेर लटकणारे माझे दोन्ही हात रिकामे असल्याचे पाहूनच, ही गोष्ट लोकांना समजेल.”

वयाच्या अवघ्या तेहतिसाव्या वर्षी मृत्यू पावणाऱ्या जगज्जेत्या सिकंदर बादशहाने, ‘खाली हाताने जगात यायचे आहे आणि खाली हातानेच जगातून जायचे आहे’ हाच एकमेव संदेश लोकांना दिलेला आहे.

आपल्या वयाच्या विसाव्या वर्षी सिकंदर जग जिंकण्याकरिता आपला देश सोडून बाहेर पडला होता आणि वयाच्या तेहतिसाव्या वर्षीच इस.पूर्व. ११ जून ३२३ मध्ये, अत्यंत दु:खद असा त्याचा मृत्यू झाला होता.

वाचकांनो, म्हणूनच प्रत्येकाने आपला मृत्यू स्व.डॉ.शांतीलाल देसरडांप्रमाणेच आनंददायी होण्याकरिता आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीचा विचार केला पाहिजे.

इतरांना आपल्या वाणीने, आपल्या कृत्याने, आपल्या वागणुकीने, आपल्या गैरव्यवहाराने आपण कोणत्याही प्रकारे त्रास देत आहोत, असे जर आपल्याला वाटत असेल तर निश्चितपणे पुढे चालून आपले आयुष्य आणि आपला मृत्यू सिकंदर बादशहाप्रमाणेच कमी वयात, अवेळीच, वेदनादायक तसेच दु:खदायकच होणार आहे, ह्याची आजपासूनच आपण खातरी बाळगावी.

प्रत्येकाने आपल्या मृत्युपुर्वीच आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीचे तसेच आपल्या वागणुकीचे चिंतन केले पाहिजे.

तुम्ही आपल्या अनीतीच्या अथवा लबाडीच्या वागण्यामुळे कुणा-कुणाला फुकटात लुबाडले आहे? तुम्ही कुणा-कुणाचा कशापद्धतीने अपमान केलेला आहे? तुम्ही कुणा-कुणाचे काय-काय नुकसान केलेले आहे? ह्याचा विचार करा.

त्या सर्वच लोकांची तुम्ही आजच भेट घेऊन त्यांची मनापासून क्षमा मागावी. त्यांचे तुम्ही जे काही नुकसान केले असेल, त्या नुकसानीची तुम्ही लगेच भरपाई करून द्यावी.

हे सर्व कार्य तुम्ही आजच करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा आपण ह्या बद्दल केवळ विचारच करीत राहू आणि विचार करण्या-करण्यातच तुमचा मृत्यू अचानक तुमच्यावर झडप मारेल आणि तुमचे आयुष्यही लगेच संपून जाईल. असे काही झाले तर अत्यंत दु:खदायी मृत्यू तुमच्या वाट्याला येईल.

तुमच्या आयुष्यावर इतरांचे काहीही कर्ज राहिले तर जीवन जगतांनाही तुम्हाला कधीच शांती मिळणार नाही, आणि मरतांनाही तुम्हाला तसेच तुमच्या प्रियजनांना कधीच आनंददायक मृत्यूसुद्धा येणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा.

तुम्ही स्वतःला कितीही इमानदार, धर्मात्मा अथवा दानशूर समजत असाल, तरीही त्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही किती लोकांकरिता काय-काय चांगले कार्य केले आहे? तुम्ही किती लोकांना मदत व सहकार्य केलेले आहे? ह्या तुमच्या दानशूरतेच्या गोष्टी, तुम्ही नाही तर इतर लोकांनीच जगाला सांगितल्या पाहिजेत.

किती लोक तुमच्या दान धर्माने प्रभावित होऊन तुम्हाला दानशूर म्हणतात, हे सुद्धा तुम्ही दुरूनच पाहिले पाहिजे. आपण स्वतः, ‘मी दानशूर, मी दानशूर’, असे म्हणून आपण स्वतःच आपले स्वतःचे डफडे बडविण्यात काहीच अर्थ नाही. इतर लोक ज्या शब्दात तुमचा उल्लेख करतात, अगदी तसेच तुम्ही वास्तविक जीवनामध्ये असता. तोच तुमचा अथवा तुमच्या परिवाराचा खरा परिचय असतो. एवढे लक्षात ठेवा की, परिवारातील व्यक्तीचा किंवा तुमचा मृत्यू दुख:दायक होत असेल, तर केवळ तुम्हीच नाही तर तुमच्या परिवारातील इतर मंडळीसुद्धा लबाड, अनीतिमान, दिलेला शब्द न पाळून इतरांची फसवणूक अथवा लुबाडणूक करणारी अत्यंत नीच मनोवृत्तीची आहेत, असे खातरीने समजण्यात येते. ह्या बाबतीत आपण विचार केल्यास, आपणही निश्चितपणे असेच आहोत, की काय ? हे तुमच्या लक्षात येईल.

आणि ज्या व्यक्ती कुठलाही त्रास न होता, अगदी सहजपणे आनंददायी वृत्तीने डॉ.शांतीलाल देसरडांसारखे अचानक न कळत मृत्युच्या कुशीत पोहोचतात, त्याच व्यक्ती खऱ्या अर्थाने लोकप्रिय, नीतिमान, दिलेला शब्द पाळणाऱ्या, इतरांची लुबाडणूक न करणाऱ्या, इतरांना मदत व सहकार्य करणाऱ्या प्रवृत्तीचे दानशूर व्यक्ती असतात.

अशा व्यक्तीला अनेकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा असल्यामुळेच अशा व्यक्तीला आनंददायक मृत्यू प्राप्त होऊन, त्या व्यक्तीला जीवन-मरणाच्या ह्या दु:खदायी चक्रापासून पूर्णपणे मुक्तता होऊन मोक्ष मिळतो. त्याला आपल्या मृत्यू नंतरही शांती मिळते.

ह्या संदर्भात मी, आपल्या अत्यंत चांगल्या कर्माने, अनेकांचा आशीर्वाद किंवा शुभेच्छा मिळवून, आनंददायक मृत्यू लाभलेल्या, स्व.डॉ.शांतीलालजी देसरडांचे उदाहरण ह्या ठिकाणी देत आहे….!

 

 

 

औरंगाबादच्या गुरु गणेश नगर मधील, डी.के.एम.एम. होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे संस्थापक, प्राचार्य तसेच जालना जिल्ह्यातील शेलगावच्या गुरु मिश्री होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचे संस्थापक, अध्यक्ष, औरंगाबाद जिल्ह्यातील नेवासा येथील अटल बिहारी बाजपेयी होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे प्रेरक व मार्गदर्शक तसेच, होमिओपॅथीचे जेष्ठ शिक्षण तज्ज्ञ, दिल्ली येथील केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे अनेक वर्षे सदस्य राहिलेले, डॉ.शांतीलाल देसरडा यांना गेल्या वीस वर्षांपासून मधुमेहाचा आजार होता. तरीही त्या आजाराची तमा न बाळगता त्यांनी होमिओपॅथीच्या वैद्यकीय क्षेत्रासह, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातही फार मोठे कार्य केलेले आहे.

ह्या विविध क्षेत्रात कार्य करीत असतांनाच त्यांनी अनेकांना शक्य ती मदत व सहकार्य केलेले आहे. अनेक लोकांना त्यांनी नोकरीला लावले आहे. अनेक लोकांना त्यांनी वेळोवेळी मोफत वैद्यकीय मदत पुरविली आहे. ह्याकरिता त्यांनी आपल्या कार्यकाळात अगदी हजारोंच्या संख्येने वेळोवेळी मोफत आरोग्य तपासणी आणि होमिओपॅथीक उपचार शिबिरे आयोजित केलेली आहेत.

अनेक गोर-गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांच्या शैक्षणिक काळात सर्वच प्रकारची शक्य ती मदत व सहकार्य केलेले आहे. त्याचप्रमाणे सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातही त्यांनी वेळोवेळी आपला मोठा सहभाग नोंदविलेला आहे.

त्यांच्या संपर्कात कोणत्याही निमित्ताने ज्या कोणी व्यक्ती येत असत, त्या व्यक्ती डॉ.देसरडा यांच्याकडून काही ना काही तरी मदतीची व सहकार्याचीच अपेक्षा करीत असत. त्या सर्वच व्यक्तींना ते अगदी सढळ हाताने मदत व शक्य ते सहकार्य ही करीत असत. त्यांच्या परिसासमान व्यक्तिमत्वाने तसेच मदत आणि सहकार्याने त्यांनी अनेकांच्या जीवनाचे सोने केले आहे. अनेकांच्या जीवनात त्यांनी सुख, समृद्धी निर्माण केलेली आहे. अशा हजारो व्यक्ती आहेत. त्या सर्वांबद्दल इथे काही सांगितले तर त्या संदर्भात एक मोठे पुस्तकच तयार होईल.

त्यांच्या ह्या अनेकांना निस्वार्थीपणे सदैव मदत करण्याच्या प्रवृत्तीमुळे वैद्यकीय क्षेत्रासह इतर विविध क्षेत्रातील हजारो लोकही त्यांच्याशी जिवाभावाच्या प्रेमळ भावनेतून जोडल्या गेले आहेत. प्रत्येकाशी ते अत्यंत सौजन्याने, आदराने आणि प्रेमाने बोलत असत. त्यांच्या चांगल्या व्यवहारामुळे कधीच त्यांना कुणीच शत्रू निर्माण झाले नाहीत. (ह्याला अपवाद काही अनीतिमान, लबाड, स्वार्थी तसेच कृतघ्न असलेल्या चार-पाच व्यक्ती समाजात असतातच.)

परंतु, त्यांच्यावर प्रेम करणारा, तसेच त्यांच्याबद्दल अत्यंत आदर बाळगणारा, अगदी हजारो लोकांचा फार मोठा जनसमुदाय त्यांच्याशी खऱ्या प्रेमाने जोडल्या गेला होता. हे काम सर्वसामान्यांना वाटते तेवढे सोपे अजिबात नाही. कारण असा जनसंग्रह जोडण्याकरिता पैशांचा मोह सोडवा लागतो. अडी अडचणीत असलेल्या असंख्य लोकांना सहकार्य किंवा मदत करतांना ह्यामध्ये आपला किती पैसा खर्च होत आहे? हा विचारही मनातून पूर्णपणे काढून टाकावा लागतो. इतरांकरिता नेमके हेच सर्वात कठीण काम आहे.

डॉ.शांतीलाल देसरडांनी आपल्या आयुष्यात प्रचंड पैसा मिळविण्यापेक्षाही असंख्य लोकांचे खरे प्रेम मिळविण्याकरीतच आयुष्यभर चांगले कार्य केलेले आहे. त्यांच्याशी खऱ्या प्रेमाने जोडल्या गेलेला संपूर्ण भारतातील फार मोठा लोकसंग्रह हीच त्यांची आयुष्यभराची खरी संपत्ती होती.

समाजातील काही धन-दांडगे, अनीतिमान लोक मात्र खोटे बोलून, इतरांची आर्थिक लुबाडणूक करून, अनेकांच्या शिव्या-शाप मोठ्या प्रमाणात मिळवीत असतात. अशा लोकांच्या सोबत असंख्य चांगले लोक कधीच नसतात. तर त्यांच्यासारखेच काही अनीतिमान, लबाड, स्वार्थी, कृतज्ञ स्वभावाचे काही थोडे फार टोळभैरवच त्यांच्या सोबत असतात.

अशा स्वार्थी आणि अनीतिमान लोकांना कधीच इतरांना मदत किंवा सहकार्य करण्याकरिता आपला पैसा अजिबात खर्च करावासा वाटत नाही, त्यामुळे अशा अनीतिमान व्यक्तीवर कधीच कुणीच प्रेम करू शकत नाही. अशा व्यक्तीबद्दल कुणालाच मनातून कधीच आदर किंवा प्रेमही वाटत नाही.

आपल्या आयुष्याच्या शेवटी, भारतातील महान तपस्वी जैन धर्मगुरु, मुनी मिश्रीलालजी महाराज, औरंगाबाद येथील गुरु गणेशनगर परिसरात निवास करीत होते, तेव्हा त्या बारा एकर परिसरात लोकांची आरोग्य सेवा करणारे होमिओपॅथिक डॉक्टर्स निर्माण व्हावेत, हे स्वप्न मुनी महाराजांनी पहिले होते. त्यावेळी संपूर्ण भारतातून लाखो भक्त मुनी महाराजांच्या दर्शनाकरिता गुरु गणेश नगर परिसरात येत असत. मुनी महाराज अंतर्ज्ञानी होते. त्यांना चांगल्या-वाईट व्यक्तींची चांगलीच ओळख होती. आपले स्वप्न साकार करणाऱ्या योग्य व्यक्तीच्या शोधात ते होते. कुणाही अयोग्य व्यक्तीच्या हातात हे कार्य सोपविण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती.

परंतु एवढ्या मोठ्या भक्त मंडळीतून कुणी आपले स्वप्न साकार करणारा, योग्य, अत्यंत नीतिमान, कर्तबगार, सर्वांशी प्रेमाने वागणारा, सर्वांना सांभाळून घेणारा, सर्वांना मदत व सहकार्य करणारा, इतरांना दिलेल्या शब्दाचे व वेळेचे शंभर टक्के पालन करणारा, अत्यंत संस्कार संपन्न तसेच, होमिओपॅथीच्या क्षेत्रात अत्यंत हुशार असणाऱ्या व्यक्तीच्या रुपात त्यांना फक्त डॉ.शांतीलाल देसरडाच आढळले, म्हणून त्यांनी डॉ.शांतीलाल देसरडांना आपल्या स्वप्नातील गुरु गणेशनगरची कल्पना सांगितली. त्यानंतर त्यांनी गुरु गणेशनगर ह्या ठिकाणी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल स्थापण्याची, डॉ.शांतीलाल देसरडांना प्रेरणा देऊन त्यांना त्याकरिता आशीर्वाद दिले होते.

गुरु मुनी मिश्रीलाल महाराजांची प्रेरणा आणि आदेशानुसार, डी.के.एम.एम. होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजची ९ ऑगस्ट १९८९ रोजी स्थापना केल्यानंतर डॉ.शांतीलाल देसरडांनी त्या कॉलेजचे संस्थापक, प्राचार्य म्हणून जवळपास सत्तावीस वर्ष हे कॉलेज गुणवत्तेच्या दृष्टीने नावा-रुपाला आणण्याकरिता डॉ.शांतीलाल देसरडांनी तसेच त्यांच्या पत्नी सौ.डॉ.कांचन देसरडा यांनी अविरतपणे आपले रक्त आटवून, अत्यंत कठोर परिश्रम केले होते.

ह्या कॉलेज मुळे अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनीना शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याची संधी मिळाली आहे, तर अनेकांना तिथे विविध पदावर नोकऱ्या मिळून त्यांचेही जीवन सुधारले आहे. केवळ डॉ.शांतीलालजी देसरडा यांच्यामुळेच अथवा त्यांनी स्थापन केलेल्या डी.के.एम.एम तसेच, त्यांच्या इतरही काही विविध संस्थांमुळेच अनेकांना रोजी-रोटी मिळून आपल्या परिवाराचे पालन-पोषण करणे शक्य झाले आहे. ह्याची आपण सर्वांनी कृतज्ञतेने सदैव आठवण ठेवलीच पाहिजे. त्यांना विसरणे म्हणजे आपण कृतघ्न होऊन, आपल्या पालनकर्त्याला अथवा आपल्या अन्नदात्याला विसरण्यासारखेच आहे. त्यानंतर २०१६मध्ये त्यांनी डी.के.एम.एमच्या प्राचार्य पदाचा राजीनामा दिला होता.

ह्याशिवाय, २००८मध्ये त्यांनी स्वतः, जालना जिल्ह्यातील शेलगाव येथे गुरु मिश्री होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाची स्थापना केली होती. ह्या संस्थेचे ते संस्थापक, अध्यक्ष होते. त्याशिवाय त्यांनी ह्याच गुरु मिश्री मेडिकल कॉलेजच्या परीसरातच पहिली ते दहावी पर्यंतची सीबीएसई पॅटर्नची, देसरडा पब्लिक स्कूल या नावाने एक शाळासुद्धा स्थापन केलेली आहे. ह्या शाळेची आणि गुरु मिश्री होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजची प्रशासन व्यवस्था त्यांचे सुपुत्र, डॉ.योगेश देसरडा हे पाहात आहेत. त्यांनतर नेवासा येथेही त्यांनी अटल बिहारी बाजपेयी होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची स्थापना करून दिलेली आहे. ह्या कॉलेजचे प्रशासन त्यांचे पुतणे मनपा औरंगाबादचे माजी उपमहापौर, प्रशांत देसरडा हे पाहत आहेत.

२०१६ नंतर त्यांनी आपल्या ह्या शेलगाव तसेच नेवासा येथील स्वतःच्या दोन संस्थांकरिता पूर्णवेळ कार्य करणे सुरु केले होते.

त्यांनी आपल्या आयुष्यात जिथे जिथे कार्य केले त्या त्यांच्या कार्यकाळात अगदी हजारो विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली होमिओपॅथीचे शिक्षण घेऊन डॉक्टर्स झाले आहेत. असे त्यांचे असंख्य विद्यार्थी आज पूर्ण भारत भर विखुरलेले आहेत.

साधारणपणे भारतातले कोणतेही शहर असले तरीही निश्चितपणे त्यांचे कुणी ना कुणीतरी विद्यार्थी त्या शहरामध्ये होमिओपॅथीचे रुग्णालय सुरु करून, रुग्णसेवा करीत असायचे. विशेष हे की, त्यांचे हे असंख्य विद्यार्थी काही ना काही तरी कार्यानिमित्त अथवा प्रयोजनार्थ त्यांच्या संपर्कात नेहमीच असायचे.

ह्या त्यांच्या विद्यार्थ्यांशिवाय इतर क्षेत्रातील अनेक मंडळीही मोठ्या संख्येने त्यांच्या संपर्कात होती.

असंख्य लोकांना त्यांनी आपल्या आयुष्यात कुठेतरी, केव्हातरी काहीतरी मदत केलेली असायची. त्यांच्या ह्या इतरांना मदत व सहकार्य करण्याच्या प्रवृत्तीमुळेच त्यांनी फार मोठा लोकांचा संग्रह, आपल्या प्रेमाने आपल्याशी कायमस्वरूपी जोडून ठेवलेला होता. आपल्या संपर्कातील व्यक्तीच्या सुखात अथवा दु:खात सहभागी होऊन जगणारे, अत्यंत नीतिमान, मोठ्या मनाचे तसेच बहु आयामी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.

मी ह्या अगोदर सांगितल्याप्रमाणे, दि. २६ नोव्हेंबर २०१८ रोजी डॉ.शांतीलाल देसरडा मधुमेहाच्या उपचारार्थ पुण्याच्या एका मोठ्या रुग्णालयात भारती झालेले असतांना दि. १ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता त्यांची पत्नी डॉ.कांचन तसेच त्यांचा मुलगा डॉ.योगेश यांच्या उपस्थितीत अगदी बोलता बोलता आनंददायी अवस्थेतच अनपेक्षितपणे, त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि अगदी एकाच मिनिटात त्यांचे आकस्मिकपणे दु:खद निधन झाले.

त्यांच्या शरीराला इतर कोणताही त्रास किंवा कोणत्याही वेदना न होता, त्यांचे अगदी सहजा-सहजी निधन झाले होते. कोणत्याही वेदना अथवा त्रास न होता अगदी सहजपणे डॉ.शांतीलाल देसरडांचे जे निधन झाले, तसे निधन हे फक्त अतिशय पुण्यवान आणि अत्यंत नीतिमान असलेल्या व्यक्तीचेच होत असते, असे म्हणतात.

अशा पुण्यवान व्यक्तीच्या सोबत त्यांच्या चाहत्यांच्या असंख्य शुभेच्छा कायमस्वरूपी असतात. त्यामुळे मृत्यूसुद्धा त्यांना वेदना देऊच शकत नाही. त्यामुळे अशा व्यक्तीचा मृत्यू वेदना दायक न होता, अत्यंत आनंददायक असाच होतो.

आपण आपल्या आयुष्यात जे काही चांगले अथवा वाईट कार्य करतो, त्यानुसारच आपल्याला आनंददायक अथवा दु:खदायक मृत्यू प्राप्त होत असतो, असे म्हणतात.

ज्या व्यक्तीमध्ये नीतीमत्ता नाही, इतरांना लुबाडण्याचीच प्रवृत्ती आहे, अथवा इतरांकरिता एक रुपयाही खर्च करण्याची दानत नाही, अथवा इतरांच्या कामाचे अथवा मेहनतीचे पैसे त्यांना न देता लबाडीने त्यांचा पैसाही बुडविण्याचीच प्रवृत्ती आहे, तसेच त्यांनी दुसऱ्यांना दिलेला शब्द किंवा आश्वासन त्यासोबतच दुसऱ्याला दिलेली वेळ न पाळण्याची प्रवृत्ती आहे, अशा अनीतिमान, लबाड, भामट्या आणि माजोरी स्वभावाच्या व्यक्तीला अथवा त्याच्या परिवारातील प्रियजनांनाच अत्यंत दु:खदायक स्थितीत मृत्यू येत असतो.

एवढेच नाही तर असे दुरात्मे किंवा त्यांचे प्रियजनही बराच काळ पर्यंत मृत्यू शय्येवर मृत्यूची प्रतीक्षा करीत असाह्यपणे पडून असतात.

कारण अशा अनीतिमान परिवाराच्या व्यक्तीच्या मागे त्याचे कोणतेही पुण्यकर्म शिल्लक नसल्यामुळेच, त्यांना असा वेदनादायक अथवा दु:खदायक मृत्यू येत असतो.

मृत्यूसुद्धा अशा दुरात्म्यांना लवकर उचलून नेऊ इच्छित नाही. अशा व्यक्तीच्या पिढीतील त्यांची मुलेसुद्धा अत्यंत अनीतिमान, विश्वासघातकी, लबाड, भामट्या स्वभावाची आणि इतरांना दिलेला शब्द तसेच दिलेली वेळ न पाळणारी असतात. आपला एकही रुपया कुणाला न देणारी तसेच इतरांच्या मेहनतीवर लबाडीने फुकटचा डल्ला मारणारीच असतात. समाजात अशा स्वभावाच्या बऱ्याचशा व्यक्ती पाहायला मिळतात. अशी अनेक उदाहरणे मी स्वतः पाहिलेली आहेत.

ह्या संदर्भात औरंगजेबचा इतिहास वाचा. त्यांचाही स्वभाव जवळपास वरीलप्रमाणेच लबाड, विश्वासघातकी, स्वार्थी आणि कृतघ्न होता. त्यानेसुद्धा आपल्या जन्मदात्या बापाला कैदेत टाकून, राज्य मिळविण्यासाठी आपल्या सर्व भावांची त्याने हत्त्या केली होती. त्यातील आपल्या मोठ्या भावाच्या पत्नीला त्याने आपल्या ताब्यात ठेवले होते. आयुष्यभर मराठ्यांचे राज्य आणि त्यांची संपत्ती जिंकण्याकरिता औरंगजेब सतत मराठ्यांशी युध्द करीत राहिला. त्याच्या शेवटच्या काळात औरंगजेबसुद्धा बराच काळ पर्यंत मृत्यूशय्येवर मृत्यूची प्रतीक्षा करीत असाहाय्यपणे पडलेला होता. अनीतिमान असलेल्या औरंगजेबाचाही शेवटी अत्यंत दु:खदायी स्थितीत मृत्यू झाला होता.

मृत्यू प्रत्येकाला येणारच असतो. मृत्युपासून कुणाचीही सुटका होत नाही. तसेच आपला मृत्यू केव्हा होईल, हे सुद्धा कुणालाच कळत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्यालाही स्व.डॉ.शांतीलालजी देसरडा यांच्यासारखाच आनंददायक, अथवा काहीही त्रास न होता किंवा मृत्यूशय्येवर मृत्यूची बराच काळ प्रतीक्षा न करता मृत्यू यावा, असे वाटत असेल तर आपणही स्व.डॉ.शांतीलालजी देसरडा यांच्या प्रमाणेच उच्च दर्जाची नितीमत्ता बाळगून वागावे. इतरांना दिलेला शब्द, आश्वासन किंवा वेळ शंभर टक्के पाळण्याचा प्रयत्न करावा. इतरांना फुकटात लुबाडण्याची प्रवृत्ती सोडून द्यावी.

वेळ प्रसंगी कुणाला मदत, मार्गदर्शन अथवा सहकार्य करण्याची संधी आल्यास ती संधी कधीही व्यर्थ दवडू नये.

आपला अहंकार, गर्व, स्वार्थ आणि आपल्याला सत्ता, संपत्ती, पद इत्यादीमुळे आलेला प्रचंड माज सोडून आपण अनेकांना मदत किंवा सहकार्य करून, त्या अनेक लोकांच्या शुभेच्छा व प्रेम मिळविण्याचा प्रयत्न करावा. जग हे नेहमीच बदलत असते. आज आपण जे काही आहोत, तसेच उद्या कदाचित आपण राहाणारही नाही.

डॉ.शांतीलालजी देसरडांनी अगदी हजारो लोकांना मदत व सहकार्य केलेले असायचे. त्यांचा स्वभावाच तसा होता. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अथवा त्यांच्या निधनामुळे अश्रू गाळून दु:खाने रडणाऱ्या त्यांच्या परिवाराच्या बाहेरील, त्यांच्या हितचिंतकांची अथवा चाहत्यांची संख्या फार मोठी होती. ह्याकरीताही फार मोठे भाग्य लागते. अनीतिमान, लबाड, स्वार्थी तसेच कृतघ्न लोकांचे, असे भाग्य कधीच नसते.

डॉ.शांतीलाल देसरडांवर असंख्य लोक एवढे प्रेम का करित होते? ह्याचा जेव्हा मी विचार केला तेव्हा माझ्या असे लक्षात आले की, त्यांच्या संपर्कात असलेल्या अथवा नसलेल्या कुणाही गोर-गरीब व्यक्तीला जर वेळ प्रसंगी काही आर्थिक अडचण आली आणि त्यांनी त्याबद्दल डॉ.शांतीलाल देसरडा यांना जर तशी कल्पना देऊन त्यांच्याकडे मदतीची विनंती केली, तर डॉ.देसरडा हे मागचा-पुढचा काहीही विचार न करता लगेच त्या व्यक्तिला हजार, दोन हजार किंवा पाच हजार रुपये सुद्धा आपल्या खिशातून काढून सहजपणे लगेच देत असत.

मग ह्या पैशाची ते कधीच त्या व्यक्तीकडे चुकूनही परत मागणी करीत नसत. हे पैसे त्यांनी त्या व्यक्तीला एक प्रकारे देणगी म्हणूनच दिलेले असत. त्यांनी असे केलेले मी अनेकवेळा पहिले आहे. डॉ.शांतीलाल देसरडा म्हणजे अडी-अडचणीत असलेल्या अनेक गोर-गरीब लोकांचे विना कार्डचे एटीएम यंत्रच होते. त्यांच्याकडील अनेक गोर-गरीब कर्मचारी वेळप्रसंगी अडचणीच्या वेळी ह्या एटीएम यंत्राचा वापर करतांना मी अनेकवेळा पाहिलेले आहे. मी सुद्धा अडी-अडचणीच्या वेळी एखाद्या वेळी, क्वचीत प्रसंगी ह्या विना कार्डच्या एटीएमचा वापर करीत असे.

ज्यांची तीनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल आहे अशा एका फार मोठ्या उद्योगपती असलेल्या व्यक्तीनेसुद्धा एकदा मला पैसे देण्याचे खोटे आश्वासन देऊन त्यांच्या वडीलांबद्दल विशेषांक लिहायला सांगितला होता, हे काम अत्यंत मेहनतीचे असते त्यामुळे दरपत्रक दिल्या नंतर आम्ही संबंधित व्यक्तीचे मान्यतापत्र आणि अडव्हांस घेतल्या नंतरच ह्या कामाला सुरवात करीत असतो. त्याप्रमाणे ह्या उद्योगपतींना दरपत्रक दिल्यानंतर मान्यतापत्र आणि अडव्हांस मागितल्यानंतर त्यांनी, “रणवीर साहेब तुम्हाला मान्यतापत्रही देतो आणि अडव्हांसही देतो, तुम्ही काम सुरु ठेवा”, असे म्हणून मला काम सुरु करायला सांगितले. मोठ्या व्यक्तीचा शब्द असल्यामुळे मी त्यांचे काम सुरु केले. पुढे चार-पाच महिन्यात पाच-सहावेळा मी जेव्हा-जेव्हा त्यांना मान्यतापत्र आणि अडव्हांसची आठवण दिली तेव्हा-तेव्हा त्यांनी वरीलप्रमाणेच उत्तर देऊन काहीतरी कारणे सांगून मान्यतापत्र व अडव्हांस द्यायला टाळाटाळ केली. त्यानंतर त्यांनी माझ्या चार-पाच महिन्याच्या विशेषांक लिहिण्याच्या मेहनतीच्या कामाचे काहीही पैसे न देता, त्या संदर्भातील तीन हस्तलिखित विशेषांकाच्या मजकुराच्या फाईल वाचायला घेतल्या, नंतर त्यांनी त्या फाईलचे झेरॉक्स काढून घेऊन, त्या फाईल त्यांनी मला परत दिल्या. त्या मजकुराचा संदर्भ वापरून, तो मजकूर अल्टर करून, इतर अनेकांच्या नवीन मुलाखती सोबतच काही नवीन मजकुराची तसेच काही नवीन छायाचित्रांची भर टाकून त्यांनी पुण्याच्या एका दुसऱ्या पार्टिकडून ते पुस्तक तयार करून घेतले. मी केलेल्या चार-पाच महिन्याच्या कामाचे त्यांनी मला काहीही पैसे दिले नाहीत.

ते पैसे त्यांनी लबाडी करून मुद्दामच बुडविले होते, मला ह्या कामाचा अगदी एक रुपयाही न देता त्यांनी मी काढलेले त्यांच्या वडिलांचे अनेक फोटोही त्यांनी त्यांच्या पुस्तकात फुकटातच वापरले होते. त्या पुस्तकाच्या कव्हरवर सुद्धा मीच काढलेला माझ्या हार्डडिस्कमधील त्यांचा वडिलांचा एक सुंदर आणि अजरामर असा फोटो आहे. एवढेच नाही तर माझी फोटोंची हार्डडिस्कसुद्धा त्यांनी लबाडी करून ढापली होती. अनेकवेळा मागणी केल्यानंतर केवळ त्या हार्डडिस्कची फक्त मूळ किंमत पाच हजार रुपये त्यांनी, अनेकवेळा तगादा लावल्यानंतर, एक वर्षानंतर मला दिली होती. एवढ्या मोठ्या व्यक्तीची अशी वर्तणूक पाहून मला त्यावेळी फारच आश्चर्य वाटले होते. एवढ्या वर्षात पहिल्यांदाच मला बुडविणारा कुणीतरी व्यक्ती अशा पद्धतीने भेटला होता. एखाद्या व्यक्तीने जे काही चांगले काम केले आहे त्या व्यक्तीला एक रुपयाही न देता त्या व्यक्तीने केलेले काम फुकट मिळविणे, ही अत्यंत अनीतिमान गोष्ट आहे. ज्या-ज्या लोकांकडे मी ह्या गोष्टीचा उल्लेख करतो, त्या त्या लोकांना सुद्धा मला बुडविणाऱ्या ह्या मोठ्या व्यक्तीबद्दल फारच आश्चर्य वाटते.

त्या तुलनेत अडी-अडचणीच्यावेळी क्वचीत प्रसंगी मला तसेच इतरही अनेकांना सहजपणे पैसे देणारे, डॉ.शांतीलालजी देसरडा हे फारच मोठ्या मनाचे, नीतीमत्ता असलेले, त्यांच्या मातोश्री स्व.बदामबाई मोतीलालजी देसरडा यांच्या उच्च दर्जाच्या संस्कारातून घडलेले अत्यंत संस्कार संपन्न असे व्यक्ती होते.

गोष्ट साधारण पाच-सहा वर्षांपूर्वीची आहे. एकदा त्यांनी वर्तमान पत्रामध्ये वाचले की, एका खेड्यातील कुणा एका गरीब व्यक्तीला इलेक्ट्रिकचा शॉक लागल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत घाटी रूग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते. नंतर त्या व्यक्तीचा उपचारा दरम्यानच मृत्यू झाला होता. डॉ.देसरडांनी आपली गाडी काढली आणि ते सरळ घाटीमध्ये गेले. त्या गरीब व्यक्तीच्या परिवाराचा त्यांनी शोध घेतला आणि त्या व्यक्तीच्या पत्नीला त्यांनी लगेच पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करून ते डी.के.एम.एम.मध्ये परत आले होते. त्या दिवशी जेव्हा त्यांची व माझी डी.के.एम.एम.मध्ये भेट झाली तेव्हा ते नुकतेच त्या अनोळखी व्यक्तीच्या परिवाराला ही आर्थिक मदत

करून परत आले होते. आपण केलेल्या मदतीचा ते कुणाही कडे चुकूनही कधीच उल्लेखही करीत नसत. परंतु त्या दिवशी मी त्यांची बराच वेळ डी.के.एम.एममध्ये प्रतीक्षा करीत थांबलो होतो, त्यामुळे त्यांनी ही गोष्ट मला सहजच बोलता-बोलता सांगितली होती.

त्यांच्या ह्या चांगल्या गुणांमुळे अथवा अनेकांना मदत व सहकार्य करण्याच्या प्रवृत्तीमुळे त्यांचा लोकसंग्रह फार मोठा वाढलेला होता. त्यांना सर्वच लोकांचे प्रेम मिळत असे, तरीही ज्या प्रमाणे स्वच्छ् निवडलेल्या शरबती गव्हामध्येसुद्धा चुकून चार-पाच खडे राहूनच जातात, तसेच त्यांच्या जीवनातही चार-पाच लोक त्यांचे अशुभ चिंतक अथवा अहितचिंतक होतेच. ज्या प्रमाणे एखाद्या सुंदर गुलाबाच्या फुलालाही काटे असतात तसेच एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मागेही असे चार-पाच अहितचिंतक लोक अथवा शत्रू असणेही साहजिकच आहे.

हे अगदी पूर्वीपासूनच चालत आले आहे. आपण जर इतिहासाचे अवलोकन केले, तर अगदी पूर्वीपासूनच अशा एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मागे त्या व्यक्तीचे काही अहितचिंतक लोकही त्यावेळी समाजात असायचेच.

आपण इतिहास वाचा, प्रभू येशू ला वध स्तंभावर चढविण्यासही त्यांचे प्रिय शिष्य अथवा त्यांच्या जवळचे लोकच कारणीभूत ठरले होते.

संभाजी महाराजांचा घात करण्यासही त्यांच्या जवळच्याच काही स्वार्थी, लबाड आणि कृतघ्न लोकांनीच औरंगजेबास मदत केली होती. त्या बदल्यात त्यांना औरंगजेबाकडून मोठी जहागिरी मिळण्याची अपेक्षा होती.

शिवाजी महाराजांनाही त्यांच्या अत्यंत जवळच्याच स्वार्थी, लबाड आणि कृतघ्न लोकांनीच, त्यांच्या राज्यावर ताबा मिळविण्यासाठी दगा दिला होता.

हे कलीयुग आहे. ह्या कलीयुगात अगदी पूर्वीपासूनच स्वार्थी, लबाड आणि कृतघ्न लोकांची अजिबात कमतरता नसते. समाजातील असे अनेक लोक आपल्या स्वार्थासाठी आपल्या उपकारकर्त्याचे उपकार विसरून त्यांच्या पाठीत विश्वासघाताचा खंजीर खुपसून, त्यांच्या ताटात माती कालविण्यासही कधीच मागे-पुढे पाहात नसतात.

डॉ.शांतीलालजी देसरडांसारख्या अजातशत्रू, म्हणजेच ज्यांना कुणीच शत्रू नाही, अशा परिसासारख्या व्यक्तीमत्वाच्या मोठ्या मनाच्या व्यक्तीलाही आपल्या स्वार्थासाठी त्रास देणारे काही स्वार्थी, लबाड, तसेच कृतघ्न लोकही समाजात असतातच. अशाच काही लोकांनी वेळोवेळी त्यांना अनेक प्रकारे त्रास दिला होता.

आपल्या संपर्कात आलेल्या, अशा स्वार्थी, लबाड  आणि कृतघ्न लोकांनासुद्धा डॉ.शांतीलालजी देसरडांनी कधीच आपले शत्रू समजले नाही. त्यांनी सदैव सर्वांनाच शक्य ती मदत व सहकार्य केलेले आहे.

आपले हितचिंतक व मित्र कोण आहेत? तसेच आपले अहितचिंतक आणि शत्रू कोण आहेत? ह्याची त्यांना पक्की जाणीव होती. तरीही कुणाबद्दलही त्यांच्या मनामध्ये द्वेषाची अथवा शत्रुत्वाची भावना कधीच नव्हती. एवढेच नाही तर ते कधीही कुणालाही आपला शत्रू समजत नसत. आपल्याशी वाईट वागणाऱ्यांचाही त्यांनी कधीच तिरस्कार अथवा द्वेष केला नाही. परंतु त्यांच्याशी कृतघ्न झालेल्या लोकांनी मात्र सतत त्यांचा कट्टर द्वेष व तिरस्कार केलेला होता.

आपले मित्र असो, वा शत्रू असो, ह्या सर्वांच्या बद्दल सदैव शुभेच्छाच त्यांच्या मनामध्ये असायची.

“गुरु महाराज त्या सर्वांचेच भले करो!”, असेच ते आपल्या अहितचिंतकांबद्दलही वेळप्रसंगी माझ्यासमोर बोलत असत. तेव्हा त्यांच्या ह्या क्षमाशील, विनयशील तसेच मोठ्या मनाच्या प्रवृत्तीबद्दल मला अत्यंत आश्चर्य वाटत असे.

स्व.डॉ.शांतीलालजी देसरडा यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्याप्रमाणेच आपण सर्वांनीही आपल्यातील कट्टर द्वेष भावनेचा, कटाक्षाने त्याग करून, आपला गर्व, अहंकार आणि आपल्याला वेळप्रसंगी आलेला प्रचंड माज सोडून, अनेकांशी मैत्री ठेऊन, अनेकांना शक्य ती मदत व सहकार्य करून, अनेक लोकांच्या शुभेच्छा व प्रेम मिळविण्याचा आपण सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्यातील केवळ दहा टक्के गुणही आपण आपल्यात आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, तर आपण फारच सुदैवी ठरू.

त्यांनतरच कदाचित आपला मृत्यूही स्व.डॉ.शांतीलालजी देसरडा यांच्याप्रमाणेच थोडाफार आनंददायक होईल, याची खातरी बाळगा….!

ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी केले आहे. अशा स्व.डॉ.शांतीलाल देसरडांच्या संपर्कातील असंख्य लोकांनी डॉ.शांतीलाल देसरडांच्या उपकारांची जाणीव न ठेवल्यास, जगात आपल्यासारखे दुसरे कृतघ्न व्यक्ती कधीच शोधूनही सापडणार नाहीत, असे समजायला काहीच हरकत नाही.

स्व.डॉ.शांतीलालजी देसरडांसारखे होमिओपॅथीचे जेष्ठ शिक्षण तज्ज्ञ, विद्यार्थ्यांचे लोकप्रिय प्राचार्य, अनेकांचा आधारवड असलेले, अनेकांना नोकऱ्या मिळवून देण्यास कारणीभूत ठरून, त्यांच्या रोजी-रोटीची सोय करून देणारे, अनेकांचे अन्नदाते,  अजात शत्रू, दानवीर, दिलदार अथवा अत्यंत मोठ्या मनाचे, परीस स्पर्शी, ईश्वरतुल्य व्यक्तिमत्व पुन्हा कधीच होणे नाही.

त्यांच्या पावन स्मृतीला माझे कोटी-कोटी वेळा विनम्र अभिवादन…!

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!