आता असा असतो रेल्वेचा प्रवास

Spread the love

चाळीस वर्षाखाली तीन प्रकारचे रेल्वे रूळ असायचे. ब्रॉड गेज, मीटर गेज आणि नॅरो गेज असे त्या रेल्वे रुळांना म्हणायचे. ब्रॉड गेज रूळ म्हणजे सध्या जे रेल्वे रूळ आपण पाहातो ते रूळ, ह्या दोन रुळांमध्ये सरासरी पाच फुट अंतर असते. त्यांनतर मीटर गेज चे रूळ म्हणजे दोन रुळांमधील रुंदीचे अंतर फक्त एक मीटर म्हणजेच सरासरी तीन फुट अंतर असायचे. त्याशिवाय नॅरो गेज चे रूळ म्हणजे त्या दोन रुळांमध्ये सरासरी दोन फुटच अंतर असायचे. ह्या रुळांच्या साईजनुसार मग त्यांच्या डब्यांची लांबी-रुंदी सुद्धा तशीच कमी जास्त असायची. ब्रॉड गेज रुळांचे डबे सध्या आहेत टा प्रमाणे मोठ्या आकाराचेच असायचे, मीटर गेजचे डबे रुंदीला आणि लांबीला ब्रॉड गेजच्या दाब्यांपेक्षा थोडे कमी असायचे आणि नॅरो गेज चे डबे मग मीटर गेजच्या डब्यापेक्षाही लांबी-रुंदीला थोडे कमीच असायचे. त्याचप्रमाणे ह्या गाड्यांचा वेग सुद्धा त्यांच्या रुळांप्रमाणेच कमी-जास्त असायचा.

narrow way railway journey

ब्रॉड गेजची गाडी जास्त वेगात धावायची, मीटर गेजची गाडी त्यापेक्षा कमी वेगात धावायची तर नॅरो गेज ची गाडी फारच कमी वेगात धावायची. नॅरो गेज च्या गाडीचा वेग सायकलच्या वेगापेक्षा थोडाच अधिक असायचा. नॅरो गेज च्या गाडीतील पहिल्या डब्यात बसलेला एखादा उचापत खोर प्रवासी धावत्या गाडीतून खाली उतरायचा, रेल्वे रूळाशेजारी असलेल्या शेतातील भुईमुगाची झाडे अथवा ज्वारीची हिरवी कणसे किंवा झाडावरची खाली लटकलेली आंबे घाईघाईने तोडायचा आणि गाडीकडे धावत यायचा. तोपर्यंत शेवटचे दोन-तीन डबे त्यःच्या समोर यायचे मग तो लगेच त्या शेवटच्या डब्यातील कोणत्यातरी एका डब्यात धावत धावत जाऊन चढायचा, ही नॅरो गेज ची रेल्वे लाईन काही काही ठिकाणीच होती. इतरत्र मात्र ब्रॉड गेज आणि मित्र गेजची लाईनच असायची. आता गेल्या वीस-पंचवीस वर्षापूर्वी मीटर गेज, नॅरो गेज च्या ह्या सर्व लाईन काढून टाकण्यात आलेल्या आहेत आणि सगळीकडे आता फक्त सध्या असलेल्या ब्रॉड गेजच्या रेल्वे लाईनच टाकण्यात आलेल्या आहेत.

representation of old railway

तीस वर्षापूर्वी सगळीकडे सगळ्याच गाड्यांना कोळशाची इंजीनच होती, नंतरच्या काळात डीझेल इंजिन आणि त्यानंतर काही ठिकाणी विद्युत तारेवर चालणारी इंजीनसुद्धा आहेत. पूर्वीची कोळशाची इंजिन्स आता कुठेही दिसत नाहीत, ती सर्व इंजिन्स इतिहासात जमा झालेली आहेत. नवीन पिढीला ते पूर्वीचे इंजिन पाहाता यावे म्हणून सध्या औरंगाबादच्या रेल्वे स्टेशनच्या प्रांगणात कोळशाचे एक इंजिन प्रेक्षकांना दाखविण्यासाठी म्हणून ठेवण्यात आलेले आहे.

प्रत्येकाला कधी ना कधीतरी, अथवा वेळोवेळी आपल्या काहीतरी कामानिमित्त, नातलगांच्या भेटीगाठीसाठी अथवा कुणाच्यातरी लग्नसमारंभ किंवा इतर काहीतरी कार्यक्रमानिमित्त आपली इच्छा असो वा नसो, प्रवास हा करावाच लागतो. ( कुणाच्या घरी पाहुणे म्हणून जातांना, लक्षात ठेवा ह्या गोष्टी )

आम्ही तिसरी-चौथीमध्ये असतांना आमच्या मराठी बालभारतीच्या पुस्तकात त्यावेळी एक कवीता असायची, “झुक झुक झुक झुक आगिनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया!” ह्या कवितेवरून असे वाटते की त्यावेळी आगिनगाडी, म्हणजेच आगगाडीचा प्रवास फारच आनंद दायक असायचा, आणि खरोखरच आमच्या बालपणी तो प्रवास आनंददायकच होता. त्यावेळी कोळशाच्या वाफेवर चालणारे आगगाडीचे इंजिन असायचे, त्या इंजिनच्या भट्टीमध्ये इंजिनमधील कर्मचारी लोखंडी शेवाळ्याने सतत कोळसा टाकीत राहायचे. पुन्हा इंजिनच्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी असायचे, काही लहान तर काही अगदीच मोठे जवळपास वीस चाके असलेले ते इंजिन त्यावेळी फारच अवजड आणि भीतीदायक दिसायचे. त्याच्या वरच्या भागात धूर जाण्यासाठी एक मोठे पाईपसारखे कमी उंचीचे धुराडेसुद्धा असायचे. इंजिन जेव्हा रुळावरून वेगात चालायचे तेव्हा ‘झुक झुक झुक झुक’ असा तालबद्ध आवाज करायचे. त्या इंजिनच्या शिट्टीचा आवाजसुद्धा कड्ड्ड्ड्क् असा फारच मोठा असायचा. गाडी एखाद्या नदीच्या पुलावरून जात असेल तर वेगळाच खडम् खडम् खडम् खडम् असा आवाज यायचा, एखाद्या पर्वताच्या बोगद्यातून गाडी जात असेल तर त्याचाही वेगळाच आवाज यायचा.

amazing view from the window of train

आमचे आई-वडील त्यावेळी जेव्हा आम्हाला एखाद्या प्रवासाला रेल्वेने घेऊन जात असत, तेव्हा आमच्या बालपणी आम्ही तिघे भाऊ आणि आमची एक बहिण या सर्वांना म्हणजे आम्हाला प्रत्येकालाच रेल्वेच्या डब्यातील खिडकीतील जागाच हवी असायची. त्या खिडकीतून दिसणारे बाहेरचे दृश्य पाहून त्यावेळी आम्हाला फारच मजा वाटायची. कुठेही टेकडीवर एखादे मंदिर दिसले की आम्ही खिडकीतून त्या मंदिरातील देवाला हात जोडायचो, आता आम्ही कोणत्याच मंदिरात जाऊन हात जोडत नसतो. गाडीच्या खिडकीतून दिसणारी हिरवीगार बहरलेली शेती, आंब्याच्या झाडांना लगडलेली आंबे, शेतीमध्ये काम करीत असलेले शेतकरी व त्यांच्या स्त्रिया तर कुठे धान्याच्या खळ्यावर बैलांच्या सहाय्याने धान्य तुडवून काढतांना तसेच त्यानंतर उंच तिपाईवर उभे राहून सुपलीच्या साहाय्याने त्यातील दाणे आणि धान्याचा भुसा अथवा कोंडा उपनून वेगळा वेगळा करतांना शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय दिसायचे. सगळीकडेच त्यावेळी शेतातील हिरवीगार पिके आणि एक आनंददायक वातावरण आगगाडीच्या डब्यातील खिडकीतून दिसून येत असे. लोकसंख्याही त्यावेळी थोडी कमीच असायची आणि त्या प्रमाणात गाडीला डबेही थोडे जास्तच असायचे, त्यामुळे रेल्वेच्या डब्यात आजच्यासारखी प्रचंड गर्दी, पाय ठेवायला किंवा बसायलाही जागाच नाही, असे कधीच नसायचे.

आता चार-पाच दिवसांपूर्वीच वाशीमला आमच्या भाच्याच्या लग्नाला रेल्वेने जाण्याचा योग आला. आम्ही दोघे आणि आमच्या दोन मुली असे आम्ही औरंगाबादच्या रेल्वे स्टेशनवर गेलो. एक्स्प्रेस गाड्यांचा पूर्वीचा अनुभव आमचा तेवढा चांगला नाही, अगोदरच आपण तिकीटाची अडव्हांस बुकिंग केली असेल तरच आपल्याला एक्स्प्रेस गाडीत जागा मिळते, अन्यथा जनरल डबे फक्त दोनच असतात. त्यात एवढी गर्दी असे की त्यामध्ये आत शिरणेही फारच कठीण असते. म्हणून यावेळेस आम्ही पॅसेंजर गाडीनेच जाणे पसंत केले. पॅसेंजर गाडीत अडव्हांस बुकिंग वगैरे काहीच नसते. औरंगाबादच्या रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर तिकिटांच्या लाईनमध्ये जवळपास पन्नास लोक उभे होते. बुकिंग क्लर्क सर्वांना ओळीने तिकीट देतच होते, तीन फुल एक हाफ असे हिंगोलीचे तिकीट मागितल्यानंतर त्याने एकशे नव्वद रुपये सांगितले. त्याला पाचशे रुपयांची नोट देत असतांना त्याने चिल्लर एकशे नव्वद रुपये द्या, असे म्हणून पाचशे रुपयांची नोट घेण्यास नकार दिला. त्याच्याकडे चिल्लर रुपये असूनसुद्धा प्रवाशांना त्रास देण्याची ही त्यांची सवयच असते. मग लाईनमधून बाहेर निघून गरज नसतांना वीस रुपयांची पाणी बॉटल घेऊन चिल्लर करावी लागली. नंतर पुन्हा एकदा तिकीटाच्या लाईनमध्ये शेवटी उभे राहून तिकिटे घ्यावी लागली. गाडी आल्यानंतर धावपळ करीत कसे तरी अगदी लोटालाटी करून प्रचंड गर्दीतून कशी तरी वाट करून एकदाचे गाडीच्या डब्यात शिरल्यानंतर कुठेतरी कसेतरी कितीतरी वेळ अगदी अडचणीत उभे राहून प्रवास करावा लागला. मग आठ-दहा स्टेशननंतर कुणी तरी प्रवासी उतरले तर त्यांच्या जागेवर बसायला जागा मिळाली, बसायचे म्हणजे थोडेसे टेकायचे. कारण रेल्वे डब्यातील चार जणांकरिता असलेल्या बाकड्यावर सहा ते सात जण अगदी दाटीवाटीने कसेतरी बसलेले असतात. त्या बाकड्यांच्या वर एक लोखंडी रॅक असतो. प्रवाशांचे सामान ठेवण्याकरिता असलेल्या त्या रॅकवर सामानासह निदान दोन-तीन प्रवासी तरी दाटीवाटीने मांडी घालून कसेतरी बसलेले असतात. आता ह्या रेल्वेमध्ये खिडकीतील जागा मिळणे तर दूरच, साधी बसायला सुद्धा व्यावस्थित जागा मिळणे कठीण झालेले आहे. आमची छोटी मुलगी म्हणाली होती की, “मला खिडकीजवळ बसायचे आहे”, परंतु तसे आता बसताच येत नाही.

now a days there is no good view from the train window

रेल्वेचा प्रवास करणे हा आता पूर्वीसारखा आरामदायक, आनंददायक आणि मजेशीर राहिलेला नाही. पूर्वी खिडकीतून बाहेर पाहिल्यावर हिरवीगार शेती आणि पिके दिसायची आता काळीशार शेती, कोरडी ठक जमीन, ओसाड माळरान, उन्हाने रापलेली निष्पर्ण झाडेच दिसतात. शेतीमध्ये पूर्वीसारखे फारसे कुणीही काम करतांना दिसत नाहीत, सगळीकडे दुष्काळासारखी भयानक परिस्थिती खिडकीतून दिसत असते.

डब्याच्या खिडकीतून बाहेर पाहिल्यानंतर आता पूर्वीसारखा आनंद होत नाही, कारण आनंद होण्यासारखे कोणतेही दृश्य आता खिडकीतून बाहेर दिसत नाही. अशाप्रकारे दाटीवाटीने प्रवास करीत असतांनाच पूर्णा स्टेशन येते. हिंगोलीला जाण्याकरिता पूर्णा स्टेशनवर गाडी बदलावी लागते, म्हणून आम्ही गाडीतून उतरलो.

प्लॉटफार्मवरील खांबावर मोबाईल रिचार्जिंग करण्याकरिता इलेक्ट्रिक थ्री पिन सॉकेट बसविलेले असतात. आमच्या मुलीने त्यामध्ये चार्जर लावून मोबाईल चार्जिंग करिता लावला. आम्ही तिथेच दोन फुटांवर बसलो, आमची थोडी नजर हटली असेल तेवढ्यात कुणीतरी तो मोबाईल काढून घेऊन पळ काढला. अशा रीतीने आमच्या मुलीचा मोबाईल चोरीला गेला. त्या ठिकाणाहून चार्जरसुद्धा चोरीला जाईल म्हणून आम्ही लगेच चार्जर काढून ठेवले.

रेल्वेमध्ये सध्या हिजड्यांचा फारच त्रास असतो. चार-पाच जण एखाद्या डब्यात शिरतात, टाळ्या वाजवतात, त्यांच्या बोटांमध्ये दहा-दहा रुपयांच्या अनेक नोटा एका विशिष्ट पद्धतीने धरलेल्या असतात. डब्यातील प्रत्येक प्रवाशाकडून ते जबरीने दहा रुपये वसूल करतात किंवा घेतात, न देणाऱ्या प्रवाशाला अत्यंत घाणेरडी शेरेबाजी करून विचित्र हावभाव करून अपमानित करतात, त्यामुळे त्या भीतीने प्रत्येक प्रवासी अगोदरच दहाची नोट बाहेर काढून ठेवतो आणि त्यांना देतो. त्यांच्याकडील नोटा पाहून असे वाटते की, एक एक हिजडा दररोज कमीत कमी दोन हजार रुपये तरी गोळा करीत असावा. हे लोक बहुदा टीसीलाही पैसे देतात, त्यामुळे टीसीसुद्धा त्यांना बिनधास्तपणे प्रवाशांची लुटालुट करायला त्यांना परवनागी देतो.

एकदाचे हिंगोली स्टेशन आले आणि आम्ही खाली उतरलो, तिथून दुसऱ्या दिवशी बसने वाशीमला गेलो, भाच्याचे तिथे लग्न लागले. लग्न समारंभ आटोपून आम्ही वाशिमच्या रेल्वे स्टेशनवर गेलो. तिथे तीस-चाळीस लोकांची तिकीटांची रंग होती. त्या रांगेत शिरून पूर्णा करिता चार तिकिटांची मागणी केली. त्याच्यापुढे पाचशे रुपयांची नोट सरकविली, तिकीट क्लर्क म्हणाला, “सुट्टे एकशे वीस रुपये घेऊन या”, असे म्हणून तो पुढच्या प्रवाशासोबत बोलू लागला. मला सुटे पैसे आणण्याकरिता पुन्हा एकदा तिकिटांच्या लाईनमधून बाहेर निघावे लागले, पुन्हा एकदा गरज नसतांना सुटे मिळविण्याकरिता वीस रुपयांची पाणी बॉटल खरेदी करावी लागली. सांगायचे तात्पर्य आता कुठलाही प्रवास पूर्वीसारखा आनंददायक राहिलेला नाही.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!