प्रा. विष्णू गाडेकर भाग ६ – कितीही अपयश आले तरी, मागे न हटणारे प्रा. विष्णू गाडेकर

Spread the love

प्रा. विष्णू गाडेकर यांनी काहीही साधक बाधक विचार न करता अति उत्साहाच्या व अति आत्मविश्वासाच्या भरात हातात घेतलेली कोणतीही कामे सहसा उलटीच होतात. त्यांनी हातात घेतलेल्या एखाद्या कामात यश आले आहे, असें सहसा मला फारसे कधी दिसूनच आले नाही. त्यांनी हाती घेतलेले कोणतेही काम असो, तिथे त्यांचे अपयश हे अगोदर पासून ठरलेलेच असायचे. लोकांना दिवसेंदिवस यश मिळत असते तर यांना दिवसेंदिवस अपयशच मिळत असते. आता ही पुढचीच एक घटना पाहा ना. मी त्यांना एकदा सहजच म्हणालो की, “गुरुजी पहिली ते दहावी पर्यंतची एखादी शाळा आणि ती सुद्धा फक्त समाजातील अत्यंत बुद्धिमान मुलांकरीताच स्थापन करणे फारच अवघड कार्य आहे. त्यापेक्षा आपल्या ऐपतीप्रमाणे सर्व साधारण मुलांकरिता एखादी बालवाडी स्थापन करणे अत्यंत सोपे आहे. तुमच्या जिनिंग प्रोसिंग कारखान्याच्या परीसरातीलच एखादी खोली पाहून तुम्हाला ही बालवाडी सहजपणे सुरु करता येईल. मग हीच मुले हळूहळू पहिली, दुसरी, तिसरी, चौथी करीत करीत कदाचित हळूहळू दहावीपर्यंतही जातील आणि हळूहळू तुमची पहिले ते दहावी पर्यंतची शाळाही तिथे सुरु होईल.” ही गोष्ट त्यांना पटली. कारण त्यांचे मेव्हणे जे.के.जाधव यांनी सुद्धा असेच केले होते. त्यांना सुद्धा प्रा. विष्णू गाडेकर यांच्या प्रमाणेच समाजसेवेची आवड होती. त्यामुळे त्यांनी वैजापूर तालुक्यातील शिऊर या आपल्या गावीच जे.के.जाधव यांनी सुरुवातीला बालवाडी सुरु केली. नंतर पहिली ते चौथी पर्यंतची शाळा सुरु केली. नंतर पाचवी ते दहावी पर्यंतची शाळा सुरु केली. त्यानंतर अकरावी-बारावी आणि त्यानंतरचेही वर्ग सुरु केले. अशाप्रकारे हळूहळू प्रगती करीत त्यांनी अनेक शाळा, अनेक कॉलेजेस सुरु केले. आज त्यांच्याकडे जवळपास तीस पेक्षाही अधिक शाळा आणि विविध अभ्यासक्रमांची महाविद्यालये आहेत. त्यामध्ये पॉलिटेक्निक, इंजिनीअरिंग, डी.एड, बी.एड, बीबीए, एमबीए, बीसीए, अशाप्रकारचे अनेक कोर्सेस असून अनेक ठिकाणी त्यांच्या संस्थेच्या अनेक मजली अशा भव्य इमारती आहेत. आपल्याला पूर्णवेळ ही समाजसेवा करता यावी म्हणून उद्योग संचालक महाराष्ट्र राज्य या पदावरील मंत्रालय मुंबई येथील नोकरीचा त्यांनी २००४मध्ये राजीनामा दिलेला आहे. आज ते एक फार मोठे नावाजलेले समाजसेवक म्हणून शिक्षण क्षेत्रात कार्य करीत आहेत.

आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात अत्यंत गरिबी आणि हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या जे.के. जाधव दादा यांनी “समाजसेवा” करीत करीतच आज उत्तुंग प्रगती केलेली आहे. त्यांच्या जीवन व कार्यावर मी आत्तापर्यंत दोन पुस्तके प्रकाशित केलेली आहेत त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच त्यांचे लहान बंधू एकनाथ जाधव यांनी सुद्धा शिक्षण क्षेत्रात प्रवेश करून आपल्या समाजसेवेला प्रारंभ केला आहे. त्यांनी सुद्धा आज समाजसेवा करीत करीतच खूप प्रगती केलेली आहे. अशा अनेकांची “समाजसेवा” आणि प्रगती पाहून अनेकांना त्यांच्या सारखीच समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळत असते.

कदाचित तशीच प्रेरणा प्रा. विष्णू गाडेकर यांनाही मिळालेली आहे. म्हणूनच त्यांनी एक दोन वर्षापूर्वी आपल्या फुलंब्री येथील जिनिंग फॅक्टरीच्या परीसरातच एक बालवाडी सुरु केली होती. आसपासच्या परिसरातील तसेच गावातील चाळीस मुले-मुली या बालवाडीत शिकत होती. त्यांना शाळेत आणण्याकरिता तसेच त्यांना घरी नेऊन सोडण्याकरिता प्रा. विष्णू गाडेकर यांनी चार जीपची मोफत व्यवस्था केली. त्याशिवाय ह्या बालवाडीतील मुला-मुलींना मोफातच शिक्षण देण्यात येत होते. सुरुवातीला प्रा. गाडेकर यांच्याकडे थोडेफार पैसे होते म्हणून त्यांनी जीप आणि शिक्षिकेला थोडा फार ऍडव्हांस रक्कम दिली होती म्हणून ठीक चालले. दोन महिन्यानंतर शिक्षिकेचा पगार थकला, जीपचे भाडे थकले, ते लोक आता मागील दोन महिन्याचे बाकी पैसे मागायला लागले. त्यांनी पैशांसाठी लावलेल्या तगाद्यामुळे किंवा पैशांच्या थक बाकीमुळे ते बेजार झाले. मग त्यांनी त्यांच्या अमेरिकेतील मुलीकडे ह्या प्रकरणाचा निपटारा करण्याची मागणी केली. त्यांच्या मुलीने सर्व थकबाकीचा हिशोब पाहून त्वरित दोन लाख रुपये पाठवून ह्या प्रकरणाचा निपटारा केला, आणि पुन्हा अशा प्रकारची अंगलट येईल अशी समाजसेवा स्वतःच्या पैशाने कधीच करू नका, असा प्रेमळ सल्लाही त्यांना दिला.

प्रा. विष्णू गाडेकर यांना असे वाटले होते की, सुरुवातीला ही बालवाडी मोफत चालवू नंतर हळूहळू बालवाडीचे विद्यार्थी वाढले की मग थोडी फार फीस सुद्धा आकारता येईल. परंतु तसे काहीच झाले नाही, आणि त्यांना ती बालवाडी कायमची बंद करावी लागली. एका चांगल्या व्यक्तीच्या उदात्त अशा समाजसेवेच्या ध्येयाची अशाप्रकारे अत्यंत दुर्दैवाने इतिश्री झाली. ह्या सर्व दैनंदिन धावपळीच्या कटकटीतून मुक्त होऊन थोडा निवांतपणा आणि थोडी मनशांती मिळविण्यासाठी मग प्रा. विष्णू गाडेकर त्यांच्या पत्नीसह त्यांच्या अमेरिकेतील मुलीकडे गेल्यामुळे त्यांची व माझी बराचकाळ भेटही झाली नाही किंवा त्यांनी मला त्या दरम्यान कधी फोनही केला नाही.

“मी त्यांच्या प्रत्येक कामात काही तरी खुसपट काढतो आणि त्यांना नाऊमेद करतो”, अशी त्यांची ठाम भावना आहे. आणि मी मात्र “आपल्या मित्राला काहीतरी चांगला सल्ला देतो आणि त्यांना संकटातून वाचवितो”, असा माझा त्याबाबतीत समज असतो. परंतु प्रा. गाडेकर यांच्या मते “तो माझा पक्का गैरसमज असतो.” मागे दोन-तीन महिन्याअगोदर सकाळी सकाळी सहा वाजता मला एकदा प्रा. गाडेकर यांनी अमेरिकेहून फोन केला. त्यावेळी तिकडे अमेरिकेत रात्रीचे दहा-अकरा वाजलेत असे काहीतरी त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी मला सांगितले की, “ते आता पुढील एक दोन महिन्यानंतर होणाऱ्या जालना लोकसभा मतदार संघातून आयकाँग्रेसच्या तिकीटावर २०१९ची लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. त्याकरिता त्यांनी दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे तिकीट मागण्याकरिता ईमेल द्वारे अर्ज आणि आपला बायोडाटाही पाठवून दिला आहे. ह्या निवडणुकीकरिता ते एक कोटी रुपये खर्च करणार आहेत” असेही ते म्हणाले. त्यांचा हा विचार मला अत्यंत आत्मघातकी वाटला. परंतु त्यांच्या मनात त्याबद्दल एवढा उत्साह आणि आत्मविश्वास होता की मी त्यावेळी त्यांना काहीही बोललो नाही. सकाळी सकाळी उगीच काहीतरी बोलून त्यांचा मूड खराब करण्याची माझी इच्छा नव्हती.

त्यांनी तिकीट मिळविण्याकरिता दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींकडे अर्ज व बायोडाटा पाठविला परंतु त्यांच्यामागे त्यांचे खरे पाच-पन्नास कार्यकर्तेही उभे नव्हते. त्यांच्या सोबत जे कुणी असायचे ते संधी साधून त्यांची आर्थिक लुटच करीत असायचे. त्याशिवाय राजकीय क्षेत्रात चांगले समाज कार्य करून ह्यापूर्वी त्यांचे फारसे नावही झाले नव्हते. त्याशिवाय आय काँग्रेसतर्फे त्यांची कुण्या विशेष व्यक्तीनेही त्यांची शिफारसही केली नव्हती, त्यामुळे त्यांना तिकीट मिळालेच नाही. त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे एवढे एक फार बरे झाले आहे की ते ह्या निवडणुकीत खर्च करणार होते ते त्यांचे एक कोटी रुपये सुद्धा वाचले आहेत. अन्यथा आजच्या परिस्थितीत एक कोटी रुपये गमाविणे किती कठीण झाले असते.

मध्यंतरी त्यांच्या जीवनात बऱ्याचशा बऱ्या-वाईट घटना घडल्या. त्यांचा गंगापूर तालुक्यातील गुऱ्हाळाचा कारखाना घाट्यात आल्यामुळे त्यांना चार-पाच वर्षापूर्वी विकावा लागला त्यानंतर त्यांच्या मुलाने स्कूल बस विक्रीची डीलरशिप घेतली होती. ती सुद्धा नंतर घाट्यात आल्यामुळे बंद करावी लागली. एक-दोन वर्षापूर्वी फुलंब्रीचा त्यांचा जिनिंग प्रोसिंगचा कारखानाही नुकसानीत येऊन अवघ्या बारा कोटी रुपयातच विकावा लागला. त्या कारखान्याच्या विक्री किमितीची आज एक-दीड वर्षानंतरही वसुली लवकर होईना. त्यांच्या दोन्ही कारसुद्धा मागेच विकल्या गेल्या आणि आता त्यानंतर ते सध्या स्कुटीवरच फिरत आहेत. आपल्या आयुष्यातील ह्या सगळ्या कटकटीतून मुक्त होऊन निवांतपणे जीवन जगण्यासाठीच तर ते त्यांच्या अमेरिकेतील मुलीकडे सहा महिन्यांसाठी राहायला गेले होते. ते आणि त्यांची पत्नी सहा महिने तिकडे अमेरिकेत राहिले. प्रोडक्शन इंजिनीअर असलेला त्यांचा मुलगा त्या दरम्यान काहीतरी नवीन उद्योग सुरु करण्यासाठी सध्या पुण्यातच स्थायिक झाला आहे.

सहा महिन्यानंतर ते जेव्हा अमेरिकेतून दोन महिन्यापूर्वी भारतात परत आले, तेव्हा ते त्यांच्या मुलाकडे पुण्याला थांबले. तिथून त्यांनी एका दिवशी मला फोन केला. मला फार आनंद झाला. त्यांना म्हणालो, “गुरुजी, तुम्ही औरंगाबादला केव्हा येणार आहात?”

ते म्हणाले, “रणवीरजी औरंगाबादला येण्यासारखी आता माझी परिस्थिती राहिलेली नाही. एन – १ मधील माझा बंगला एका कर्जामध्ये आतील साहित्यासह देवगिरी बँकेने जप्त करून नुकताच एक कोटी सदूसष्ट लाख रुपयांमध्ये दुसऱ्या एका पार्टीला विक्री केला आहे. फुलंब्रीच्या जिनिंग प्रोसिंग फॅक्टरीची बारा कोटी रुपयात विक्री होत आहे. ती किंमत लवकरच मिळणार आहे, ती किंमत जर लवकर मिळाली तर तो बंगला आम्ही निश्चितपणे सोडवून घेऊ शकतो. सध्या आम्ही पुण्यामध्येच आमच्या मुलाच्या सोबत भाड्याच्या एका छोट्याशा फ्लॅट मध्ये राहात आहोत. आम्हा दोघांनाही पेन्शन मिळते वगैरे वगैरे….”

हे सर्व ऐकूण मला थोडे वाईटच वाटले. मी म्हणालो, “गुरुजी लवकर ह्यातून मुक्त होऊन पुन्हा तुमच्या औरंगाबाद येथील बंगल्यात राहायला या. आपण इथे पूर्वीसारखेच एकमेकांशी बोलत राहू, वादविवाद करीत राहू, भांडतही राहू, आणि वेळप्रसंगी पूर्वी प्रमाणेच एकमेकांना मदत व सहकार्यही करीत राहू. आपली मैत्री पूर्वीप्रमाणेच शेवटपर्यंत कायम राहील.”

त्यानंतर पंधरा-वीस दिवसांनी त्यांना मी फोन केला. “गुरुजी सध्या काय चालू आहे?” प्रा. गाडेकर म्हणाले, “मी सध्या विशेष अभ्यास करीत आहे, मला अत्यंत बुद्धिमान मुलांसाठी पहिले ते दहावीपर्यंत एक चांगली निवासी शाळा काढायची आहे. त्या शाळेत केवळ गरिबांचीच नाही तर कुणाचीही अत्यंत बुद्धिमान मुले शिकतील.”

मी त्यांना म्हणालो, “पहिलीला प्रवेश देतांना ती मुले टॅलेंटेड आहेत की नाहीत? हे आपण कसे काय ओळखायचे?” ते म्हणाले, “त्यांची ‘आय क्यू टेस्ट’ घ्यायची आणि नंतरच, त्यांना प्रवेश द्यायचा,”

मी म्हणालो, “तुमची योजना चांगली आहे, परंतु……” ते मध्येच मला थांबवीत म्हणाले, “रणवीरजी, तुम्ही याबाबतीत दुसरेच काहीतरी खुसपट काढून किंवा काहीतरी बोलून मला पंचर करू नका.” मी म्हणालो, “ठीक आहे” आणि मी दुसरे काहीतरी बोलण्याअगोदरच लगेच त्यांन फोन कट केला.

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!