“आला पावसाळा, झाडे लावा, झाडे जगवा !”

Spread the love

दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. देशातील वनसंपत्ती म्हणजेच झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. पावसाचे अल्प प्रमाण तसेच वृक्षांची भरमसाठ तोड ही कारणे त्याकरिता प्रामुख्याने आहेत.

जेवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्ष आणि वनराई नष्ट होत आहे ; तेवढ्याच मोठ्या प्रमाणात नवीन वृक्षांचे रोपण केल्या जात नाही. ही गंभीर बाब आहे.

वृक्षारोपणासाठी शासनातर्फे फार मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो. परंतु त्या करोडो रुपयांच्या निधीचा योग्य तो सदुपयोग कधीच करण्यात येत नाही. शासनाच्या वृक्षरोपणाच्या ह्या योजनांद्वारे शासनाच्या जंगलात, पर्वतावर, दऱ्या-खोऱ्यांमध्ये, नदी-नाल्यांच्या काठावर, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना, वनराईच्या मोकळ्या जागेंमध्ये तसेच शेतांमध्ये जिथे-जिथे शक्य होईल तिथे-तिथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे अपेक्षित असते ; परंतु शासनातील अधिकारी आणि संबंधित मंडळी शासनाच्या ह्या सर्व योजना प्रत्यक्षात काटेकोरपणे न राबविता ह्या योजना राबविल्याचे फक्त कागदोपत्रीच नोंदवितात आणि त्यामध्ये मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार करून वृक्षारोपणाकरिता प्राप्त झालेला करोडो रुपयांचा निधी मोठ्या प्रमाणात सर्वजन मिळून हडप करतात ; त्यामुळे करोडो रुपयांचा निधी वृक्षारोपणाच्या कार्याकरिता खर्च होऊनही त्याप्रमाणात त्याठिकाणी वृक्षांचे अस्तित्व मात्र कधीच दिसून येत नाही.

सहज पडताळणी म्हणून गेल्या पाच वर्षात शासनामार्फत वृक्षारोपणाकरिता कोण-कोणत्या भागात किती-किती निधी खर्च करण्यात आला आहे? त्या निधीचा सदुपयोग झाला कि नाही? त्या ठिकाणी गेल्या पाच वर्षात किती वृक्षांचे रोपण करण्यात आले? त्यापैकी किती वृक्षांची वाढ झाली? आणि सध्या किती वृक्षांचे अस्तित्व त्या ठिकाणी दिसून आले? याचाही सविस्तर चौकशी अहवाल तयार करण्यात यावा ; म्हणजे या बाबतीत मोठ्या प्रमाणात झालेला भ्रष्टाचार दिसून येईल. या बाबतीत नुकतीच दैनिक लोकमत मध्ये खालील आकडेवारी वाचण्यात आली आहे. त्यामध्ये अशी माहिती आहे कि, महाराष्ट्रात या वर्षी १३ कोटी वृक्षरोपणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येत आहे. यापैकी मराठवाड्यात २ कोटी, ९१ लाख, ७४ हजार वृक्ष रोपण करण्यात येणार आहेत.

२०१६मध्ये सुद्धा राज्यसरकारने वृक्षरोपणाची मोठी मोहीम राबवली होती. त्यावेळी महाराष्ट्रात २ कोटी रोपटी लावण्यात आली होती. त्यावेळी मराठवाड्यात ५४ लाख, १९ हजार, ४६५ रोपटी लावली होती. यातील तब्बल ७४टक्के रोपटी जगल्याचा दावा नंतर वन विभागाने केला; परंतु प्रत्यक्षात किती झाडे जगली? हे त्यांचे त्यांनाच ठाऊक.

यंदाचे किती जगली? याचीही टक्केवारी थोड्याच दिवसात दिली जाईल. त्यातील सत्यता तपासायची कोणी, आणि कशी? कारण ही झाडे लावली कोठे? याची नेमकी ठिकाणेच दिली जात नाहीत; त्यामुळे सत्यता तपासायचा प्रश्नच येत नाही.

सरकार सांगेल तेच खरे, किंवा वनविभाग जी काही आकडेवारी जाहीर करेल तीच आकडेवारी सत्य समजावी लागेल असे हे वृक्षरोपणाच्या आकडेवारीचे गौडबंगाल आहे.

शालेय विद्यार्थ्यासंदर्भात अगदी प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही वृक्षारोपणाचे महत्व समजावून सांगून वृक्षांबद्दल त्यांच्या मनात प्रेम निर्माण करणे आवश्यक आहे. ह्याकरिता शिक्षकांनी ह्या उपक्रमात सक्रीय सहभाग घेतलाच पाहिजे.

मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्व आहे? हे त्यांना समजावून सांगितले पाहिजे. त्याच्या हाताने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करवून त्यांचे संगोपन आणि संरक्षण केले पाहिजे. वन विभागाच्या कार्यालयात विनंती अर्ज केल्यास आपणास हवी तेवढी रोपटी वृक्षरोपणाकरिता मोफत मिळू शकतात.

वृक्षापासून आपल्याला इमारतीसाठी तसेच फर्निचरसाठी लाकूड मिळते. खेड्या-पाड्यातील लोक जळणासाठीही मोठ्याप्रमाणत लाकडेच वापरतात. अनेक झाड-पाल्यांचा, फुलांचा, फळांचा, झाडांच्या सालींचा, लाकडांचा अथवा झाडांच्या मुळाचा उपयोग अनेक आयुर्वेदिक तसेच होमिओपॅथीक औषधी तयार करण्याकताही होतो.

फळांच्या झाडांपासून विविध प्रकारची फळे मिळतात. फुलांच्या झाडांपासून विविध प्रकारची फुले मिळतात. फुलांची तसेच फळांची आपल्या देशात फार मोठी बाजारपेठ आहे. अनेक लोक फळांच्या तसेच फुलांच्या विक्री व्यवसायात कार्यरत आहेत.

लाकडी फर्निचर तयार करण्याच्या व्यवसायातही अनेक लोक कार्यरत आहेत. केवळ वृक्षांच्या अस्तित्वावरच ह्या सर्व लोकांचा व्यवसाय चालू आहे. कागद उद्योगातही बांबूंच्या वृक्षाचे महत्व आहेच. आपल्या देशात वृक्षांचे अस्तित्व नसेल तर ह्या व्यवसायातील लाखो लोकांचे जीवनही निश्चितपणे धोक्यात येईल.

आजकाल रस्ता रुंदीकरण करतेवेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जी काही मोठ-मोठी झाडे असतात ती झाडे अगदी सर्रासपणे तोडली जातात. एक-एक झाड मोठे होण्यासाठी शंभर-दीडशे किंवा दोनशे वर्षही लागतात परंतु काहीही विचार न करता ती एवढी मोठी आणि जुनी झाडे केवळ एकाच दिवसात तोडून टाकण्यात येतात.

कोणतेही एक झाड तोडले तर त्या बदल्यात तशीच दुसरी कमीत कमी पाच झाडे लावावीत आणि जगवावीत, असा शासनाचा नियम आहे. झाडे तोडणारी मंडळी त्याप्रमाणे आम्ही नवीन झाडे लावलीत, असे म्हणतातही परंतु पुढे त्या झाडांचे त्यांनी संगोपन, संवर्धन केले कि नाही? हे कोण पाहणार? ह्यासाठी काही नियम आहे कि नाही?

त्यापेक्षा कोणतेही एक झाड, कोणत्याही कारणाने तोडायचेच असेल तर त्या झाडाच्या किमतीएवढी रक्कम वन विभागाकडे झाड तोडणाऱ्यांनी डीपॅाझीट म्हणून जमा करावी. त्याने तोडलेल्या झाडाच्या बदल्यात लावलेल्या रोपट्यांचे जर व्यवस्थित संगोपन, संवर्धन आणि संरक्षण केल्यामुळे ते झाड व्यवस्थित वाढले तर दहा वर्षानंतर त्या व्यक्तीने झाड तोडण्याकरिता भरलेली डीपॅाझीट रक्कम त्याला परत करण्यात यावी आणी त्याने लावलेल्या झाडाचे जर व्यवस्थित संगोपन, संवर्धन झालेले आढळून आले नाही तर ती रक्कम जप्त करून वृक्षरोपण, वृक्षसंगोपन, वृक्ष संवर्धन आणि वृक्ष संरक्षण करण्याकरिता वन विभागाने त्या रकमेचा उपयोग करावा.

वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा मोठ्याप्रमाणात नाश होतो. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होते ; त्याचाच परिणाम म्हणून भूगर्भातील पाण्याची पातळीही खाली जाते. दुष्काळ पडतो, दुष्काळामुळे महागाई वाढते. शेतात धान्य अथवा पिकांचे फारसे उत्पादन होत नाही. या सर्वच गोष्टींचा मानवी जीवनावर गंभीर परिणाम होतो. शेतकरी कर्जबाजारी होतात. अनेक शेतकरी कर्जबाजारीपणा अथवा दुष्काळामुळे आत्महत्याही करतात. हे सर्व टाळण्यासाठी आपल्या देशात जिथे जिथे वृक्ष लागवडीसाठी चांगली जागा उपलब्ध असेल; तिथे तिथे मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड केलीच पाहिजे.

केवळ वृक्ष लागवड करूनच उपयोगाचे नाही तर लागवड केलेल्या त्या वृक्षांचे चांगले संगोपन, संवर्धन करून चांगली वाढ होईपर्यंत त्या वृक्षांचे संरक्षणही केले पाहिजे.

ह्या वृक्षारोपणाच्या आणि वृक्षसंवर्धनाच्या कार्यात अगदी लहानापासून तर मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनीच चांगला सहभाग घेतला पाहिजे. ह्याकरिता शासनाने मोठ्या प्रमाणात विविध वृक्षांच्या रोपट्यांचे मोफत वाटप केले पाहिजे.

आपल्या अंगणात, आपल्या शेतात, आपल्या शाळेत, आपल्या गावाच्या परिसरात, आपल्या गावाच्या शेजारच्या जंगलात, नदी-नाले, ओढ्यांच्या काठावर, पर्वतावर, टेकड्यांवर जिथे जिथे शक्य होईल तिथे-तिथे आपण सर्वांनीच सामुहिकपणे वृक्षारोपणाची मोहीम मोठ्याप्रमाणात राबवली पाहिजे.

वृक्षारोपण करून सर्व परिसर हिरव्यागार झाडा-झुडपांनी कसा बहरून जाईल ह्याकरिता आपण सर्वांनी जोमाने कार्य केले पाहिजे.

वृक्ष हेच जीवन आहे ! त्यामूळेच संत तुकारामांनीही त्यांच्या अभंगामध्ये,

“वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे !”

असे म्हणून वृक्षांचे महत्व पटवून सांगितले आहे; म्हणून आपणही आता “झाडे लावा, झाडे जगवा !” असा संकल्प केलाच पाहिजे.

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!