आपल्या कामातील तसेच आपल्या नात्यांमधील शंभर टक्क्यांचे गणित

Spread the love

दररोज आपण अनेक कामे करतो, परंतु त्या कामामध्ये हवी तशी गुणवत्ता आपल्याला अजिबात दिसून येत नाही. कारण ते कामा करीत असतांना आपण त्या कामामध्ये आपली परिपूर्ण कार्य शक्ती, बुद्धी, एकाग्रता आणि पूर्णपणे समर्पण कधीच केलेले नसते. त्यामुळेच ते कार्य परिपूर्ण शंभर टक्के गुणवत्ता असलेले कधीच झालेले नसते. अशाप्रकारे आपण जे काही कार्य केलेले असते, त्या कार्याची गुणवत्ता जवळपास साठ टक्क्यांच्या आसपासच असल्याचे आपणास दिसून येते. बाकी चाळीस टक्के गुणवत्ता आपण ते कार्य करतांना केलेल्या हलगर्जी पणामुळेच कमी झालेली असते.

think before you work on something and then do work carefully

कोणतेही काम साधारणपणे हलगर्जीपणे करण्याची आपल्याला सवयच असते. प्रत्येक काम व्यावस्थित होण्यासाठी ते काम कोणत्या पद्धतीने कसे करावे? ह्याचा विचार करून अगदी त्या पद्धतीनेच ते काम काळजीपूर्वक केले तरच त्या कामामध्ये काहीही त्रुटी किंवा अपूर्णता राहाणार नाही, आणि ते काम अगदी शंभर टक्के जरी परिपूर्ण झाले नाही तरीही पंच्यान्नव टक्के तर नक्कीच परिपूर्ण होईल. ( एखादे  काम करण्यासाठी प्रेरणा, स्फूर्ती तसेच कार्य करण्याची शक्ती अशाप्रकारे मिळवा )

उदा – आपण एखादा  महत्वाचा तीन ते चार पेजेसचा अर्ज किंवा निवेदन डीटीपी टाईपिंग करण्याकरिता दिले, तर डीटीपी टाईपिंग करतांना त्या अर्जामध्ये बऱ्याचशा चुका राहून जातात. कुठे अक्षराची विलांटी द्यायची राहून जाते, तर कुठे अक्षराचा ऊकार द्यायचा राहून जातो, कुठे अक्षराला काना द्यायचा राहून जातो, तर कुठे एखाद्या अक्षराला नको तिथे पुन्हा पुन्हा दोनवेळा काना दिल्या जातो. कुठे एखादे अक्षर टाईप व्हायचे राहून जाते तर कुठे एखादे अक्षर चुकून पुन्हा पुन्हा दोनदा टाईप होते, कुठे पूर्ण विराम द्यायचा राहतो तर कुठे सल्प विराम द्यायचा राहून जातो, तर कुठे योग्य ठिकाणी पॅरेग्राफ बदल करण्याचे राहून जाते. अशा अनेक प्रकारच्या अनेक चुकांसोबतच ह्रस्व दीर्घ च्या चुकाही त्यामध्ये हमखासपणे दिसून येतात, ज्या अत्यंत अक्षम्य अशाच असतात. टायपिंग करतांनाच अगदी शंभर टक्के एकाग्रतेने हे काम केले तर त्यामध्ये फारच कमी चुका राहातील, परंतु टायपिंग करतांना आपली कदाचित साठ टक्के एकाग्रता राहात असावी. त्यावेळी आपल्या मनात इतर अवांतर विचारही चालू असावेत, त्यामुळेच आपल्या टायपिंगमध्ये अशाप्रकारच्या अनेक चुका राहून जातात. तरीही टायपिंगमध्ये राहिलेल्या ह्या चुका त्या मजकुराचे प्रिंट घेऊन त्या प्रिंट मध्ये लाल पेनाने दुरुस्ती करून घ्याव्यात आणि त्यानंतर त्या चुकांची पुन्हा एकदा दुरुस्ती करणे आवश्यक असते, ह्यालाच “प्रिंट चे प्रुफ करेक्शन” असेही म्हणतात. ही दुरुस्ती केल्यानंतरच आपले काम गुणवत्तेच्या दृष्टीने पंच्यान्नव ते शंभर टक्के बरोबर झालेले असते. हे केवळ एक उदाहरण झाले. आपल्या जीवनातील प्रत्येक कामात अशीच शंभर टक्के गुणवत्ता असावी, ह्याची आपण नेहमीच दक्षता घेतली पाहिजे.

always think before working on something

एखादे फरशी पुसायचे घरगुती काम जरी असले, तर केवळ इकडून तिकडून ओले फडके फिरवून, कसे तरी घाई गडबडीत फरशी पुसून आपण मोकळे झालो, तर त्या कामाची गुणवत्ता साठ टक्केच राहील. परंतु तेच काम करताना आपण व्यावस्थित सगळीकडून काना कोपऱ्यातून कुठेही कोणताही भाग सुटू न देता, व्यावस्थित फरशी पुसली तर निश्चितपणे ते काम पंच्यान्नव ते शंभर टक्के गुणवत्ता असलेले होऊ शकते. अशाच प्रकारे आपल्याला आपल्या प्रत्येक कामाच्या बाबतीत असलेली गुणवत्ता आपल्याला तपासून पाहाता येईल, आणि आपण करीत असलेले प्रत्येक काम शंभर टक्के गुणवत्ता असलेले कसे होईल? त्या दृष्टीने ते काम करतांनाच त्या संदर्भात विचार करता येईल.

वरील उदाहरणे आपल्या कामाच्या संदर्भातील होती. आता आपल्या आप-आपसातील विविध नाते संबंधातही याबाबतीत आपण विचार करायला हवा. आपल्या नाते संबंधातही आपण शंभर टक्के गुणवत्ता लक्षात घेऊन त्या संदर्भात आपण तशी आपआपसात वागणूक ठेवतो काय?

उदा – भावाने भावा सोबत कसे वागायचे? ह्या संदर्भात एखादे चांगले उदाहरण द्यायचे झाल्यास लोक म्हणतात की, “काय राम-लक्ष्मणासारखी आदर्श भावा भावाची जोडी आहे”. भावा भावाच्या संदर्भातील एखादे वाईट उदाहरण द्यायचे झाल्यास, “रावणाची लंका बिभीषणासारख्या घरभेदी रावणाच्या भावामुळेच अस्तास गेली होती,” असेही लोक म्हणतात.

म्हणजेच वरील उदाहरणामध्ये राम-लक्ष्मण ह्या भावांनी आपल्या नात्यातील पावित्र्याचे शंभर टक्के पालन केले होते तर रावण आणि बिभीषण यांनी आपल्या नात्यातील पावित्र्याचे फक्त वीस टक्केच पालन केले होते.

try to keep your relationship alive and happy

म्हणजेच आपल्याला कोणतेही नाते पाळावयाचे असेल तर त्या नात्यांमधील पावित्र्य शंभर टक्के पालन करणे जरुरी असते. पती-पत्नीचेही नाते असेच असते. त्याचीही गुणवत्ता शंभर टक्के असावी, अशी अपेक्षा असते. परंतु कुठेही अशाप्रकारची शंभर टक्के गुणवत्ता असल्याचे सहसा दिसून येत नाही. क्वचित काही ठिकाणी ऐंशी टक्के गुणवत्ता, तर काही ठिकाणी साठ टक्के गुणवत्ता, तर काही ठिकाणी चाळीस टक्के गुणवत्ता तर काही ठिकाणी केवळ वीस टक्केच गुणवत्ता असते, तर अनेक ठिकाणी फक्त दहा टक्केच गुणवत्ता असते. म्हणजेच दोघेही पती-पत्नी एकमेकांना काहीच जुमानत नाहीत. केवळ नावापुरतेच ते पती-पत्नीचे नाते असते. प्रत्येकाचे साम्राज्य आणि विचार वेगळेच असतात. ज्या पती-पत्नीच्या नात्यातील गुणवत्ता चाळीस टक्के, तीस टक्के, वीस टक्के किंवा दहा टक्के असते त्यांची आपआपसात नेहमीच भांडणे होत असतात. वाद-विवादही होतात, केवळ नावापुरतेच ते एकत्र राहात असतात. तसेच त्यांच्यापैकी काहींचे घटस्फोटही होतात, तर काहींचे इतरत्र अनैतिक संबंधही असतात. ह्यामध्येही विशेष हे की एखाद्याची गुणवत्ता कमी असते तर त्यांच्या दुसऱ्या जोडीदाराची गुणवत्ता त्यापेक्षा जास्त असते, अशावेळी दुसरा जोडीदार पहिल्या जोडीदाराची अन्यायी वागणूक सहजपणे सहन करीत असतो.

आजकाल तर प्रत्येक नात्यांमध्ये शंभर टक्के गुणवत्ता नसल्याचेच आपल्याला वर्तमानपत्रात प्रसिध्द होणाऱ्या अनेक बातम्यांमध्ये दिसून येते. कुठे मुलांनी आईला घराबाहेर काढून दिलेले असते, तर कुठे मुलानेच वडिलांची कोणत्यातरी कारणावरून हत्या केलेली असते, तर कुठे पतीने पत्नीला जाळून ठार केलेले असते, तर कुठे पत्नीनेच तिच्या प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचाच खून केलेला असतो. काय ही समाजाची आणि नात्यांची दुरवस्था आहे.

जेव्हा एखादी व्यक्ती पारिवारिक हितापेक्षाही अधिक स्वतःच्या स्वार्थाचाच विचार करतो, तेव्हा त्या व्यक्तीकडून आप-आपसातील नात्यांमधील शंभर टक्के गुणवत्ता पालन न झाल्यामुळेच आपआपसातील नाते संबंध दुरावतात. म्हणून प्रत्येकानेच जीवन जगतांना आपण आपल्या प्रत्येक कामामध्ये शंभर टक्के गुणवत्तेच पालन करीत आहोत काय? तसेच आपआपल्या नाते संबंधामध्येही आपण आपला स्वतःचा स्वार्थ सोडून त्या नात्यातील शंभर टक्के गुणवत्तेचे पालन करीत आहोत काय? की आपला स्वार्थ, आणि आपल्या अहंकारामुळे आपण आपल्या नाते संबंधालाही तिलांजली देत आहोत, ह्याचाही विचार प्रत्येकानेच केला पाहिजे. ज्या वेळी हा विचार केल्या जाईल, त्या नंतरच आपआपसातील पारिवारिक संबंध सुधारण्याची शक्यता निर्माण होईल.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

3 thoughts on “आपल्या कामातील तसेच आपल्या नात्यांमधील शंभर टक्क्यांचे गणित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: