खालील आठ गोष्टी करून तुमच्यातील आत्मविश्वास वाढवा…!

Spread the love

१) पैसे मिळविण्याच्या प्रयत्न करा

Try to earn money

ज्यांच्याकडे पैसा नसतो, त्यांच्यामध्ये आत्मविश्वासही नसतो. आत्मविश्वास नसल्यामुळे ते कोणतेही चांगले कार्य कधीच करू शकत नाहीत.आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याकरिता प्रथम आपल्याकडे पैसा कसा येईल? याचा विचार करा. पैसा मिळविण्याकरिता तुम्हाला तुमच्या योग्यतेची चांगली नोकरी मिळत नसेल, तरीही काहीच हरकत नाही. तुम्ही सुरवातीला अगदी तात्पुरती काही काळाकरिता अत्यंत साधी अथवा कमी पगार मिळणारी कोणती नोकरी मिळवा, ज्यामुळे अगदी थोडे का होईना, तुमच्याकडे पैसे जमा होतील. तुमच्या खिशात पैसा असला तर मग बघा तुमच्यामध्ये निश्चितपणे आत्मविश्वास निर्माण होईल.

२) आपल्या वेळेचे आणि कामाच्या तासांचे योग्य ते नियोजन करा !

manage your time

सर्वच लोकांना प्रत्येक दिवसाचे चोवीस तास मिळालेले असतात त्यापेक्षा जास्त अथवा कमी तास कुणालाही मिळालेले नसतात. आपल्यात आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी आपण आपल्या वेळेचे योग्य ते नियोजन करा. साधारणपणे प्रत्येक व्यक्ती आठ तासच काम करतो. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला आठ तासांची झोपही पुरेशी असते. आता ह्या शिवाय आपल्याकडे ८ तास प्रत्येक दिवसाचे शिल्लक असतात जे आपण विनाकारण दररोज वाया घालवीत असतो. ह्या वाया जाणाऱ्या आठ तासांपैकी आपली दैनंदिन दिनचर्या एक ते दोन तासात आपण आटोपल्या नंतरही आपल्याकडे सहा तासांचा आपण जर योग्य त्या प्रमाणे नियोजन करून त्याचा सदुपयोग केला तर आपण त्या वेळी जे काही चांगले विधायक कार्य केले तर त्यामुळे आपली प्रगती होण्यासोबतच निश्चितपणे आपला आत्मविश्वासही वाढू शकतो.

३) आपल्या वयोमानानुसार तसेच शरिर प्रकृतीनुसार, योग्य तो व्यायाम करा.

Exercise

जो व्यक्ती शरिर प्रकृतीने कमजोर असतो, त्याच्यामध्ये उत्साह तर नसतोच परंतु कोणतेही कार्य करण्याकरिता पुरेसा आत्मविश्वासही नसतो. त्यामुळे आपण आपल्या दैनंदिन दिनचर्येत कमीत कमी तीस ते चाळीस मिनिटे तरी व्यायामाचे नियोजन केलेच पाहिजे. योगासनांमुळेही चांगला व्यायाम होतो. आपण कोणता व्यायाम करायचा हे प्रत्येकाने आपल्या शरीर प्रकृतीनुसार ठरवावे. ज्यांना कोणताच व्यायाम जमत नाही, त्यांनी सकाळी अर्धातास वेगात चालण्याचा व्यायाम केलाच पाहिजे. व्यायामाने आपले शरीर तंदुरुस्त तर राहातेच, त्याशिवाय आपल्याला कोणतेही काम करण्यास उत्साह वाटतो, त्यामुळे आपल्यामध्ये आत्मविश्वासही निर्माण होतो.

४) ध्यान करा, म्हणजेच जीवनाबद्दल सकारात्मक विचार करा !

Meditate

ध्यान करणे, म्हणजे आपल्याला आवडणाऱ्या आपल्या एखाद्या देवतेचा १०८ वेळा मंत्र जपणे, असे अजिबात नव्हे. ध्यान करणे म्हणजे आपल्या जीवनातील उपस्थित झालेल्या अथवा उपस्थित होणाऱ्या काही प्रश्नांवर किंवा समस्यांवर सकारात्मक विचार करून, त्यावर उपाय शोधणे. आपण करीत असलेल्या कार्यात आपण काय-काय सुधारणा कशा-कशा पद्धतीने करू शकतो? ह्यावर सखोल चिंतन करून, त्याप्रमाणे कार्यात आणि जीवनात आपण आवश्यक तो बदल करण्याचा प्रयत्न करणे. ह्याकरिता दररोज झोपण्याअगोदर मांडी घालून, पद्मासनामध्ये, डोळे लावून दहा ते वीस मिनिटे एकांतामध्ये शांत बसून आपण वरीलप्रकारे चिंतन केले पाहिजे. ह्यामुळे आपल्याला नवीन-नवीन मार्ग सुचून, त्याप्रमाणे आपण कृती केल्यास, त्यामुळे आपला आत्मविश्वासही नक्कीच वाढेल.

५) सदैव चांगल्या आणि यशस्वी लोकांच्या संपर्कात राहावे!

always be with successful people

आपले मित्र कसे आहेत? तसेच आपण सतत कुणाच्या संपर्कात असतो, ह्यावरही बरेच काही अवलंबून असते. म्हणून नेहमीच आपल्यापेक्षा चांगल्या आणि यशस्वी लोकांच्याच संपर्कात सतत राहण्याचा प्रयत्न करा. त्यांचे चांगले विचार ऐकून तसेच त्यांचे चांगले  कार्य पाहून, तुमच्यामध्येही निश्चितपणे आत्मविश्वास निर्माण होईल.तुम्ही जर वाईट लोकांच्या संगतीत राहिले तर त्यांच्यासारख्याच वाईट सवयी तुम्हालाही लागू शकतील. त्यांच्या संगतीत तुम्ही कदाचित एकशे सत्तर रुपयांची दारूसुद्धा प्यायला सुरवात कराल. वाईट सवयी अथवा वागणूक असलेल्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास नसतो. त्यामुळे त्यांच्या संगतीत तुमचा आत्मविश्वास कधीच वाढू शकत नाही. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहून त्यांच्याकडून चांगली प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढू शकतो.

६) चांगली पुस्तके वाचा!

Read good books

आपण कोणत्याही क्षेत्रात कार्य करीत असलो तरीही, त्या क्षेत्रातील परिपूर्ण माहिती आपल्याला कधीच नसते. अशा अधुऱ्या माहितीने अथवा अपुऱ्या ज्ञानामुळे आपल्या क्षेत्रातील कोणतेही विशेष असे मोठे कार्य सहजपणे करण्याकरिता आपल्यामध्ये कधीच आत्मविश्वास नसतो. ते कार्य आपल्याला कधीच जमणार नाही, असेच आपणास नेहमी वाटत असते. आजकाल प्रत्येक क्षेत्रातील कार्याबद्दल सखोल मार्गदर्शन करणारी अनेक पुस्तके त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांनी लिहिलेली आहेत. ती पुस्तके कितीही महागडी असली अथवा वाचायला कितीही रटाळ किंवा कंटाळवाणी असली, तरीही त्यातील माहिती वाचून ती आत्मसात केलीच पाहिजे. त्या माहितीचा आपल्या कार्यात तसेच जीवनात आपण जर योग्य प्रकारे उपयोग केला तर त्यामुळे आपल्यात निश्चितपणे आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. त्या आत्मविश्वासाच्या जोरावर अथवा त्या पुस्तकातील माहिती किंवा ज्ञानाच्या भरवशावर आपण वर्तमानात तसेच भविष्यात फार मोठे कार्य करू शकतो.

७) कृतीशील व्हा!

use your knowledge and work

आपण विविध प्रकारे कार्य करून अथवा त्या-त्या क्षेत्रातील पुस्तकातून ज्ञान प्राप्त करून, सखोल माहिती मिळविलेली असेल आणि त्या माहितीच्या आधारे आपण योग्य त्या प्रकारे कृती करून आपले कार्य सुरूच केले नाही, तर आपले सर्व ज्ञान व्यर्थ ठरते. म्हणून आपण कोणतेही कार्य करण्याकरिता नेहमीच कृतीशील राहिले पाहिजे. कृतीशील राहिल्यामुळे निश्चितपणे आपला आत्मविश्वास वाढू शकतो.

८) अयशस्वी झालो तरी, तिथे अजिबात थांबू नका!

never give up

आपण आपल्यापरिने कोणतेही काम अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचाच सदैव प्रयत्न करीत असतो. परंतु ते कार्य करतांना आपण कुठेतरी, काहीतरी चूक करतो आणि त्या कामात अयशस्वी होतो. अयशस्वी झाल्यामुळे, हे काम आपल्याला कधीच जमणार नाही, असे समजून आपण कधी-कधी त्या कामाचा पूर्णपणे नादच सोडून देतो. आत्मविश्वास नसलेल्या व्यक्तीच अशा प्रकारे माघार घेतात. त्यामुळे आपण कितीही वेळा चुकलो तरीही ते कार्य पुन्हा-पुन्हा करण्याचे आपण कधीही थांबवू नये. जोपर्यंत ते कार्य आपण चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकत नाही, तोपर्यंत आपण ते कार्य वारंवार करितच राहिले पाहिजे. त्यामुळे त्या कार्यातील राहिलेल्या चुका आपल्याला समजतील. ते कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्यात नवीन आत्मविश्वास निर्माण होऊन, आपण त्या कार्यात निश्चितच यशस्वी होऊ. कोणत्याही गोष्टीत अपयश आले तरीही आत्मविश्वासाने पुन्हा-पुन्हा प्रयत्न केलाच पाहिजे.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!