दहावी-बारावीच्या निकालापूर्वीच आपल्या मुला-मुलींचे मनोधैर्य वाढवा

Spread the love

दहावी आणि बारावीच्या परिक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनात अतिशय महत्वाच्या ठरविण्यात आलेल्या आहेत. दहावीच्या परीक्षेत त्या विद्यार्थ्याला जे काही गुण प्राप्त होतात, त्यावरच तो पुढे चालून कोणत्या क्षेत्रात कार्यरत होईल? हे ठरविण्यात येते.

पालकांना आपल्या मुलांच्या तसेच मुलींच्या पुढील भवितव्याची अत्यंत काळजी असते. अनेकांना वाटते की, आपल्या मुलाने इंजिनीअर व्हावे किंवा डॉक्टर व्हावे किंवा कोणत्यातर चांगल्या क्षेत्रात चांगल्या पदावर कार्य करावे, त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, वगैरे वगैरे…..

आपल्या मुलाच्या अथवा मुलीच्या संदर्भात एवढ्या साऱ्या अपेक्षा बाळगल्यामुळे मग दहावीच्या किंवा बारावीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलांवर तसेच मुलींवर ह्या सर्वांचे सतत मानसिक दडपण येत असते. त्यासोबतच मुलं-मुली हे सुद्धा पाहातात की, आपले आई-वडील किती कष्ट करून आपल्याला शिकवीत आहेत. याबाबतीत ह्या मुला-मुलींचे आई-वडील ह्या बद्दल वारंवार बोलून आपल्या मुलां-मुलींना ह्या गोष्टीची सतत जाणीव करून देत असतात. त्या सर्वांचाच त्या मुला-मुलींवर प्रचंड मानसिक दडपण येत असते. मग निकाल लागण्याच्या दोन-चार दिवस अगोदर तर ही मुल मुली निकालाच्या धास्तीने अगदीच घाबरलेली असतात. त्यांना वाटते की, परीक्षेत आपण नापास झालो तर आपल्या आई-वडिलांना काय वाटेल? ते आपल्याला नापास झाल्याबद्दल काय काय बोलतील? आपण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पास झालो नाही तर त्यांना किती वाईट वाटेल, त्यांना किती दुःख होईल, त्यांनी आपल्यासाठी किती कष्ट घेतलेले आहेत, वगैरे वगैरे…..

अशा अनेक विचारांतून परीक्षेच्या निकालापूर्वीच त्यांच्यावर प्रचंड दडपण येते. त्यामुळे त्यांचा मानसिक ताण वाढतो आणि त्या वाढलेल्या मानसिक तणावामुळेच काही मुल मुली मनोरुग्ण होऊन

  • त्यांचा दहावीचा किंवा बारावीचा निकाल लागण्याच्या तीन-चार दिवस अगोदरच नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या करतात.
  • तर काही मुल मुली परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे आत्महत्या करतात.
  • तर काही मुल मुली परीक्षेत नापास झाल्यामुळेही आत्महत्या करतात.

 

आत्महत्या करणाऱ्या मुला-मुलींच्या मागे प्रामुख्याने त्यांच्या पालकांना काय वाटेल? हीच एकमेव भीतीची, दडपणाची अथवा मानसिक तणावाची भावना असते. आपल्या मुला-मुलींनी आत्म्हत्येकरिता प्रेरित होऊ नये, अथवा त्यांनी आत्महत्या करू नये म्हणून पालकांनी निकालाच्या एक महिन्या अगोदर पासूनच आपल्या मुलाला किंवा मुलीला निकालाच्या संभाव्य परिणामापासून तणाव मुक्त करण्याचा प्रयत्न करावा.

आत्ता तुझा निकाल काय लागतो की? परीक्षेत काय दिवे लावलेत? हे आता निकाल आल्यावरच कळेल. अभ्यास सोडून बऱ्याचवेळा मोबाईल खेळण्यात आणि टीव्ही पाहाण्यातच वेळ घालविला आहेस, बघू आता निकाल लागल्यावर काय होते ते…..

अशा प्रकारची भाषा मुला-मुलींनी ऐकल्यामुळे त्यांचे मनोबल खचते. आपण आता ह्या परीक्षेत नक्कीच नापास होऊ, अशेच त्यांना वाटायला लागते. ह्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक तणाव येतो आणी ज्यावेळी त्यांना हा तणाव असह्य होतो त्यावेळी ते सर्वांची नजर चुकवून निश्चितपणे आत्महत्या करतात. मग त्यांनी आत्महत्या केल्यावर आपल्या लक्षात येते की, ज्या मुलांनी किंवा मुलींनी नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या केलेली असते ते तर अगदी पन्नास-पंचावन्न टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेले असतात. परंतु नापास होण्याची त्यांच्या मनामध्ये जी काही भिती असते केवळ त्या भीतीमुळेच ते निकालाच्या अगोदरच आत्महत्या करण्यास प्रेरित झालेले असतात. त्याकरिता प्रामुख्याने त्यांच्या पालकांनी वेळोवेळी त्यांच्या निकालाबद्दल चिंता व्यक्त करून दाखविली होती, केवळ त्याच गोष्टीच्या मानसिक तणावामुळे त्या मुलांनी किंवा मुलींनी आत्महत्या केलेली असते.

आपल्या मुला मुलींनी दहावी किंवा बारावीच्या निकालाच्या परिणामामुळे आत्महत्या करू नये म्हणून पालकांनी काही गोष्टी करणे अत्यंत आवश्यक आहे.

  • मुला-मुलींच्या दहावी किंवा बारावीच्या निकाला संदर्भात आपल्या पाल्यासमोर कोणतीही नकारात्मक चर्चा करू नये किंवा त्यांच्या निकालासंदर्भात त्यांच्या समोर चिंताही व्यक्त करू नये. त्याबद्दल त्यांना धीर देणारी चर्चा करावी.

उदा – “दहावी-बारावीचा अभ्यास फार कठीण असतो, कितीही अभ्यास केला तरीही एक दोन विषयात मुले नापास होण्याची शक्यता असतेच, परंतु त्यामुळे मुलांचे फारसे काहीही नुकसान होत नाही. कारण त्यानंतर लगेच चार पाच महिन्याने दहावी-बारावीची जेव्हा पुढील परिक्षा होते त्या परीक्षेत पुन्हा सहभागी होऊन राहिलेल्या त्या दोन विषयात चांगले गुण मिळवून आपल्या गुणांची टक्केवारी आपल्याला चांगलीच वाढविता येते. त्यामुळे मुलांनी एक दोन विषयात आपण नापास जरी झालो, तरीही काहीच काळजी करू नये, वगैरे वगैरे……

अशाप्रकारच्या बोलण्यामुळे आपल्या मुला-मुलींच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो आणि निकालाच्या कोणत्याही परिणामाला न घाबरता ते सामोरे जाऊ शकतात. दहावी-बारावीच्या परीक्षेत त्यांना कमी गुण मिळून ते नापास जरी झाले तरीही ते आत्महत्या करण्याचा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत कधीही नसतात.

“कोणत्याही अपयशामधूनच यश प्राप्त होत असते”, ह्या गोष्टींची आपल्या मुला-मुलींना जाणीव करून द्या. एडिसन सारखे शास्त्रज्ञ असलेले व्यक्ती सुद्धा इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावण्याच्या प्रयोगात नऊशे नव्व्याण्णव वेळा अपयशी झाले होते. शेवटी एक हजाराव्या प्रयोगात त्यांना यश मिळाले आणि बल्बचा शोध लागला. जेव्हा ह्याबद्दल त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितले की, “बल्ब बनविण्यात आपल्याला यश का मिळत नाही? ह्या बद्दलचे मला नऊशे नव्व्याण्णव प्रयोग माहिती आहेत. त्या सर्व प्रयोगांचा मला शोध लागलेला आहे.”

अशाप्रकारे आपल्या अपयशाचे सुद्धा प्रत्येकाला सकारात्मक पद्धतीने मूल्यमापन करता आले पाहिजे. “एडिसन सारखा व्यक्ती यश मिळविण्याच्या प्रयोगात नऊशे नव्व्याण्णव वेळा अपयशी ठरला असेल तर आपणही अपयशी झाल्यामुळे आत्महत्या करण्यापेक्षा यश मिळविण्याकरिता दोन-तीन वेळा जरी दहावी बारावीची परिक्षा दिली तरीही फारसे काहीच बिघडत नाही. शेवटी किती वेळा परिक्षा दिल्यानंतर आपण पास होतो, ह्याला काहीच अर्थ नाही. तर आपल्या पास होण्यालाच विशेष अर्थ असतो”, अशाप्रकारे आपल्या मुला-मुलींना दहावी बारावीच्या परीक्षेबद्दल आत्मविश्वास आणि धीर दिला तर ते नक्कीच आत्महत्या करणार नाहीत. त्यांच्या आत्महत्येपेक्षा त्यांनी दुसऱ्या किंवा तिसऱ्यावेळा परिक्षा देऊनही ते उत्तीर्ण झाले, तरीही त्यामध्ये फारसे काहीच वाईट नसते. कारण अपयश आणि यश हेच तर आपल्या जीवनातील अत्यंत महत्वाचे टप्पे आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!