अभ्यास कसा करायचा?

Spread the love

आता लवकरच परिक्षा सुरु होणार आहेत. वर्षभर आपण अभ्यास केलेलाच असतो, परंतु त्या अभ्यासातील फारसे काही आपल्या लक्षातच राहात नाही. कारण आपल्या मेंदूला कोणत्याही गोष्टी विसरण्याची एक सवयच लागलेली असते. आपल्या दोन दिवसांपूर्वीच्या जेवणात कोणती भाजी होती? हे सुद्धा आपल्याला आज आठवत नाही. परंतु आपण आपल्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला कोणती वही दिलेली आहे? हे मात्र आपल्याला पंधरा दिवसानंतरही अगदी सहजपणे आठवते, असे का होते? तर आपण त्या गोष्टीची बारकाईने आपल्या मेंदूमध्ये त्यावेळी विशेष नोंद केलेली असते. त्या उलट आज आपल्या जेवणात कोणती भाजी आहे? ह्याची आपण जेवतांना अजिबात नोंद केलेलीच नसते, किंवा त्यावेळी त्या संदर्भात काहीच विचारही केलेला नसतो म्हणूनच आपल्याला दोन दिवसानंतर त्या संदर्भात काहीच आठवत नाही. अभ्यासाच्या बाबतीतही असेच होते, म्हणूनच आपण केलेला अभ्यास आपल्या काहीच लक्षात राहात नाही.

लक्षात राहाण्यासाठी अभ्यास कसा करायचा? ह्या संदर्भात कोणकोणत्या गोष्टीचा अवलंब करायचा? ह्या बद्दल आपण खालील आठ मुद्यांचा विचार करा.

 

वर्गात शिक्षकांनी शिकविलेले का समजत नाही?

why students don't understand the teachers taught in the classroom

शिक्षक जेव्हा वर्गात विद्यार्थ्यांना शिकवितात तेव्हा त्या विद्यार्थ्यांचे डोळे शिक्षकांकडे असतात. त्यांचे कान शिक्षकांचे शब्द एकत असतात, परंतु या शब्दांचा अर्थ समजून घेण्याचा विद्यार्थी कधीच प्रयत्न करीत नाहीत. त्याशिवाय विद्यार्थ्यांचा मेंदू त्यावेळी दुसऱ्याच एखाद्या वेगळ्या विचारात अथवा कामात गुंतलेला असतो. त्यावेळी त्या विद्यार्थ्यांच्या मेंदूमध्ये दुसरेच कोणतेतरी विचार चालू असतात. ते विचार अभ्यासाव्यतिरिक्त कोणतेही असू शकतात. वर्गात त्यावेळी जे काही शिक्षक शिकवीत असतात, त्याच्याशी त्या विचारांचा काहीही संबंध नसतो, म्हणूनच शिक्षकांनी वर्गात जे काही शिकविलेले असते त्यापैकी दहा टक्केही त्या विद्यार्थ्यांच्या लक्षात राहात नाही, म्हणूनच बुद्धीमत्तेने चांगले असलेले विद्यार्थीसुद्धा अभ्यासामध्ये मागे पडलेले असतात.

 

अभ्यासात विद्यार्थी मागे का पडतात?

Why scholar students fall behind?

शिक्षक वर्गात शिकवितांना विद्यार्थी लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांना तो धडा समजलेला नसतो, विद्यार्थी शिक्षकांना त्याबद्दल काहीही विचारीत नाहीत. गृहपाठ करतांना तो गृहपाठ किंवा धडा सुद्धा काहीही समजून न घेता, त्या धड्याची प्रश्नोत्तरे नवनीतच्या गाईडमधून पाहून विद्यार्थी जसेच्या तसे आपल्या गृहपाठाच्या वहीत लिहून ती वही तपासायला शिक्षकांकडे देतात. वही पूर्ण आहे हे पाहून शिक्षक सुद्धा त्यावर चांगला शेरा लिहून सही करून वही तपासून विद्यार्थ्यांना परत देतात. त्यामध्ये विद्यार्थ्यांना काही समजले आहे की नाही? ह्याचे परीक्षण अथवा निरीक्षण करायला शिक्षकांकडे तेवढा वेळही नसतो. त्यांना आपला पुढील धडा शिकवून, एकदाचा कसातरी अभ्यासक्रम पूर्ण करायची घाई झालेली असते. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासक्रमात कायम मागे पडत जातात.

 

 

ही आहे अभ्यासाची चार सूत्रे

कोणत्याही गोष्टी शिकतांना त्या गोष्टी आपल्या लक्षात राहाव्यात म्हणून अभ्यास करतांना आकलन, साठवण, आठवण आणि लेखण ह्या चार सूत्रांचा अवलंब केला पाहिजे.

 

१) आकलन म्हणजे काय?

What is intelligence?

वर्गात जेव्हा शिक्षक एखादा धडा शिकवीत असतात, तेव्हा त्यावेळी विद्यार्थ्यांचे डोळे त्यांच्याकडे पाहात असतात. विद्यार्थ्यांचे कान त्यांच्या बोलण्यातील अर्थ समजून न घेता त्यांचे बोलणे नुकतेच एकत असतात, त्याशिवाय त्यांचा मेंदू त्यावेळी अभ्यासाव्यतिरिक्त दुसऱ्याच एखाद्या विचारात दंग असतो. म्हणून शिक्षकांनी वर्गात जे काही शिकविले आहे त्याचे विद्यार्थ्यांना काहीही आकलन होत नाही, म्हणजेच वर्गात शिकविलेला अभ्यास किंवा धडा विद्यार्थ्यांना, काहीही समजत नाही.

त्याकरिता विद्यार्थ्यांनी एकावेळी एकच काम केले पाहिजे आणि ते काम करतांना त्या कामामध्ये आपल्या डोळ्यांचा, आपल्या कानांचा, आपल्या मेंदूचा आणि आपल्या हातांचाही महत्वाचे नोट्स अथवा अभ्यासासंदर्भातील टिपणे किंवा नोंदी करण्याकरिता वापर केला पाहिजे, तरच त्या विद्यार्थ्यांना वर्गात शिकविलेल्या प्रत्येक धड्याचे पूर्णपणे व्यावस्थित आकलन होईल.

एखादा धडा जर समजला नाही तर त्या संदर्भात आपल्या शिक्षकांना पुन्हा विचारून तो भाग विद्यार्थ्यांनी व्यवस्थित समजून घेतलाच पाहिजे. मागील धडा व्यवस्थित समजल्यानंतरच पुढील धड्याचा अभ्यास केला पाहिजे.

 

२) साठवण म्हणजे काय?

process of storing

वर्गात शिकविलेल्या धड्याचे आपणास चांगले आकलन झाले तरच आपण आपल्या मनामध्ये अथवा आपल्या मेंदूमध्ये त्या धड्याची व्यावस्थित साठवण करून ठेवू शकतो. त्याकरिता आपण घरी गृहपाठ म्हणून त्या धड्याचा विशेष अभ्यास केला पाहिजे. त्या धड्यातील प्रश्नांची उत्तरे घरी सोडवून पाहाणे आवश्यक आहे. त्या संदर्भात काही आकृत्या असतील तर त्या सुद्धा काढल्या पाहिजेत. त्या धड्यासंदर्भातील काही टिपणे सारांशाच्या स्वरुपात लिहिणेही आवश्यक आहे. धड्याचा आशय आपल्या स्वत:च्या भाषेत टिपणांच्या स्वरुपात आपल्याकडे साठवून ठेवला पाहिजे, त्यालाच साठवण म्हणतात.

 

३) आठवण म्हणजे काय?

process of memorizing

आपण अभ्यास करतांना जी काही टिपणे आपल्या वह्यांमध्ये लिहून, साठवून ठेवलेली असतात, त्यावर अधून मधून नजर मारू त्याची आपण शक्य होईल तेवढ्यावेळा, निदान पाच-सहा वेळा तरी उजळणी केली पाहिजे.

त्या भागाची उजळणी केल्यानंतर त्यातील कोण-कोणता भाग आपल्याला आठवतो आहे, त्या बाबतीत असलेले प्रश्न लिहून त्याची उत्तरे केवळ आठवणीने लिहिण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. उत्तरे लिहिल्यानंतर आपल्याला जो कोणता भाग व्यवस्थित आठवत नसेल. त्या भागाची पुन्हा एक-दोन वेळा उजळणी करून तो भाग पुन्हा-पुन्हा केवळ आठवणीने लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वारंवार असा प्रयत्न केल्यामुळे तो अभ्यासक्रम पूर्णपणे आपल्या आठवणीत राहील, ह्यालाच आठवण असे म्हणता येईल.

 

४) लेखन म्हणजे काय?

process of writing

अभ्यासक्रमातील एखादा भाग तीन वेळा वाचूनही कदाचित आपल्याला समजणार नाही, कारण अनेकवेळा मोठ्याने वाचतांनासुद्धा आपण केवळ डोळे आणि तोंडाचाच वापर करतो. त्यावेळी आपला मेंदू मात्र इतर काहीतरी दुसरा विचार करण्यातच गुंग राहातो, त्यामुळे आपण वाचत असलेला कोणताच भाग आपल्याला समजत नाही. परंतु तोच भाग जेव्हा आपण लिहून काढतो तेव्हा आपले डोळे, आपले तोंड, आपला मेंदू आणि आपली बोटे सुद्धा लिहिण्याच्या क्रियेत सहभागी असतात. मेंदूच आपल्या हाताला तसा आदेश देऊन आपल्याला हवे तसे लिहिण्यास प्रवृत्त करीत असतो. ह्या क्रियेत आपल्या मेंदूचा विशेष सहभाग असल्यामुळे अभ्यासक्रमातील तो भाग आपल्या चांगलाच लक्षात राहातो, त्यालाच लेखन असे म्हणतात.

 

अभ्यास करण्याची खरी पद्धत कशी असावी?

how to give attention in classroom

शिक्षक शिकवितांना किंवा कोणत्याही विषयाचा अभ्यास करतांना, त्या प्रक्रियेमध्ये आपले चार अवयव सक्रीय असले पाहिजे.

डोळ्यांनी त्या अभ्यासक्रमाचे बारकाईने निरीक्षण केले पाहिजे. कानांनी त्या अभ्यासक्रमाविषयी व्यावस्थित लक्ष देऊन एकले पाहिजे. मेंदूने त्या अभ्यासक्रमाविषयी अथवा धड्याविषयी असलेल्या माहितीचे विश्लेषण करून ती माहिती व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. म्हणजेच मेंदूला त्या माहितीचे व्यावस्थित आकलन झाले पाहिजे. त्यानंतर आपल्याला आकलन झालेल्या त्या अभ्यासक्रमासंदर्भातील धड्याचे आपल्या सोप्या भाषेत अथवा सोप्या शब्दां टिपणे काढण्याचे काम आपल्या मेंदूने आदेश दिल्यानुसार आपल्या हातांनी केले पाहिजेत. त्या धड्याची आपल्याला कायम स्वरूपी आठवण राहाण्यासाठी त्या धड्यातील प्रश्नोत्तरे त्या टिपणांच्या आधारे मधून लिहून पाहाणे अत्यंत आवश्यक असते. ह्या पद्धतीने अभ्यास केला तर त्याचे आकलन होऊन त्या संदर्भात आपण सहजपणे आठवणीने लेखनही करू शकतो.

अशाप्रकारे वरील मुद्य्यांच्या आधारे, न कंटाळता अविरतपणे अभ्यास केल्यामुळे आपण नक्कीच चांगली प्रगती करू शकतो.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!