“आवश्यकता आणी इच्छा”, ह्या शब्दांचा अर्थ लक्षात घेऊनच खर्च करा

Spread the love

आपण नोकरी अथवा व्यवसाय ह्याकरिता करतो की, कितीही आर्थिक प्राप्ती झाली तरीही आपल्याला तो पैसा कमीच पडत असतो. कारण जीवन जगतांना आपल्या इच्छा आणि आवश्यकता ह्या अमर्यादीत असतात. आपण आपल्या सभोवताल अनेक गोष्टी पाहातो, आपल्याला इच्छा होते की, त्या गोष्टी आपल्याजवळही असाव्यात, त्या गोष्टींचा लाभ आपल्यालाही व्हावा. एखादा व्यक्ती त्याच्याकडे कोणतेही वाहन नसेल आणि त्याची आर्थिक परिस्थिती जेम तेम असेल तर त्याची अशी इच्छा होते की, आपल्याकडेही एखादी सायकल असावी. पुढे चालून तो सायकल खरेदी करतो, नंतर काही काळाने त्याला वाटते की आपल्याकडे एखादी मोटार सायकल किंवा स्कूटर असावी, त्या दृष्टीने तो पैशांची बचत अक्रून काही काळाने स्कूटर किंवा मोटार सायकलही खरेदी करतो. नंतर पुढे चालून काही काळाने त्याला वाटते की आपल्याकडे कार असावी, त्या दृष्टीने तो प्रयत्न करतो आणि काही काळाने तो कारही खरेदी करतो. अशाप्रकारे आपल्या इच्छा अमर्यादित असतात. त्याला कधीही अंत नसतो, आपली एक इच्छा पूर्ण झाली की लगेच आपल्यासमोर दुसरी इच्छा उपस्थित होत असते.

keep control on your desires

इच्छा आणि आवश्यकता ह्यामध्ये फरक आहे. आपल्याला ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या गोष्टी मिळाल्याशिवाय आपल्याला अजिबात जमत नाही. उदा – भूक लागली की आपल्याला वेळेवर जेवण मिळालेच पाहिजे, त्यावेळी जेवण मिळणे ही आपली आवश्यकता असते. परंतु जेवण झाल्यावर एखादा चित्रपट पाहायला जाण्याची आपली इच्छा झाली तरीही आपण चित्रपट पाहायला जाण्याचे टाळू शकतो, कारण त्याशिवाय आपले कुठेही काहीही अडत नाही. म्हणजेच आपली आवश्यकता पूर्ण झालीच पाहिजे, परंतु इच्छा पूर्ण झाली नाही तरीही चालू शकते, त्याशिवाय आपले विशेष काही नुकसान होत नसते.

अशाप्रकारे इच्छा आणि आवश्यकता ह्या दोन्ही शब्दांचे भिन्न भिन्न अर्थ आहेत. परंतु अनेक लोक ह्या दोन्ही शब्दाचा एकच अर्थ गृहीत धरतात, त्यामुळे ते कायम आर्थिक अडचणीत येतात. इच्छेला काहीच मर्यादा नसते, अनेक गोष्टीच्या प्रती आकर्षीत होऊन, त्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात म्हणून आपण त्या गोष्टींची इच्छा करीत असतो. इच्छा अमर्याद असतात, तर इच्छेच्या प्रमाणात आपली आवश्यकता मर्यादित असल्यामुळे आपण मर्यादित खर्चातच त्या आवश्यकतेची परिपूर्ती करू शकतो, परंतु आपल्या इच्छा अमर्यादीत असल्यामुळे त्याची परीपूर्तता करता करता आपली आर्थिक क्षमताही अपुरी पडत असते.

people who don't save money have to face financial problems in future

ज्या ज्या लोकांनी त्यांच्या आवश्यकतेमध्ये तसेच इच्छेमध्ये गरजेपेक्षा अधिक वाढ केलेली असते, त्यांना त्यांची परिपूर्तता करण्याकरिता कायम आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

सध्याच्या काळात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे, प्रत्येक वस्तूचे भाव कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. अनेक वस्तूंचे उत्पन्न कमी आणि आवश्यकता जास्त असल्यामुळेच महागाई वाढत असते. जेव्हा त्या वस्तूचे उत्पन्न आवश्यकतेपेक्षा जास्त होते, तेव्हा मात्र त्या वस्तूची किंमत ही कमी होते, तरीही त्या वस्तूला किंवा मालाला बाजारात फारसा उठाव नसतो. परंतु अशी परिस्थिती क्वचितच अपवाद स्वरूपच असते.

ह्या महागाईच्या काळातही आपल्याला आपल्या आर्थिक क्षमतेनुसार व्यावस्थित जीवन जगता येऊ शकते. त्याकरिता आपण आपली इच्छा आणि आपली आवश्यकता ह्या दोन गोष्टींवर आपले लक्ष केंद्रीत केले  पाहिजे.

plan your budget to save more money

त्याकरिता एका कागदावर आपण आपल्या आवश्यकता काय काय आहेत?  ह्याची व्यावस्थित नोंद करा. दुसऱ्या कागदावर आपण आपल्या इच्छा काय काय आहेत? ह्याचीही व्यावस्थित नोंद करा.

ज्या ज्या गोष्टींची आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे, टा त्या गोष्टींमध्ये धान्य, किराणा साहित्य, मुलांचे शैक्षणिक साहित्य, गाडीचा पेट्रोल खर्च, गरज असेल तर औषधीचा खर्च, ह्यासारख्या काही गोष्टींची नोंद केल्या जाऊ शकते. कारण ह्या गोष्टींची आपल्याला अत्यंत आवश्यकता असते. त्याशिवाय आपले काम चालू शकत नाही, तर दुसऱ्या कागदावर आपण आपल्याला ज्या ज्या गोष्टींची इच्छा आहे, त्या त्या गोष्टींची नोंद केली पाहिजे.

त्यामध्ये रविवारी चित्रपट पाहायला जाणे, येतांना तिकडूनच हॉटेलमध्ये जेवून येणे, कपड्यांचा सेल लागलेला आहे तिथून काहीतरी नवीन फॅशनचे कपडे खरेदी करणे, आपले मेकअपचे साहित्य संपले आहे ते घेऊन येणे, घड्याळ फार जुनी झाली आहे एखादी नवीन घड्याळ घेऊन येणे, आपला बूट सुद्धा थोडा जुना झालेला आहे तर बुटाचे वेगवेगळ्या कलर चे आणखी दोन जोड खरेदी करणे, अशा अनेक प्रकारच्या आपल्या इच्छा असू शकतात. वास्तविकपणे ह्या वस्तू आपल्याकडे नसल्या तरीही चालू शकते, परंतु तरीही त्या वस्तू आपल्याला हव्यातच असे आपल्याला वाटते. त्याचे कारण आपले आपल्या मनावर अजिबात नियंत्रण नसते, त्यामुळे अपान कोणताही विचार न करता ह्या गोष्टींवर अतिरिक्त खर्च करून आपल्या पैशांचा विनाकारण अपव्यय करून आर्थिक अडचणीत येत असतो.

try to avoid buying things which you don't need to save money

ह्याकरिता आपण आपल्याला खरोखरीच कोण कोणत्या गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे? त्याच गोष्टींची विचारपूर्वक खरेदी केली पाहिजे, अवांतर गोष्टींच्या खरेदीचा विचार आपण आपल्या मनातून कटाक्षाने दूर केला पाहिजे. कोणत्याही गोष्टीची खरेदी करतांना त्या गोष्टींची आपल्याला अत्यंत गरज आहे काय? हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे.

एखादी गोष्ट आपण फॅशन, सौंदर्य प्रसाधने, आवड, दिखावा, आराम, किंवा इतरांसमोर आपला मोठेपणा दाखविण्यासाठी म्हणूनही खरेदी करीत असतो. त्या वस्तूची आपल्याला त्यावेळी अजिबात गरजही नसते, त्या वस्तू शिवायही आपले काम चालू शकते, अशावेळी ती वस्तू खरेदी करण्याचे आपण कटाक्षाने टाळलेच पाहिजे.

don't buy the new cloths if you already have cloths

बऱ्याचवेळा तर आपण आपल्याकडे अनेक नवीन नवीन कपडे असूनही दर वेळी पुन्हा पुन्हा गरज नसतांनाही नवीन कपडे खरेदी करण्याचा आपल्याला मोह होतो. त्याशिवाय दुसऱ्यांना दाखविण्याच्या भावनेतूनही आपण अशा प्रकारच्या नवीन कपड्यांची खरेदी करीत असतो. आपल्या ह्या नवीनकपड्यांची लोक विशेष दाखलही घेत नाही, त्यामुळे कपड्यांवर अशाप्रकारच्या खर्चाचे आपण कटाक्षाने नियंत्रण आणलेच पाहिजे. आपल्याकडे गरजेपुरतेच कपडे असावेत आणी त्याचाच आपण आलटून पालटून वापर करणे योग्य ठरते. कोणतेही कापड अत्यंत जने झाल्याशिवाय नवीन कापडांची खरेदी करू नये.

अनेकवेळा ज्या ज्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता नाही, त्या त्या गोष्टींची खरेदी करण्याचीही आपली इच्छा होते, त्यामुळेच आपल्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. आपल्या गरजा अपरिमित असतात, त्या सर्वांची परिपूर्ती होणे कधीच शक्य नसते. त्यामूळे त्यातील कोणकोणत्या गरजा अनावश्यक आहेत? त्या सर्व गरजा कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करा.

try to gain control on your desires to stop spending money

त्याशिवाय सतत अशा कितीतरी इच्छा आपल्या मनात निर्माण होतात, ज्याची पूर्तता होणे अत्यंत कठीणच नाही तर कधी कधी अशक्यही असते. अशा सर्व इच्छांचा कटाक्षाने त्याग केला पाहिजे, अन्यथा त्या इच्छा पूर्ण होत नाहीत, म्हणून आपण सदैव दुःखी होत असतो. त्यामुळे आपली मनस्थिती बिघडते आणि आपले आपल्या दैनंदिन कामातही मन लागत नाही. कधी कधी तर त्यामुळे आपल्या मनावर परिणाम होऊ आपण काही प्रमाणात मनोरुग्णही होऊ शकतो. ज्या इच्छा पूर्ण होणे शक्य नाही अशा इच्छा आपल्या मनात नसतील तर त्यामुळे आपले मन नेहमी आनंदात राहू शकते.

इच्छा एका मागोमाग एक वाढतच जातात. एक इच्छा पूर्ण झाली की लगेच त्यापुढे दुसरी इच्छा निर्माण होते, त्याला कुठेही अंत नसतो, म्हणून अशा अनावश्यक इच्छांचा त्याग करता आला पाहिजे. त्यापेक्षा, चांगल्या गोष्टींची सदैव इच्छा करावी. उदा – मला परीक्षेत सर्वात जास्त गुण मिळाले पाहिजेत, माझ्यात नेहमी चांगले गुण रुजले पाहिजे, येणाऱ्या एका वर्षात माझ्याकडे एवढी बचत रक्कम शिल्लक राहिली पाहिजे, वगैरे वगैरे….

आपल्या पैशांचा सदुपयोग करून अत्यंत विचारपूर्वक त्यांचा विनियोग किंवा खर्च करणे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ही गोष्ट आपल्याला न समजल्यामुळेच आपण मोहात पडून किंवा इतरांवर आपल्या मोठेपणाची छाप पाडण्याकरिता आपण अनेकवेळा फॅशनपरस्ती वर किंवा दिखाव्यासाठीही अनावश्यक खर्च करीत असतो.

ज्यामुळे आपल्या पैशांचा अपव्यय होऊन आपल्याला आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागते आणि अत्यंत अनावश्यक गोष्टींची आपण खरेदी करू शकत नाही. म्हणून “आवश्यकता आणि इच्छा” ह्या शब्दांमधील अर्थ लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपला पैसा कुठे, कसा आणि कशाकरिता, केव्हा खर्च करणे आवश्यक आहे, की नाही? ह्याचा विचार करावा. तरच आपल्यासमोर आर्थिक समस्या उपस्थित राहाणार नाहीत.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

One thought on ““आवश्यकता आणी इच्छा”, ह्या शब्दांचा अर्थ लक्षात घेऊनच खर्च करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!