वधू-वरांची निवड करतांना

Spread the love

प्रत्येकाच्या जीवनात विवाह करणे ही एक अत्यंत अपरिहार्य अशी गोष्ट असते. योग्य वयात, योग्य वेळी, योग्य जोडीदारासोबत विवाह होणे ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट असते. त्यामुळेच भावी वराची अथवा वधूची निवड करण्याची जी काही प्रक्रिया आहे, त्याला फारच महत्व प्राप्त झालेले आहे. योग्य-अयोग्याची परिक्षा न घेता, घाई गडबडीत जर आपण अयोग्य वधू किंवा वराची निवड केली तर नंतर फारच अडचणीचे ठरते. अनेक वेळा त्या दोघांचा अपेक्षा भंगही होतो, म्हणून भावी वधू किंवा वराची निवड करतांना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे जरुरी आहे, त्या संदर्भात आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे.

bride getting ready when grooms family comes to visit her home

आजकाल भावी वधू-वर जेव्हा एकमेकांची निवड करतात, तेव्हा तो मुलगा मुलीच्या घरी मुलगी पाहण्याकरिता आपल्या दोन-तीन जवळच्या नातेवाईकांसोबत जातो. त्यावेळी चहा-पोहे किंवा जेवणाचा कार्यक्रम होतो. थोडा फार मेकअप केलेली मुलगी मुलाला आणि त्याच्या नातेवाईकांना चहा-पाणी किंवा जेवण देते. एवढ्या अल्पशा वेळात मुलाने आणि त्यांच्या नातेवाईकांनी मुलीला पाहून द्यावे, ही अपेक्षा असते. मुलीला व्यावस्थित बोलता येते की नाही? तसेच तिच्या बोलण्यावरून ती किती हुशार आहे? हे जाणून घेण्यासाठी मुलगा किंवा त्याच्यासोबतचे नातेवाईक मुलीला काहीतरी प्रश्न विचारतात. आता एवढ्या अल्पशा वेळेत मुलगी कशी दिसते? आणि ती कशी बोलते? एवढ्याच गोष्टी समजून येतात.

process of selecting bride and groom

तिचे व्यक्तिमत्व कसे आहे? तिचा स्वभाव कसा आहे? तिला काय काय आवडते? काय काय आवडत नाही? इतरांसोबत तिचे वागणे कसे आहे? ती शांत स्वभावाची आहे की, रागीट आहे? तिचा स्वभाव इतरांशी जुळवून घेणारा आहे की एकलकोंडा आहे? तिचे इतरांशी बोलणे तसेच वागणे कसे आहे? तिला घरातील कामे व्यावस्थित करता येतात की नाही? ती कामसू आहे की, आळशी स्वभावाची आहे? ह्या सगळ्या तिच्या स्वभावातील अंतर्गत गोष्टी इतरांना त्या एक तासाच्या वधू परीक्षणाच्या कार्यक्रमात त्यावेळेस अजिबात कळत नसतात. तसेच ह्या सर्व गोष्टी तिला आपण समोरासमोर बसवून त्यावेळी विचारू सुद्धा शकत नाही. तशी मुलाची व त्याच्या नातेवाईकांची परिस्थितीसुद्धा नसते. कारण ते असभ्यपणाचे ठरते.

त्याचप्रमाणे मुलीच्या नातेवाईकांनासुद्धा मुलाची विशेष ओळख व परिचय नसतो. मुलगा किती शिकलेला आहे? कुठे नोकरीला आहे? आणि कोणत्या गावचा आहे? एवढीच त्याच्याबद्दल मुलीच्या नातेवाईकांना माहिती असते. त्याची वागणूक, त्याचे गुण किंवा दुर्गुण, तसेच त्याच्या व्यक्तिमत्वासंदर्भातील इतर माहिती मुलीच्या नातेवाईकांना नसते.

सांगायचे तात्पर्य, मुलगा व मुलगी एकमेकांना काही बाबतीत अत्यंत अपरिचित असतात. केवळ शिक्षण, रंग-रूप किंवा सौंदर्य पाहूनच सहसा मुलीची निवड करण्यात येते. तर मुलाची शिक्षण व नोकरी एवढीच गोष्ट पाहून निवड करण्यात येते. मुलाच्या रंग-रूप किंवा सौंदर्याकडे बहुतेक वेळा थोडे दुर्लक्षच करण्यात येते.

काही काही मुल अथवा मुली गोऱ्या रंगाला, आणि जोडीदाराच्या रूप सौंदर्याला, डॉक्टर-इंजिनीअर यासारख्या उच्च शिक्षणाला तसेच त्याच्या मोठ्या पगाराच्या नोकरीलाच अधिक महत्व देतात. त्यामुळे मग ते अनेक मुली किंवा अनेक मुळे पाहातात, तरीही त्यांचा शोध लवकर संपत नाही. त्यामुळे हळू हळू त्यांचे वयसुद्धा वाढू लागते, मग वाढलेल्या वयामुळे लग्न जुळणे अतिशय कठीण होऊन जाते. कारण त्यांच्या वयानुसार थोड्या अधिक वयाच्या त्यांना अपेक्षित असलेल्या मुलांचा अथवा मुलींचा शोध घेणे अत्यंत अवघड होऊन बसते.

things you need to think about before getting married to your partner

वधू किंवा वराची निवड करतेवेळी एकमेकांची आवड, एकमेकांच्या सवयी सारख्या असतील तर भावी जीवनात त्यांचे आपसात चांगले जमेल, अन्यथा त्यांच्यामध्ये आपसातील संघर्ष व मतभिन्नता कायम चालू राहील. वधू वरांची निवड विसंगत असेल तर त्यांच्यामध्ये इतर सर्व काही व्यावस्थित असूनही आपसातील स्नेह किंवा प्रेम वाढीस लागत नाही. प्रेम, आपुलकी सारख्या नेमक्या ह्याच गोष्टीची सुखी परिवाराकरिता आवश्यकता असते.

आजकाल भावी वर, भावी वधूंच्या सौंदर्यालाच अतिरिक्त महत्व देतांना दिसतात. वधूमध्ये सौंदर्यासोबतच चांगले गुण असणेही आवश्यक असतात. वधू किंवा वरामध्ये केवळ सौंदर्य आहे आणि चांगले गुण नसतील तर त्या विवाहानंतर पुढे चालून एकमेकांना मनस्ताप झाल्याचेच आपल्याला दिसून येते.

मुलगी पाहायला गेल्यानंतर एखाद्या मुलाला जर एखादी मुलगी पसंत आली नाही तर तो मुलगा त्या मुलीला नावे ठेवील. तिचे नाक चपटे आहे, ती बारीक आहे अथवा जाड आहे, रंगाने काळी आहे, उंचीला कमी आहे, इत्यादी प्रकारची काहीतरी कमतरता मुलातर्फे त्यावेळी सांगण्यात येते. तसेच मुलीला मुलगा पसंत नसला तर ती सुद्धा अशीच काहीतरी कारणे सांगू शकते.

this is how most indian parents select bride for their son

मुलगा जेव्हा मुलगी पाहातो, तेव्हा तो प्रामुख्याने ह्याकडे लक्ष देतो की मुलगी गोरी, सुंदर, सुशिक्षित आणि शक्यतो नोकरी करणारीही असावी. मुलाच्या परिवारातील जबाबदार लोक किंवा मुलाचे पालक हे पाहातात की वधूच्या पालकांची आर्थिक परिस्थिती कशी आहे? ते आपल्याला हुंड्यामध्ये काय काय देऊ शकतात? मुलाच्या पालकांना असे अजिबात वाटत नाही की, हुंडा न घेता आपल्याला एक चांगली, संस्कारसंपन्न सुगृहुणी सून मिळावी. बऱ्याचवेळा असे होते की, एखादी चांगली रूपवान, गुणी आणि संस्कारसंपन्न मुलगी भेटूनसुद्धा तिचे पालक हुंडा देऊ शकत नसल्यामुळे तिला नापसंत करण्यात येते आणि एखादी सर्व सामान्य दिसणाऱ्या मुलीचे पालक हवा तेवढा हुंडा देण्यात तयार असल्यामुळे तिला मात्र पसंद करण्यात येते. मग ती फारशी गुणवान, अथवा संस्कारसंपन्न नसली तरीही ह्या गोष्टींकडे फारसे लक्ष देण्यात येत नाही. त्याचप्रमाणे एखादी रूपवान गोरी मुलगी सुद्धा तिच्यामध्ये कितीही दुर्गुण असतील तरीही तिला पसंद करण्यात येते. फक्त तिचे पालक मात्र भरपूर हुंडा देणारे असावेत, अशीच मुलाकडील लोकांची अपेक्षा असते.

सध्या आपल्या समाजामध्ये ज्या ठिकाणाहून हुंडा भरपूर मिळेल त्याच परिवारातील मुली सहजपणे पसंद केल्या जातात. आयुष्यभरासाठी सुंदर, गुणी आणि संस्कार संपन्न जीवन संगिणी मिळविण्याऐवजी, वधूची निवड करतांना आपल्या विवाहाच्या निमित्ताने हुंड्याच्या स्वरूपात आपल्याला जास्तित जास्त कशी कमाई होईल? त्याचाच मुलगी पाहतांना जास्तित जास्त लोकांकडून विचार केल्या जातो.

think about these things for selecting bride for your son

वधूची निवड करतांना मुलीचे गुण, स्वभाव, सौंदर्य ह्याचा तर विचार केलाच पाहिजे, त्याचसोबत वधू आणि तिच्या पालकांनी मुलाचे गुण, त्याचे शिक्षण व नोकरी, त्याचा स्वभाव, त्याची आर्थिक क्षमता, त्याचे सुसंस्कार, ह्याचाही विचार केला पाहिजे.

त्याचप्रमाणे मुलीच्या पालकांच्या आर्थिक स्थितीचा विचार न करता, तिच्या घरचे वातावरण, तिच्या घरचे संस्कार, तिचे शिक्षण, तिचे सौंदर्य व सुसंस्कार यासोबतच तिच्या घरच्या सदस्यांसोबतचे तिचे आत्मियता, प्रेम, सद्भाव ठेवून असलेले आपुलकीचे वागणे, त्यांच्या परिवाराशी इतरांचे असलेले चांगले संबंध, ह्या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. स्वतःचा मोठेपणा, श्रीमंतीचा बडेजाव, हुंडा, मानपान ह्या सर्व गोष्टीला तसेच हुंडा किंवा देण्याघेण्याला फारसे महत्व न देता, आपसातील प्रेम, सद्भाव, सुसंस्कार, ह्यासारख्या गुणांना महत्व देऊनच योग्यतेनुसारच अनुरुपतेला महत्व देऊन वधू किंवा वराची निवड करण्यात यावी, असे झाले तरच भावी वधू-वरांचे वैवाहिक जीवन सफल होऊ शकते.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!