आई माझा गुरु, आणि आईच माझा कल्पतरू – साने गुरुजी

Spread the love

आज दि. ६ मे २०१९ रोजी औरंगाबादच्या दैनिक लोकमतमध्ये एक बातमी वाचली. “जन्मदात्रीला घराबाहेर काढले”. जन्मदात्रीचा सांभाळ न करता तिला घराबाहेर हाकलून देणाऱ्या तीन मुलांसह सुनेविरुध्द सिडको पोलिसांनी गुन्हा नोंदविला. त्या वृद्धेची तीन मुले संदीप एकनाथ कोतकर, सचिन एकनाथ कोतकर, सुनील एकनाथ कोतकर आणि सुना आरोपी आहेत. स्वामी विवेकानंद नगरात एक ६० वर्षीय महिला तिची तीन मुले आणि सुनांसह राहाते. मात्र आई, मुले आणि सून यांच्यात सतत वाद होत आहे, त्यामुळे तिन्ही मुले, सुनांनी वृद्धेचा सांभाळ करण्यात नकार देत आईला जेवण देणे बंद केले. शुक्रवारी त्यांनी जन्मदात्रीला घरावाहेर हाकलून दिले. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी वृद्धेने सिडको पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

many people send their parents to old age home after growing up

अशाप्रकारच्या अधून मधून बऱ्याच बातम्या वाचायला मिळतात. अशा घटनांवरून आजकालची तरुण मंडळी किती संस्कार शून्य, स्वार्थी आणि पराकोटीची मतलबी झालेली आहेत हेच दिसून येते. ज्या आई-वडिलांनी त्यांना जन्म दिला, त्यांचे पालन-पोषण आणि शिक्षण करून त्यांनी त्याला मार्गी लावले, त्याच आई-वडिलांना त्यांचीच काही कुतघ्न मुल, आई-वडिलांच्या प्रेमाचे, त्यांच्या त्यागाचे, त्यांच्या परिश्रमाचे मोल विसरून त्यांनाच त्यांच्याच हक्काच्या घरातून घराबाहेर हाकलून देतांना दिसत आहेत. अनेक ठिकाणच्या वृद्धाश्रमात आज अनेक सुशिक्षित, कमावत्या परंतु स्वार्थी, बेईमान आणि कृतघ्न अशा अनेक मुलांचे आई-वडील आपल्या वृद्धपणाच्या निराधार अवस्थेत शेवटच्या घटका मोजत आहेत.

many people kick out their parents from their own home

प्रत्येक आई-वडील आपल्याला मुलं झाले की, त्या मुलाच्या जन्मदिवशी आनंदोत्सव साजरा करतात. त्यांना वाटते हे आपले मुल आपल्या शेवटच्या घटकेचा साक्षीदार असेल. आपल्या म्हातारपणीचा आधार असेल, परंतु संस्कार संपन्न असलेले फारच कमी मुले क्वचितच आपल्या आईवडिलांचा म्हातारपणीचा आधार होतात. आणि बहुतेक सर्व स्वार्थी आणि कृतघ्न मुल सरासरी पंचवीस वर्षानंतर जेव्हा ते काहीतरी नोकरी अथवा उद्योग करायला लागतात, पैसे कमवायला लागतात, तेव्हा ते लग्न करून आपल्या पत्नीला घेऊन वेगळा संसार थाटतात. आपल्या संसारात आपल्या वृध्द आई-वडिलांची काहीच अडचण नको म्हणून ते त्यांना अगदी सहजपणे वृद्धाश्रमात टाकून देतात. वृद्धाश्रमातील प्रवेश आणि तेथील खर्च सुद्धा ही मुल सहन करीत नाहीत, ज्या वृद्धांना पेन्शन मुळात आहे अशीच काही वृध्द मंडळी वृद्धाश्रमात राहातात. त्यांच्या त्या पेन्शन मधूनच ते त्या वृद्धाश्रमाची फीस जमा करतात, अन्यथा अनेक मंदिराच्या समोर, तीर्थस्थानावर, शासकीय रुग्णालयासमोर अथवा बस स्टॅंड किंवा रेल्वे स्टेशनवर किंवा एखाद्या वृक्षाच्या सावलीत निराधार असलेली अशी अनेक वृद्ध मंडळी आपल्याला अत्यंत असहाय्य आणि बेसहारा अवस्थेत भिक मागून जगतांना दिसतात.

ह्या वृध्द मंडळींशी तुम्ही आपुलकीन संवाद साधण्याचा प्रयत्न करा, ते तुम्हाला सांगतील की, त्यांच्या मुलाने व सुनेने त्यांना त्यांच्या स्वतःच्याच घरातून कशाप्रकारे हाकलून दिलेले आहे.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक वृद्धाचे आयुष्य सरासरी साठ ते पासष्ट वर्षापर्यंतच असते. ह्या वृद्धाच्या सुरुवातीचा तरुणपणाचा काळ त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा काळ असतो. त्यावेळी त्यांची नोकरी किंवा त्यांचा जो काही व्यवसाय असतो, तो व्यवसाय व्यावस्थित चालू असतो. जेव्हा त्यांना मुल-मुली होतात तेव्हा त्यांच्या संगोपनात, बालपणात, आजारपणात त्यांच्या शैक्षणिक काळात जमेल तसे आपल्या उत्पन्नातील मोठी रक्कम त्यांच्यासाठी आनंदाने खर्च करून ते त्यांच्या मुला-मुलींना वाढवितात. ह्या रकमेत ते स्वतःची काहीही अतिरिक्त हौस, मौज करीत नाहीत. तो सर्व पैसा ते मुलांवरच खर्च करतात. कमी पडले तर कर्ज काढून, दुसऱ्यांकडून उसने घेऊनही ते खर्च करतात. असा खर्च करून ते आपल्या मुलांना शिकवितात. त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, ह्याकरिता त्यांना सक्षम बनवितात. त्यांच्या बालपणापासून म्हणजेच जेव्हा ते अगदी निराधार असतात, तेव्हापासून त्याचे आई-वडीलच त्याला आधार देऊन, त्याला शिक्षण शिकवून जगात सक्षमपणे उभे करतात. वयाच्या सरासरी पंचविसाव्या वर्षी तो मुलगा कुठेतरी नोकरी किंवा व्यवसाय करू लागतो. थोडी फार कमाई करू लागतो.

how the behaviour changes of your kids after they grow up

तेव्हाच त्याला प्रथम ही जाणीव होते की, “मी आता व्यवसायाला अथवा काम धंद्याला लागलो आहे. मी आता स्वतः काहीतरी कमवायला लागलो आहे, ही माझी स्वतःची कमाई आहे. ही माझी कमाई मी मला हवी तशी खर्च करू शकतो.” आपली कमाई आपल्या आई-वडिलांनी घेऊ नये, म्हणून तो अतिशय दक्ष आणि सावध असतो. मला आता आई-वडिलांची गरज राहिलेली नाही असे तो समजतो. ज्यांनी आपल्याला घडविले आहे, अशा आपल्या आई-वडिलांनाच तो आता अत्यंत मूर्ख समजत असतो. मग तो लग्न करतो आणि त्याच्या पत्नीला घेऊन स्वतंत्रपणे वेगळे राहू लागतो. आपल्या ह्या घर संसारात त्याला आता आपल्या आई-वडिलांची अत्यंत अडचण वाटू लागते. त्यांचा खर्च आता आपण विनाकारण का सहन करावा? आपल्यालाही आपले आयुष्य, आपले कुटुंब, आपले जीवन आहे, असा तो विचार करू लागतो.

अशा परिस्थितीत त्याच्या आई-वडिलांना काही आर्थिक उत्पन्न असले तर ठीक, त्यावर त्यांचा खर्च चालत असतो आणि त्यांना दुर्दैवाने जर काहीच उत्पन्न नसले तर मग त्यांची मुलेच त्यांना त्यांच्या हक्काच्या घरातून बाहेर हाकलून देत असतात.

how life of mother changes when their son gets married

योगायोगाने वडिलांचे वय थोडे जास्त असल्यामुळे साठ-पासष्टच्या दरम्यान त्यांचा वृध्दपणामुळे मृत्यू होतो. ते ह्या चक्रव्युहातून सुटतात, परंतु त्यांची पत्नी किंवा त्यांच्या मुलांची आई मात्र जिवंत असल्यामुळे मुलाच्या आणि सुनांच्या घरी धुणे धुणे, भांडी घासण्याचे, स्वयंपाक करण्याचे तसेच त्यांची मुलं सांभाळण्याचे काम एका बिनपगारी नोकराणीप्रमाणे नाविलाजाने करीत असते.

जी आई आपल्या वृद्धपणामुळे, आपल्या मुलांच्या घरी काहीही काम करू शकत नाही, त्या त्यांच्या आईला फुकटात खाऊ पिऊ घालून, तिचा सांभाळ करण्यात ती मुल नकार देतात आणि तिला आपल्या घराच्या बाहेर हाकलून देतात. अशा दुर्दैवी घटना आपल्या समाजात सध्या घडत आहेत, हेच आजच्या बातमीवरून दिसून येते.

आपल्या मुलाच्या जन्मापासून तर तो मुलगा पंचवीस वर्षाचा होईपर्यंत म्हणजेच तो नोकरी, व्यवसायाला लागेपर्यंत त्या मुलाचे आई-वडील अगदी आनंदाने, आपले सर्वस्व अर्पण करून त्याचे पालनपोषण व शिक्षण करीत असतात. त्यावेळ पर्यंत त्या मुलाच्या आई-वडिलांचे वय जवळपास साठ-पासष्ट वर्षाचे झालेले असते. त्यापुढील दोन ते पाच वर्षात त्यांचा हमखास वृद्धपणामुळे मृत्यू होणारच असतो. परंतु ज्या मुलांचे त्यांनी पंचवीस वर्षे संगोपन केलेले असते, ती मुले त्यांच्या साठ वर्षाच्या वृध्द आई-वडिलांना पुढील दोन ते पाच वर्षेपर्यंतही सांभाळण्यास अजिबात तयार नसतात. आता लवकरात लवकर त्यांचा मृत्यू कसा होईल? कोणत्याही अडचणी शिवाय आपल्याला त्यांच्या घरात आनंदाने कसे राहाता येईल? ह्याचाच विचार आजकालची तरुण मुले करीत असतात.

आपले आई-वडील वृध्द झाल्यामुळे त्यांच्या स्वाभाविक मृत्यूमुळे त्यांचे लवकर निधन होत नसेल तर मग ते आपल्या त्या वृध्द आणि निराधार आई-वडिलांचा छळ करून त्यांना घराबाहेर हाकलून देतात. त्यांच्यापैकी कुणातरी एकाला पेन्शन वगैरे मिळत असेल तर मग त्या पेन्शनच्या खर्चातच, दोघांनाही ते वृद्धाश्रमात दाखल करतात. समाजातील अशा घटना म्हणजे, सामाजिक नितीमुल्ये वेगाने घसरत चालल्याची ही सर्व लक्षणे आहेत.

kids of new generation

हे सर्व कशामुळे होत असावे? आजकालच्या तरुण मुलांना वाचनाची अजिबात आवड राहिलेली नाही. अभ्यासाच्या पुस्तकांशिवाय फार तर चारसहा मनोरंजक कादंबऱ्या कदाचित त्यांनी वाचल्या असण्याची शक्यता आहे. आपले विचार, आपले संस्कार तसेच आपले व्यक्तिमत्व प्रगल्भ होण्यासाठी अनेक मोठ्या विचारवंत लोकांच्या साहित्याचे वाचन करावे लागते. एवढी मोठी पुस्तके एकाग्रतेने वाचणे हे कोण लुंग्यासुंग्याचे काम नाही. एखाद्या पुस्तकाची सलगपणे दहा पाने वाचणेही आजकालच्या तरुण-तरुणींना फारच अवघड काम वाटत असते. त्यामुळे त्यांच्यामध्ये चांगल्या विचारांची, चांगल्या संस्कारांची रुजवणूक कधीच झालेली नसते.

आपल्या पालकांसोबत तसेच इतरांसोबतही कसे वागावे? कसे बोलावे? त्यांच्याप्रती आदर कसा बाळगावा? त्यांच्याप्रती आपली कर्तव्ये काय आहेत? आपण आज जे काही आहोत ते कुणामुळे आहोत? ह्याचीही ह्या तरुण मंडळींना जाणीव नसते. त्यांना वाटते आपण जन्म घेतला त्यानंतर आपण आपल्या स्वतःच्याच कर्तुत्वाने पुढे आलो आहोत. आपण स्वतःच आपली प्रगती केलेली आहे. आपल्या आई-वडिलांचा आपल्या ह्या प्रगतीमध्ये कोणताही सहभाग नाही. उलट त्यांच्या गरिबीच्या आर्थिक परिस्थितीमुळेच आपण ह्यापेक्षा जास्त प्रगती करू शकलो नाहीत, वगैरे वगैरे…..

shamchi aai book by sane guruji
image by – https://www.bookganga.com

ह्या सर्व गोष्टी आणि तरुण मुलांची अशी विचारसरणी असल्यामुळेच ही तरुण मुले आपल्या आई-वडिलांना घराबाहेर हाकलून देण्याच्या मनस्थितीत असतात.  आपल्या आई-वडिलांना घराच्या बाहेर हाकलून देणाऱ्या तरुणांनी त्यांच्या लहानपणी साने गुरुजींचे “शामची आई” हे पुस्तक कधीच वाचलेले नसते. हे पुस्तक केवळ लहान मुलांनीच नव्हे तर सर्वांनीच वाचावे, तरच त्यांना आपल्या आई-वडिलांची महती आणि प्रेम कळून येईल.

“शामची आई” ह्या साने गुरुजींच्या पुस्तकासंबंधी आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेमधील खालील काही ओळी वाचल्यानंतर त्या पुस्तकाची महती आपणास कळून येईल. आचार्य अत्रे म्हणतात की, “मराठी भाषेत साने गुरुजींनी “शामची आई”मध्ये मातृप्रेमाचे जे महान स्तोत्र रचून ठेवले आहे, असे अतीव माधुर्याने आणि मांगल्याने ओथंबलेले महाकाव्य दुसऱ्या कोणत्याही वाड:मयात असेल, असे मलाच मुळीच वाटत नाही.

मातेचे प्रेम हे सर्व प्रेमांत थोर आहे. ममतेची ती गंगोत्रीच आहे, म्हणतात. बाकीच्या सर्व प्रेमांचा उगम मातृप्रेमातूनच होतो. जगात पुष्कळ मुलांचे आपल्या आयांवर प्रेम असेल. आईवर कोणाचे प्रेम असत नाही? पण साने गुरुजींनी आपल्या आईवर जसे प्रेम केले, तसे मात्र कोणत्याही मुलाने आपल्या आईवर केले असेल असे वाटत नाही. गुरुजींनी एवढे प्रेम करावे, अशाच योग्यतेची त्यांची आई होती. त्याखेरीज का गुरुजी एवढे मोठे झाले? गुरुजींना त्यांच्या आईनेच मोठे केले, तर गुरुजींनीही आपल्या आईला मोठे करून तिचे ऋण फेडले. एवढे मोठे केले की, ती आता केवळ गुरुजींचीच आई राहिलेली नाही, तर महाराष्ट्रातल्या, नव्हे भारतातल्या सर्व मुलांची ती आता आई झालेली आहे.

‘शामची आई’ ह्या पुस्तकातील प्रत्येक अक्षरन अक्षर गुरुजींनी गहिवरलेल्या अंत:करणाने आणि डबडबलेल्या डोळ्यांनी लिहिलेले आहे. त्यातील प्रत्येक वाक्यन वाक्य दाटून आलेल्या गळ्यातून अन दाबून ठेवलेल्या हुंद्क्यातून निर्माण झालेले आहे, त्यामुळे कोरड्या डोळ्यांनी आणि कोरड्या हृदयाने हे पुस्तक वाचणे अगदी अशक्य आहे. कोणत्याही पानावरचे कुठलेही वाक्य काढले तरी टचकन डोळ्यात पाणी येते. नाशिकच्या तुरुंगात असतांना दिवसा काम करून अवघ्या पाच दिवसात रात्री त्यांनी हे पुस्तक लिहून काढले.

गुरुजींच्या सवंगड्यांनी त्यांना विचारले, “गुरुजी, तुमच्या जीवनात हा कस्तुरीचा सुंगंध कोठून आला? तुमच्यामध्ये ही सेवावृत्ती आणि ही निरहंकारीता कशी निर्माण झाली?”

गुरुजी अश्रुपूर्ण नेत्रांनी म्हणाले, “गड्यांनो हे सारे माझ्या आईचे देणे आहे बरे. आई माझा गुरु आणि आईच माझा कल्पतरू. गाईगुरांवर फुलापाखरांवर, झाडामाडांवर प्रेम करायला तिने मला शिकविले. कोड्यांचा मांडा करून कसा खावा अन अगदी गरीबीतही आपले स्वत्व न गमावता कसे राहावे? हे तिने मला शिकविले.”

आपल्या मुलांचे संगोपन कसे करावे? ही कला गुरुजींच्या आईला फार चांगली माहित होती. सूर्यचंद्राच्या किरणांनी जशी कमळे फुलतात, तशा आईबापांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळ्या फुलतात, हे तिला माहित होते. गुरुजींच्या जीवनाचा झरा शक्य तितका निर्मळ ठेवण्याची आटोकाट काळजी तिने घेतली. अश्रूंचा गुरुमंत्र तिनेच गुरुजींना दिला. शरीर अन कपडे, फार झाले तर साबणाने स्वच्छ होतील; पण मन कशाने स्वच्छ करता येईल?, अश्रूंनी. म्हणून अश्रुंचे हौद परमेश्वराने डोळ्याजवळ भरून ठेवले आहेत. पण त्याची कोणाला आठवण आहे? बारक्या सारक्या दुःखासाठी लोक पसापसा अश्रू ढाळतात. पण आपले मन निर्मळ नाही, म्हणून रडणारे भाग्यवान ह्या जगात कितीसे आहेत? निस्वार्थी सेवेचे अन आत्मार्पणाचे धडेही गुरुजींना आईनेच दिले. त्यांची आई म्हणे, “अरे, आपल्याजवळ जे असेल, ते दुसऱ्यास द्यावे. दुसऱ्याचे अश्रू थांबवावे. त्याला हसवावे आणि सुखवावे. ह्या आनंदासारखा आनंद नाही.” जगाला सुधारून सुखी करावयाचे, गुरुजींच्या आईजवळ इतके सोपे आणि साधे तत्वज्ञान होते; “उगीच खोलात कशाला शिरावयाचे? आपल्याला करता येईल ते करावे, दगड उचलावा, काटा बाजूला फेकावा, फुलझाडे लावावे, रस्ता झाडावा, कोणाजवळही गोड बोलावे, आजाऱ्याजवळ बसावे, रडणाऱ्याचे अश्रू पुसावेत. अरे, दोन दिवस तर जगात राहावयाचे आहे!”, मनुष्य अन्नावाचून जगेल; पण प्रेमावाचून जगणार नाही. ही गुरुजींच्या हृदयातली प्रेमाची भूक त्यांच्या आईने उत्पन्न केली. प्रेम हे जीवनाचे तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान ते काय साधूसंतांपासून शिकले म्हणता की काय? छे! आईपासून. गुरुजींच्या ह्या प्रेमाची तऱ्हाही निराळीच होती. ते म्हणत, “प्रेम घेण्यापेक्षा प्रेम देण्यात आनंद आहे. लहान अंकुराला जर प्रेमाने वाढविले तर तो मोठा होतो आणि हजारोंना प्रेम देतो. ज्यांना बालपणी प्रेम मिळाले नाही त्यांना जगास प्रेम देता येत नाही, ते जीवनात कठोर होतात”. प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे अन जगाला सुखी करून सोडावे. ही प्रेमाची धुळाक्षरे गुरुजी आपल्या आईच्या भोवती रांगता रांगता अन खेळता खेळताच लहानपणी शिकले होते.

‘शामची आई’ ह्या पुस्तकात अनेक संस्काररत्ने जागोजागी विखुरलेले आहेत. ती किती किती वेचावित आणि किती किती मनात साठवावीत!”

ज्यांना ही संसाररत्ने वेचता येतील आणि मनात साठविता येतील ते खरोखरच संस्कारसंपन्न होण्याची शक्यता आहे. ही संस्काररत्ने ज्यांना ज्यांना वेचता येतील, आणि मनात साठवून ठेवता येतील केवळ तीच मुळे-मुली आपल्या आई-वडिलांना प्रेम देऊन त्यांच्या प्रती कृतज्ञ राहून, त्यांचा मानसन्मान ठेवून, त्यांच्या वृध्दपणाचा आधार होण्याची शक्यता आहे.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com


Spread the love

One thought on “आई माझा गुरु, आणि आईच माझा कल्पतरू – साने गुरुजी

  • May 7, 2019 at 1:53 pm
    Permalink

    Nice i like the given text

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: