आपल्याला मदत करणाऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करा

Spread the love

समाजातील कितीतरी लोक आपल्या परिचयाचे असतात. त्यातील काही आपले नातेवाईक असतात, तर काही लोकांशी आपला काहीतरी कामानिमित्त परिचय होतो. त्यांच्यापैकी अनेकांच्या आपल्यासोबत वारंवार भेटीगाठी होतात. त्यांच्यापैकी कुणालातरी आपला स्वभाव आवडतो आणि आपल्यालाही त्यांचा स्वभाव आवडतो, त्यामुळे त्यांच्यासोबत आपले थोडे अधिकच जवळचे संबंध निर्माण होतात. त्यामुळे त्यांच्याशी आपली चांगलीच मैत्री होते. त्यांचे आपल्या घरी व आपले त्यांच्या घरी येणे जाणे होऊ लागते. ( जाणून  घ्या, खरी मैत्री, कशी असते? )

friendship fades with the time

काही काळानंतर परिस्थिती बदलल्यामुळे अथवा आपल्या कामधंद्याच्या निमित्ताने किंवा इतरही काहीतरी कारणामुळे आपल्या त्यांच्यासोबत आता पहिल्यासारख्या भेटीगाठी होत नाहीत. हा भेटी गाठीचा कालखंड वाढत वाढत जातो, दर महिन्यात न चुकता पूर्वी दहा वेळा तरी भेटी होत असत, आता मात्र क्वचितच प्रसंग वर्षा-दोन वर्षातून भेट होत असते. ह्या भेटीतील कालखंड वाढल्या मुळे आप-आपसातील स्नेहाची, जिव्हाळ्याची, आत्मियतेची तसेच मैत्रीची भावनाही आता हळू हळू कदाचित लोप पावत असते. केवळ त्या पूर्वीच्या भेटी गाठींच्या आणी त्या व्यक्तींच्या स्मृतीच नंतर आपल्या मनामध्ये शिल्लक असतात.

as the time passes people forget calling their friends

आजकाल प्रत्येकाजवळ मोबाईल असून सुद्धा अशा जुन्या ओळखी किंवा पूर्वीचे जुने मैत्रीचे संबंध जपण्यासाठी कुणीही एकमेकांना कामाशिवाय सहजपणे फोन करू इच्छित नाही, किंवा बोलू इच्छित नाही. कारण आपल्या कार्याचे क्षेत्र बदलले की त्या व्यक्तीची अथवा त्याने आपल्याशी त्यावेळी केलेल्या मैत्रीची आठवण विसरून जाण्यातच अनेक लोक धन्यता मनात असतात. त्यावेळी काहीतरी कामानिमित्त ते आपल्या संपर्कात येत होते, आता त्यांचे आपल्याशी काहीही काम पडत नसल्यामुळे आपण कदाचित त्यांच्या स्मृतीतून नामशेष अथवा “डिलीट” झालेलो असतो.

अशाच एका जुन्या मित्राचा दोन-तीन वर्षांपूर्वी मला फोन आला होता. मधुमेहाच्या गंभीर आजारपणामुळे ते अतिशय गांजलेले होते. एका पायाच्या बोटांना गँगरीन झाल्यामुळे त्यांचा एक पाय गुडघ्यापासून कापण्याचा सल्ला त्यांना एका डॉक्टरांनी दिला होता. माझ्या चांगल्या परिचित असलेल्या डॉक्टरांमार्फत हे कार्य चांगल्या प्रकारे करून घेता येईल काय? ह्याबद्दल त्यांनी माझ्याकडे त्यावेळी चौकशी केली होती.

operation process

जुन्या मैत्रीचे संबंध असल्यामुळे, मी त्यांना माझ्या जवळच्या चांगल्या परिचित असलेल्या मोठ्या डॉक्टरांमार्फत शासकीय योजनेतून एका मोठ्या धर्मादाय रुग्णालयात त्यांच्यावर पूर्ण उपचार मोफत करून दिले होते. औषधीही त्यांना अर्ध्या किमतीत देण्यात आली होती. त्यांचा पाय गुडघ्यापासून न कापता व्यावस्थित उपचार झाल्यामुळे केवळ त्या एका पायाचे पाच बोटेच कापून त्यांच्यावर जवळपास सात ते आठ महिन्यांच्या काळात तीन वेळा शस्त्रकीया करावी लागली होती, त्यानंतरच तो पाय पूर्णपणे बारा झाला. ह्या आठ महिन्याच्या काळात दोन-तीन दिवसानंतर त्यांच्या भेटीला जाणे, त्यांच्या उपचारार्थ डॉक्टरांना भेटणे, त्यांच्याकडून व्यावस्थित उपचार करवून घेणे, ह्याकरिता मला तिथे कितीतरी वेळा एक एक-दोन दोन, तीन तीन तसाही थांबावे लागत असे. मित्रप्रेम म्हणून मी सुद्धा तिथे थांबत असे. (येण्याजाण्यात माझे पेट्रोल खर्च होऊ नये म्हणून त्यांची मुळे माझ्या गाडीत पेट्रोल टाकून देत असत) ह्या सर्व उपचारानंतर ते बरे झाले, आपल्या घरी गेले. परंतु त्यानंतर कधीही त्यांनी अगदी सहजपणे मला फोन करण्याचा प्रयत्न केला नाही. मीच कधी तरी त्या भागात काही कामानिमित्त गेल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन अधून मधून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करीत असे.

मी दाखविलेल्या ह्या आत्मियतेबद्दल अथवा मैत्रीच्या भावनेबद्दल कधीही त्यांनी माझ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला नाही, असे मला जाणवले. एवढेच नाही तर आपले काम झाल्यानंतर त्यांनी स्वतः होऊन त्यानंतर कधीही फोन सुद्धा करण्याचा प्रयत्न केला नाही. ( योग्य वेळी, योग्य पद्धतीने, इतरांचे आभार यामुळे  व्यक्त  केले  पाहिजे )

आपल्या दुःखात आपल्याला सर्वतोपरी निस्वार्थ भावनेने स्वतः वेळोवेळी उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्या आपल्या मित्राबद्दल काम झाल्यानंतर कोणत्याही प्रकारे कृतज्ञता व्यक्त न करणे म्हणजे आपण दाखविलेल्या त्या आत्मियतेची अथवा आपण त्यांच्याप्रती व्यक्त केलेल्या मैत्रीच्या भावनेची जाणीव न ठेवण्यासारखीच ही गोष्ट होती. मग मी सुद्धा त्यांना स्वतःहोऊन कधीही फोन करण्याचा प्रयत्न केला नाही.

people get away from each other when they stop calling each other

जेव्हा आपल्याला कुणाचा तरी सहजपणे केलेला एक साधा फोन येतो, तेव्हा त्या व्यक्तीला आपली आठवण झालेली आहे, हे पाहून आपल्याला निश्चितपणे आनंद होत असतो. विशेष हे की, ज्यांना आपण आपल्या जवळचे समजतो, त्यांनी आपल्याला सहजपणे एक साधा फोनही कधी करू नये, ह्याचेही आपल्याला आश्चर्य वाटत असते. अशाप्रकारे सहजपणे फोन न करणे म्हणजे त्यांना आपल्याबद्दल आत्मियता, जिव्हाळा अथवा मैत्रीची कोणतीच भावना नसणे, असाच त्याचा सरळ अर्थ होत असतो. त्यावेळी त्यांच्या पायांच्या बोटांवर ज्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या  होत्या, त्यानंतरच्या दोन-तीन वर्षांत त्यांचा सहजपणे मला फोन वगैरे कधीच आला नाही. कदाचित त्यामुळे त्यांच्या मनातील माझ्या संदर्भातील आत्मियतेची, जिव्हाळ्याची अथवा मैत्रीची भावनाही कदाचित संपली असावी, असे मला वाटले.

तीन वर्षानंतर त्यांचा अचानक एका दिवशी मला फोन आला, ते म्हणाले, “आता माझ्या दुसऱ्या पायाचेही बोटे पूर्वीप्रमाणेच गँगरीनमुळे सडलेले आहेत आणि आता ती बोट सुद्धा शस्त्रक्रिया करून काढून टाकायची आहेत. त्याकरिता माझ्या एका जवळच्या मित्राने त्यांच्या परिचयातील एका डॉक्टरांना फोन केला होता. त्या डॉक्टरांनी एका दुसऱ्या मोठ्या डॉक्टरांच्या नावे चिठ्ठी दिलेली आहे. ती चीठ्ठी घेऊन माझे एक मित्र मला त्यांच्या कारमध्ये त्या डॉक्टरांकडे घेऊन जात आहेत. तेव्हा तुम्ही आज अकरा वाजता त्या ठिकाणी रुग्णालयात या, जर तिथे माझे काम नाही झाले तर कदाचित मला तुमच्या मदतीची गरज पडू शकेल”

मी त्यांना सांगितले की, “एका डॉक्टरांनी तुम्हाला दुसऱ्या डॉक्टरांच्या नावाने चीठ्ठी दिलेली आहे. शिवाय तुमचे जवळचे मित्र तुमच्या सोबत आहेतच, त्यामुळे आता तुम्हाला माझ्या कोणत्याही मदतीची गरज पडणार नाही. शिवाय आज माझ्या मुलीची दहावीची परिक्षा असल्यामुळे मला येता येणार नाही. तुम्हाला काही अडचण आलीच तर तुम्ही मला पुन्हा नंतर फोन करा आपण नंतर बघू”

हे एकूण त्यांनी “काय मग तुम्ही येत नाही काय?” असे म्हणून थोडा नाराजीनेच फोन ठेवून दिला, नंतर त्यांचे काय झाले, हे त्यांनी मला एक साधा फोन करूनही पुन्हा कधीच कळविले नाही. कदाचित त्यांची शस्त्रक्रिया वगैरे व्यावस्थित झाली असावी, म्हणूनच त्यासंदर्भात मला काहीही कळविण्याची त्यांना गरज पडली नसावी. त्या घटनेला आता एक-दोन महिने झालेले आहेत. त्यानंतरही त्यांचा मला कधीच फोन आलेला नाही.

हे सर्व सांगण्याचे तात्पर्य असे की, आपल्या जीवनात, आपल्या अत्यंत अडचणीच्या वेळी कुणीतरी मित्र आपल्याला मदतीचा हात देतो. त्या प्रसंगी त्याने आपल्याला केलेली मदत आपल्याकरिता फार मोठी असते. त्यामुळे आपण अशा मदतीबद्दल आपल्या त्या मित्रांच्या अथवा आपल्याला मदत करणाऱ्या त्या व्यक्तीच्या प्रती विशेष जाणीव ठेवून, अत्यंत कृतज्ञतेने त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्यांना आपल्या शेजारी बसवून आत्मियतेने एकदातरी आपल्या घरी जेवू घातले पाहिजेत. तुमची ही क्रिया सुद्धा त्यांच्याबद्दल तुमच्या मनात असलेली कृतज्ञतेची, आत्मियतेची व मैत्रीची भावना व्यक्त करण्याकरिता पुरेशी असते.

ह्याखेरीज आपल्याशी आत्मियता बाळगणाऱ्याना दुसरी कशाचीही कधीच अपेक्षा नसते. त्यावेळी त्या जेवणाला महत्व नसून त्या मागील कृतज्ञतेच्या भावनेलाच विशेष महत्व असते. ज्यांच्यामध्ये मनाचा एवढाही मोठेपणा दिसून येत नाही, त्या व्यक्ती प्रती लोकांची आत्मियतेची भावना राहात नाही. अशा चुका अनेक लोक करीत असतात, समाजात वावरतांना योग्य वेळी, योग्य तर्हेने आपल्याला मदत करणाऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करा, त्यामुळेच आपल्याला मदत किंवा सहकार्याची गरज भासल्यास लोक आपल्याला पुन्हा आनंदाने स्वतःहोऊन मदत करण्यास तयार राहातील. अन्यथा लोक आपल्यापासून दूर व्हायला काहीच वेळ लागणार नाही.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

One thought on “आपल्याला मदत करणाऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!