पैशांच्या चुकीच्या व्यवहारामुळे जवळची नातीही संपतात

Spread the love

कोणत्याही एखाद्या मोठ्या व्यवहारात, विशेषतः आर्थिक बाबींसंदर्भात कुणावर विश्वास ठेवावा, अशी सध्या परिस्थितीच राहिलेली नाही. कोणतेही आर्थिक व्यवहार अत्यंत सावधगिरीने अथवा जपूनच केले पाहिजेत. एखाद्या व्यक्तीशी जर कधी मोठ्या रकमेचा आर्थिक व्यवहार करायची वेळ तुमच्यावर आली तर केवळ त्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार केला तर वेळप्रसंगी त्याची नियत बदलेल आणि तो व्यक्ती विविध प्रकारची खोटी करणे सांगून तुम्हाला पैसे देण्यास टाळाटाळ करील, त्यामुळे तुम्हाला तुमच्या हक्काचा पैसा असूनही वेळेवर मिळणार नाही.

don't give money without any written receipt

आजच सकाळी एका व्यक्तीशी भेट झाली. तेव्हा त्याने सांगितले की, वीस वर्षापूर्वी त्याने त्याच्या सासऱ्याकडून चार एकर शेती खरेदी केली होती. त्यावेळेस ती शेती ऐंशी हजार रुपयांमध्ये खरेदी केली होती, आता स्वतःचा सासराच आहे म्हणून या जावयाने त्या सासऱ्याला कागदपत्रे तयार करण्याअगोदरच पूर्ण पैसे दिले आणि लवकरच एका महिन्यात मी तुम्हाला खरेदीची कागदपत्रे तयार करून देतो, त्यासंदर्भात काही कागदपत्रे तयार करणे आहेत त्यानंतरच रजिस्ट्री करता येईल, असे त्यांना त्यांच्या सासऱ्याने आश्वासन दिले होते. नंतर दर वेळेस काही न काही तरी कारणे सांगून ते खरेदीची कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करू लागले. शेवटी ही टाळाटाळ आणि बहानेबाजी वीस वर्षे पर्यंत चालली, मग जावयांनी सासऱ्यांना आणि इतरही काही नातेवाईकांना एका बैठकीत आमंत्रित केले. तिथे सर्वासमक्ष फिर्याद मांडली, मग आता वीस वर्षापूर्वी ऐंशी हजारात खरेदी केलेल्या चार एकर शेतीची किंमतही आता दहा लाख रुपये एकर झाली होती. चार एकर शेतीची किंमत आता चाळीस लाख रुपये झाली होती. त्यामुळे त्या व्यक्तीचे सासरे आणि त्यांची पाच मुले ह्या जावयांना शेती खरेदीची कागदपत्रे तयार करून देण्यास तयार नव्हती.

sometimes you have to send the notice by the lawyer to people

मग शेती नावावर करून देत नसाल तर मग आजच्या बाजार भावाप्रमाणे शेतीची जी काही किंमत होत असेल तेवढी रक्कम मला देण्यात यावी, अशी मागणी जावयांनी केली. मग शेवटी चाळीस लाख रुपयांऐवजी एकूण दहा लाख रुपये देण्यास सासरे तयार झाले. त्यापैकी एक लाख रु. नगदी देऊन उरेलेल्या रकमेचे चेक देण्याचे ठरले, त्यानुसार एक साडेसात लाख रुपयांचा चेक आणि एक दीड लाख रुपयांचा चेक जावयांना देण्यात आला. साडे सात लाख रुपयांचा चेक एक वर्षानंतर टाकण्यात यावा, त्यानंतर पुढच्या एक वर्षानंतर राहिलेला दीड लाख रुपयांचा चेक टाकण्यात यावा, असे त्यावेळी ठरले. एक वर्षानंतर जेव्हा पहिला चेक टाकला तेव्हा तो न वटता परत आला. आता जावयांनी त्या चेक संदर्भात सासऱ्यांवर १३८ प्रमाणे चेक बाउंसची केस टाकण्याकरिता एका वकिलांमार्फत सासऱ्यांना पोस्टाने नोटीस पाठविली आहे.

court case by lawyers

सासऱ्यांनी नोटीस स्वीकारलेली नाही, त्यामुळे ती परत आलेली आहे. आता ह्यानंतर पुन्हा नोटीस पाठविण्यात येईल. काही महिने किंवा काही वर्षे कोर्टात ती केस चालेल, सासऱ्यांची मुले म्हणजेच ह्या जावयाचे मेव्हणे त्या केसच्या तारखाही बऱ्याच काळपर्यंत वाढवून घेतील. ज्यांना कोर्टाचा अनुभव आहे त्यांना माहित आहे की तारखी वाढवून घेण्यासाठी काय करावे लागते? तारखी वाढवून देणाऱ्या व्यक्तीला थोडी फार रक्कम दिली की लगेच पुढील तारीख देण्यात येते. तारीख वाढल्यामुळे वकिलांनाही दर तारखेला आपल्याकडे केस दाखल करणाऱ्या व्यक्तीकडून काही ना काही तरी रक्कम घेता येते. तारखी वाढतच जातात, त्या दरम्यान पंच्याहत्तर पेक्षाही अधिक वय असलेल्या सासऱ्यांचा वृद्धापकाळामुळे एखाद्या दिवशी सहजपणे मृत्यूही होऊ शकतो.

अशा परिस्थितीत मृत झालेल्या व्यक्तीकडून रक्कम वसुली करण्याचा आदेश कोणत्याही कोर्टाचे न्यायाधीश देऊ शकत नाहीत. एवढेच नाही तर मृत व्यक्तीला वर्षभर जेलमध्ये ठेवण्याचाही आदेश न्यायाधीश देऊ शकत नाहीत.  त्यासोबतच एका व्यक्तीने रक्कम घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या मुलांकडून अथवा इतर नातेवाईकांकडूनही त्या रकमेच्या वसुली करिता न्यायाधीश आदेश देऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत ती रक्कम बुडण्यातच जमा असते. पैशांच्या बाबतीत इतरांवर केवळ विश्वास ठेवण्याबद्दल त्या जावयाला आता एवढी मोठी रक्कम बुडण्याची शिक्षा मिळण्याची शक्यता आहे.

हे सर्व सांगण्याचे तात्पर्य असे की, कोणताही व्यक्ती असो, कितीही विश्वासपात्र व्यक्ती असो, कोणत्याही व्यवहाराच्या काही पद्धती असतात. त्या त्या पद्धतीनुसारच ते ते व्यवहार करण्यात आले पाहिजेत अन्यथा पैशामुळे आप-आपसातील नातेही संपून जाते. सध्या त्या जावयाचे, सासऱ्यांचे व त्यांच्या मुलांचे आप-आपसातील नाते पूर्णपणे संपलेलेच आहे. मुलगी सुद्धा ह्या व्यवहारात आपल्या वडिलांना आणि भावांना दोष देत आहे. तिने सुद्धा या मंडळींशी नाते संपविले आहे. नाते संपवूनही ते पैसे परत मिळतील अशी शक्यता त्यांना वाटत नाही.

एकमेकांशी बोलणे, एकमेकांच्या घरी जाणे-येणे, हे सर्व पैशांचा व्यवहार झाल्यानंतर काही वर्षातच बंद झालेले आहे. आपला सासराच आहे, आपले पैसे कुठे जातील? आपल्याला त्यांनी त्यावेळी एका महिन्यात शेती नावी करून देतो, असे सांगितले होते. ते शब्द कसे काय बदलतील? असा जावयांचा सुरवातीच्या काही वर्षापर्यंत तरी त्यांच्यावर विश्वास होता, आता गेल्या अनेक वर्षात सासऱ्यांना जमीन नावी करण्याचा तगादा लावून लावून ते थकलेत. शेवटी एकदाचा सोक्ष मोक्ष लावूनच टाकूया, असे म्हणून ते सासरे आणि त्यांची पाच मुळे जावयांना म्हणाले “समजा आम्ही आता जमीन तुमच्या नावी करून दिलीच नाही, तर तुम्ही काय करणार?” ( अशाप्रकारे अनीतीने मिळविलेल्या संपत्तीने हे दुष्परिणाम होतात )

आता ह्यावर काय काय करता येईल? याचाच जावई सध्या विचार करीत आहे. ह्यापुढे कुणावरही आर्थिक बाबतीत विश्वास करायचाच नाही, अशी त्यांना शिकवण मिळालेली आहे. परंतु ह्या शिकवणीकरिता एवढी मोठ्या रकमेची फीस देणे त्यांना कधीच परवडणार नाही.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!