बारावी उत्तीर्ण झालेल्या गोरगरीब परिवारातील विद्यार्थ्यांचेच अभिनंदन

Spread the love

नुकताच २८-०५-२०१९ रोजी बारावीचा निकाल लागला. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ज्यांना शिकण्याकरिता सर्वच प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत, त्याशिवाय महागड्या कोचिंग क्लासेस मध्ये ज्यांनी आपली नावे दाखल केलेली होती, ज्यांच्याकडे ट्युशन क्लासमध्ये जाण्याकरिता टू व्हिलर बाईक होती, तसेच हवी ती पुस्तके, गाईड्स किंवा नोट्स सुद्धा त्यांना सहजपणे विकत घेता येत होत्या, असे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत जरी विशेष गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झाले असतील तरीही त्यांचे फारसे कौतुक करण्यासारखी ही गोष्ट अजिबात नाही.

students who born in poor family have no money for education

अनेक झोपडपट्ट्यामध्ये किंवा गोर गरिबांच्या वस्तीमध्ये कष्टकऱ्यांच्या, मजुरांच्या, साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तसेच कचरा वेचक असणाऱ्या आई-वडिलांच्या कुटुंबातील, अभावग्रस्त आणि अत्यंत हलाखीत जीवन जगणारी जी मुले आहेत, अशा काही मुलांनी तसेच मुलींनी ही बारावीची परिक्षा या वर्षी उतीर्ण केलेली आहे. तेव्हा त्यांचेच या संदर्भात विशेष कौतुक आणि अभिनंदन केले पाहिजे. ज्यांच्याकडे ट्युशन क्लासमध्ये जाण्याकरिता पैसे नाहीत, अभ्यासाकरिता वह्या-पुस्तके गाईड्स-नोट्स विकत घेण्याकरीताही पैसे नाहीत, अशी बरीचशी गरीब परिस्थितीतील मुले कुठेतरी पार्ट टाईम काम करून आपल्या शिक्षणाचा खर्च स्वतःच भागवित असतात, काही गरीब परिस्थितीतील मुले-मुली अपुऱ्या साधन सामग्रीवर जमेल तसा आपला बारावीचा अभ्यास करीत असतात, अभ्यास करण्यासाठी एखाद्या कोचिंग क्लासमध्ये किंवा अभ्यासिकेत नाव दाखल करण्यासारखीही त्यांची आर्थिक परिस्थिती नसते, तरीही आपल्या आई-वडिलांच्या गरिबीच्या अथवा हलाखीच्या परिस्थितीतही विशेष जाण ठेवून ही मुले-मुली जेव्हा जिद्दीने बारावीचा अभ्यास करून उत्तीर्ण होतात तेव्हा त्यांच्यातील जिद्द पाहून आपणही खरोखरच अचंबित होतो. अशाच हलाखीत जीवन जगणाऱ्या मुलांचे तसेच मुलींचे आपण बारावी उत्तीर्ण झाल्याबद्दल आज विशेष कौतुक केले पाहिजेत. त्यांना कदाचित इतर सुखवस्तू जीवन जगणाऱ्या मुलांपेक्षा गुणांची टक्केवारी थोडी कमी पडली असेल, तरीही ते ज्या परिस्थितीत बारावीचा अभ्यास पूर्ण करून बारावी उत्तीर्ण झालेत, ही त्यांच्याकरिता तसेच त्यांच्या परीवाराकरिता निश्चितपणे फार मोठी गोष्ट आहे. ( दहावी, बारावीत अनुत्तीर्ण झाले? अशाप्रकारे प्रयत्न करून उत्तीर्ण व्हा )

students who born in rich family have lot of money for their education

आता बारावी नंतर काय करायचे? हा एक नवाच प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झालेला आहे. सर्व सामान्य सुख वस्तू मुलांसमोर हा प्रश्न कधीच उपस्थित होत नाही. त्यांचे मोठ्या नोकरीवर असलेले पालक कोणत्याही उच्च दर्जाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाची महागडी फीस भरून त्यांच्या मुला-मुलींना, त्यांना हव्या त्या अभ्यासक्रमात अगदी सहजपणे प्रवेश घेऊन देऊ शकतात. सुखवस्तू घरातील बहुतेक मुल इंजिनीअर, आर्कीटेक्ट, डॉक्टर्स, सी.ए. अशाप्रकारच्या अनेक महागड्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेऊ इच्छितात. परंतु गरीब तसेच हलाखीत जीवन जगणारी मुळे अशा महागड्या अशा अभ्यासक्रमाच्या वाटेलाही जाऊ इच्छित नाहीत. ह्या महागड्या तसेच उच्च दर्जाच्या अभ्यासक्रमाची महागडी प्रवेश फीस, त्यानंतर शैक्षणिक फीस, तसेच शैक्षणिक साहित्याचा खर्चासह इतरही विविध प्रकारचा खर्च हे सर्व सहन करण्याची ऐपत गरीब परिस्थिती असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्याच्या पालकांची अजिबात नसते. मग असे अनेक गरीब परिस्थितीतील विद्यार्थी एम.सी.व्ही.सी., आय.टी.आय., नर्सिंग, बी.सी.ए., बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी इत्यादीसारख्या दुय्यम दर्जाच्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतात.

poor students get scholarship very late from government

आता काही लोक म्हणतात की, ह्या गरीब परिस्थितीतील अथवा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीसमध्ये सवलत मिळते, तसेच अनेक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळते, त्यामुळे त्यांचे शिक्षण सहजपणे होते. आम्हाला मात्र शिक्षणाकरिता भरपूर पैसा खर्च करावा लागतोम परंतु यातील वास्तविकता जाणून घेण्याकरिता ह्या मागासवर्गीय अथवा स्कॉलरशिप घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जर आपण त्यांची स्कॉलरशिपची रक्कम, त्यांचे शैक्षणिक सत्र चालू असतांनाच मिळाली आहे काय? असा प्रश्न विचारला तर ते सांगतील की, “संपूर्ण शैक्षणिक सत्र संपले आहे तरीही अद्याप आम्हाला शासनाने स्कॉलरशिप दिलेलीच नाही.”

शासनाच्या अशा अत्यंत चुकीच्या द्वेषकारक धोरणामुळे स्कॉलरशिपवर शिकणारे, खेड्यापाड्यांतून शहरात आलेले अनेक मुले-मुली आर्थिक तंगीला कंटाळून, तसेच उपासमारीला तोंड देता न आल्यामुळे, शिक्षण सोडून आपआपल्या गावाकडे परत गेलेले असतात, ह्यावरून गोरगरिबांच्या मुलांना शिकताच येऊ नये, असेच शासनाचे धोरण असल्याचे दिसून येते. ह्या मुलांच्या अशा शैक्षणिक गैरसोयीकडे लक्ष देण्यास शासनाला तसेच शासनाशी संबंधीत असलेल्या शैक्षणिक यंत्रणेलाही काहीच देणे घेणे नसते. अनेक शिक्षण संस्था पुढाऱ्यांच्या तसेच त्यांच्याशी संबंधीत असलेल्या त्यांच्या नातेवाईकांच्या किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्याच असतात. त्यामुळे दरवेळी दरवर्षी काहीतरी ठराव मांडून ह्या शैक्षणिक संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांची फीस कशी काय वाढवीता येईल? ह्या दृष्टीनेच ही शैक्षणिक संस्था चालविणारी तसेच त्यांचे हितचिंतक असलेली पुढारी मंडळी प्रयत्न करतांना दिसतात.

सध्याची शैक्षणिक परिस्थिती पाहाता शिक्षण आता गोरगरीब परिवारातील मुला-मुलींकरिता अजिबात राहिलेले नाही, असेच वाटत आहे. अनेक विद्यार्थ्यांना तर वेळेवर शैक्षणिक फीस किंवा परिक्षा फीस भारता न आल्यामुळे त्यांना शिक्षणही अर्ध्यातून सोडून द्यावे लागत असते. जर कुणी गरीब अथवा हलाखीच्या परिस्थिती जगणारी मुले-मुली शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन करीत असतील, तर त्यांचे आम्ही आज विशेष अभिनंदन करीत आहोत.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!