असे केल्याने, नक्कीच तुमचे मित्र आणि हितचिंतक वाढतील

Spread the love

दररोज कितीतरी लोकांशी आपला कोणत्या ना कोणत्यातरी कार्यानिमित्त संबंध येत असतो. आपण आपल्या कामात मग्न असतो आणि ते त्यांच्या कामात मग्न असतात. आपले त्यांच्याशी काही काम असले तरीही आपण त्यांना केवळ आपल्या त्या कामासंबंधीच अगदी जरुरी पुरतेच बोलतो. ते लोक सुद्धा आपल्याशी अत्यंत कमी आणि जरुरी पुरतेच बोलतात. आपण त्यांच्याशी जे काही बोलतो, त्या संदर्भात ना त्यांना विशेष आनंद होतो, ना आपल्याला विशेष आनंद होतो.

आता आजपासून ठरवा की, आपण ज्या ज्या लोकांशी बोलणार आहोत, त्या त्या लोकांना आपल्या बोलण्यामुळे आनंद झाला पाहिजे. लोकांना आनंद कशामुळे होतो? त्याचा आपण थोडा विचार करा. लोक आपल्यासाठी जी काही कामे करीत असतात, ती कामे त्यांच्या दैनंदिन कार्याचा भाग जरी असली तरीही, आपण त्यांनी आपल्या साठी केलेल्या एखाद्या चांगल्या कामाची मनापासून प्रशंसा करून त्यांचे आभार मानले पाहिजेत.

always try to thank someone when they help you for something

प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की, इतर लोकांना त्यांना तसेच त्यांच्या कामाला विशेष महत्व द्यावे. परंतु लोक ना तर त्या व्यक्तीला विशेष महत्व देतात, ना त्याच्या कार्याला विशेष महत्व देतात. त्यामुळे तो कार्य करणारा व्यक्ती सुद्धा आपल्या कार्याचा दैनंदिन भाग म्हणून नाविलाजानेच ती कामे करीत असतो. कोणत्याही एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल आपण कुणाचे कौतुक केले अथवा त्यांची प्रशंसा केली तर ह्यामध्ये आपले विशेष काहीही खर्च होत नाही, परंतु आपल्या ह्या कौतुकाने किंवा आपल्या त्या प्रशंसेने मात्र त्या व्यक्तीस निश्चितपणे आपले काम केल्यानंतर आनंद होईल. आपल्या अशा बोलण्यामुळे त्या व्यक्तीला आनंद झाला तर त्या व्यक्तीचे निश्चितपणे आपल्याबद्दल चांगले मत होईल.

एखाद्याच्या चांगल्या कामाबद्दल, किंवा एखाद्याच्या चांगल्या गोष्टीबद्दल आपण जे काही कौतुक करणार आहोत, ते आपले शब्द अगदी शंभर टक्के खरेच असायला पाहिजेतम अन्यथा आपल्या शब्दात त्या व्यक्तीला त्याचे खोटे कौतुक अथवा त्याची खोटी प्रशंसा दिसून आली अथवा जाणीवली, तर तो व्यक्ती मात्र निश्चितपणे आपल्यावर मनातून नाराज होईल.

observe their work and express your appreciation by all your heart

कुणाची प्रशंसा करण्याअगोदर आपण त्या व्यक्तीचे आणि त्याच्या कामाचे बारकाईने निरीक्षण करा. आता त्या व्यक्तीमध्ये नेमकी कोणती विशेष गोष्ट आहे? त्याचा शोध घेऊन केवळ त्याच गोष्टीचे अगदी मनापासून तुम्ही कौतुक करा! तुम्ही केलेल्या ह्या कौतुकाने त्या व्यक्तीच्या मनस्थितीमध्ये काय काय बदल होतो? ह्याचे तुम्ही बारकाईने निरीक्षण करा. अशा प्रकारे इतरांची प्रशंसा केली, तर त्यामध्ये आपला विशेष काहीही खर्च होत नाही.

जगामध्ये लोकांना सगळ्यात जास्त आपले स्वतःचे नाव प्रिय असते, हे लक्षात ठेवा. आपल्या नावाचा जर लुथे कुणीही कोणत्याही बाबतीत चांगला उल्लेख केला असेल, किंवा करीत असतील, तर त्यामुळे त्या व्यक्तीला अतिशय आनंद होऊन तो पुढील वेळा त्यापेक्षाही अधिक चांगले कार्य करतो.

अनेक लोक एखाद्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक अथवा औद्योगिक संस्थेच्या इमारतीला किंवा त्या संस्थेला आपले नाव देण्याची इच्छा व्यक्त करून, त्या संस्थेला फार मोठी रक्कम देणगी म्हणून देतात. त्यामध्ये त्यांच्या नावाचा, त्यांच्या मृत्यूनंतरही चिरकाल त्या इमारतीच्या रूपाने, लोकांनी सतत उल्लेख करावा, हीच त्यांची अपेक्षा असते. म्हणून आपणही ज्या ज्या लोकांना आपले मित्र किंवा आपले हितचिंतक बनवू इच्छितो, त्या त्या लोकांच्या नावाला आपण त्यांनी आपल्यासाठी केलेल्या एखाद्या चांगल्या कामाच्या संदर्भात वेळोवेळी उल्लेख केलाच पाहिजे.

Every person feels that others should give him greatness

त्या शिवाय प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की, इतरांनी त्याला मोठेपणा दिला पाहिजे, इतरांनी त्याचा सन्मान केला पाहिजे. इतरांनी त्याच्या चांगल्या कार्याबद्दल त्याची प्रशंसा केली पाहिजे. ह्या तीन गोष्टींचे आपण विशेष लक्ष देऊन आपल्या आयुष्यात पालन केले तर अनेक लोक आपले मित्र तर होतीलच, परंतु आपल्या ह्या स्वभावाने अनेक लोक आपल्याला आनंदाने सहकार्य करायलाही तयार होतील. आपल्यावर जर कधी काही संकट आले, अथवा आपल्याला एखादी अडचण आली तर ह्यापैकी अनेक लोक आपल्याला मदत करायलाही तयार होतील.

नेमक्या वरील ह्याच विशेष गोष्टी आहेत, ज्याची प्रत्येक व्यक्तीला इतरांकडून अपेक्षा असते. ज्या ज्या लोकांकडून त्याला ह्या गोष्टी प्राप्त होतात, त्या त्या व्यक्तींप्रती तो व्यक्ती मनातून आनंद व्यक्त करतो, तसेच ह्या गोष्टी प्राप्त करून देणाऱ्या त्या व्यक्ती करीता तो स्वतःहोऊन शक्य ते सहकार्यही करायला तयार होतो.

कोणतेही चांगले कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटते की, इतरांनी त्याच्या कार्याची प्रशंसा करावी, इतरांनी त्याच्या कार्याला मान्यता द्यावी. अंतकरणापासून जेव्हा आपण एखाद्याची प्रशंसा करतो किंवा त्याच्या चांगल्या कार्याला मान्यता देतो, तेव्हा आपण त्या व्यक्तीकरिता अत्यंत महत्वाचे ठरतो. वेळप्रसंगी तो व्यक्ती स्वतः अडचण सोसूनही आपल्याला शक्य ती मदत करायला तयार होतो.

जीवन जगतांना आपण मुद्दाम हेतूपुरस्पर इतरांना मान द्यायला तसेच सतत इतरांचे मोठेपण मान्य करायलाही शिकले पाहिजे. जिथे जिथे शक्य आहे, तिथे तिथे आपण इतरांना मोठेपण द्या. ह्यात आपले काहीच नुकसान होत नाही, हे लक्षात ठेवा. सर्व करतांना मात्र आपल्या मनातील, आपल्या स्वतःबद्दलचा जो काही अहंकार किंवा मोठेपणा आहे, तो अहंकार किंवा मोठेपणा मात्र विसरून जा. म्हणजे अगदीच तुम्ही इतरांसमोर लाचार व्हा, असे मला म्हणायचे नाही, परंतु योग्य त्या शब्दांत, योग्य त्या प्रकारे, समोरच्या व्यक्तीचा मान राखून तुम्ही त्या व्यक्तीला मोठेपण दिले पाहिजे.

मी अशा एका व्यक्तीला ओळखतो जो त्याच्या संपर्कात आलेल्या कोणत्याही नवीन किंवा जुन्या व्यक्तीला मग तो ऑटो रिक्षावाला का असेना, त्यांना बोलतांना तो दादा, काका, मामा, भाऊ अशा आदरार्थी शब्दांनीच उल्लेख करून बोलतो. काही विशेष लोकांचा तो साहेब, सर असाही उल्लेख करतो, तसेच महिलांचा तो त्यांच्या वयाप्रमाणे ताई, आई, काकू, मावशी, मॅडम अशाप्रकारे उल्लेख करून अत्यंत आदराने, हळू आवाजात बोलतो. त्या व्यक्तीच्या अशा बोलण्याने इतर लोकही त्या व्यक्तीला चांगलाच मान देतातम हे मी पहिले आहे. ( बोलतांना नेहमीच अशाप्रकारेच बोलावे )

If a person even does a little bit of your work, then you must thank them

ह्या सर्व गोष्टींचे आपण कधीच मनापासून पालन करीत नाहीत. त्यामुळेच तर इतरांकडून मान, सन्मान किंवा आदर प्राप्त करून घेण्यास आपणही काही प्रमाणात निश्चितपणे कमी पडतो. एखाद्या व्यक्तीने आपले एखादे छोटेसे काम जरी केले तर आपण त्या व्यक्तीचे मनापासून आभार मानलेच पाहिजेत. कुणाकडून आपल्याला काही काम करून घ्यायचे असेल तर, “कृपा करून माझे हे काम करून देता का?”, असे म्हणून आपण त्या व्यक्तीला थोडे मोठेपण दिलेच पाहिजे. आपले काम झाल्यानंतर आपण, “आपल्याला मी थोडा त्रास दिला, परंतु आपल्या मदती शिवाय माझे हे काम कधीच व्यवस्थित पूर्ण झाले नसते”, असे म्हणून आपण त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.

आपण इतरांना मोठेपण दिले नाही, इतरांचे कधीच आभारही मानले नाही, इतरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली नाही, तर त्या व्यक्ती आपल्याला पुन्हा दुसऱ्यावेळी मदत किंवा सहकार्य करण्यास कधीच तयार नसतात. कुणी आपल्यासाठी विशेष काही ए-केले तर केवळ आभाराच्या अथवा कृतज्ञतेच्या कोरड्या शब्दानेच त्या व्यक्तीची बोळवण करून त्याला वाटेला न लावता, आपल्या परीने शक्य तो आर्थिक किंवा इतर वस्तूंच्या स्वरुपात त्या व्यक्तीला काहीतरी योग्य तो मोबदला आपण भेट स्वरूपात दिलाच पाहिजे, अन्यथा आपल्याला सहकार्य करणारा व्यक्ती आपल्याला धूर्त अथवा लबाड समजून दुसऱ्यावेळेस आपले काम करण्यास, “मला अजिबात वेळ नाही”, असे सांगून आपल्याला नकारही देऊ शकतो. म्हणून आपल्यासाठी विशेष चांगले करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कार्याचा योग्य तो मोबदला देण्यास कधीच विसरू नका.

आजपासून आपण लोकांना आपले शत्रू न बनविता मित्र बनविण्याचा प्रयत्न करण्याकरिता वरील गोष्टींचे अगदी कसोशीने पालन करण्याचा प्रयत्न करा.आपल्या संपर्कात येणाऱ्या [प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या कार्याची प्रशंसा करा, ते तुमच्यासाठी किती महत्वाचे आहेत, हे तुम्ही त्यांना तुमच्या बोलण्यातून तसेच वागण्यातून दाखवून द्या. हे सर्व तुम्ही लबाडीने न करता अंत:करणापासून केले पाहिजे.  कोणत्याही कामानिमित्त आपल्या संपर्कात आलेल्या लोकांशी बोलतांना तुम्ही स्वतःबद्दल अत्यंत कमी बोला, आणि त्यांच्याबद्दल बोलतांना मात्र तुम्ही खूप बोला, परंतु ते सर्व चांगलेच बोला ते तुमचे सर्व बोलणे अगदी आनंदाने ऐकून घेतील.

वरील ह्या सर्व गोष्टींचे तुम्ही तुमच्या आयुष्यात कटाक्षाने पालन केले तर तर मग बघा तुम्हाला सहकार्य करणाऱ्या तुमच्या हितचिंतकांची आणि मित्रांची संख्या कशी दिवसेंदिवस हळू हळू वाढत असल्याचे तुम्हाला दिसून येईल.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

2 thoughts on “असे केल्याने, नक्कीच तुमचे मित्र आणि हितचिंतक वाढतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!