“खोटी प्रशंसा आणि अति आदर व्यक्त करणाऱ्यांपासून सावध राहा !”

Spread the love

समाजात वावरतांना आपला अनेक लोकांशी संबंध येतो. प्रत्येकाचा स्वभाव वेग-वेगळा असतो. त्यापैकी क्वचित कोणी आपले हितचिंतक असतात तर बहुतेक लोक आपले अहितचिंतकच असतात.

खरोखर आपले हितचिंतक कोण आहेत? आणि अहितचिंतक कोण आहेत? हे ओळखणे म्हणजे आपल्या करिता एक कसोटी अथवा परीक्षाच असते.

लोकांना ओळखण्याच्या परीक्षेत आपण जर उत्तीर्ण झालो तर आपल्याला चांगल्या-वाईट लोकांची ओळख पटण्यास मदत होईल.

खरी अथवा खोटी, इमानदार अथवा बेईमान, प्रामाणिक अथवा अत्यंत विश्वासघातकी, नीतीमान अथवा नीतीमत्ता नसलेली, चापलुसी व खोटी प्रशंसा करणारी अथवा सत्य आणि रोख-ठोक बोलून आपल्या चुका दाखविणारी, आपले हितचिंतक असणारी अथवा आपले हितचिंतक असल्याची खोटी बतावणी करून आपले अहित करण्याची संधी शोधून आपला स्वार्थ साधणारी, चांगल काम करणारी अथवा कामचोर व आळशी प्रवूत्तीची, गरज पडली तर आपल्याला मदत करणारी अथवा आपल्यावर संकट आले तर मनातून आनंदी होणारी आणि आपल्यापासून दूर राहाणारी, अशी अनेक प्रकारची, विविध प्रवृत्तीची वरील गुणदोष असणारी अनेक माणसं आपल्या सभोवती वावरत असतात.

अशावेळी अत्यंत डोळसपणे ह्या सर्वांच्या वर्तनावर लक्ष ठेऊन ह्यातील चांगली माणसं ओळखून त्यांना आपल्या जवळ करणे, तसेच आपले हितचिंतक नसणारी किंवा आपले अहित करण्याची संधी शोधून आपला स्वार्थ साधणारी किंवा आपले नुकसान करण्याची इच्छा ठेवणारी माणसं ओळखून त्यांच्या पासून सावध राहणे आवश्यक असते.

गव्हातील खड्याप्रमाणे अशा लोकांना त्वरित बाजूला सारणेही अत्यंत आवश्यक असते, अन्यथा ही मंडळी आपले कसे, कधी आणि काय नुकसान करतील? हे आपल्याला वेळ गेल्यावर दिसून येईल.

कुणी आपली अति स्तुती करीत असेल अथवा आपल्या प्रती अत्यंत आदर दाखवीत असेल, तर त्याच्या ह्या फुकटच्या स्तुतीला आणि आदराला पाहून कधीच हूरळून जाऊ नका. उलट असे करण्यामागे त्या व्यक्तीचा कोणता स्वार्थ आहे? ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. त्या व्यक्तीचा काय स्वार्थ आहे हे तुम्हाला लगेच दिसून येईल.

कुणी आपली अत्यंत स्तुती करीत असेल अथवा आपल्या प्रती अति आदर दाखवत असेल तर लगेच त्या व्यक्तीपासून सावध व्हा, अन्यथा आता तुमचे त्या व्यक्तीकडून लवकरच काहीतरी नुकसान होणार आहे, असे समजायला काहीच हरकत नाही.

ह्या गोष्टीचा मी अनेकवेळा अनुभव घेतलेला आहे. त्या अनुभवातूनच मला ह्या संदर्भात अनेक गोष्टी कळलेल्या आहेत.

एवढेच नाही तर माझ्या संपर्कातील माझ्या जवळच्या काही व्यक्तींनाही आलेल्या वाईट अनुभवाचे मी निरीक्षण केलेले आहे. हे सर्व निरीक्षण करीत असताना मानवी स्वभावाचे अनेक नमुने मला पाहायला मिळालेले आहेत.

माझ्या संपर्कातील एक फार मोठे व्यक्ती आहेत. गेल्या दहा पंधरा वर्षांपासून मी त्यांना अगदी जवळून ओळखतो. त्यांनी आयुष्यात अनेकांना उभे केलेले आहे. अनेकवेळा अत्यंत निस्वार्थीपणे त्यांनी कितीतरी लोकांना मदतही केलेली आहे. त्यांनी अनेकांना चांगल्या नौकऱ्याही लाऊन दिलेल्या आहेत. अनेक व्यक्तींची जीवनात प्रगती व्हावी म्हणून त्यांनी अनेकांना मनापासून वेळोवेळी सहकार्य करून मार्गदर्शनही केलेले आहे.

त्यामुळे अनेक लोक त्यांच्याशी आदरपूर्वक बोलायचे, एवढेच नाही तर अनेक लोक त्यांच्या पायाला हात लावूनही त्यांना नमस्कार करून जाहीरपणे आपली त्यांच्यावर असलेली श्रद्धाही व्यक्त करायचे. एक-दोन व्यक्ती तर त्यांच्या तसेच त्यांच्या पत्नीबद्दल असे म्हणायचे की, “हे माझे दुसरे आई-वडीलच आहेत. ह्यांच्यामुळेच मी जीवनात उभा आहे….. वगैरे­-वगैरे”.

अशाप्रकारे अनेक लोक त्या मोठ्या व्यक्तीसमोर अति नम्रतेचे अथवा त्यांचा अतिविश्वासू असल्याचे नाटक करून, त्यांच्याशी गोड बोलून, त्यांच्या प्रती अत्यंत आदर दाखवून त्यांच्या पुढे-पुढे करीत असत. थोडक्यात असे म्हणा की, त्यांची चापलुसी करीत असत.

वास्तविक पाहाता हे लोक त्यांच्या प्रती कृतज्ञ असल्याचे केवळ नाटक करून आपला स्वार्थ साधण्याकरिता त्यांच्या विरोधात कट करीत होते. शेवटी ह्याच लोकांनी आपला स्वार्थ साधण्याकरिता त्यांच्या विरोधात कट करून त्यांना अत्यंत अडचणीत आणले.

त्यानंतर त्यांच्या पत्नीला व त्यांना आपल्या आई-वडिलांच्या प्रमाणे समजणाऱ्या त्या लोकांनी पुन्हा आयुष्यात त्यांची कधीही भेट घेतली नाही.

एवढेच नाही तर त्या मोठ्या व्यक्तीप्रती त्या ढोंगी लबाड व्यक्तींच्या मनातील पराकोटीची अत्यंत कटू अशी द्वेष भावना ही लगेच काही घटनांमधून दिसून आली.

सांगायचे तात्पर्य असे की, आपल्याशी अत्यंत गोड बोलणारे, वेळ प्रसंगी आपल्या प्रती अत्यंत आदर दाखविणारे, आपली चापलुसी करणारे, आपली खोटी प्रशंसा करणारे, आपले अत्यंत विश्वासू असल्याचे नाटक करणारे, आपल्याशी अत्यंत नम्रपणे वागणारे हे सर्व लोक आपला स्वार्थ साधण्याकरिता तुमच्या मागे-पुढे करीत असतात. त्यांचा स्वार्थ साधल्यानंतर ते केव्हा तुमच्या पाठीत विश्वास घाताचा खंजीर खुपसून तुमची ‘वाट’ लावतील, ह्याची काहीच खात्री नसते.

त्या ऐवजी तुमच्याशी सत्य आणि रोख-ठोक बोलणारी तसेच वेळ प्रसंगी तुमच्या चुका तुमच्या नजरेस आणून देणारी व्यक्ती, अनावश्यक रितीने तुमच्या पुढे-पुढे न करणारी अथवा तुमची चापलुसी न करणारी व्यक्ती तुमची निश्चितपणे हितचिंतक असते ह्याची खात्री बाळगा.

आपल्या संपर्कातील अनेक चांगल्या लोकांमुळेच आपल्याला जीवन जगणे सुसह्य होते. अशाच लोकांची आपल्या कार्यातही मदत होते, तर आपल्या संपर्कातील अनेक वाईट लोकांमुळेच आपल्याला जीवन जगणे असह्य होते. त्यांच्या विश्वास घातकी स्वभावामुळे आपल्या अनेक चांगल्या कार्यातही अडथळे निर्माण होतात. कधी-कधी तर असे लोक आपल्या नावाने कुठेही काहीही खोटे-नाटे पत्र देऊन आपल्यावर खोटे आरोप करून आपल्या कार्यात अडचणी आणण्याचाही प्रयत्न करतात.

हे सर्व निस्तरण्याकरिता आपला विनाकारण वेळही खर्च होतो, म्हणून तुम्ही इतर काही शिका अथवा न शिका परंतु आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना ओळखायला जरूर शिका, तरच आपले जीवन आनंदी होईल.

शेवटी ह्याप्रसंगी मला हेच सांगायचे आहे की, “खूप गोड बोलणारी, अति नम्रता दाखविणारी, अति स्तुती करणारी, अति आदर सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक, दांभिक, आतल्या गाठीची, लबाड, बेरकी, संधी साधून व विश्वास घातकी असतात. (तुमच्याकडून कशाचीही अपेक्षा न करणारा, तुम्हाला कोणतेही काम न सांगणारा क्वचित एखादा व्यक्तीच ह्या गोष्टीला अपवाद असू शकतो.)

अन्यथा तुमच्याच खांद्यावर हात ठेऊन तुम्हालाच खांदा देण्याचे षड्यंत्र अशा व्यक्ती मनातल्या मनात रचत असतात. या उलट, जी मानस तोंडावर रागाने कडवट, टीकात्मक, जहरी, फटकळ, पण सत्य आणि स्पष्ट बोलतात, त्याचं अंतर्मन वरच्या प्रवूत्तीपेक्षा नक्कीच चांगल असत.

विश्वासघात करणं, कुणाला फसवणं त्यांच्या कधी रक्तातच नसतं, ती खरच मनमोकळी व विश्वासू असतात….!

म्हणून जीवनात आपण बाकी काही शिको अथवा ना शिको, पण माणसं वाचायला नक्की शिकलच पाहिजे….!

अन्यथा आपले नुकसान निश्चितपणे झालेच म्हणून समजा…..!”

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!