उद्योगासाठी कर्ज घेण्याअगोदर उद्योगाचा अनुभव घ्या

Spread the love

उद्योग धंदा किंवा व्यवसाय करण्याची अनेकांची इच्छा असते, परंतु त्याकरिता केवळ इच्छा असणेच जरुरीचे नसते, तर त्यासोबतच इतरही काही गोष्टींची आवश्यकता असते. त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत? त्याचा आपण विचार करू.

आपण जो काही उद्योग धंदा करणार आहोत, त्या उद्योग धंद्याचे आपण कुठे प्रशिक्षण घेतलेले नसेल किंवा असेल तरीही केवळ तेवढ्या प्रशिक्षणावरच आपल्याला तो उद्योग यशस्वीपणे करता येईल, असे नाही. स्वतंत्रपणे आपण एखादा उद्योग करण्याचा विचार करीत असाल तर त्या अगोदर कुणाच्यातरी मार्गदर्शनात, कुणाकडे तरी आपण त्या उद्योगासंबंधी शिकाऊ उमेदवार म्हणून प्रत्यक्ष कार्य करून भरपूर अनुभव घेतला पाहिजे. त्या उद्योगांसंबंधीच्या सर्वच लहान मोठ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत. कोणताही उद्योग धंदा आपण त्या उद्योग धंद्याचे प्रशिक्षण न घेता अथवा त्यासंबंधिचा अनुभव न घेता सुरु केला तर त्यासंदर्भात पुढे ज्या काही अडचणी येतील, त्या अडचणी आपण कशा काय सोडवायच्या? ह्या संदर्भात आपल्याला काहीच माहिती नसते, त्यामुळे आपण त्या अडचणी सोडवू शकत नाही. म्हणूनच त्या उद्योगात आपण निश्चितपणे अयशस्वी होतो.

कुणाला एखाद्या उद्योगात चांगले यश मिळत असल्याचे, अथवा चांगला पैसा मिळत असल्याचे पाहून आपणही हाच उद्योग करावा, असे आपल्यालाही वाटत असते. अशावेळी त्या उद्योगात यशस्वी झालेल्या व्यक्तीने त्या उद्योगात किती कठोर परिश्रम करून त्या उद्योगातील सर्वच लहान मोठ्या गोष्टींचा कसा अनुभव घेतलेला आहे, ह्या संदर्भातही आपण विचार केला पाहिजे. कोणत्याही उद्योगात यश मिळविण्यासाठी आपण फक्त तो उद्योग सुरु करणेच आवश्यक नसते, तर त्या उद्योगात यश मिळविणाऱ्या यशस्वी व्यक्तीसारखे कठीण परिश्रम करणेही फारच आवश्यक असते.

उद्योगासाठी तरुण-तरुणींना कर्ज देण्याकरिता शासनाने, अनेक महामंडळांची स्थापना केलेली आहे, व्यक्तींच्या सामाजिक जातीनिहाय, ह्या आर्थिक महामंडळांना विविध महापुरुषांची नावे देण्यात आलेली आहेत. उदा – महात्मा फुले मागास वर्गीय आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे मागास वर्गीय आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, इत्यादी. याशिवाय शासनाने जिल्हा उद्योग केंद्रामार्फतही तरुण-तरुणींना उद्योग धंदा सुरु करावा म्हणून विविध योजना सुरु केलेल्या आहेत. शासनाच्या सर्वच खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो, तसाच ह्या सर्वच महामंडळामध्ये तसेच त्यातील शासनाच्या ह्या विविध योजनांमध्येही भ्रष्टाचार होत असल्याच्या बातम्या वेळोवेळी वर्तमानपत्रात पाहावयास मिळतात.

उद्योगासाठी कर्ज मिळविण्याकरिता ह्या महामंडळामध्ये हजारो तरुण-तरुणी अर्ज सादर करतात. त्यापैकी साधारण वीस टक्के तरुण-तरुणींनाच आपण सुरु करू इच्छिणाऱ्या उद्योगासंदर्भात माहिती अथवा अनुभव असतो. बाकी ऐंशी टक्के युवक-युवतींना त्या उद्योगासंदर्भात फारसा काहीच अनुभव नसतो, तरीही ह्या उमेदवारांना विविध शासकीय आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज मिळते. त्यातील बहुसंख्य लोकांना दलालांच्या सहकार्यानेच कर्ज मिळते, अन्यथा तेथील संबंधित अधिकारी कुणाही उमेदवाराला अगदी सहजा सहजी उद्योगासाठी कधीच कर्ज मंजूर करीत नाहीत, हा अनेक उमेदवारांचा अनुभव आहे.

आपण सुरु करीत असलेल्या उद्योग धंद्याचा प्रत्यक्षात काहीही अनुभव नसल्यामुळे त्याचप्रमाणे दलालांच्या मध्यस्थीने अथवा सहकार्याने ज्यांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते, अशा अनेक उमेदवारांचे उदयोग व्यवसाय एकतर कधी व्यावस्थित सुरुच होत नाहीत अथवा सुरु झाले तरीही ह्या उमेदवारांना त्या उद्योगाचा काहीही अनुभव नसल्यामुळे काही काळातच ते उद्योग बंदही पडतात, उद्योगाचा काहीच अनुभव नसल्यामुळे कर्ज घेऊन नंतर बंद पडलेल्या ह्या उद्योग धंद्यांची अथवा तो उद्योग सुरु करणाऱ्या कर्जदारांची फार मोठी संख्या आहे, ज्यांचा उद्योग बंद पडलेला आहे. ते त्यांच्याकडील थकीत कर्जाची बाकी रक्कमही कधीच परतही करू शकत नाहीत. ज्यांनी ह्या शासकीय आर्थिक विकास महामंडळांकडून उद्योग धंद्यासाठी कर्ज घेतले होते, असे जवळपास हजारो उमेदवारांचे आज कर्जदार अथवा थकबाकीदार म्हणून शासनाच्या महामंडळांकडे नावे नोंदविल्या गेलेली आहेत, त्यांना शासनाच्या कोणत्याही योजनेतून आता ह्यापुढे कधीच कर्ज मिळणार नाही.

आजकाल नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून तर तरुण-तरुणींवर कोणतातरी उद्योग धंदा सुरु करण्याची वेळ येते, परंतु पुरेसा अनुभव नसल्यामुळे तिथेही त्यांना अपयशी व्हावे लागते. म्हणून कोणताही उद्योग व्यवसाय सुरु करण्याकरिता कर्ज घेण्याअगोदर त्या उद्योगाचा कुणाच्या तरी मार्गदर्शनात चांगला अनुभव घेतल्यानंतरच कर्ज घेण्याचा विचार करा. असे झाले तरच तुम्ही सुरु करीत असलेला उद्योग काही काळाने बंद पडण्याची शक्यता राहाणार नाही.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!