नेहमीच सकारात्मक आणि चांगल्या शब्दातच बोलावे

Spread the love

मोठ्याने बोलणाऱ्या एखाद्या व्यक्तीला आपण नकारात्मक स्वरात मोठ्याने ओरडून, “अरे बोंबल्या बोंबलु नको, तुझे नरडे फुटून मरशील”, असे जर म्हंटले तर तो म्हणेल “माझ्या बोंबलल्याने तुझ्या बापाचे काय जाते?” असे म्हणून तो आपल्याला भांडायला किंवा मारायलाही आपल्या अंगावर येईल. परंतु हेच शब्द, “अरे हळू आवाजात बोल, तुझा घसा दुखून तुलाच त्रास होईल !” असे समजावणीच्या आणि हळू स्वरात आपण उच्चारले तर तो व्यक्ती आपल्या म्हणण्याप्रमाणे हळू आवाजात बोलेल किंवा शांत बसेल. आपले म्हणने त्याला पटल्यामुळेच तो आपल्या मतांशी सहमत होईल. असा असतो आपल्या नकारात्मक अथवा सकारात्मक शब्दांचा परिणाम.

disadvantages of speaking in negative words

आपल्या शब्दांमध्ये आणि स्वरांमध्ये फार मोठी विध्वंसक तसेच उत्साहवर्धक शक्ती असते. एखादाच्या नकारात्मक शब्दांमुळे कुणी विध्वंसक, आक्रमक किंवा उध्वस्त होतो, तर एखाद्याच्या सकारात्मक शब्दांमुळे कुणाच्या तरी मनात आनंद, उत्साह, प्रेरणा अथवा मैत्रीची भावनाही निर्माण होऊ शकते. म्हणूनच शब्द नेहमीच जपून वापरायचे असतात. आपल्या शब्दांमुळेच अनेक लोक आपले मित्र किंवा शत्रू होत असतात. ( असे केल्याने, नक्कीच तुमचे मित्र आणि हितचिंतक वाढतील )

आपण जेव्हाही इतरांशी बोलतो, तेव्हा आपण एकतर सकारात्मक शब्द वापरतो किंवा मग नकारात्मक शब्द वापरतो. सकारात्मक शब्दांचा वापर केल्यामुळे इतरांवर व तुमच्या स्वतःवरही त्याचा चांगलाच परिणाम होतो. नकारात्मक शब्द वापरल्यामुळे तुमच्या स्वतःवर आणि इतरांवरही त्याचा निश्चितपणे वाईट परिणाम होतो. नकारात्मक शब्दांचा आपल्याला अपेक्षित असा परिणाम कधीच होत नसतो. नकारात्मक शब्दांच्या वापरामुळे इतरांशी आपला वादविवाद अथवा भांडणही होते, एवढेच नाही तर आपले एखादे होणारे कामही बिघडते. तर सकारात्मक शब्दांमुळे आपले इतरांशी चांगले संबंध निर्माण होऊन आपल्याला अपेक्षित असलेली कामे सुद्धा होण्याची शक्यता असते.

बोलण्यापूर्वी नेहमीच विचार करून बोलावे. विचार न करता बोलल्यामुळे आपण बऱ्याचवेळा आपल्या नवीन-नवीन शत्रूंची अथवा अहितचिंतकांची निर्मितीच करीत असतो. आज जरी नाही तरीही पुढे मागे कधीतरी आपली ही अहितचिंतक लोक आपले नक्कीच कोणत्या ना कोणत्या तरी ठिकाणी, आपल्याला कळत न कळत आपले नुकसान नक्कीच करू शकतात. मनुष्याच्या तोंडातून निघालेला प्रत्येक कटू शब्द आणि धनुष्यातून सुटलेला प्रत्येक बाण कधीही वापस घेता येत नसतो. आपल्या चांगल्या शब्दांमुळेच आपण जीवनात यशस्वी होत असतो, तर आपल्या कटू शब्दांच्या बाणामुळेच आपण जीवनात अयशस्वी होत असतो. कोणत्या शब्दांमुळे आपण यशस्वी होऊ शकतो आणि कोणत्या शब्दांमुळे आपण अयशस्वी होऊ शकतो याचा आपण, तो शब्द उच्चारण्यापूर्वीच विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शब्दांमध्ये काहीतरी चांगले करण्याची, तसेच काहीतरी वाईट करण्याचीही प्रचंड शक्ती असते. आपण इतरांचे वाईट करण्याकरिता शब्द उच्चारले तर त्यांच्या सोबतच आपलेही काहीतरी वाईट नक्कीच होऊ शकते. आपण इतरांचे चांगले होण्याकरिता काही चांगले शब्द उच्चारले तर त्यांच्या सोबत निश्चितपणे आपलेही काहीतरी चांगलेच होत असते, त्याकरिता आपले चांगले होण्यासाठी तरी इतरांसोबत आपण नेहमीच चांगल्या शब्दातच बोलले पाहिजे. बोलतांना आपण अशी वाक्ये निवडली पाहिजेत की, त्यामुळे इतरांना निश्चितपणे आनंद होईल, आनंद जरी झाला नाही तरीही त्यामुळे त्यांना वाईटही वाटणार नाही. इतरांना वाईट वाटेल असे कठोर शब्द आपण उच्चारून बघा, तेवढ्याच किंवा त्यापेक्षाही वाईट अथवा कठोर शब्दांची तो व्यक्ती आपल्याला लगेच व्याजासहित परतफेड करील. एवढेच नाही तर तो व्यक्ती तुमचा निश्चितपणे अहितचिंतकही होईल. इतरांशी चांगले संबंध ठेवण्याची तसेच आपले अहितचिंतक वाढविण्याची इच्छा न ठेवणाऱ्याने इतरांशी बोलतांना विचारपूर्वक चांगल्या शब्दांतच बोलले पाहिजे.

advantages of speaking in positive words

आपले चांगले शब्द इतरांच्या मनामध्ये आपल्याबद्ल मैत्रीचा भाव जागृत करतील. आपले काम करण्यासाठी त्यांना चांगली प्रेरणा देतील, त्यांच्या मनामध्ये उत्साह निर्माण करतील. ही सर्व आपण इतरांकरिता उच्चारलेल्या चांगल्या शब्दांचीच किमया असते. ह्या चांगल्या शब्दांमुळेच इतरांचाच नाही तर आपलाही निश्चितपणे फायदा होईल.

शब्दांचे महत्व सांगतांना संत कबीर म्हणतात की,

“शब्द सम्हारे बोलिये, शब्द के हाथ न पांव |

एक शब्द औषधी करे, एक शब्द कारे घाव ||”

(म्हणजेच. शब्दाला हात-पाय नसले तरी सुद्धा शब्द सांभाळूनच वापर. एक शब्द अमृतासारखा औषधी म्हणूनही उपयोगी ठरतो, तर दुसरा शब्द अंगावर (मनावर) जखम करून वेदना देणाराही असतो.)

“शब्द जु ऐसा बोलिये, तन का आपा खोय |

औरन को शीतल कारे, आपण को सुख होय ||”

(म्हणजेच, शरीराच्या अहंकाराचा त्याग करून शब्द उच्चारा, त्यामुळे तुम्हाला शीतलता मिळेल आणि इतरांना सुद्धा सुख प्राप्त होईल.)

“जेहि शब्दे दुख न लागे, सोई शब्द उचार |

तपत मिती सीतल भया, सोई शब्द ततसार ||”

(म्हणजेच, ज्या शब्दांच्या उच्चारणामुळे कुणाला पिडा होणार नाही, असेच शब्द उच्चारा. ज्या शब्दांमुळे मनाचे सर्व ताप नाहीसे होतील व मन कायमस्वरूपी शांत-शीतल होईल, तेच शब्द “ज्ञान-स्वरूप” आहेत.)

“जीभ्या जीन बस मी करी, तिन बस कियो जहान |

नहि तो औगुन उपजै, कहि सब सन्त सुजान ||”

(म्हणजेच, ज्यांनी आपली जीभ आपल्या नियंत्रणात आणली, त्याने जणू साऱ्या जगाला जिंकून घेतले. सर्व संतांचे सांगणे आहे की, अशा नियंत्रणा शिवाय जगण्याने शरीरात अवगुण निर्माण होतात.)

म्हणून चांगल्या चांगल्या शब्दांचे महत्व ओळखूनच आपण त्या शब्दांचा वापर केला पाहिजे. आपले चांगले शब्द अथवा आपले चांगले बोलणे हाच आपल्या सफलतेच खरा मूलमंत्र आहे.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

2 thoughts on “नेहमीच सकारात्मक आणि चांगल्या शब्दातच बोलावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!