चांगले जीवन जगण्यासाठी खालील आठ गोष्टी करा

Spread the love

प्रत्येकाला चांगले जीवन जगण्याची इच्छा आणि महत्वाकांशा असते, परंतु केवळ इच्छा किंवा महत्वाकांशा असू जमणार नाही, त्याकरिता आपल्यालाही काही गोष्टी करणे अत्यंत जरुरी असते. त्याशिवाय आपल्याला चांगले जीवन जगताच येणार नाही. अशा कोण-कोणत्या गोष्टी आहेत? ज्यामुळे आपले राहाणीमान आणि आपले जीवन सुधारेल? किंवा आपल्याला चांगले जीवन जगता येईल? अशाच आठ गोष्टींचा आढावा आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत.

 

१) बंगला असो वा झोपडी, त्या ठिकाणी स्वच्छता असावी.

always make sure to live in clean house

चांगले जीवन जगण्याकरिता आपल्याला एखादा मोठा पॉश बंगलाच असावा, असे काही नाही. आपण अगदी एक किंवा दोन खोल्यांमध्ये किंवा एखाद्या लहानश्या झोपडीमध्ये सुद्धा चांगले जीवन जगू शकतो.

आपण जिथे कुठे राहात असू, ती आपल्या घरातील तसेच घराच्या परिसरातील आसपासची जागा अत्यंत स्वच्छ आणि टाप-टीप ठेवावी. तसेच आपल्या बंगल्यातील, घरातील अथवा झोपडीतील सर्व सामानही टाप-टीप ठेवलेले असावे. स्वच्छता आणि टाप-टीपपणा असे तरच आपल्याला तिथे राहाण्यात मानसिक सुख, शांती आणि आरोग्य प्राप्त होते.

 

२) आपल्या शरीराची स्वच्छताही अत्यंत आवश्यक आहे.

Cleanliness of your body is also essential

ज्याप्रमाणे आपण आपला परिसर तसेच आपले घर स्वच्छ टाप-टीप ठेवतो, त्याच प्रमाणे आपले शरीरही आपण नियमितपणे स्वच्छ ठेवले पाहिजे. याकरिता आपण दररोज सकाळी आपले नित्यक्रम पार पडतांना व्यावस्थित दात घासणे, तोंड धुणे, तोंड धुतल्या शिवाय चहा न घेणे आवश्यक असते. काही काही लोकांना दात न घासता तसेच तोंड न धुताच चहा घेण्याची अत्यंत वाईट सवय असते, ते त्याला ‘बेड टी’ असे म्हणतात. अशाप्रकारे ‘बेड टी’ घेतल्यामुळे त्यांच्या तोंडातील तसेच जिभेवरील अतिसूक्ष्म जंतू अथवा बॅक्टेरिया त्यांच्या पोटात जाऊन त्यांच्या पचनक्रियेवर परिणाम होऊन ते आजारी सुद्धा पडतात. सकाळी उठून अंघोळ केल्याशिवाय आपली दैनंदिन दिनचर्येची कधीही सुरुवात करू नये. अंघोळ केल्यामुळे आपल्यातील आळस नष्ट होऊन उत्साह निर्माण होतो. काही काही लोक तर केवळ आळशीपणामुळे अथवा “आज फारच थंडी आहे”, असे काहीतरी कारण पुढे करून दोन-दोन, तीन-तीन दिवसही अंघोळच करीत नाही.

 

३) कपड्यांवरूनही व्यक्तीची किंमत केली जाते.

always wear good and clean cloths

आपल्या कपड्यांवरून अथवा आपल्या पेहरावावरूनच आपली प्रथमदर्शनी ओळख पटते, अथवा किंमत केली जाते. आपल्या अंगावर आपल्या व्यक्तिमत्वाला, आपल्या शरीराला तसेच आपल्या व्यवसायाला अनुरूप असतील असेच कपडे असावेत. तरच लोक आपल्याला खऱ्या अर्थाने ओळखू लागतील. आपल्या अंगावर मळके अथवा फाटके कपडे असतील तर लोक आपला मनातून आदर न करता तिरस्कार करू लागतील. म्हणून आपले कपडे कितीही स्वस्त आणि साधे असतील तरीही हरकत नाही, परंतु ते स्वच्छ धुतलेले मात्र असावेत. आपले कपडे कुठे फाटलेले अथवा उसवलेले असतील तर ते व्यवस्थित शिवलेली ही असावेत. कपडे धुतल्यानंतर त्या कपड्यांना नेहमीच प्रेस करा. त्या कपड्यांची व्यवस्थित घडी करून ते कपडे कपाटात ठेवून, आवश्यकतेनुसार वापरावेत.

तसेच आपल्या व्यवसायाला अनुरूप कपडे आपण वापरले नाही तर त्याचा आपल्या व्यवसायावरही निश्चितपणे वाईट परिणाम होतो.

उदा – निष्णांत वकील पायजामा, नेहरू शर्ट, गळ्यात रुमाल, गांधी टोपी घालून कापडी शबनम बॅगमध्ये आपली कागदपत्रे ठेवून कोर्टामध्ये एक वर्षभर जरी जाऊन बसला तरीही त्याच्या कपड्यांकडे पाहून त्याला कुणीही एक साधे प्रकरण अथवा केस ही देणार नाही. त्या ऐवजी त्याच वकिलाने काळी पॅन्ट, पांढरा शर्ट, त्यावर काळा कोट, हातात ब्रिफकेस घेऊन तो जर कोर्टात बसला तर अनेक अशिल येऊन आपली प्रकरणे त्याच्याकडे देतील. असेच प्रत्येक व्यवसायाबद्दल असते, म्हणून आपल्या व्यवसायाला आणि व्यक्तिमत्वाला अनुरूप असेल असेच कपडे वापरावेत.

 

४) वाईट व्यसनांचा सक्तीने त्याग करा.

Abandon the bad addiction

 

तंबाखू, गुटका, धुम्रपान किंवा सिगारेट-पान, अतिप्रमाणात चहा किंवा कॉफी ही सर्व आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम करणारी व्यसने आहेत. पान किंवा तंबाखू खाणारी व्यसनी लोक कुठेही थुंकत असतात, अशावेळी त्यांच्याजवळ जी कुणी व्यक्ती उभी असेल त्या व्यक्तीला ह्या थुंकणाऱ्या व्यक्तीचा अतिशय राग येतो. त्यांच्या ह्या कुठेही थुंकण्याच्या क्रियेची इतरांना अत्यंत किळस वाटत असते, त्यांच्या तोंडाचा दुर्गंध येत असतो. एवढेच नाही तर तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीला निश्चितपणे गालाचा, जिभेचा अथवा घशाचा कँसरही होतो. ह्या कँसरमुळे तंबाखू, गुटका खाणारे तसेच धुम्रपान करणारेही अनेक लोक अवेळीच मृत्यूमुखी पडत असल्याचे दिसून येते.

 

५) मद्यपान करू नका.

avoid drinking alcohol

दारू किंवा मद्यपान करण्याची अनेक लोकांना सवय असते. सुरुवातीला कुण्यातरी मित्राच्या संगतीने दारू पिणारा व्यक्ती नंतर अधून-मधून दारू पिऊ लागतो, नंतर तर तो नियमितपणे दारू पितो, आणि पक्का दारुडा होतो. दारू पिल्यानंतर त्या व्यक्तीच्या मेंदूची कार्यशक्ती त्या वेळापुरती नष्ट होते, आशावेळी गाडी चालवत असतांना त्यांचा अपघातही होऊ शकतो. दारू पिणाऱ्या व्यक्तीला आपल्या व्यवसायाशी संबंधित कार्य व्यावस्थित करता येत नाही, म्हणून दारू पिणाऱ्या व्यक्तीला कुणीही आपल्या कामावर ठेवीत नाहीत.

दारू पिणाऱ्या व्यक्तीचा बाहेरचेच काय तर, त्याच्या परिवारातील लोकही सन्मान करीत नाहीत. दारू पिणारा व्यक्ती आपल्या परिवारातील लोकांसोबतही नेहमीच भांडणे करीत असतो, यामुळे खूप लोकांचे घटस्फोटही झालेले असतात.

दारू पिणारे लोक सांगतात की, दारूमुळे त्यांची थकान दूर होतो, चांगली भूक लागते, सर्व चिंता मिटतात, परंतु असे काहीही होत नाही. उलट दारूमुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यात नवीन-नवीन चिंता, संकटे आणि अनेक आजार निर्माण होतात. एवढेच नाही तर दारू पिणाऱ्या अनेक लोकांचे घर-संसारही दारूमुळे उध्वस्त झाल्याचे दिसून येतात. म्हणून चांगले जीवन जगण्याची इच्छा ठेवणाऱ्याने दारूला चुकूनही कधीच स्पर्श करू नये.

 

६) जास्तीत जास्त लोकांशी मैत्री किंवा चांगले संबंध ठेवा.

Keep friendship or better relations with the majority of people

आपल्या जेवढ्या जास्त लोकांशी ओळखी असतील, त्यापैकी अनेक लोक आपल्याला जाणते अजाणतेपणी काही ना काही तरी मदत किंवा सहकार्य करीतच असतात. आपल्या उद्योग व्यवसायाच्या संदर्भातही आपल्याला आपल्या ओळखीच्या लोकांमार्फतच मदत किंवा सहकार्य होत असते. आपण इतरांना मदत व सहकार्य केले तर इतर लोकही आपल्याला मदत व सहकार्य करतील. म्हणून शक्यतो जास्तीत जास्त लोकांशी मैत्रीचे किंवा ओळखीचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा.

 

७) बाहेरचे दुषित अन्नपदार्थ खाणे टाळा.

avoid eating outside food

घरी शिजविलेले शुध्द, सात्विक आणि ताजे अन्न योग्य प्रमाणात घेतल्याने कधीही कुणीही आजारी पडत नाही. जेव्हा जेव्हा कुणी तरी आजारी पडतो, तेव्हा त्याची आजारपणाची कारणे शोधली तर त्यावेळी त्याने बाहेरचेच काहीतरी दुषित अन्नपदार्थ किंवा पाणी घेतल्याचेच आपल्याला दिसून येते. बाहेर हॉटेलमधील जेवण किंवा अन्नपदार्थ कितीही रुचकर, चविष्ट अथवा स्वादिष्ट वाटत असतील तरीही त्याच्या शुद्धतेची, स्वच्छतेची, ताजेपणाची तसेच गुणवत्तेची काहीही शाश्वती नसते. हॉटेलमध्ये स्वयंपाक करणारे जे नोकर असतात, ते किती स्वच्छ असतात? हे आपण एकदा तिथे जाऊन पहिले तर आपल्याला त्यांनी शिजविलेले जेवण घेण्याची कधीच इच्छा होणार नाही. हॉटेलमध्ये अगदी उघड्यावरच भजे, वडापाव, चिवडा, आलुवडे, सामोसे इत्यादी पदार्थ ठेवलेले असतात. त्यावर माशा घोंगावत असतात, हेच पदार्थ ग्राहकांना देण्यात येतात. हॉटेलमध्ये पिण्याच्या पाण्याचा ड्रम किंवा जो हौद असतो त्याच्या स्वच्छतेकडे सहसा कुणाचेच लक्ष नसते. त्याशिवाय चिकन बिर्याणी, चिकन मसाला, कंटकी यासारखे पदार्थ एकदा सकाळी शिजवून ठेवली की मग दिवसभर त्यालाच पुन्हा-पुन्हा गरम करून ग्राहकांना देण्यात येतात. तसेच हे सर्व बनविण्यासाठी हलक्या प्रतीचे तेल वापरण्यात येते. ह्याच पदार्थांच्याच काय तर हॉटेलमधील जेवणाच्या कोणत्याच इतर पदार्थाच्याही शुद्धतेची, स्वच्छतेची, ताजेपणाची अथवा गुणवत्तेची काहीच खात्री नसते. आजारी न पडता चांगले जीवन जगण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांनी बाहेरचे दुषित अन्नपदार्थ खाणे कटाक्षाने टाळा.

 

८ ) स्वतःला तंदुरुस्त ठेवा.

Keep yourself fit and healthy

सकाळी लवकर उठून आपल्या शरीराला सहजपणे करता येईल, असा व्यायाम केला पाहिजे. शरीर तंदुरुस्त ठेवण्याकरिता अनेक लोक योगासने करतात. योगासने कशी करायची? हे कुणाकडून तरी व्यावस्थित शिकून घ्या. योगासनांमुळे आपल्या शरीराला व्यायाम मिळून आपले शरीर तंदुरुस्त राहाते. दिवसभर आपल्याला काम करतांना उत्साह वाटतो. त्यासोबतच सकाळी तीन-चार किलोमीटर थोड्या वेगात चालण्याहेही आपल्या शरीराला चांगलाच व्यायाम मिळतो. त्याशिवाय सकाळी चार-पाच किलोमीटर सायकल चालविण्याचा व्यायामही करता येईल. आपल्याला आवडेल आणि आपल्या शरीराला झेपेल असाच व्यायाम आपण नियमितपणे केला पाहिजे.

 

चांगले जीवन जगण्याची इच्छा ठेवणाऱ्याने वरील आठ गोष्टींचे कटाक्षाने पालन केलेच पाहिजेत. ह्या आठ गोष्टींचे पालन करण्याकरिता आपली दृढ इच्छाशक्ती असणे अत्यंत आवश्यक आहे. आपली दृढ इच्छाशक्तीच आपल्याला वाईट गोष्टींपासून दूर ठेवून चांगल्या गोष्टी करण्याकरिता प्रेरित करीत असते.

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!